फक्त आणि फक्त अनुभवावा असा ‘ऑक्टोबर’! 

– सानिया भालेराव

मी जेव्हा चित्रपटांबद्दल लिहिते तेव्हा ते त्या चित्रपटाचं परीक्षण वगैरे नसतं. चित्रपट पाहताना जे अनुभवते ते मी लिहिते त्यामुळे मला एखादा चित्रपट चांगला वाटला म्हणजे तो सगळ्यांनाच चांगला वाटेल असं नाही होत. कारण आपण आपल्या अनुभवानुसार, सेन्सिबिलिटीनुसार चित्रपट पर्सिव्ह करत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाची अनुभूती वेगळी आणि म्हणूनच मी जे लिहिते ते चित्रपटाबद्दल नसून मी अनुभवलेल्या इमोशन्स बद्दल असतं. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे आजचा चित्रपट.. सुजित सरकारचा “ऑक्टोबर’. मला वाटतं कित्येक वर्षात मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी हा एक! ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे थेट हृदयात हात घालून कोणी आत जोरजोरात ढवळून काढावं आणि त्यामुळे आपण एक विलक्षण भावनिक प्रलय अनुभवावं अशी कलाकृती बनणं फार दुर्मिळ आणि म्हणूनच ‘ऑक्टोबर’ फार स्पेशल!

ही गोष्ट आहे डॅन वालिया( वरुण धवन) आणि शिऊली अय्यर ( बनिता संधू) या हॉटेल मॅनेजमेंट करून शेवटची इंटर्नशिप करणाऱ्या दोन तरुण मुलांची. इंटर्नशिपच्या दरम्यान एका पार्टीत डॅन नसतो आणि तो कुठे आहे हा प्रश्न विचारत असताना शिऊलीचा तोल जातो आणि ती आयसीयूमध्ये पोहोचते. पुढे तिचं काय होतं, त्यामुळे तिच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कसे पडसाद उमटतात आणि डॅनला स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल काय जाणवतं अशी ही गोष्ट . चित्रपटाची स्टोरी न सांगता ह्या चित्रपटावर लिहिणं अवघड पण चित्रपट पाहिल्याशिवाय हे अनुभवता येणं अशक्य … आपल्या डोक्यात प्रेम म्हणजे १ + १ = २ हा फॉर्म्युला चित्रपटांनी इतका पक्का केला आहे की ह्या दोघांमधलं प्रेम आपल्याला धक्के देत राहतं आणि संपूर्ण चित्रपटभर अचंबित करत राहतं. सुजित सरकार आणि जुही चतुर्वेदी यांनी ह्या आधीही ‘विकी डोनर’ आणि ‘पिकू’ सारखे ऑफबीट चित्रपट केले आहेत. पण ह्या चित्रपटातून एकूणच प्रेमाबाबत, आयुष्याबाबत आणि जगण्याबाबत ते जे सांगू पाहत आहेत ते केवळ विलक्षण. एखादा चित्रपट ज्या मध्ये हिरोइन आयसीयूमध्ये आहे आणि कोणताही इमोशनल ड्रामा न करता, हिरोने हात लावताच हिरोईन कोमातून बाहेर येते वगैरे असले फिल्मी प्रसंग न दाखवता, रडारडीचे सीन टाळून, प्रेमाचा चौकटीतला फॉर्म्युला न लावता, प्रेमाची नवीन व्याख्या सांगू पाहणारा, प्रेक्षकांना अंतर्मुख करू पाहणारा, एकाच वेळी आयुष्यापुढे असहाय्य करणारा आणि त्याच वेळी आयुष्यासाठी लढू पहाणारा आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेवर अखंड विश्वास ठेवून जेंव्हा ‘ऑक्टोबर’ सारखा चित्रपट येतो तेव्हा त्या दिग्दर्शकाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं मला वाटतं.

चित्रपट पाहताना, संपल्यावर सुद्धा डोळ्यातून पाणी येणं थांबलं नाही. कित्येक वर्षात अपरिमित दुःख , त्रास, आनंद आणि अस्वस्थता ह्या चारीही भावना एकाच वेळी कोणताही चित्रपट पाहून अनुभवता आल्या नाहीत. वरुण धवनने डॅन सुंदर रंगवला आहे. इनोसंट, क्युट आणि थोडासा वेडपट असलेला डॅन खूप आवडून जातो. शिउलीचं काम करणारी बनिता डोळ्यातून खूप काही सांगून जाते. तिच्या आईचं काम करणारी गीतांजली राव ह्यांनी देखील जबरदस्त अभिनय केला आहे. चित्रपटाचं नावसुद्धा फार विचार करून ठेवलं आहे. शिउलीला प्राजक्ताची फुलं खूप आवडतात. तिची आई एका सीनमध्ये वरुणला सांगते म्हणून तिचं नाव शिउली ठेवलं कारण प्राजक्ताचं अजून एक नाव म्हणजे शिउली. ही फुलं ऑक्टोबर महिन्यात येतात .ह्या झाडाला ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात कारण ह्या फुलांचं आयुष्य खूप कमी असतं त्यांचा सुगंध खूप दरवळणारा असला तरीही.. आणि वरुण म्हणतो, ‘आपल्या शिउलीसारखा..’ आणि म्हणून चित्रपटाचं हे नाव. इतक्या बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा चित्रपट बनवला असला तरीही तो अत्यंत सहज आणि कोणत्याही पडद्याशिवाय आपल्या पर्यंत पोहोचतो. चित्रपटाचा अर्ध्याहून अधिक भाग हॉस्पिटलच्या अवतीभोवती चित्रित झाला असूनही कुठेही मेलोड्रॅमॅटिक होत नाही हे विशेष. एखाद्या नितांत सुंदर कवितेसारखा हा चित्रपट उलगडत जातो . आणि चित्रपटाचा शेवटसुद्धा अप्रतिम. सहज तरीही आतून पोखरणारा.

कित्येकदा आपण आयुष्य, आपल्या आजूबाजूची लोकं फार गृहीत धरतो. काही क्षणांसाठी का होईना मिळालेल्या आयुष्याबद्दल, आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञ राहता आला पाहिजे . किती जगायचं ह्यापेक्षाही कसं जगायचं हे महत्वाचं. आयुष्यात येणाऱ्या अवघड प्रसंगांना तोंड देताना दुःखाचा शोऑफ न करता ते मनात ठेवून धगधगतं ठेवून त्याचं तेज जेव्हा आपल्या चेहेऱ्यावर झळाळतं ते काही औरच. एक महत्वाची गोष्ट … ज्यांना फास्ट पेस्ड, ड्रॅमॅटाइज्ड आणि काँक्रीट स्टोरीलाईन असलेले चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही. ज्यांनी आयुष्यात काहीतरी गमावलं आहे, ज्यांना कधी कधी काही गोष्टींना नेमका शेवट नसतो हे माहिती आहे, कोणताही ड्रामा न करता दुःख झेलत माणूस आपलं जगत राहतो पण आतून तो हळूहळू तुटत असतो हे ज्यांनी अनुभवलं आहे, एखादा क्षण माणसाचं पूर्ण असणं, जाणिवा आणि अस्तित्व निष्फळ ठरवतो आणि तोच क्षण आयुष्य कसं जगायचं हे देखील सांगतो, हे जे जगले आहेत आणि कोणत्याही चौकटीत न बसणारं, शहाणपण आणि वेड ह्यांच्या पलीकडे नेऊन ठेवणारं, प्रॅक्टिकलीटीच्या सर्व संज्ञा मोडकळीस आणणारं प्रेम ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट! कधीही आणि कशानेही न शमणाऱ्या अस्वस्थतेसाठी, हृदयाची लाही लाही करणाऱ्या प्रेमासाठी आणि अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही सर्व बांध फोडून डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यासाठी … फक्त आणि फक्त अनुभवावा असा ‘ऑक्टोबर’!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

हे सुद्धा नक्की वाचा-

‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’ चित्रपटाची लिंक http://bit.ly/2QcghSf

अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्रhttp://bit.ly/2VPJKXv

नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे– http://bit.ly/2LgHILE

जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’! http://bit.ly/2VVvmcR

द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleनको उश्रामे आणि नको उन्मादही…  
Next articleकमलाचे जाणे व लखनऊचे अध्यक्षपद
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.