प्रिय भाजप सदस्यहो,

-टी एम कृष्णा

…………………….

प्रिय भाजप सदस्यहो,

एक नागरिक म्हणून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. माझा समाज-राजकीय विचार तुमच्याहून वेगळा आहे. आपण एकमेकांशी अखंड वाद घालत राहू; पण तरीही आपल्याला परस्परांविषयी आदर राखता यायला हवा. कारण मानवता हाच तर आपल्या ध्येयातला समान धागा आहे. भारताविषयी आपल्या सर्वांनाच प्रेम आहे हे गृहीत धरुन नागरिकत्वाच्या, सहभावाच्या नात्याने तुमच्याशी बोलतोय.

देश सध्या टकमक टोकावर उभा आहे. हजारो लोक मरताहेत. कित्येक लोकांचा मृत्यू झालाय, हे आपल्या गावीही नाही. जे ठणठणीत, बरे आहेत त्यांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी आपण झगडतो आहोत. हे सगळं अभूतपूर्व आहे आणि हा अंधार दूर लोटत आपल्याला वाट काढायलाच हवी. म्हणजेच आपण आपले दोष समजून घ्यायला हवेत. कर्तव्य पार पाडताना अक्षम्य दुर्लक्ष होतंय, हे आपण नजरेस आणून द्यायला हवं. हे करण्यासाठी कोविडोत्तर काळातल्या विश्लेषणाची गरज नाही. आता सर्वाधिक गरज आहे. आता या सगळ्यात सुधारणा करायला हवी. या महासाथीला शास्त्रीयदृष्ट्या आणि आस्थेने कसं सामोरं जायचं हे आपल्या हातात होतं आणि आजही आहे. लाखो लोकांचे जीव टांगणीला लागले आहेत.

T M Krishna

नरेंद्र मोदी हे फक्त तुमच्या पक्षाचे नेते नाहीत, ते आपले सर्वांचे देशाचे पंतप्रधान आहेत. या संवैधानिक भूमिकेचा विसर पडताच कामा नये. तुमच्या पक्षाचे तारणहार म्हणून त्यांच्याकडे न पाहता, संपूर्ण देशाचे नेते म्हणून त्यांच्याकडं पहा. माझ्यासाठी दोन क्षण असा विचार करा. अनेक दशकानंतर असं कणखर, शक्तिशाली नेतृत्व तुमच्या पक्षाला लाभलं आहे ज्यांनी एकदा नव्हे, दोनदा तुम्हाला बहुमत मिळवून दिलं आहे, हे काही काळासाठी बाजूला ठेवा.

मोदी दुस-या कोणत्या पक्षाचे असते तर तुम्ही असे शांत बसला असतात ? त्यांच्यामुळे हजारो स्थलांतरित मजूरांना अन्नपाण्याविना शेकडो किलोमीटर चालत जाण्याची वेळ आली असती तरी तुम्ही मौन धारण केलं असतं ? तुम्ही पंतप्रधानांना आणि सरकारला या गैरव्यवस्थापनाबद्द्ल धारेवर धरलं नसतं ? ज्यांच्यामुळे लसीकरणाचा कार्यक्रम रखडलाय आणि लोक खाजगी कंपन्यांच्या दयेवर अवलंबून आहेत, अशा पंतप्रधानांना तुम्ही प्रश्न विचारले नसते? देशाच्या राजधानीतच ऑक्सिजन उपलब्ध नाही, हे पाहून तुम्ही उद्विग्न झाला नसतात ? सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करुन ऑक्सिजन देण्याबाबत सरकारला आदेश द्यावे लागतात, हे पाहून तुम्हाला धक्का बसला नसता ?

काही राज्यांमधला कोविड डाटामधला घोळ पाहून तुम्ही चौकशीची मागणी केली नसती ? नियोजनशून्य कारभारामुळे आणि शास्त्रीय सल्ल्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असं तुम्ही म्हणाला नसतात ? आणि या सगळ्या भीषण अवस्थेत मंत्री सरकारची चांगली प्रतिमा टिकून रहावी म्हणून प्रयत्न करत आहेत आणि विरोधी विचाराच्या लोकांच्या सोशल मिडिया अकाउंटसची गळचेपी करण्यात व्यस्त आहेत ! दरम्यान सरकार सेंट्र्ल विस्टा या संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या प्रकल्पात व्यस्त आहे.

राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका कशा पार पडल्या ते सोडा, पण कोविड संसर्गाचे आकडे उच्चांक गाठत असताना लाखोंची गर्दी गोळा करुन पंतप्रधान सभा घेत होते, हे धक्कादायक नव्हतं का ? त्यांनी स्वतःच असा वस्तुपाठ घालून दिल्यावर नागरिकांनी कोविड प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून आपण नागरिकांना दोष देऊ शकतो का ?

आंतराष्ट्रीय माध्यमं आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करताहेत, असं तुमचं मत आहे, यावर माझा विश्वास नाही. ती चित्रं खरी आहेत, ती माहिती, त्या स्टोरीज ख-या आहेत. प्रेतांची रास जळते आहे, हे खरं आहे. लोक श्वास घेण्यासाठी झगडताहेत. लोक मदतीची याचना करताहेत इतर लोकांकडून, सरकारकडून नव्हे ! हे पाहून तुम्हाला धक्का बसत नाही ? तुमचं हृदय हेलावून जात नाही ? तुम्ही आणि मी या महासाथीत कित्येक मित्र गमावले पण तरीही या सा-या अराजकाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असं म्हणताना तुमची जीभ अडखळते. जीव वाचवण्यापेक्षा तुमच्या नेत्याची प्रतिमा वाचवणं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ? अंतर्गत लोकशाहीविषयी तुमचा पक्ष नेहमी बोलतो. ती प्रत्यक्षात यावी म्हणून तुम्ही आता का बोलत नाही ? विशेषतः आता ?

कर्तव्य कुचराई करण्यात राज्य सरकारंही जबाबदार आहेतच; पण कोविड महासाथ हाताळण्याची प्रमुख जबाबदारी केंद्राची आहे. मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. तेव्हापासून सहकार्यशील संघराज्यवाद दिसण्याऐवजी मोदी सरकार खोडाच घालताना दिसते आहे. केंद्र सरकार हे कोणत्याही राज्यापेक्षा शक्तिशाली आहे आणि या परिस्थितीवर नियंत्रण राखण्याची, दुवा साधण्याची सर्वाधिक जबाबदारी केंद्राचीच आहे. या ऐक्यभावनेच्या विश्वासासह पंतप्रधानांनी एकदाही संवाद साधला नाही. दुस-या बाजूस बसलेल्या आपल्याच सहका-यांवर ते केवळ आगपाखड करत असतात.

प्रत्येक नागरिकाचं मी संरक्षण करेन, असं ते पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. माझ्या सगळ्या कृत्यांची जबाबदारी माझी आहे, असंही ते सांगत राहिले. आपण अतिशय साधारण कुटुंबातून आलेलो असल्याने कष्टकरी जनतेच्या हालापेष्टा आपण जाणतो,असंही ते म्हणाले. मात्र ते अक्षरशः आम्हा सर्व नागरिकांना जोजवल्यासारखं करताहेत. ‘मन की बात’ मध्ये ते आधीच ठरलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात तर माध्यमांमधल्या त्यांच्या मुलाखतीही ‘पूर्वनियोजित’ असतात. एकही खुली पत्रकार परिषद का घेत नाही, असा सवाल तुम्ही त्यांना का करत नाही ? मोदी वगळता जगभरातले सगळे नेते पत्रकार परिषदांना सामोरे जाताहेत.

कोविड १९ चं संकट जेव्हा आलं तेव्हा मोदी सा-या पक्षांची मोट बांधू शकले असते. धोरणं, निर्णय, कृती, व्यवस्थापन या सा-याची जबाबदारी वाटून देता आली असती. शतकांमधून कधीतरी अशी महासाथ येते. त्याचं आधी सारं नियोजन कोणीच करु शकत नाही मात्र किमान आपण ही लढाई एकत्र लढली असती. आपण नागरिक खासदार निवडतो, पक्ष नाही, हे आपण विसरुन गेलो आहोत. मोदींना आपण ‘स्टेटसमन’ आहोत, असं दाखवून देता आलं असतं.

अवघड प्रश्न विचारण्याची विशिष्ट एक योग्य वेळ नसते. प्रत्येक दिवशी तुम्ही शांत राहता आणि हजारो लोक मरतात. आता या कारभारात तातडीने सकारात्मक, रचनात्मक हस्तक्षेप केला नाही तर परिस्थिती भयंकर प्रकोपाला जाऊ शकते, हे आपल्याला माहीत झालं आहे.

तुम्हाला भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल !

-( लेखक प्रख्यात संगीतकार आहेत. सदर लेख ‘Dear BJP Members’ या शीर्षकासह द इंडियन एक्सप्रेसच्या छापील आवृत्तीत ११ मे २०२१ रोजी प्रसिद्ध झाला आहे. )

अनुवाद: श्रीरंजन आवटे

Previous articleकोरोना उपचारासाठी नवीन औषध: 2-Deoxy-D-Glucose
Next articleलसीकरण की सेंट्रल व्हिस्टा?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.