पोल्ट्री व्यवसायातील पायोनियर- सुनील झोंबाडे

संतोष अरसोड

     वैफल्य हा शब्दच ज्याच्या शब्दकोषात नाही  असा एक तरुण. गाव खेड्याच्या मातीने ताकद दिलेला. राखेतील निखारे फुलवायचे कसे याचे बाळकडू  प्राशन केलेला. रिस्क घेणे हा त्याचा स्वभाव. त्याचा हा धाडसी स्वभावच त्याला देशभर घेऊन गेला. देशातील काही प्रांत अस्थिरतेच्या वणव्यात होरपळत असतानाही या तरुणाने आपल्या व्यवसायाचे नेटवर्क या अस्थिर प्रांतात स्थिर केले. व्यवसायाच्या या जगात तो अनेकदा कोसळला…. पुन्हा उभा झाला …..पुन्हा कोसळला अन पुन्हा उभा होतोय. वयाच्या ५१ व्या वर्षी सुद्धा त्यांच्या मनात दुर्दम्य आत्मविश्वास आहे. त्यांच  मन, मेंदू ,मनगट अजूनही मजबूत आहे. हा माणूस आपल्या आयुष्यात कधीच ढासळत नाही. तो अभेद्य असतो किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे. व्यवसायातील नवी नवी क्षितिजे त्याला खुणावत असतात. त्याचे पंख आसुसलेले असतात नवीन क्षितिजाकडे भरारी घेण्यासाठी. नव्या पाऊलवाटा आपल्या कर्तृत्वानं निर्माण करणारा हा माणूस आहे,अमरावतीचे सुनील शंकरराव झोंबाडे. पोल्ट्री व्यवसाय म्हणजे काय, तो कसा करायचा असतो याची भणक ज्या काळात विदर्भाला लागली नव्हती त्या काळात त्यांनी करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग या व्यवसायात उडी घेतली. या पोल्ट्री व्यवसायाची विदर्भात पहिल्यांदाच मुहूर्तमेढ रोवली ती सुनील झोंबाडे यांनी.

               बेचिराख झालेली स्वप्न पुन्हा साकारणारा सुनील झोंबाडे म्हणजे विदर्भाच्या पोल्ट्री व्यवसायातला पायोनियरच जणू…लाटांशी मैत्री करणारी माणसं संकटांचे समुद्री तुफान सहज रिचवत असतात आपल्या हृदयात. संघर्ष आणि चढउतार हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असतो. सुनील झोंबाडे यांना त्यांच्या आयुष्यात या चढउताराचा अनेकदा सामना करावा लागला. मात्र हेच चढ-उतार त्यांच्यासाठी ‘माईल स्टोन’ ठरले. विदर्भाला पोल्ट्री व्यवसायाची ओळखच सुनील झोंबाडे यांनी दिली. खरं तर पोल्ट्रीचा व्यवसाय हा अत्यंत धोकादायक . कारण यामध्ये खूप चढउतार येत असतात. वातावरण, सण ,परंपरा याचा सरळ परिणाम या व्यवसायावर होत असतो. तरीसुद्धा सुनील झोंबाडे यांनी वेळोवेळी धोका पत्करून नियोजनबद्ध पद्धतीने हा व्यवसाय पुढे नेला. अमरावतीच्या नांदगाव पेठ च्या औद्योगिक वसाहतीत अंजनगाव सुर्जी येथील या तरुणाच्या व्यवसाय कौशल्याची पताका डौलाने फडकताना आपल्याला पाहायला मिळते. वैष्णव फीड्स आणि आगत ब्रीडिंग फार्म ही त्यांची दोन व्यावसायिक अपत्ये  या औद्योगिक वसाहतीत आपणास दिमाखात बहरलेली दिसतात. ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाचे हे वैभव अनेकांसाठी प्रेरणादायीआहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेला आगत ब्रीडिंग फार्म हा विदर्भातील पहिला वातानुकूलित पोल्ट्री फार्म आहे.

            तसं पाहिलं तर सुनील झोंबाडे हा माणूस राजकीय गणगोतामधला. वडील शंकरराव जिल्हा बँकेचे अध्यक्ष. त्यामुळे घरी सतत कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. सहाजिकच आईवर कुटुंब आणि शेतीची जबाबदारी आली होती. आईवर व्यावहारिक जबाबदारी आल्याने  सुनील आईला व्यवहारात मदत करायचे. सातव्या वर्गात असतानाच ते  मजुरांचे चुकारे चुकवायचे. परिणामी अगदी लहान वयात त्यांचा व्यवहाराशी संबंध येऊ लागला. बारावीनंतर सुनील यांनी सहज कापसाचा व्यवसाय करून पाहिला. व्यावसायिक आयुष्याची ही खरी सुरुवात होती. कोवळ्या वयात व्यवसायाचे ज्ञान येऊ लागले. नेमके याच वर्षी म्हणजे सन 1980 ला कापसाला बोनस जाहीर झाला आणि सुनील झोंबाडे यांच्या पदरात दोन लाख रुपये पडले. त्यामुळेच आयुष्यात व्यवसायातच आपण आपला जम बसवायचा याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधून घेतली. बीएससी झाल्यानंतर त्यांनी काही काळ शेती करून बघितली. मात्र शेती ही बेभरवशाची आणि तोट्याची आहे हे त्यांच्या लवकरच लक्षात आले . त्यावेळी मोठे बंधू शिवाजी झोंबाडे यांनी सुनील यांना पोल्ट्री फार्मिंग ची दिशा दाखवली. त्यानंतर सुनील यांनी पोल्ट्री व्यवसायातील एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यंकटेश्वरा हॅचरीजमध्ये दीड वर्ष नोकरी केली. इथूनच त्यांचा पोल्ट्री व्यवसायाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला.
सन १९९०  ला सुनील झोंबाडे यांनी व्यवसायाच्या निमित्ताने दिल्ली गाठली. डोळ्यात स्वप्नं  अन् पंखात उडण्याचे बळ अशा अवस्थेत एक ग्रामीण मराठी तरुण वयाच्या चोवीसाव्या वर्षी व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या  राजधानीत जातो आणि तीन पार्टनर घेऊन तिथे स्थापन करतो ‘महाराष्ट्र फीड्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कंपनी. दिल्लीमध्ये १५ लाखामध्ये हा व्यवसाय उभा होतो. या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा व्यवसाय फोफावू लागतो. यासाठी सुनील  यांनी प्रचंड मेहनत केली . त्यांनी आपल्या कामासाठी  रात्रीचा दिवस केला. आपल्या मारुती ८०० ने त्यांनी संपूर्ण उत्तर, पूर्व भारत पालथा घातला . सिलिगुडी,जयपुर ,पंजाब ,जम्मू काश्मीर यासह देशाच्या अनेक भागात हा व्यवसाय विस्तारू लागला. धगधगता पंजाब, जळते काश्मीर हे सारे सुनील यांनी  जवळून बघितले आहे. हा व्यवसाय जोमात असताना काही ठिकाणी फसवणूकही वाट्याला आली . तब्बल दोन वर्ष हा पेच कायम राहिला. या दोन वर्षात जे चढउतार पाहायला मिळाले त्याने एक नवा धडा सुनील यांना मिळाला. १९९० ते २००३  हा दिल्लीमधील व्यावसायिक काळ अनेक चढ-उतारांचा साक्षीदार आहे. तो त्यांच्या तोंडून ऐकण्याजोगा आहे . व्यवसायातील यश – अपयश दुय्यम पण नवीन प्रांतात , नवीन माणसांमध्ये जावून केलेला व्यवसाय त्यांना माणूस म्हणून प्रचंड समृध्द करून केले . त्या काळात त्यांना वेगवेगळ्या वृत्तीची जी माणस अनुभवायला मिळालीत त्यातून माणसांबद्दलची एक matured समज विकसित झाली. काही भाबड्या समजुती मोडीतही निघाल्या . पूर्वी महाराष्ट्र म्हणजे विकसित , महाराष्ट्रातील माणस खूप वेगळी असं वाटायचं . पण जवळपास १३ वर्ष तिकडे राहिल्यानंतर तिकडली माणसं अधिक मेहनत घेतात. त्याचं vision ही व्यापक आहे . infrastructure मध्ये अनेक राज्य महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत , हे सुनील झोंबाडे आपल्याला सांगतात .
सन २००३ मध्ये कुटुंबासह सुनील रायपूर इथे आले. याठिकाणी पोल्ट्री फिड चे युनिट त्यांनी भाड्याने घेतले. हे युनिट सुद्धा त्यांनी योग्य रीतीने सांभाळले .मात्र अ’ बर्ड फ्लू ‘ च्या एका  साथीने व्यवसायावर काहीसा परिणाम झाला .मात्र आत्मविश्वास कायम होता. त्याचदरम्यान अनुभव , भटकंती खूप झाली.  आता आपण गावाकडे वळले पाहिजे  हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.  आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या परिसराला व्हावा हे त्यांच्या मनाने घेतले . २००५ मध्ये ते अमरावतीला आले . येथील  औद्योगिक वसाहतीमध्ये २००५- ०६  मध्ये कुक्कुट खाद्य आणि हॅचरी सुरू त्यांनी सुरु केली .सोबतच ब्रीडिंग फार्म सुद्धा होता . आता हा व्यवसाय गाव खेड्यांमध्ये कसा विस्तारित करता येईल  याचे डोहाळे सुनील यांना लागले होते. यातूनच करार पद्धतीने कुक्कुटपालन या संकल्पनेचा जन्म झाला. अंजनगाव तालुक्यात हा प्रयोग सुरू करण्यात आला. विदर्भात करार पद्धतीने कुक्कुटपालन या संकल्पनेला त्यांनी जन्म दिला . तिथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही . अतिशय वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी ते ख्यातीप्राप्त आहेत . त्यांचा फार्म पाहण्यासाठी दूरदुरून माणसं येतात .

पुन्हा नवी इनिंग
………………………………………..
सध्या सुनील झोंबाडे यांनी ‘वैष्णव फीड्स’ आणि ‘आगत ब्रीडिंग फार्म ‘या नावाने स्वतंत्र युनिट सुरू केले आहे. या दोनही युनिटमध्ये जवळपास साठ सहकारी काम करतात. वयाच्या ५१ व्या वर्षी नव्या आत्मविश्वासाने युनिट उभारणी करणे याला फक्त हिंमत आणि नैतिक पाठबळ लागते आणि ती नैतिकता सुनील झोंबाडे यांच्या रक्तात ठासून भरलेली आहे. अंत:करणाची अनेक नाती सुनील यांनी निर्माण केलेली आहे. नांदगाव पेठ च्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेला आगत ब्रीडिंग फार्म हा विदर्भातील पहिला पर्यावरण नियंत्रित अर्थात वातानुकूलित फार्म आहे. या फार्ममध्ये कॉक 435 या जातीच्या नर-मादी कोंबड्या आहेत. वर्षभर अंडी देणाऱ्या  एका कोंबडीवर  अखेरपर्यंत चार हजार रुपये खर्च येतो. या फार्म मधून येणारी अंडी नागपूरला पाठविली जातात आणि तेथील हॅचरीतून महिन्याकाठी दीड लाख पिल्ल  निघतात. या पिल्लांचं  संगोपन आणि पुरवठा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येतो. वैष्णव फीड्स मधील कुक्कुट खाद्य विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पुरवण्यात येते. याठिकाणी ताशी सहा टन खाद्याचे निर्माण करण्यात येते. येणाऱ्या काळात हॅचरी चे युनिट सुद्धा त्यांना इथे उभारायचे आहे. या वयात  नवे युनिट उभारण्याची हिंमत त्यांना जीवनात आलेल्या चढ-उतारातूनच आली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या हिंमतीमध्येच त्यांच्या स्वप्नांचा आवाका दडलेला आहे. हे सारे चढ-उतार सांभाळत असताना त्यांनी मुलगी वेदा हिला वैद्यकीय शिक्षणाच्या पायरीवर नेऊन ठेवले तर मुलगा बारामती आणि नेदरलँड या  ठिकाणी  Animal husbandry चे  शिक्षण घेत आहे. वेगवेगळ्या संकटात सुनील यांना त्यांची पूर्णांगिनी रंजना यांनी मोठी साथ आहे. ती कोणत्याही परिस्थितीत सोबत होती म्हणून आपल्याला परिस्थितीशी लढण्याचे बळ मिळाल्याचे सुनीलभाऊ कृतज्ञतेने सांगतात . व्यवसायाच्या निमित्ताने आतापर्यंत देशभर जवळपास ७ लाख किलोमीटरची ड्रायव्हिंग केलेल्या या माणसाचे संपूर्ण देशात मैत्रीचे एक मोठे वर्तुळ आहे. हा मित्र परिवारच त्यांना जगण्याचे बळ देतो.  पराभवाच्या राखेतही विजयाचे गर्भ शोधणारा सुनील झोंबाडे नावाचा माणूस व्यवसायामध्ये उतरणाऱ्यासाठी खरा आयकॉन आहे.

(श्री सुनील झोंबाडे यांचा मोबाईल नंबर -83800 50999)

(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे असोसिएट एडिटर आहेत)

9623191923

Previous articleमाझी शाळा कंची?
Next articleमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.