पुरूष: रोस्टेड सॅण्डवीच

मीडिया वॉच दिवाळी अंक- २०१६

-हिनाकौसर खान-पिंजार

समवयस्क पुरूषा, विषय तसा गंभीर आहे. आजूबाजूला तुला पाहताना जे काही मनाच्या पटलावर यायचं, आज त्याची उजळणी करत तुझ्याचसमोर मांडायला म्हणून बसलेय. म्हणजे असं नाही की, मी याआधी बोलले नाही. काही वेळा बोलून दाखवलं, मतभेदांच्यावेळेस कडकडून भांडणं ही केली तर काही वेळा दुर्लक्षानं मारलं. काही वेळा तर तुला ‘गया गुजरा, समज’माफ केलं. तर! तुझ्याविषयी बोलायला इथं बसलेय. त्यामुळं माझ्यासाठी हा फारच गंभीर मामला आहे. सरळ सरळ तुझं डिसेक्शनच करायचं आहे ना. उगीच चिरफाड नाही हां. आणि छे, छे! मला, तुला काही आरोपीच्या पिंजऱ्यातही उभं करायचं नाहीये. सगळं चूक आणि सगळं बरोबर यामध्येही अनेक शेडस् असतात. त्या अधेमधे तुला धडपडताना पाहिलयं. त्यामुळं तू उगीच असा गैरसमज करून घेऊ नकोस की आता स्त्री, डिसेक्शन करणार म्हणतेय तर तुझ्यावर केवळ आरोपांचीच फैरी उडणार. निसंशय ’कानखिचाई’ होईल….आरोपही, पण कौतुक करण्यासारखं काही असेल तर त्याकडं दुर्लक्ष नाही करणारं हे ही खरं. सो, रिलॅक्स!

मी हे सगळं सांगतेय आणि सांगणार आहे ते, अर्थात मला तू जसा कळत गेला तसाच. विश्वास ठेव, उगीच मिर्चमसाला लावून काहीही सांगणार नाही. मला तू जसा भेटला, कळला, जाणिवांच्या तळाशी पोहचलास तसाच सांगणार आहे. त्यानिमित्ताने मलाही उलगडत जाईल मी तुला किती ओळखायला लागले.

कसं आहे ना, तू स्वत:ला फार गंभीरपणे घेत नाहीस. तुला उगाच वाटत राहतं, तू एकदम ठीकठाक आहेस. अतिशय समजूतदार, सशक्त, सबल अन हो परिपूर्णही. म्हणून म्हटलं जरा सांगावं तुला तू समजतोस तितकं कॅज्युअली घेऊ नकोस स्वत:ला. सशक्त असल्याचा अवडंबर तर नकोच नको. काही फरक पडत नाही आपण थोडे भित्रे, भावूक, कमकुवत आणि अपूर्ण आहोत हे मान्य केल्याने.  अपूर्ण असल्याची जाणिव माणसाला पुर्णत्वाचा ध्यास घ्यायला लावते. मला सगळचं कळत, जमतं हा तुझा अतिरेकी भाव तू थोडा कमी केलास तर तुला अधिक स्वच्छ नजरेने आसपासच्या लोकांकडे पाहायला जमेल विशेष करून स्त्रियांकडे. आणि भावनाशील असण्यात गैर ते काय? डोळ्यांतून थोडे आसवे निघालेच तर लगेच तु काही रडूबाई होत नाहीस आणि या त्या कारणाने तुला रडायला आलं तरी उगीच ‘आपण मुलगा/पुरूष आहोत असं रडणं बरं नव्हे ’ म्हणून स्वत:ला दटावण्याची गरज नाही. तसं आता आता  ‘मुलं कुठे रडतात’ या वाक्यातील तुझीच गोची तुला बाजूला ठेवता येतेयं हे चांगलचं आहे. एकतर यामुळे तुला मोकळं होणं सोपं जातयं.  तुझं भावनिक होणं, हळवं होणं, डोळ्यांतून अश्रू काढणं हे तुझ्यातील जिवंतपणाला अधोरेखित करतं. त्यामुळे तसं होत असेल तर लपवू नकोस अन बाऊही करू नकोस.

आत्ताचा तू, माणूस म्हणून ही बरा वाटतोस. म्हणजे माणूसपणाच्या मोठ्या कक्षेत स्वत:ला सामावून घेण्याची तुझ्याकडं प्रचंड ताकद आहे, पण अजून तुलाही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. सध्या तुझं तळ्यात मळ्यात सुरूयं. पण तुझं अगदी वाईट माणूस असण्यापेक्षा बरा माणूस असणं केव्हाही फायद्याचंच. ते मला आवडतं, मनापासून. बदलत्या काळानुसार, तूही बदलत चालला आहेस. मर्दुमकीच्या, मर्दांगीच्या तुझ्या व्याख्या तुच बदलू लागला आहेस. आई, बहिण, मुलगी, पत्नी यांच्या संरक्षणाची, खाऊ-पिऊ घालण्याची जबाबदारी फक्त तुझीच हे किती खोटयं हे तुझ्या लक्षात आलयं. पुरूषीपणा अगदीच गळून पडला नसला तरी ते काही खरं उरलेलं नाही. पुरूष आणि पुरूषचं सगळं करू शकतात हे भ्रामक आहे, कवीकल्पनेसारखं आहे, ही गोष्ट तुला पटलीये. तुझ्या मनावर पूर्वापार गोंदवलेला हा संस्कार म्हणजे भ्रमाचा मोठा भोपळा असल्याचं तुझ्या लक्षात आलयं, ते बर झालयं.

आता, मुलींनी शिकू नये, घरातच रहावं असं काही तुला वाटत नाही. त्याची तीव्रता खूपच कमी झाली आहे. मुलींशी मैत्री करावी असा खुलेपणा तर तुझ्यात आलाय ही.  मुली म्हणजे काही तरी तिसरं जग आणि नुसतं दुरून न्याहाळणं,  त्यांच्यावर कॉमेंट करत रहाणं आणि आपला शत्रूपक्ष असल्यासारखं तिच्याशी वागणं हे काही तुला बरोबर वाटत नाही, हे चांगलयं. म्हणजे कित्येकदा स्त्रीयांवरच बेतलेले विनोद असतात. असे विनोद तुला अगदी वर्ज्यच झालेत असे नव्हे आणि तुला ते आवडतही नाही असंही नाही. उलट स्त्रीची अक्कल काढणारा किंवा खिल्ली उडवणारा एखादा मेसेज आला, तो पटला की तू पण लगेच तो तुझ्या इतर मित्रांनाही पुढे पाठवतोसच की. पण हे करून सवरूनही तू, स्त्री फक्त विनोदापुरतीच असते यापलिकडे आला आहेस हे मी नाकारणार नाही.

तुझ्या दृष्टीनं ती एक मजा असते किंवा आपल्या आसपासच्या वातावरणात हलकं फुलकं वातावरण तयार करायला ते तुला बरं वाटतं, कदाचित सोपं वाटतं. स्त्रीयांवर फुटकळ विनोद करणं चूकच पण कसयं तू एक पाऊल पुढे येतोस तर आम्हीही येते ना. आताशा आम्हीही हसू लागलेय अशा विनोदांवर. कारण विनोदांना विनोद म्हणूनच घेण्याइतकी माझी विनोदबुद्धी प्रगल्भ आहे. (विनोदातून तरी तूला ती मान्य नाही असं दिसत असली तरी.) असो. विनोदातल्या स्त्रीवर तू कितीही हसत असलास तरी प्रत्यक्ष तिला हसण्यावारी घ्यायचं नसतं ही तुझी समज आता वाढीस लागली आहे आणि ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. इतकचं काय, स्त्रिया म्हणजे मन रिजवणारं एक पात्र असा विचार तू कधीचाच मागे टाकलायेस. तुला आता त्यांच्या केवळ वरवरच्या र्सौदर्याची नव्हे तर स्वभावाची, कर्तृत्वाची भूरळ पडू लागली आहे.  एकूणच काय, स्त्रीया म्हणजे काय ब्याद आहे हे तू आता चुकूनही उच्चारणार नाहीस. उलट मैत्रिण म्हणजे एक चांगली सोबत असं तुझ्या विचारात होऊ लागलेलं परिवर्तन सुखावणारचं. मुलींसोबत बिनधास्त वागाय-बोलायला तुला आवडतं म्हणजे तुला आवडतचं होतं. मुलीचं तेवढ्या मोकळ्या होत नव्हत्या पण आता आलाय त्यांच्यातही बिनधास्तपणा. त्यामुळे एकदम सच्चे मित्र-मैत्रिणीं असणार्‍यांची संख्या वाढलीये. त्याचं बरचंसं श्रेय तुला. तू तिला नीट समजून घेऊ लागलास, तिच्या जाणिवांपर्यंत उतरण्याचा किमान प्रयत्न करू लागला, मुख्य म्हणजे तिचा आदर करू लागलास म्हणून तीही हात पुढे करू लागली. मैत्रीची वीण गुंफू लागली. हळूहळू मैत्रीतील स्त्री-पुरूष भेद ही गळू लागले. तूझ्यातही मैतर आहे, शेअरींग होऊ शकते, सर्व प्रकारची सुख- दु:ख, तुझ्याशी शेअर होऊ शकतात हा आत्मविश्‍वास तू स्त्रीयांना देऊ शकलास. सारखं आपलं पुरुषी पार्टनर बाहेर काढून अरेरावी, दमनशाही, कमी लेखणं या गोष्टी तूही तुझ्या स्मृतीआड करू लागलायेस. खोट्या मर्दुमकी वागण्याचा विचारही तुला असभ्य वाटू लागलाय, हे खरचं छान आहे.

तुला ही कळलयं, मैत्रीच्या सौख्यामध्ये स्त्री आणि पुरुष असं लिंगधिष्ठित काहीही आडवं येत नसतं. पण तू स्त्री-पुरूष यांच्यातील जैवशास्त्रीय ही बदल समजून घेत आहेस. स्त्रीयांच्या मासिक त्रासातील प्रत्येक वेदनेची कळ कळायला लागली आहे. अशा त्रासांच्या दिवसात ‘आऊट ऑफ नर्व्हसनेस’ मुली चिडचिड्या होतात हे ही तुला कळतयं. फिरायला जाताना वगैरे तू आता अशा गोष्टी मनाच्या तळाशी ठेवतो. त्यामुळे त्यापद्धतीने हवं नको ते पाहणं ही तुला जमतं. अर्थात, तुझ्यातले काही महाभाग मासिक त्रास आणि त्याविषयीच्या एकूण अर्धवट माहितीवर काहीतरी नॉनसेन्सही बोलत राहतात, ते ऐकणं असह्य असतं. त्यांच्यासाठी हे जरा गमंतीचे विषय असतात. फुकट चर्चा करावी असं खूप वाटत असतं. नॅपकिन्स, मुलींचे न्हाऊन येणं यावर काहीबाही बरळत राहणं त्यांना आवडतं. तिचा हॅपी बर्थडे आहे, लाल शाई टपकते, दाग अच्छे होते अशा शब्दांत त्रासाचे वर्णन करत राहतात, याचा त्रास होतो. पण समजून घेणार्‍यांची संख्या वाढलीये हे निश्‍चित.

तुला, स्त्री-पुरूष समता, बरोबरी वगैरे सगळचं पटलयं की नाही ते नाही ठाऊक. कळलयं की नाही हा ही मुद्दा आहेच. मुळात ते स्त्रीयांना तरी किती कळलयं याचाही तपास करावा लागेल. पण आपण काय एकमेकांचे परस्पर शत्रू थोडीच आहोत, की सतत आपपला फणा काढून तयार रहायला. समतेच्या गोष्टी करायच्या म्हणजे स्पर्धा करायचं पाय खेचत रहायला, असंही नाही. समता येईल तेव्हा येईल. तूर्तास आपण एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकांशी संवाद ठेवला तरी पुरेच की! त्याप्रकारची समज तुझ्यात वाढायला लागली तशी माझ्यातही. नुसती तुझ्यात, नुसती माझ्यात म्हटलं तरी पुन्हा घोळच. मैत्रिणी-मैत्रिणी आणि मित्रा-मित्रातल्या नात्यातील खुलेपणा मित्र-मैत्रिणीच्या नात्यात आलयं हे किती छान. हे छान नातं कुटुंबातही मान्य हे त्याहून छान. तुझ्या आधीच्या पिढीतील जमातीला आणि माझ्या आधीच्या पिढीतील जमातीला इतकं खुलेपणं मिळालं नसेल ते आत्ता मिळतयं इतकंच नव्हे तर त्याच आधीच्या पिढ्या मान्य, स्वागत करतात याचीही आपल्याला नोंद घ्यायालाच हवी की.

मी लहान होते तेव्हा माझ्या आत्याला किंवा मावशीला मित्र आहे ही गोष्ट माझ्या वरिष्ठ कुटुंबियांना अप्रुपाची वाटायची. शंभर शंका आणि सूचना दडलेल्या असायच्या. वर घराबाहेर नव्हे तर घरात बसून बोला असा अन या प्रकारचा सल्ला असायचा. इतकं दडपण, इतकं लक्ष असायची की वैतागून त्यांना अशी मैत्रीच नको वाटायची. मलाही लहानपणी तुझ्याशी मैत्री वगैरे या शब्दाची सुद्धा भीती वाटायची. तुझी ओळख करून देण्याची अगदीच वेळ आली तर चाळीतला, शाळेतला असे शब्द मी वापरायचे. पण अमूक तमूक माझा मित्र. केवढ अवघड वाटायचं. खरं तर, मित्र म्हणजे कोणी जिवलगा असल्यासारखचं इतरांचं तोंड व्हायचं. नजरा तर जणू एक्सरे मशीन होऊन आपल्या मनात नेमकं काय आहे (त्यांच्या दृष्टीनं काळबेरं ) हे तपासयला धडपडायच्या. एकूणच काय, मुलीला मित्र आणि मुलाला मैत्रिण असू शकते यावर आपल्या लहानपणीच नीटसं एकमत नव्हतं ते आता किती मस्त गळून पडलयं. आता सांग बर, आपल्या घरात आपल्याला एकमेकांना जरा तरी मज्जाव आहे का?  त्या अर्थी तुझ्यावर विश्‍वास टाकावास इतका तू बदलला आहेस. तुलाही स्वत:ला मैत्रिण पटते तशी बहिणीला मित्र असतो हे कळलयं. इतकंच काय तर बायकोलाही मित्र असूच शकतो आणि त्यांच्यात तुझ्या-तिच्या नात्यापेक्षा घट्टमुट्टं काहीतरी असू शकतं हेही समजून चुकलयं.

त्या अर्थी भाऊ म्हणूनही बराच मॅच्युअर झाला आहेस. बहिणीवर ‘लक्ष’ ठेवणं तुझं तू परम कर्तव्य समजत असलास तरी  ‘पाळत’ ठेवण्याची आता तुला गरज वाटत नाही. कॉलेज, ऑफिसमधून येता-जाता कसं वागावं हे जरी तू तिला सांगत असलास तरी त्यात तुझी काळजी असते. उगीच तुला, तिनं घराबाहेर मुळी जावचं कशाला? असे प्रश्‍न पडत नाहीत. शिवाय जगातलं सगळंच कळतं आणि सगळेचं कसे तिच्यावर डोळा ठेऊन आहेत अशा प्रकारचा भंपकपणा त्यात नाही. वाढत्या, असुरक्षित जगण्यात ती सुरक्षित असावी अशी एक प्रांजळा भावना त्यात डोकावू लागली आहे. आस्था, काळजी आहे, घरालाच जुंपण्याचा दमनशाही विचार नाही. काही वेळा तर तुझ्यापेक्षा मोठी ताई असेल तर मग हाच रोल तिचा असतो. तिच्यासाठी तू अगदी छोटसं बाळ असतोस अन गर्दीत हरवून जाऊ नये म्हणून ती काळजी घेत असते. तिच्या या काळजी घेण्याला तूही समजून घेतोयेस, उगीच किरकिर करत नाहीस. भाऊगिरी वगैरे मुळी खपवलीही जात नाही.

आणखी एक गंमतीशीर गोष्ट आठवली. आताशा तुला ना गर्लफ्रेंडनं येऊन अमूक एक किती सॉलिड दिसतो आणि तमूक किती भारीये, त्याच्यावर क्रशच आहे असं काही सांगितलं तरी तू चिडत नाहीस. गर्लफ्रेंड असताना आपण इतर पोरींकडे पाहतोच आणि आपल्याला त्या तशा आवडतात अगदी तसचं गर्लफ्रेंडचं ही असतं. सहज. नैसर्गिक. हे तू किती मस्त स्वीकारू लागला आहेस. हा मोकळेपणा, हा समंजसपणा आवडतो. पझेसिव्हनेसच्या नावाखाली उगीचं स्वत:ची ही फसगत वा गोंधळ करत नाही की आपल्या गर्लफ्रेंडला ‘तू फक्त माझी’ म्हणत त्रास देत नाहीस.

तसं, नवरा म्हणून ही तुझ्यात विकास झाला आहे. पत्नी म्हणजे केवळ तुझ्यातील नराची शांती करणारी मादी नव्हे, हे तुला पटलयं. तसं अजून पती म्हणून तुझ्यातील पुरूषाचा बराच विकास व्हायचा आहे पण ही पत्नीला मादी नव्हे माणूस म्हणून गणण्याची सुरूवात तरी केलीस हे काही कमी नाही. तुझ्यातील मुलगा, भाऊ, मित्र या नात्यातील पुरूष बराच प्रगल्भ झाला असला तरी अजूनही पती म्हणून व्हायचा आहेस. बहोत लंबी दौड है…

असो, तरीही तुझ्याशी संवाद वाढलाय ते खरचं चांगलं आहे. विसंवाद टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा. ते होऊ लागला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही विषयावर. भरभरून रसिकतेनं तुला कथा-नाटक-चित्रपटांवर बोलायला आवडतं तसचं एखाद्या किचकट, तांत्रिक विषयावरही तू तिच्याशी संवाद साधत आहेस. खरं तर स्त्री आणि पुरूषांची शाररिक रचना जशी ठरली तशी मेंदू अन भाव भावनांचीही ठरली आहे. स्त्रियांना भावनिक गोष्टींत जास्त रस तर पुरूषांना तांत्रिक पण हे उलटपक्षी होणारच नाही हा आपण वर्षानुवर्षे साठवून ठेवलेला समज प्रवाही होत आहे. तांत्रिक गोष्टीत स्त्रीला रस नसेल पण म्हणून कळतच नाही असं नाही ना. शिवाय ती प्रयत्न करत असेल समजून घ्यायचं तर हरकतच नसते, बोलायला. संवादाच्या पातळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारे वाढल्या आहेत. तसं तूला ते बोलावसं, शेअर करावसं वाटतं, तिलाही ते तसचं वाटतं ही खास गोष्ट वाटते. ‘बायकांना मुळी काही कळतचं नाही‘ या वाक्याच्या बर्‍याच पुढे गेला आहेस. याउलट, तुझ्याशी सुरू झालेल्या या सम्यक संवादातून आश्‍वासक वाटू लागलयं.

संवादच नव्हे तर कौतुकाचा संवादही सुरू झाला आहे. सहजगत्या तिच्या कामाचंही कौतुक तुला जमतयं. नुसतं पुरूषीपणातून न पाहता समोरच्या बाईचं काम कौतुक करण्यासारखं असेल तर ते तू मोकळेपणाने करू लागला आहेस.  तिच्यावर विश्‍वास ठेवू लागला आहेस. याउलट तिने पुढं जावं म्हणून तिला आग्रह करू लागला आहेस. तिच्यातील शक्तीस्थळं सांगू लागला आहेस. ‘स्वोट’(swot)  अ‍ॅनालिसीस करून सांगू लागला आहेस. सोबत हवी का, मदत हवी का असंही विचारू लागला आहे. पण काही वेळा ना, सहकारी म्हणून तिचं काम मान्य असतानाही बॉस म्हणून तिला अजूनही स्वीकारलेलं दिसत नाही. बॉस म्हणून एखादी स्त्री असली की ‘लूज टॉक’ सुरू होतो. पहिला घात तिच्या चारित्र्यावर होतो की ती या पदावर पोहचली याचा अर्थ तिनं तिच्या बाईपणालाचा निलाजरा फायदा उचलला असणार. ही मानसिकता अजूनही गेलेली नाही. पण सहकारीच्या क्षमतांची ओळख झालीच आहे तर हळू हळू तुला तिच्या पदोन्नतीचीही ओळख होईलच.

तुझं सॅण्डवीच झालयं का?

वर जे काही मी म्हणतेय ते ठीकेय रे पण मला सारखं-सारखं काय वाटतं माहितीये, तुझं ना सॅण्डवीच झालयं. पारंपरिक पुरूषपणाचं जोखड एकीकडे आणि आधुनिक विचारसरणींच्या श्रृंखला एकीकडे. तुला पौरूषत्वाच्या खोट्या, बेगडी कसोट्यांवर खरं-खोटं काहीचं उतरायची इच्छा नाहीये अन दुसरीकडं आधुनिकीकरणाचा सर्वार्थाने, सर्वशक्तीने स्वीकारही होत नाहीये.

तू असा मध्येच अडकलायस.

पूर्वीच्या म्हणजे, बाबा, आजोबांच्या काळातल्या लोकांना पुरेसे आधुनिक वारे लागलेले नव्हते त्यामुळे त्यांची ‘सोय’ हा मध्यममार्ग ठरत होता.  स्त्रीयांनाही मन मारण्याचे संस्कार असायचेच. सहनशीलता, कुटुंबाला प्राधान्य अशा गोष्टींची बंधनंही स्त्रीयांनी स्विकारलेली होती. या सगळ्या गोष्टी तुझ्या आधीच्या पिढीच्या पथ्यावरच पडत होती. उदाहरण घ्यायचं झालं तर, समजा आधीच्या पिढीतील पुरूषाची पत्नी शिकलेली असली तरी तिने प्राधान्यानं घर सांभाळावं हा बहुतांश कुटुंबाचा अलिखित नियम असायचा आणि त्यामुळं नकळतपणे घरकाम व बाहेरकामांची विभागणी ठरलेली असायची. नोकरीवर पुरूष जाणार म्हणून त्याला घरातील कामं माफ असायची आता हीच परिस्थिती तुझ्याबाबत वेगळी का ठरतेय? तुझी जोडीदार नोकरी, व्यवसाय करते म्हटल्यावर आपोआपच घरकामातही तिच्याबरोबरीनं तू उभं राहणं आवश्यक आहे. तुला तुझ्या ऑफिसमधल्या सहकारी, मैत्रिणीं यांची दु:ख दिसत असतात.

घरची कामं करून थकून आलेल्या आणि पुन्हा ऑफिसमधल्या कामात उत्साह दाखविण्यासाठी एनर्जी गोळा करणार्‍या बायका दिसतात. शिवाय तुझा अट्टाहास असतोच, की त्या जर तुझ्या इतका पगार घेणार असतील तर त्यांनी नोकरीच्या कामातही 100 टक्के द्यायलाच हवं (अर्थात दुमत नाहीच यात. ) पण याचा परिणाम कौटुंबिक जबाबदार्‍यांवर होतो. त्या फक्त तिला ओढता येत नाहीत म्हणून मग ती तुझ्या मागे लागते. आता गोची काय होते, तुला हे शंभर टक्के कळलेलं आहे की, नोकरी करणं, बॉसला सांभाळणं, काम वेळेत पुर्ण करणं यासाठी किती मगजमारी करावी लागते. करिअरचा ग्राफ चढा ठेवण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात.

इतकचं नव्हे तर, संसारासाठी तीही पैसा उभा करते आणि घरच्या बहुतांश जबाबदार्‍यांमध्येही तिच उभी राहते. त्यामुळे तिला निव्वळ मदतीची नव्हे तर जबाबदारी घेणार्‍या मदतीची गरज आहे.

मैत्रिणींची गार्‍हाणी ऐकताना मनातल्या मनात तुलाही ठाऊक असतं मैत्रिणी देत असलेल्या शिव्या आपल्याही आहेत. तिच्या त्रासाची धग आपल्यालाही जाळणारी आहे पण ते तू तरीही तुला स्वत:च्या घरी काम करण्याचं मान्य होत नसतं. तू तिची मस्त सांत्वनाही करतो. तुमची जमातच कशी याबाबत ‘ढ’ आहे आणि त्यांनी कसं स्त्रियांच्या पाठिशी उभं राहण्याची गरज आहे वगैरे वगैरे वरं जोरकस भाषण ही ठोकतो. ते ठोकत असताना त्यातील बरेसचे मुद्दे तुलाही पटलेले नसतात कारण ते पटतात म्हटल्यावर तुला घरी जाऊन लगेच मदतीसाठी उभं राहणं भाग आहे ना पण प्रत्यक्ष कृतीत ते घडत नाहीत. तुला जबाबदारी नको असते. तुला वाटलं तर, वेळ असेल तर, मुड असेल तर, करावसं वाटलं तर तू ते करणार असा काहीतरी आर्विभाव असतो. त्याचा काही एक उपयोग त्या बिचारीला होणार नसतो कारण आजच टाकलेलं काम जर आधी सांगितलेल्या प्रकारात मोडणारं नसेल तर ते तसचं पडून राहणार असतं. तुला मदत करावीशी तर खूप वाटते पण जबाबदारीने नव्हेच.

काही वेळा तुला मदत करायची असते. मनापासून करायची असते पण कुटुंबातलेच म्हणत राहतात, तू काय अशी कामं करायला बाई आहेस. तुला का बायकोचा पुळका…वगैरे वगैरे. अशा वेळेस तुझ्या मनाचा कोंडमारा होतो. तुला बायकोच काय आईलाही मदत करायची असते पण ही काम पुरूषांची नाही, स्वयंपाकखोलीत तू पाय का ठेवावं अशी वाक्य कानावर पडून पडून तुझ्या मेंदूचं पारं भुस्कटं पडतं. काही वेळा काही सिलेक्टीव्ह कामांना मुभा असते. म्हणजे चिरणं, निवडणं, कुकर लावणं असं पण भांडी घासणं, फरशी पुसणं, कपडे धुणं ही काम तर हलक्या प्रतीची समजून ती तुला करायला लागणं म्हणजे जणू समस्त पुरूषजातीचा अपमानच, असं वागवलं जातं. यामुळे तुझ्या मनाचा गोंधळ उडतो. तुला जात्याच जबाबदारी घ्यायची इच्छा असतानाही पुरूषीसत्ताक मानसिकतेत वाढलेल्या स्त्रियाच तुझ्या पायापुढे डोंगराएवढे धोंडे ठेवून मोकळे होतात.

म्हणून म्हणतेय तुझं ना सॉलिड सॅण्डवीच झालयं. रोस्टेड सॅण्डवीच.

म्हणजे अनेक गोष्टी तुला स्त्रीयांच्या बाबतीत पटतात. पण प्रत्यक्ष कृती नकोय. ऑफिसमध्ये नोकरी करणार्‍या मुलीं-बायकांविषयी आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक वाटत असलं तरी तुलाच सतत शंका उपस्थित करण्यात मजा येते. बायकोच्याही कर्तृत्वाचं तुला फार कौतुक असतचं असं नव्हे पण आपल्या ऑफिसमधल्या बायकांना नोकर्‍या मिळूच नयेत असं एकीकडे तुला वाटतं असतं तर दुसरीकडे आपल्या बायकोची प्रमोशन कधी होईल याची चिंता लागून राहिलेली असते. ऑफिसमधल्या गरोदर सहकारी विषयी तुझ्या मनात संवेदनशील भाव असतात ही आता खूप चांगली बाब आहे. तिच्या गरोदरपणावर जोक्स करण्यापेक्षा तिच्या वेदना समजून घेण्याची मॅच्युरिटी तुझ्यात आलीये.  तिची दगदग होऊ नये, तिला बैठं काम द्यावं म्हणून तुही तिच्या बाजूने उभा राहतोस. किती छान आहे ही गोष्ट. पण तिला प्रसूतीच्या पगारी रजा म्हटल्यावर नाही म्हटलं तरी तुझी थोडीशी चिडचिड होते. दुसरीकडे खाजगी कंपनी म्हणून बायकोला फक्त तीन महिन्यांच्याच रजा का मिळतात, त्यांनाही सहा महिने मिळायलाच हवं असं तुझं दुसरं मन म्हणतं राहतं. आहे ना गमंत. सहकारीच्या पगारावर डोळा तर बायकोला सहा महिने का नाही म्हणून त्रागा.  तुझं हे असचं झालयं. एकीकडे तुझ्या संवेदना अधिक मजबूत होत आहेत तर दुसरीकडे तुझी ही प्रॅक्टीकल मेजरमेंटस् सुरू असतात. तुझं खरचं सॅण्डवीच झालयं.

आधी म्हटलयं ना, बायकोचा मित्र तुला पटतोय तरी तुझं हे सॅण्डवीच प्रकरण असल्यामुळे तुला कळतं पण वळत नाही अशीही काहीवेळा अवस्था होते. आपल्या मनातलं सारं काही सांगण्यासाठी खास मैत्रिणीची जागा तू एकीला देऊ केलीस, तरी तुला हे आपली बायको तिच्या कोणा खास मित्राजवळ तिचं मन उलगडते हे पचवायला अवघड जातं. किंवा आपली बायको कोणाची तरी खास मैत्रिण आहे ही कल्पना अजीर्ण होते. यातून काहीवेळेस संशयी वृत्ती ही निर्माण होते. मग तिचा मोबाईल तपास, व्हॉटसअ‍ॅप बघ असे प्रकार केले जातात. काही वेळेसं संशय नसेलही तरीही कामानिमित्त दिवसातील बराच वेळ  घराबाहेर असल्याने ती कोणाशी बोलते, काय बोलते हे जाणून घेण्याची इच्छा तुला रोखता येत नाही. त्यातील असुरक्षित भावनाही बळावयाला लागलीये. मित्र, सहकार्‍याशी बोलणं मान्यही असलं तरी कुठेतरी त्यावर वॉच ठेवण्याची ही सुप्त इच्छा याला तुझं सॅण्डवीच प्रकरणच जबाबदार. काही वेळा तर यातून उगीच मैत्रिण-बायको अशी तुलनाही करू लागलाय. मैत्रिणीशी अमूक तमूक विषयांवर बोलता येतं पण बायकोला त्यातलं कळतचं नाही किंवा बायको समजून घेत नाही पण मैत्रिण ते सगळं न बोलताही समजून घेते अशी तुलना करू लागलास. याचा त्रास अर्थातच तुला जास्त होऊ लागला आहे. दोन व्यक्ती कधीही सारख्या नसतात हे ठाऊक असतानाही तुझ्याकडून तुलना होतेच मग त्यातून बायकोशी भांडणं, चिडचिड ही गोष्ट घडत जाते. हे इथवरंही थांबत नाही. काही वेळा बायकोपेक्षा मैत्रिणच जवळची वाटू लागते आणि त्यातून वेगळा गोंधळ निर्माण होऊ लागतो. नात्यांमध्ये वितुष्टता निर्माण होऊ लागते. आजकाल तुझ्याबाबत, असं घडण्याची शक्यताही वाढू लागलीये.

आर्थिक व्यवहारांवरही तुलाच देखरेख करायची असते. असं का रे? बायकोचा पगार, त्याचं व्यवस्थापनं तुझ्याकडं राखून ठेवायला आवडतं. कैकवेळा तर तिचं एटीएमही तुलाच वापरायचं असतं. पत्नीच्या व्यवहारात सहभाग नोंदवू नये असं म्हणणार नाही पण तुझं याबाबत अतिक्रमण सुरू असतं. स्वत:चं एटीएम कार्ड तर कधीही तिला देववत नाही पण तिचं मात्र तुझ्याजवळच ठेवशील. किती शिल्लक, किती वजावट करायची हे ठरवशील. म्हणजे कसं झालयं की ती कमावती झाली तरी आर्थिक स्वतंत्र नाहीच ना. वडिल, नवरा, सासरा यापैकी कोणत्याही भूमिकेत तुम्हाला, तिच्या आर्थिक हालचालींची खबरबात हवीच असते. त्यामुळे नकळतपणे तिच्या खर्चाची दिशाही आधी घर-संसार अन मग हौस अशा रेषेत सुरू होते, यात ती कुठं तिचं मन मारतेय का याची साधी कल्पनाही नसते. ते ही तिचं कर्तव्य असा तू सरळसोट समज करून मोकळा होतोस. असा दुटप्पी भाव कशासाठी रे! तिला आर्थिक ही स्वतंत्र होऊ दे. तिचे आर्थिक निर्णय तिला घेऊ दे, मग बघ नातं कसं आणखी खुलेल.

नात्यावरून आठवलं, तसा तर तू आता तिच्याशी एकरूप होताना हळवेपणानं वागतोस. तिची इच्छा तपासतो. तुला प्रत्येक वेळेस तिच्या इच्छेनुसार राहणं जमतचं असं नाही पण तरीही तू अगदी थेट पुरूषीपणाने चढाई नाही करत. तिची मर्जी जाणून घेण्याची तसदी तरी घेतोच. तिच्या भावनांचा आदर करतो. तिच्या दुखत्या खुपत्या वेळांचा आणि वेदनांचा आब राखतोस. यात कुठेही तुला तुझ्या मर्दांगीला गालबोट लागतयं असं वाटत नाही. उलटं असं पुरूषांतलं हळवेपण कोणत्याही स्त्रीला सुखावणारचं असतं. पौरूषत्व आणि माणूसपण याची सांगड घालत जगण्याला सुरूवात झाली हे चांगलचं की.

शिक्षण-वाचन आणि डोळसंपणे जगाकडं पाहता पाहता तू असा माणूस म्हणून घडू लागला आहेस असं जाणवतयं. सॅण्डवीच होत असलं तरी जाणिवा तरी किमान प्रगल्भ होऊ लागल्या आहेत. जाणिवांत तरी माणूसपण, हळवेपण रूजू लागलयं हे काही कमी नाही. तू स्वत:च तथाकथित, बुरसटलेल्या पुरूषी मानसिकतेतून बाहेर पडू लागला आहेस. तुला व्यवस्थित कळलयं आपण एकमेकांचे दुश्मन नाही तर एकमेकांना पूरक होत जगणारे दोन प्रवाह आहोत.  तू चांगल्या अर्थाने बदलत चालला आहेस हे हवचं आहे आम्हाला. आपल्यातला फोल संघर्ष इथून पुढं कमी होईल असं वाटू लागलयं. आश्‍वासक संवादातून आशादायी भविष्याची अपेक्षा आहे. वैचारिक, मानसिक, भावनिक पातळ्यांवर असाच मोकळा ढाकळा हो. मग बघ आपले दोन्ही प्रवाह कसे एकमेकांना परस्पर पूरक ठरत जातील.

(लेखिका ‘साप्ताहिक साधना’ त कार्यरत आहेत)

9850308200

हे सुद्धा आवर्जून वाचा

कळालेल्या पुरुषाचा कोलाज-शर्मिष्ठा भोसले-  http://bit.ly/2qq4es1

लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?-योजना यादवhttp://bit.ly/2OopG8F

पुरुष असाही! पुरुष तसाही!- हर्षदा परब – http://bit.ly/2quw8TN

पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी- सानिया भालेराव- http://bit.ly/2r3YyUw

Previous articleपौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी…
Next articleजवाहरलाल नेहरू : सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.