प्रतिभाताई, त्यांना माफ करा..

आदरणीय प्रतिभा देविसिंह पाटील
माजी राष्ट्रपती
 भारत सरकार

सप्रेम नमस्कार.

ताई, तुम्ही राष्ट्रपतीपदावर असताना तुमच्या नावाचा शासकीय स्तरावर असाच उल्लेख होत होता. आता शेखावत साहेबांना ते आवडत होतं की नाही, माहीत नाही. पण तुम्हाला पत्र लिहितांना परंपरा मोडू नये, असं वाटल्यानं तेच संबोधन कायम ठेवलंय. बाकी खूप दिवस झालेत, तुमची भेट नाही. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपता-संपता एकदा अमरावतीला यायची तुमची तीव्र इच्छा होती, मात्र तुमचं ते पुण्याच्या बंगल्याचं प्रकरण, विदेश दौरे वगैरे भानगडी प्रेसवाल्यांनी उकरून काढल्या आणि तुमचा मूडच गेला. 

 
आता पाच वर्ष भरपूर काम केल्यानंतर तुम्ही दिल्लीतच जरा कुठे विश्रंती घेत नाहीय, तर तुमच्या भेटवस्तूंचं प्रकरण बाहेर आलं. घर फिरलं की घराचे वासे फिरतात, असं म्हणतात. तसंच काहीसं होऊन राहिलंय. राष्ट्रपतीपदावर असताना वेगवेगळ्या देशप्रमुखांनी, राजदूतांनी तुमच्या सन्मानार्थ दिलेल्या भेटवस्तू तुम्ही आपल्या सासरच्या लोकांना पाहता याव्यात, म्हणून मोठय़ा कौतुकाने अमरावतीला पाठविल्या. त्या भेटवस्तूंसाठी शेखावत साहेबांनी आपल्या कॉलेजमध्ये खास प्रतिभा आर्ट गॅलरी उभारली. पण नाही पाहवलं लोकांना. तो सुभाषचंद्र अग्रवाल नावाचा आरटीआय कार्यकर्ता. त्याने माहिती अधिकाराचा वापर करून तुम्हाला मिळालेल्या भेटवस्तूंबाबत माहिती मागविली. त्या भेटवस्तू कुठे आहेत?, त्याबाबतचे नियम काय आहेत?, भेटवस्तू बाहेर पाठविल्या असल्यास कोणत्या नियमान्वये पाठविल्या? असे अनेक उपप्रश्न विचारले. (याला उंगली करणं म्हणतात, ताई!) राष्ट्रपती भवनाने भानगड नको म्हणून त्या भेटवस्तू पुढील वर्षाच्या प्रारंभी परत दिल्लीत बोलावणार असल्याचे लेखी उत्तराव्दारे सांगून टाकले. ताई, लोक खूप उचापती झाले हो हल्ली. काही चांगलं पाहवतच नाही त्यांना. आता त्या वस्तू तुम्ही काय किंवा शेखावत साहेब घरी थोडेच घेऊन जाणार होते ? अमरावतीच्या युवा पिढीला आपल्या ताईंनी पाच वर्षात किती वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन देशासाठी किती महत्वपूर्ण करार केले, याची माहिती मिळाली असती. त्यातून अनेकांनी प्रेरणाही घेतली असती. पण नाही. ही आरटीआय कार्यकत्र्यांची जमातच अशी करंटी. यांना चालत्या गाडय़ात खिळे खुपसनं भारी आवडतं. तसंही ताई, अलीकडे हे असे तत्वनिष्ठ, नियम, मूल्यांबद्दल आग्रह धरणारे लोक जरा जास्तच वाढत चालले आहे. आता आमचे अजितदादा. चांगले धरणातून, त्यातील पाण्यातून प्रचंड पैसानिर्मितीचे अद्भुत प्रयोग करत होते. महाराष्ट्र त्यामुळे दीपून गेला असताना कोण कुठल्या विजय पांढरे नावाच्या सामान्य अभियंत्यानं एक लांबलचक पत्र लिहिलं. झालं! आमच्या एवढय़ा कर्तबगार दादाला एकदम आतला आवाज ऐकू यायला लागला. त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला. आता यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे, त्याचं त्या पांढरेला काय देणं-घेणं. ते आपले ज्ञानेश्वरीतील पसायदानात रमणार. पण इकडे संदीप बाजोरिया, मितेश भागडिया, सतीश चव्हाण अशा किती ठेकेदारांचे शिव्याशाप बसतील. उद्या त्यांचे संसार उघडय़ावर आले, तर जबाबदारी हे पांढरे घेतील का?

जाऊद्या ताई, चांगल्याचे दिवसच नाहीत. आता तुमचचं उदाहरण घ्या ना. निवृत्त झाल्यानंतर तुम्ही पुण्यात राहायची इच्छा व्यक्त केली. उतरत्या वयात मुलीजवळ राहावसं वाटतं माणसाला. घराकरिता निवृत्त जवानांसाठी असलेली सरंक्षण मंत्रालयाची एक जागा तुम्हाला पसंत आली. पाच वर्ष 350 खोल्यांच्या 200 एकर परिसरातील राष्ट्रपती भवनात राहिल्यानंतर जेमतेम 10 हजार स्क्वेअर फुट जागा तुम्हांला हवी होती. पाच वर्ष सरंक्षण दलाच्या तुम्ही सरसेनापती होत्या. त्यामुळे तुम्हाला थोडीफार जागा दिली असती तर काय बिघडलं असतं? पण नाही. तिथेही सुरेश पाटील नावाचा निवृत्त अधिकारी कोर्टात गेला. शोभलं का त्याला हे? तुम्ही त्याला सणसणीत चपराक दिली. अजित पवारांसारखाच बाणेदारपणा दाखवत ती जागा मला नको, असे सांगून तुम्ही मोकळ्या झाल्या. पण तेव्हापासून नाही म्हटलं तरी तुम्हाला वैतागच आला होता. स्वाभाविकही आहे ते. काहीही बोलतात हो लोक. मनात येईल ते बकतात. तुम्ही निवृत्त झालात आणि त्या फेसबुकवर लोक वाट्टेल ते लिहायला लागलेत. ‘पाच वर्षात तुम्ही म्हणे, 20 ट्रक सामान अमरावतीला पाठविलं. एकीकडे हे आणि दुसरीकडे कलाम. एक सुटकेस घेऊन आले आणि तिच सुटकेस घेऊन परत गेले.’ आता तुलना तरी अशी करायची असते का? कायम डोळ्यावर केस येणारे ते कलाम. त्यांना ना बायको, ना पोरं. ट्रक पाठवून करतील काय? ते म्हणे राष्ट्रपती भवनात येणारे आपले नातेवाईक आणि वैयक्तिक पाहुण्यांचा खर्च स्वत: करायचे. आता कलाम येडपटपणाने वागले म्हणून आपणही तसंच वागायला पाहिजे, असा नियम कुठे आहे? लोकांना बोलायला काय जाते हो ताई.आपल्याला रावसाहेबांना निवडून आणायचं होतं. त्यासाठी अमरावतीहून येणार्‍या-जाणार्‍यांची व्यवस्था आपण बघायला नको? तसंही सामान्य माणसाला कुठे हो, राष्ट्रपती भवन बघायला मिळतं. गेल्या पाच वर्षात तुमच्यामुळे एखादा लाख लोकांना राष्ट्रपतीसोबत फोटो काढल्याचा आनंद मिळाला. पण हे असं पॉझिटिव्ह कोणी सांगत नाही. रावसाहेबांसाठी काही लोकांना आपण दिल्ली, हरिव्दार, आग्रा, अजमेरची सफर घडवून आणली. पण लोकांना आनंद मिळावा. पर्यटनासोबत देवदर्शन व्हावं हाच त्यामागचा हेतू होता. शेवटी देशाच्या सर्वोच्च सत्तेचा उपयोग शेवटच्या माणसासाठीच करायचा असतो, हे गांधीजीच सांगून गेले आहेत. काहीही म्हणा ताई, तुमच्यावर प्रेसवाल्यांनी आणि तुमच्या विरोधकांनी जरा जास्तच टीका केली. तुम्हाला आठवत असेल, तीन वर्षापूर्वी तुम्ही त्या उर्मट डॉ. सुनील देशमुखाच तिकीट कापून आपल्या रावसाहेबांसाठी आणलं, तेव्हा मीडियानं किती रान उठविलं होतं. जणू काही आभाळ कोसळलं, असं त्यांचं वागणं होतं. आता आपल्या पोराबाळाची चिंता आपण नाही करायची तर कोणी करायची? तुम्ही तेव्हा धडपड केली नसती तर आज रावसाहेबांनी आई, तू राष्ट्रपतीपदावर असूनही मला त्याचा काहीच फायदा झाला नाही, असं दोषारोपण तुमच्यावर केलं असतं. त्यामुळे तुमचं मातृह्रदय किती बरं कळवळलं असतं. झालं ते बरंच झालं. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. आता ‘बाळा, तुझ्यात गट्स असतील, तर तू टिकशील’, असं सांगायला तुम्ही मोकळ्या झाल्यात. ताई, हे प्रेसवाले तसेही नालायक असतात. आता प्रणव मुखर्जीचा पोरगा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभा आहे. एक पत्रकार त्यांच्याविरुद्ध लिहित नाही. आता प्रणवदादांनी तुमच्यासारखी दुसर्‍याची जागा हिसकावून पोराला दिली नाही. स्वत:चाच मतदारसंघ दिला. मात्र तरीही पत्रकारांनी दादांना हितोपदेश द्यायला नको का? आता सारे मूग गिळून बसले आहेत. तरी बरं ताई, तुम्ही ज्यांना एक शब्दही लिहता येत नाही, अशाही पत्रकारांना परदेश दौर्‍यावर घेऊन गेल्या होत्या. त्यांनी तरी तुमची बाजू घ्यायला नको का? पण हे असंच असतं ताई. सत्तेवर असलं की सारेच लाळघोटेपणा करतात. सत्ता गेली की पाठ फिरवतात. आता तुघलक रोडवरच्या तुमच्या बंगल्यावर तुम्हाला किती लोक भेटायला येतात? बरं झालं ताई, तुम्ही निवृत्तीनंतर अद्याप अमरावतीत आल्या नाहीत. आधी तुम्ही यायच्यात तर एकेक किलोमीटरच्या रांगा लागायच्या. आता तुम्ही आल्यात, तर तुमची निराशा होईल. तुमचं पद जात नाही, तर ‘देवीसदन’वरील गर्दी कमी झाली. तरी बरं रावसाहेब अजून आमदार आहेत. लोक असेच कृतघA असतात. खाल्ल्या अन्नाला न जागणारे असतात. शेवटी छोटय़ा गावचे छोटे लोक आहेत ताई हे! त्यांना माफ करा. ते काय करताहेत त्यांना कळत नाहीय..

तुमचा
एक अमरावतीकर

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

भ्रमणध्वनी – 8888744796

Previous articleपाटबंधारे खात्याला लुटारूंचा विळखा
Next articleही अशीही माणसं असतात..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here