प्रज्ञा आणि तर्क

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १४

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

मोतीलालजींच्या मृत्यूने नेहरूंना गांधीजींच्या आणखी जवळ आणले. यापुढचा त्यांचा नेता व अनुयायी हा अनुबंध राहिलाच पण त्यात पितृत्वाची ओढही मिसळलेली दिसली. आपले मन मोकळे करायला आणि प्रत्येक प्रश्नावर सल्ला घ्यायला आता नेहरूंना गांधीजींखेरीज दुसरे कोणी उरले नाही. मात्र याही स्थितीत त्यांच्या स्वमतावरील निष्ठा कायमच होत्या.

गांधीजींच्या विचारांहून त्यांची प्रज्ञा अधिक मोठी व वरचढ ठरणारी होती. प्रज्ञेचा हा संकेतच त्यांना त्यांचा आतला आवाज वाटायचा. तो विचारांच्या पातळीवर जगणार्‍या नेहरूंना अनेकदा गोंधळात टाकायचा तर कधी ते त्याबाबत त्यांच्याशी वाद घालायचे. आपला विचार तर्कशुद्ध आहे, तो बुद्धी व तर्क यावर आधारला आहे असे ते म्हणायचे. तर गांधीजी मेंदूहून मनावर अधिक विसंबून राहणारे आहेत अशी त्यांची धारणा होती. विचार व तर्क यांचा प्रज्ञा व मन यांच्याशी असलेला तो संघर्ष होता. पण नेहरू गांधींपासून कधी दूर झाले नाहीत. काही काळ गेला की गांधीजींची प्रज्ञाच खरी ठरलेली त्यांना दिसायची. तीत तर्क नसेल पण तिला जनाधार असायचा आणि तो सार्‍यांना जाणवायचा. मग गांधी असेपर्यंत त्यांनी आपल्या विचारांनाही त्यांच्या तार्किक टोकापर्यंत कधी ओढू दिले नाही.

मोतीलालजींच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवशी पहिल्या गोलमेज परिषदेला गेलेली मंडळी मुंबईत उतरली. त्यातले अनेकजण तेथून सरळ अलाहाबादला नेहरू व गांधींना भेटायला आले. सारी वर्किंग कमिटीही तेथेच होती. यावेळी सप्रू आणि जयकरांनी गांधीजींना, सरकारशी पुन्हा बोलणी सुरू करा असे विनविले. सत्याग्रहात विरोधकांशी चर्चा करायलाही वाव आहे असे आपले समर्थनही त्यांनी गांधींना ऐकविले. नेहरूंना तो प्रकार आवडणारा नव्हता. सरदारांचीही इच्छा तशी नव्हती. मुळात सरकारमध्ये वावरणारी आणि जनतेत न मिसळणारी ही माणसेच त्यांना आवडत नव्हती. परंतु  गांधीजींनी त्यांच्या विनंतीला मान देऊन इर्विन यांना भेटीचे पत्र लिहिले. इर्विन त्या पत्राची वाट पाहात होते. तिसर्‍याच दिवशी १७ फेब्रुवारीला त्यांची दिल्लीत चर्चा सुरू झाली. ती प्रथम तीन तास व विश्रांतीनंतर पुन्हा तीन तास चालली.

या भेटीवर चर्चिल फार संतापले होते. ‘एक नंगा फकीर साम्राज्याविरुद्ध आंदोलन चालवतो आणि तशाही स्थितीत तो व्हाईसरॉयच्या बंगल्याच्या पायर्‍या चढून त्याच्याशी, म्हणजे साम्राज्याच्या प्रतिनिधीशी बरोबरीच्या नात्याने बोलतो हा प्रकार साम्राज्याची अब्रू घालविणारा आहे’ असे ते यावेळी संसदेत म्हणाले.

इर्विन मात्र शांत वृत्तीचे व काहीसे धार्मिक मनाचे होते. त्यांचा गांधीजींच्या प्रामाणिकपणाएवढाच त्यांच्या लोकप्रियतेवरही विश्वास होता. त्यांनी गांधीजींचा आदरच केला व योग्य त्या सन्मानानिशीच  त्यांनी त्यांना वागविले. कोणतीही अडचण पुढे न करता गांधीजींनी दुसर्‍या गोलमेज परिषदेला यावे हा त्यांचा आग्रह होता. गांधीजी मात्र त्यांच्या पूर्वीच्या अटी सोडायला तयार नव्हते. याच काळात गांधीजी वर्किंग कमिटीच्या सदस्यांशीही बोलत होते. नेहरू समझोता न करण्याच्या त्यांच्या मतावर ठाम होते तर सरदारांचा बारडोलीचा सत्याग्रह सुरू होता. त्यात सरकारने जप्त केलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी मुक्त होणे त्यांना आवश्यक वाटत होते.

तरीही गांधीजी समझोत्याला राजी झाले. त्यांची इर्विनशी झालेली चर्चाही लांबली. अखेर सगळ्या सहकार्‍यांनी, त्यातल्या काहींच्या इच्छेविरुद्ध समझोत्याला संमती दिली. काँग्रेसची त्यासाठी झालेली अखेरची बैठक ५ मार्चला पहाटे दोन वाजेपर्यंत चालली. गांधीजींनी आणलेल्या समझोत्याच्या प्रतीतील काही भाग नेहरू व पटेलांसह अनेकांना आवडणारा नव्हता. त्यात संघराज्य पद्धतीची व्यवस्था सुचविली होती. शिवाय काही प्रश्नांबाबत भारताच्या जबाबदार्‍या व मर्यादांची चर्चा होती. संरक्षण, परराष्ट्रव्यवहार, अल्पसंख्यकांचे प्रश्न व राष्ट्रीय कर्ज याविषयी भारताचे सरकार साम्राज्याशी चर्चा व सहकार्य करीत राहील अशी तरतूद त्यात होती.

त्या रात्री नेहरूंच्या मनात आले, आपला सत्याग्रह, त्यातला हजारोंचा त्याग आणि प्राणार्पण यावर आपण पाणी तर सोडत नाही. गांधीजींनी अशा शरणागतीला साथ कशी दिली हे मनात येऊनही ते कमालीचे खिन्न झाले. आपल्या नोंदीत त्या समझोत्याने आपल्या डोळ्यात अश्रू आणल्याचे त्यांनी लिहिले आहे.

दुसर्‍या दिवशी पहाटे गांधीजींनी नेहरूंना आपल्यासोबत फिरायला नेले. यावेळी बापाने मुलाची समजूत काढावी तसे ते नेहरूंना म्हणाले, ‘माझ्यावर विश्वास ठेवा. मी कोणतीही मूल्यविषयक तडजोड केली नाही. आपला कोणताही महत्त्वाचा आग्रह मी सोडला नाही. आपल्यावरील मर्यादांचा स्वीकार मी राष्ट्रहितासाठीच केला आहे. शिवाय सार्वभौम राष्ट्राला कोणत्या मर्यादा लागूही होत नाहीत.’

‘तुम्ही आमच्यावर जे आश्चर्य लादता त्याचीच मला अधिक भीती वाटते’ हे त्यावरचे नेहरूंचे उत्तर होते.

‘मी तुम्हाला १४ वर्षांपासून ओळखतो, परंतु तुमच्यातले काहीतरी मला कळायचे राहिले आहे असेच मला सदैव वाटत आले. या क्षणीही मला तुमची चिंता कळत नाही. पण या समझोत्यातून आपण स्वराज्याच्याच दिशेने एक पाऊल टाकले आहे हे लक्षात घ्या’ अशा शब्दात गांधींनी त्यांची समजूत काढली.

त्याच दिवशी दुपारी गांधीजी आणि लॉर्ड इर्विन यांनी समझोत्याच्या करारावर सह्या केल्या. अतिशय प्रसन्नपणे इर्विन यांनी गांधीजींना ‘हा करार आपण एका चांगल्या पेयाने साजरा करू’ असे सुचविले. पण गांधीजींचा मद्यविरोध लक्षात घेऊन त्यांनी लागलीच ‘चहावर’ अशी सूचना केली. गांधींना चहाही चालत नव्हता. मग त्यांनी इर्विनसोबत मीठ घातलेले लिंबूपाणी घेतले.  इर्विनचा निरोप घेताना गांधीजी त्यांची शाल बैठकीतच विसरले. त्यांना थांबवून इर्विन म्हणाले ‘तुम्ही तुमची शाल विसरलात, ती घेऊन जा. कारण तिच्याखेरीज तुमच्याजवळ दुसरी कोणतीही इस्टेट नाही’ त्यावर गांधीजी खळाळून हसले.

काँग्रेस वर्किंग कमेटी आणि देश या समझोत्यावर प्रसन्न नव्हता. ज्यांच्यावरचे गुन्हे अद्याप सिद्ध झाले नाही त्या राजबंद्यांच्या सुटकेचीही या करारात तरतूद नव्हती. शिवाय सरदार भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना झालेल्या फाशीच्या शिक्षेचा दिवस जवळ येत होता. गांधीजींनी वारंवार विनवूनही इर्विन आणि ब्रिटीश सरकार ती फाशी रद्द करायला तयार झाले. दि. २३ मार्चला त्या तिघांनाही फासावर अडकविले गेले. ‘भगतसिंगाचे शवच यापुढे भारत आणि इंग्लंड यामध्ये सदैव उभे असेल’ असे नेहरूंनी त्याविषयी लिहिले. त्यांनी भगतसिंगांची तुरुंगात भेट घेतली होती. त्या भेटीच्या वेळी ते शांत होते. सहजपणे बोलत होते. त्यांनी केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप त्यांच्या बोलण्यात नव्हता. उलट स्वातंत्र्याचे आंदोलन आणखी तीव्र करण्याची तळमळच तेवढी त्यात होती’ ही नेहरूंची त्या भेटीविषयीची नोंद आहे.

मात्र आपली नाराजी बाजूला ठेवून वर्किंग कमेटीने गांधी-इर्विन समझोत्याला मान्यता दिली. ब्रिटीश सम्राटाचा प्रतिनिधी एका अर्धनग्न फकिराशी बरोबरीच्या नात्याने बोलणी करतो ही बाबही तेव्हा सर्वत्र गौरविली जात होती. गांधीजी म्हणाले, ‘या समझोत्यात कोण जिंकले आणि कोण हरले याची चर्चा करण्यात हशील नाही. त्यात विजय असलाच तर तो दोन्ही पक्षांचा आहे. आपला पक्ष विजयासाठी नाही. तो सार्‍यांच्या कल्याणासाठीच तेवढा आहे हे लक्षात घ्या.’ सत्याग्रहाचा त्यांच्या मते अर्थही तोच होता.

दिल्लीत असताना एका पहाटे त्यांनी नेहरूंना आपल्यासोबत फिरायला नेले. यावेळी बोलताना नेहरू गांधींना म्हणाले ‘स्वातंत्र्य मिळताच आपण काँग्रेस पक्षाचे विसर्जन केले पाहिजे असे मला वाटते’. त्यावर गांधीजींचे उत्तर ‘काँग्रेसने निवडणूक लढवू नये. सत्तेची पदे घेऊ नयेत. मात्र सरकारवर प्रभाव राखणारी लोकचळवळ म्हणून ते शिल्लक राहावे. पक्षाचा जो सभासद सरकारातले पगारी पद घेईल, त्याने पक्षाचा राजीनामा मात्र दिला पाहिजे.’ असे होते. प्रत्यक्षात स्वातंत्र्य आले तेव्हा मात्र गांधींनाही, आजवर स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पक्षाने देश व समाजाच्या उभारणीसाठी स्वत:ला वाहून घ्यावे आणि त्यासाठी सत्ताही राबवावी असे वाटू लागले. तो विचार त्यांनी लिहून ठेवला नाही. मात्र काँग्रेसच्या सत्ताग्रहणाला त्यांनी आक्षेपही घेतला नाही.

गांधी-इर्विन करारानंतर लगेच कराचीला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनावर भगतसिंगांच्या फाशीची काळी छाया होती. अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल हे स्वत:च गांधीजींना घेऊन अधिवेशनस्थळी पोहोचले तेव्हा शेकडो तरुणांनी त्यांचे काळ्या झेंड्यांनी व ‘वापीस जाओ’ अशा घोषणांनी स्वागत केले. यावेळी सरदारच त्यांच्या दमदार स्वभावानुसार त्यांना सामोरे गेले व गांधीजींनी भगतसिंगांचे प्राण वाचवण्याचे केवढे प्रयत्न केले याची सारी कहाणीच त्यांना सांगितली. नंतर खुल्या मैदानातच उभारलेल्या व्यासपीठावर चढून गांधीजींनी तेथे जमलेल्या ५० हजार लोकांना उद्देशून भाषण केले. भगतसिंगांच्या त्यागाचा गौरव करतानाही, त्यांचा मार्ग अहिंसेच्या प्रयत्नात बसणारा नव्हता हेही त्यांनी त्यात सांगितले. मात्र त्यांना वाचविण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांचीही माहिती जमावाला दिली. परिणामी त्यांच्या निषेधासाठी जमलेला जमावच त्यांचा जयजयकार करीत त्यांना अधिवेशनस्थळी घेऊन गेला.

या अधिवेशनात गांधी-इर्विन करार होणे व तो करार सार्‍यांचे समाधान करणारा असेल असे त्यात नोंदविले जाणे गरजेचे होते. तसेच ते केलेही गेले… ‘काँग्रेस आणि सरकार यांच्यात झालेल्या कराराची पूर्ण शहानिशा वर्किंग कमेटीने केली असून तिच्यावर मान्यतेचे शिक्कामोर्तब केले आहे. संपूर्ण स्वराज्याची काँग्रेसची मागणी त्यात कायम राहिली आहे. यापुढे सरकारशी होणार्‍या वाटाघाटीत देशातील जनतेचा लष्कर, परराष्ट्र व्यवहार व आर्थिक क्षेत्र यावर पूर्ण अधिकार राहील याची काळजी काँग्रेस घेईल. देशावरील कर्जासाठी एखादा तटस्थ आयोग नेमायला काँग्रेसचा विरोध नाही. या आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा अधिकार मात्र काँग्रेसला असेल व तो अधिकार देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच वापरला जाईल.’.. यावेळी काँग्रेसने दुसर्‍या गोलमेज परिषदेला आपले प्रतिनिधी म्हणून हजर राहण्याचा अधिकार गांधीजींना असेल व त्यांचे सहकारीही तेच निवडून घेतील असे एका वेगळ्या ठरावाद्वारे म्हटले.

समझोत्याविषयीचा ठराव नेहरूंनी मांडावा हा गांधीजींचा आग्रह, त्यावर नाराज असलेल्या नेहरूंना प्रथम रुचला नाही. पण गांधींचा शब्द प्रमाण मानण्याच्या त्यांच्या भूमिकेने त्यांनी आपली नाराजी मागे घेतली. शिवाय कोणाच्या अपेक्षेत न बसण्याएवढ्या जोरकसपणे त्यांनी तो ठराव मांडला व त्याचा पाठपुरावा केला. ‘आज इथे आणि उद्या तिथे’ अशा भूमिका आपल्याला घेता येणार नाहीत. आपण गांधीजींना नेता मानले आहे आणि त्यांच्या मार्गात कोणता अडथळा येतपर्यंत आपण त्यांच्याच मार्गाने गेले पाहिजे असे यावेळी ते म्हणाले. या ठरावाला काहींनी दुरुस्त्या सुचविल्या. पण गांधीजी आणि खान अब्दुल गफ्फारखान यांच्या भाषणानंतर त्या मागे घेण्यात आल्या.

याच अधिवेशनात नेहरूंनी भगतसिंगांना श्रद्धांजली वाहणारा ठरावही कमालीच्या तळमळीने व संतापाने मांडला. ‘भगतसिंगांच्या मृत्यूतून आणखी किती भगतसिंग जन्म घेतील याची सरकारला जाणीव नाही’ असे यावेळी ते म्हणाले. ‘देशासाठी सन्मानाने मरण पत्करणे म्हणजे काय हे त्या शहीदाने आम्हा सार्‍यांना शिकविले आहे’ असेही त्यांनी बोलून दाखविले. हा ठराव गांधीजींनी लिहिला होता आणि त्यातही भगतसिंगांच्या शस्त्राचारी मार्गापासून काँग्रेस दूर असल्याचे स्पष्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

आर्थिक परिस्थिती व नागरिकांचे मूलभूत अधिकार याही विषयीचा एक ठराव नेहरूंनी यावेळी आणला. त्यात सरकार व जनता यांच्यातील मध्यस्थ नाहिसे करणे, कुळांना त्यांच्या जमिनीचे हक्क मिळणे आणि समाजवादाच्या दिशेने पुढे जाणे या गोष्टी सामील होत्या. स्वातंत्र्याच्या लढ्याला भरीव स्वरूप द्यायचे तर हे करणे आवश्यक आहे या मतावर ते फार पूर्वीच आले होते. वर्किंग कमिटीतील अनेकांना या गोष्टी यावेळी चर्चेला आणणे आवडणारे नव्हते. पण ‘नेहरूंची लहर’ म्हणून त्यांनीही या ठरावाला मान्यता दिली. हा ठराव तयार करण्याआधी नेहरूंनी गांधीजींशी प्रथम दिल्लीत व नंतर कराचीतही चर्चा केली होती. गांधीजींना त्यात मीठावरील कराची समाप्ती, देशी वस्त्रोद्योगाला संरक्षण व दारूबंदी यांचाही समावेश हवा होता. तो नेहरूंना मान्यही झाला होता.

राहता राहिला मुद्दा गोलमेज परिषदेतील गांधीजींच्या उपस्थितीचा. यावेळी लॉर्ड इर्विन यांची जागा लॉर्ड विलिंग्डन यांनी घेतली होती. त्याआधी ते मुंबई व मद्रासचे गव्हर्नर आणि कॅनडाचे गव्हर्नर जनरल राहिले होते. अतिशय उच्चशिक्षित व उच्चभ्रू समाजातून आलेले विलिंग्डन कमालीचे शिस्तप्रिय म्हणून ओळखले जात होते. काँग्रेस पक्षाला जास्तीची मोकळीक देण्याच्या मताचे ते नव्हते. मात्र आपला विरोध हसून करण्याचे कसब त्यांना साध्य होते. त्यांना गांधीजींचे अर्धवस्त्रातले रूपही आवडणारे नव्हते. ते स्वत: सदैव उंची गणवेषात असत आणि त्यांना फारसा अनौपचारिकपणा आवडत नसे… याच काळात इंग्लंडच्या राजकारणात उलथापालथ होऊन समाजवाद्यांचे सरकार ऑगस्ट ३१ मध्ये गेले आणि त्याची जागा तीन पक्षांच्या राष्ट्रीय सरकारने घेतली. मात्र याही मंत्रीमंडळाचे प्रमुख समाजवादी पक्षाचे रॅमसे मॅकडोनाल्ड हेच होते. गांधीजी म्हणाले, ‘यापुढे सरकारशी नुसती चर्चा पुरेशी नाही. आता आम्हाला निश्चित निर्णय हवे आहेत.’

तथापि या करारावर भारतीय प्रशासनातला मोठा वर्गही नाराज होता. त्याला गांधी व काँग्रेस यांना सरकारच्या बरोबरीचे स्थान मिळाले ही बाबच आवडणारी नव्हती. या कराराच्या अंमलाचा काँग्रेस पक्षाचा आग्रह हा त्याला आपल्या कामकाजातला हस्तक्षेप वाटत होता. त्याचवेळी सविनय कायदेभंगाची चळवळही अनेक प्रांतात सुरू होती. वायव्य सरहद्द प्रांत अशांत होता. बंगाल व बिहारमध्येही तिचा भडका थांबला नव्हता. याचवेळी देशात हिंदू-मुस्लिम यांच्यातील दुहीने नवा पेट घेतला होता. कराची काँग्रेसचा बराच काळ तो पेट शमविण्यात खर्ची पडला होता. गांधीजी कधी दोन्ही समाजांच्या स्वतंत्र तर कधी संयुक्त सभा घेऊन त्यांना देशाचे ऐक्य व स्वातंत्र्य यांचे नाते समजावीत होते.

यानंतर लगेचच गांधीजी, नेहरू, पटेल व सरहद्द गांधी यांनी सिमला येथे लॉर्ड विलिंग्डन यांची भेट घेतली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्या. विलिंग्डनचे दुटप्पीपण नेहरूंच्या लक्षात येत होते तर गांधीजी त्याला महत्त्व देत नव्हते. अखेर गांधींनी दुसर्‍या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जाणे मान्य केले. २७ ऑगस्टला ते सिमल्याहून मुंबईला आले आणि राजपुताना या बोटीने इंग्लंडला रवाना झाले. सिमल्यापासून मुंबईपर्यंत व पुढे गांधींना निरोप देतपर्यंत नेहरू त्यांच्यासोबत होते.

इंग्लंडला जाताना गांधीजी म्हणाले, ‘मी एकटाच परमेश्वराच्या सोबतीने इंग्लंडला जायला निघालो आहे.’ नेहरूंनी त्यांना निरोप दिला व आपण लवकरच भेटू अशी सदिच्छा व्यक्त केली. मात्र पुढची दोन वर्षे त्यांची भेट व्हायची नव्हती. गांधीजींनी भारत सोडल्यानंतर काही दिवसातच सरकारने नेहरूंना अटक करून तुरुंगात डांबले.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमालाजुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://mediawatch.info/category/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82/

 

Previous articleहिंदू पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले…
Next articleकोलकात्यातील कांगावा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.