कोरोना देतोय बहिष्कृत भारताचा अनुभव!

-नितीन पखाले

‘ताई, मी तुमच्या घरी काम करते म्हणून फ्लॅटमध्ये राहणऱ्या त्या बाईनं आजपासून कामावर येऊ नको म्हणून सांगितले. तिने कामाहून कमी केलं म्हणून फ्लॅटमधील आणखी तीन घरांमधील काम बंद झाले. या बायांचे ऐकून एका मोठ्या घरातील पंधराशे रूपये महिन्याचा झाडू-पोछा बंद झाला. सहा हजार रूपयांची कामं हातातून गेली ताई! घर कसं चालवावं? सारे प्रश्नच उभे केले बुहाऱ्या कोरोनानं!’
‘हो पण झालं काय?’
‘काही नाही जी, तुमच्या इथचे काकाजी कोरोनानं गेले, म्हणून मले कामावर येऊ नको म्हणते.’
‘पण आमचे बाबा तर ठणठणीत आहे. कोरोनाने गेले ते आमचे चुलत सासरे, दुसरीकडे राहणारे होते. आम्ही सर्व कुटुंब खबरदारी म्हणून जाणीवपूर्वक क्वारंटाईन झालो.’
‘सांगितलं त्यायले, पण मानालेच तयार नाही. म्हणलं आता त्या काकाजीलेच घेऊन येतो सोबत. मंग ठिवजा कामावर.’
‘अगं मग, आमच्याकडचे काम सोडायचे होते, नुकसान नसते झाले तुझे.’
‘तुमच्या इथचे कावून सोडू जी! तुमच्या घरात थोडीच कोरोना झाला कोणाले?’

गेल्या आठवड्यात नात्यातील एका व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर आमच्या घरी धुणंभांडी करायला येणाऱ्या ताईंच्या रोजगारावर ‘सुशिक्षित’ महिलांनी असे गंडांतर आणले. अर्थात खबरदारी, काळजी म्हणून त्या महिलांचे काही चुकले नाही. पण आपण ज्या कारणासाठी या गरीब कष्टकरी बाईचा रोजगार हिरावून घेतोय, त्याबद्दल जरा खातरजमा करून निर्णय घेतला असता तर, त्या ताईंची आता पुढे कसं? या जीवघेण्या विवंचनेतून सुटका झाली असती.
भारतात कोरोनाने उग्र रूप धारण केले तेव्हापासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोरोनाच्या भयछायेतून गेलेल्यांच्या वाट्याला ‘बहिष्कृत’ जीणे आले आहे. संपूर्ण मीडियात सुशांत, रिया, ड्रग्ज या फाईव्हस्टार पेड इव्हेंटचा रतीब असताना कोरोना पुरस्कृत बहिष्कृत भारताकडे कोणाचे फार लक्ष नाही. मात्र कोरोना संसर्गाने आपल्या सर्वांनाच पुन्हा बहिष्कृत भारतात आणून ठेवले हे खरे आहे.

या बहिष्काराच्या वेदना, ही कोरोना फरफट सोसल्यावरच जाणवते. या बहिष्कारासाठी तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय केवळ कोरोनाबाधित असायला हवे, एवढीच अट आहे. कोरोनाने समाजातील उच-नीच, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरूष आदी सर्व भेदाभेद संपविले. सर्वांना एकाच रांगेत आणून बसविले. एरवी शासकीय रूग्णालयांची पायरी न चढणाऱ्यांना आता या महामारीत हीच रूग्णालये देवालये भासू लागली. मनुष्याला कोरोनाने जीवनाकडे निर्माेह वृत्तीने बघण्याचा संदेश देतानाच भयाने पछाडलेला बहिष्काराचा व्हायरसही सर्वांच्या डोक्यात सोडला, ही वस्तुस्थिती आहे. जरा आपल्या आजुबाजूला कोरोनाच्या संसर्गात असलेल्या किंवा त्यातून बाहेर पडलेल्या व्यक्तींकडे किंवा कुटुंबांकडे जरा निरखून पाहिले तर कोरोनाभयातून उद्भवलेल्या बहिष्काराच्या अनेक घटना निदर्शनास येतील.

कायम माणसांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे एक उभरते युवा नेतृत्व. गल्लीपासून मुंबईपर्यंत पक्ष आणि सत्तेतील लोकांमध्ये उठबस. पण महिनाभरापूर्वी या युवा नेत्याच्या कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला. प्रारंभी घरातील वृद्धांना या संसर्गाने वेढले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना नागपूर, मुंबई येथे महागड्या दवाखान्यांत उपचारासाठी ने-आण करताना हे युवा नेतेही  पॉझिटिव्ह झाले. ही वार्ता कार्यक्षेत्रात कानोकान झाली आणि कायम गराड्यात राहणाऱ्या युवा नेत्याच्या वाट्याला अनपेक्षित एकाकीपण आले. कोरोनाच्या भीतीमुळे कार्यकर्त्यांनी टाकलेला बहिष्कार या युवा नेत्याला प्रचंड अस्वस्थ करणारा ठरला. अशीच अवस्था एका मोठ्या उद्योगपतीच्या वाट्याला आली. कोरोनाचे निदान झाल्यावर या महाशयांनी दुसऱ्या जिल्ह्यात खासगी हॉस्पीटलमध्ये महागडे उपचार घेतले. उपचारांची शिकस्त झाली.अखेर या जीवघेण्या कोरोना हल्ल्यातून ते सहिसलामत आपल्या घरी पोहचले. घरी पोहचताच हे घरच आपल्यासाठी अनोळखी आहे की काय? अशी शंका त्यांना कुटुंबातील सदस्यांच्या वर्तणुकीतून यायला लागली. खुद्द पत्नी, मुलं, भाऊ सारेच अपरिचितासारखे वागत असल्याचे बघून पैशांची प्रचंड श्रीमंती असलेले हे उद्योजक क्षणात कंगाल झाले. आपले कुटुंबियच कोरोनाच्या भीतीने आपल्यावर असा अघोषित बहिष्कार घालतील, असा विचार त्यांनी कधी स्वप्नातही केला नव्हता. त्यात मागतील तेवढे पैसे द्यायला तयार असताना कोणीही कोणतेच काम करण्यासाठी घरी यायला तयार नसल्याने या कुटुंबाची वाढलेली चिडचिड त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारी ठरत आहे.

कोरोनामुळे व्यक्तीवर, कुटुंबावर, समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याच्या अशा कितीतरी घटना आपल्या आजुबाजूला दररोज घडताहेत. कोरोना संसर्ग अघोषित बहिष्कारासाठी ‘निमित्तास कारण’ ठरत आहे. धुणंभांडी करणारी ही ताई किंवा सोबतची ही उदाहरणे आपण या विज्ञानयुगातून पुन्हा वैचारिक अंधारयुगाकडे वाटचाल करतोय का, हा प्रश्न आपल्या मनाला विचारण्यास भाग पाडतील. यापूर्वी कुष्ठरोग किंवा एचआयव्ही -एड्स या रोगांमध्ये रूग्णांना कौटुंबिक, सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. आजही करावा लागतो. पण कोराना भयातून उत्पन्न झालेला बहिष्काराचा विषाणू कौटुंबिक जिव्हाळा, मानवी नातेसंबध यातच भेदाभेदीची भिंत उभी करू पाहतोय. घरातील व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले तर त्याच्या अंत्यसंस्कारासही कुटुंबातील सदस्य जीवाच्या भीतीने उपस्थित राहत नसल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. कोरोना संसर्गामुळे घरातच ‘विलग’ राहिलेल्या अनेक व्यक्तींचे या काळातील अनुभव तर अंगावर शहारे आणणारे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल १९२७ मध्ये ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरू केले होते. त्याकाळी देशातील उच्चवर्णीय लोकं धार्मिक आणि जातीय कारणांनी कनिष्ठ वर्गाचा प्रचंड मानसिक, शारिरीक छळ करीत असत. भारतातील ही अस्पृश्यता मिटावी म्हणून अनेक समाजसुधारकांनी जनजागृती करून महत्वाचे योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकातून समाजाच्या बहिष्कृत मानसिकतेवर प्रचंड प्रहार केले. पण कोरोना महामारीने आज ‘पुन्हा बहिष्कृत भारत’ अनुभवण्याचा दुर्दैवी प्रसंग देशवासियांवर आणला आहे. २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात देशातील शैक्षणिक, वैचारिक, वैज्ञानिक प्रगती बघता या कोरोना भयछायेतून येणऱ्या बहिष्काराच्या मानसिकतेत अडकण्यापेक्षा समाजाकडून, कुटुंबियांकडून कोरोनाग्रस्तांना सौहार्दाची, मदतीची, सहकार्याची, प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि कोरोनाला हरवून रिपोर्ट निगेटिव्ह येण्यासाठी सकारात्मक विचारांच्या आधाराची खरी गरज आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने कदाचित उद्या आपणही या बहिष्काराच्या निमित्तास कारण ठरू शकतो!  बघा विचारू करून, स्वत:त सकारात्मक बदल करण्याची संधी अजूनही आहे!

फोटो : प्रातिनिधिक

© (लेखक दैनिक ‘लोकसत्ता’ चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी व दैनिक ‘मतदार’ यवतमाळ आवृत्ती संपादक आहेत)

9403402401

Previous articleक्रांतीच्या टाळांची चिरविश्रांती
Next articleम्हसवड-इस्लामपूर: मूलखाचं भावविश्व व्यापणारी एसटी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here