पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडलाय, त्या पुरुषांसाठी…

©सानिया भालेराव

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन! या दिवसाची मूळ संकल्पना Thomas Oaster यांची. १९९२ साली ७ फेब्रुवारी रोजी जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. पुढे Dr. Jerome Teelucksingh यांनी १९ नोव्हेंबर हि तारीख पक्की केली आणि मग IMD ( International Men’s Day ) जगभरात साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये २००७ साला पासून हा दिवस साजरा केला जातो. खरं पाहता एकूणच महिला दिन, पुरुष दिन वगैरे साजरे करून जेंडर इक्वॅलिटी साध्य होते का हा वादाचा मुद्दा होऊ शकतो पण त्या पलीकडे जाऊन पुरुषांचे, मुलांचे प्रश्न सोडवणे, जेंडर इक्वॅलिटी प्रस्थापित करणे आणि मुलगा, पुरुष म्हणून समाजामध्ये कित्येकदा या जेंडरला डाग लावल्या जातो तो पुसून काढण्याचा प्रयत्न करणे असा साधारण हा दिवस साजरा करण्यामागचा अजेंडा आहे.

कुठल्याही जेंडरला एका विशिष्ट अँगल मधून बघणं मला नेहेमीच गैर वाटत आलं आहे. जसं की सगळ्याच बायकांवर अत्याचार होतो किंवा बायकांना हवं तसं स्वातंत्र्य हा समाज देत नाही तसंच सगळेच पुरुष अत्याचारी असतात किंवा बायकांचं चारित्र्यहनन करतात वगैरे. असं जनरलाईज्ड स्टेटमेंट बऱ्याचदा आपण सहज करून जातो. आजकाल बायकांना बऱ्यापैकी मोकळीक मिळते आहे ( हा वादाचा मुद्दा होऊ शकतो कारण शहरी बायका, ग्रामीण बायका , किती टक्के बायकांना अशी मुभा आहे. त्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत का असे अनेक मुद्दे आहेत पण हा ह्या पोस्टचा विषय नाही). बाई आणि पुरुष हे दोन्हीही जेंडर इव्हॉल्व होतं आहेत. जशी बायकांची मानसिकता बदलते आहे तशी पुरुषांचीही बदलते आहेच की. जसं बायकांच्या प्रश्नांवर आपण बोलतो , लिहितो तसं जर आपण खरचं जेंडर एक्वेलिटी मानत असू तर पुरुषांच्या प्रश्नांवर बोलणं तितकंच गरजेचं नाही का? भले प्रमाण कमी असो पण शेवटी मुलांच्या, पुरुषांच्या बदलत्या मानसिकते बाबत, इव्होल्यूशन बाबत सजगता येणंही गरजेचं आहेच कि.

पालकत्वाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं मुलीला वाढवताना चॅलेंजेस आहेत तसं मुलाला वाढवतांनाही आहेतंच. मुलाला समंजस, जबाबदार, संवेदशील बनवताना त्याच्या मूळ पुरुषी स्वभावाला जपणं ही तसं पाहता अवघड गोष्ट. रडू येणं, भीती वाटणं ह्या सगळ्या नैसर्गिक उर्मी आहेत हे समजावून सांगताना निडरता, करारी वृत्ती हेही असणं गरजेचं आहे हे सुद्धा अवघडंच. समाज पुरुषाला अजूनही एका चौकटीत बसवतोच. आपल्याला पुरुष स्त्रीचा सन्मान करणारा हवा ,तिला स्वातंत्र्य देणारा हवा, कधी तिच्या साठी लढणारा तर कधी ती लढत असताना तिला बळ देणारा, कधी तिचे डोळे पुसणारा तर कधी चार चौघात तिच्या साठी लढणारा हवा, मुलींची काळजी घेणारा बाबा हवा आणि त्यांना मोकळीक देणारा मित्रही हवा,मुलाला रडलं म्हणून न हिणवता समजवून घेणारा बाबा हवा आणि त्याला पुरुषार्थाचा खरा अर्थ समजवून सांगणारा पुरुषही हवा! किती अपेक्षा असतात आपल्या पुरुषांकडून!

बायकोला स्वयंपाकात मदत करणारा, मुलीची वेणी घालून देणारा, मुलाबरोबर दंगा मस्ती करणारा ,मैदानी खेळ खेळणारा, बायको पोरींबरोबर तासंतास शॉपिंगच्या बॅगा सांभाळत फिरणारा, रविवारी भाजी घेऊन येणारा, मुलीचा मित्र बनून राहणारा, पोरगी वयात आल्यावर तिच्या मित्रांमुळे मनातून इन्सिक्युअर झालेला पण बाहेरून तसं न दाखवता ‘कुल’ बाबा म्हणून वावरण्याचा प्रयत्न करणारा, बायकोचं कामाच्या ठिकाणी होणारी प्रमोशन मनापासून सेलिब्रेट करणारा,बायकोला तिच्या कामात पाठींबा देणारा, बायको मुलीने त्यांना हवं तसे कपडे घातल्या नंतर त्यांच्याकडे हपापल्या नजरेने बघणाऱ्या इतर लंपट पुरुषांकडे दुर्लक्ष करायला शिकणारा, तू तर बायकोला घाबरतो अश्या कुजकट कॉमेंट हसत हसत स्वीकारणारा, बायकोचं.स्वत्व जपणारा, बायकांवर होणाऱ्या बलात्काराची , छळाची बातमी ऐकून शरमेने मान खाली घालणारा, मुलीशी पाळीपासून ते वयात येतानाच्या शारीरिक बदलांवर चर्चा करणारा, समाज बदलू पाहणारा, मुल गर्भात न वाढवता त्याच्यावर जीवापाड प्रेम करू शकणारा, स्वतः वेगळा असूनही बायकांकडून सतत अपराध्याच्या नजरेतून पहिला जाणारा, स्वतःच्या मुलाला आपल्या वर्तनातून एक चांगला म्हणून व्यक्ती घडवू इच्छिणारा, बाईला तिच्या शरीरा पलीकडे बघू शकणारा अशा कित्येक छटा आहेत पुरुषाच्या आयुष्यातही. जरा कुठे तो सोशिक झाला, संवेदनशील झाला तर त्याच्या पौरुषत्वावर बोट ठेवणारा हा समाज आहे हा. ह्या सगळ्यामध्ये तो जेंव्हा आपल्या बायकोला, मुलीला वा मुलाला एक माणूस म्हणून बघू पाहतो, घडवू पाहतो तेंव्हा तोही प्रवाहा विरुद्ध जातोच की!

त्याची होणारी घुसमट, चौकटी बाहेर जाताना केलं जाणारं हसं या सगळ्यांमधून जाताना होणारा मनस्ताप आणि या परिस्थितीतही कुठेही न डगमगता, असह्य न होता एक पुरुष म्हणून केल्या जाणाऱ्या करेजची , साहसाची अपेक्षा! हे अतीच ना? कधी समंजस पणा दाखवायचा, कधी एक पाऊल मागे घ्यायचं, कधी आधार द्यायचा कधी मोकळीक द्यायची हे सगळं कसं काय बुवा मॅनेज करत असतील पुरुष?

तसं बघायला गेलं तर बाईला खऱ्या अर्थाने परिपूर्ण करतो तो पुरुषच आणि पुरुषाला बाई! दोघांना एकमेकांची तितकीच गरज आहे. स्वतःचं पौरुषत्व उमगलेला पुरुष बाईचं आयुष्य अक्षरशः उमलू शकतो,उजळवू शकतो. जेंव्हा एका स्त्रीला असा जोडीदार मिळतो तेंव्हा एक वेगळंच तेज तिच्या सभोवताली असतं . इतका महत्वाचा आहे पुरुष प्रत्येक बाईच्या आयुष्यात. म्हणून आजची ही पोस्ट अशा तमाम पुरुषांसाठी ज्यांना पौरुषत्वाचा खरा अर्थ उलगडला आहे, जे कुठेही पुरुषीपणाचा अहंकार न बाळगता वागू शकतात, जे तिला चुका करू देतात आणि वेळ प्रसंगी सावरूनही घेतात, ज्यांना जेंडर इक्वॅलिटी हवी आहे आणि जे स्त्रीचं चारित्र्य, शरीर या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तिला बघू शकतात. अशा समस्त पुरुषांना जे समाजाचे स्टीरीओटाइप तोडून स्वतःमध्ये आणि कुटुंबामध्ये बदल घडवू पाहत आहेत, ज्यांच्यामुळे मला मी स्त्री आहे याची सतत जाणीव आणि भीड न बाळगता निवांत एक माणूस म्हणून जगता येतं..हे त्यांच्यासाठी.. त्यांच्यापर्यंत हे पोहोचायला पाहिजे.. असा पुरुष मग तो तुमचा मित्र असेल,वडील, भाऊ, प्रियकर, नवरा.. जे काही नातं असेल.. त्याच्या पर्यंत हे पोहोचवा..

Cheers to All Gentlemen who don’t consider being Gentle as a threat to their manhood!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

हे सुद्धा आवर्जून वाचा

पुरूष: रोस्टेड सॅण्डवीच–हिनाकौसर खान-पिंजार- http://bit.ly/2r5noTZ

कळालेल्या पुरुषाचा कोलाज-शर्मिष्ठा भोसले-  http://bit.ly/2qq4es1

लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?-योजना यादवhttp://bit.ly/2OopG8F

पुरुष असाही! पुरुष तसाही!- हर्षदा परब – http://bit.ly/2quw8TN

 

Previous articleबाळासाहेब आणि पवार साहेब -एक दिलदार यारीदुश्मनी!
Next articleपुरूष: रोस्टेड सॅण्डवीच
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.