फाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री

-शेखर पाटील

.

आपण करत असलेले कोणतेही काम हे काळाच्या ओघात बदलत जाते. हा बदल आपण नेमका कसा स्वीकारतो यावर बर्‍याच बाबी अवलंबून असतात. खरं तर आधी बदलाचा वेग हा कमी असल्याने याबाबत फारशी घाई गडबड होत नसे. आता मात्र सुसाट वेगाने बदल होत असल्याने याचा तातडीने अंगिकार करण्यात धांदल उडत असल्याचा आपण सर्वांचा अनुभव असेलच. हाच अनुभव मला पत्रकारिते आलेला आहे. मी डिसेंबर २००२ मध्ये पत्रकारितेत आलो तेव्हा काही महिन्यांपर्यंत मी सर्व बातम्या हातांनी कागदावर लिहून काढत असे. माझे तेव्हाचे संपादक सुभाष सोनवणे साहेब यांनी मला प्रत्येक बातमी लिहून काढल्यास माझी प्रगती वेगाने होईल असेही सुचविले होते. यानुसार मी झपाटून त्यांच्या सुचनांचे पालन केले. याचा मला खूप लाभ झाला. या नंतर मात्र बदल गतीमान झाले

खरं तर मी पत्रकारितेत आलो तेव्हा इंटरनेटची डायल-अप या प्रकारातील आवृत्ती उपलब्ध होती. आज १७ वर्षांमध्ये डायलअप नंतर ब्रॉडबँड, वन-टू-थ्री पासून ते फोर-जी नेटवर्क आणि फायबर-टू-होम या प्रकारात इंटरनेटची गती बदलली आहे. या सोबतच मी कामाचा वेगदेखील बदलला आहे. आधी कागदावर बातम्या लिहतांना नंतर मी टायपींग शिकलो. गेल्या अनेक वर्षांपासून मी बातम्या लिहण्यासाठी पेन वापरला नाही. किंबहुना बँकेच्या कामासाठी स्वाक्षरी करण्याशिवाय मी पेनदेखील कधी वापरत नाही. या पार्श्‍वभूमिवर, येत्या काही महिन्यांमध्ये फाईव्ह जी मोबाईल नेटवर्क कार्यरत होणार असल्याने मी आधीच माझ्या कामाचा गिअर बदलला असून माझे सहकारीदेखील याला बदलण्याच्या तयारीत आहेत. सध्या आपण वापरत असणार्‍या इंटरनेटच्या अनेक पटीने वेग मिळणार असल्याने जर कामाची गती तीच ठेवल्यास स्पर्धेत टिकाव धरणार तरी कसा ? हा प्रश्‍न मला पडला आहे.

सध्या चांगले नेटवर्क असल्यास सरासरी ५० मेगाबाईट प्रति-सेकंद इतका इंटरनेटचा वेग मिळतो. तर फायबर-टू-होम या प्रकारातही शेअर्ड कंप्युटर असले तर जवळपास याच गतीने चांगल्या पध्दतीत इंटरनेटची गती वापरता येते. आता फाईव्ह जी नेटवर्क आल्यानंतर सर्वात लक्षणीय बदल हा अर्थातच इंटरनेटच्या गतीमध्ये होणार आहे. विद्यमान वेगाच्या किमान २० पट गतीने अर्थात जवळपास एक जीबी प्रति-सेकंद इतक्या गतीने डाटा वापरता येणार आहे. अर्थात, एका अक्षरश: एका सेकंदात फुल एचडी सिनेमा डाऊनलोड करण्याची क्षमता असणार्‍या वेगात आपण काम करणार आहोत. आता इंटरनेटच्या गतीचा आणि पत्रकारितेचा तसा फारसा संबंध असेल यावर बहुतांश पत्रकारांचा विश्‍वास बसणार नाही. तथापि, इंटरनेटची गती ज्या पध्दतीत वाढली अगदी त्याच प्रकारे पत्रकारितेची गतीसुध्दा वाढली. किंबहुना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मीडियाला गतीमान होणे भाग पडले. २०१० पर्यंत हा बदल फारसा जाणवला नाही. तथापि, यानंतर सोशल मीडियाचे प्रचलन तसेच थ्री-जी आणि फोर-जी इंटरनेटमुळे गतीमधील हा बदल लक्षणीयरित्या दिसून आला. या पार्श्‍वभूमिवर, मोबाईल नेटवर्कची नवीन पिढी उंबरठ्यावर उभी असतांना प्रसारमाध्यमांनीही बदलाची तयारी सुरू करणे क्रमप्राप्त आहे. तथापि, बदलांची ही दिशा नेमकी कशी असेल याची किमान प्राथमिक माहिती तरी आपल्याला असणे आवश्यक आहे. यात खाली नमूद केल्यानुसार साधारणपणे पाच प्रकारे फाईव्ह-जी नेटवर्क प्रसारमाध्यमांना बदलू शकते.

१) स्मार्ट न्यूजरूम : खरं तर, फोर-जी नेटवर्कमुळे पारंपरीक मीडियातील न्यूज रूम ही थोड्या प्रमाणात तरी बदलली आहे. बदलाचा हा वेग फाईव्ह-जी नेटवर्कच्या आगमनानंतर गतीमान होण्याची शक्यता आहे. बहुतेक मीडिया हाऊसेसमध्ये स्मार्टफोन हा महत्वाचा घटक बनला आहे. माहितीच्या आदान-प्रदानाचा पहिला स्त्रोत स्मार्टफोनच बनलेला आहे. एकीकडे वाढीव रॅम आणि स्टोअरेजसह दर्जेदार कॅमेर्‍यांनी युक्त स्मार्टफोन्स बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे फाईव्ह-जी नेटवर्कच्या माध्यमातून माहितीचे वहन अतिशय वेगवान पध्दतीत होणार असल्याने स्मार्टफोनची उपयुक्तता वाढणार आहे. परिणामी कोणत्याही मीडिया हाऊसच्या न्यूजरूममधील स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांचे महत्व अजूनच वाढणार आहे. पारंपरीक मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये स्मार्टफोनचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

२) ‘गो व्हिज्युअल’ : फोर-जी नेटवर्कच्या युगातच व्हिज्युअल नॅरेशनला खूप महत्व आलेले असून फाईव्ह-जी नेटवर्कमध्ये याला अजून गती मिळण्याची शक्यता आहे. निव्वळ शब्द वा प्रतिमांपेक्षा चलचित्रांच्या माध्यमातून मांडले जाणारे कंटेंट हे जास्त प्रमाणात वापरले जाईल. सद्यस्थितीत एचडी वा फार तर फुल एचडीचा वापर प्रचलीत असतांना फाईव्ह-जी नेटवर्कमुळे फोर-के क्षमतेच्या व्हिडीओजचा वापर विपुल प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अर्थात, दृश्य स्वरूपातील कंटेंटचा दर्जादेखील वृध्दींगत होणार आहे. यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या प्रमाणात प्रचंड वाढ होणार हे देखील उघड आहे. यात कौशल्य दाखविण्याचे आव्हान प्रत्येक मीडियाकर्मीला पेलावे लागणार आहे.

३) कट द कॉर्ड : फाईव्ह-जी नेटवर्कमुळे आपली टिव्ही पाहण्याची सवय ही पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये आधीच कट द कॉर्ड ही मोहीम वेग धरू लागली आहे. यामुळे केबल आणि डीटीएच सेवांच्या माध्यमातून पाहिले जाणारे टिव्हीचे कार्यक्रम हे इंटरनेटचा वापर करून पाहिले जात आहेत. भारतातही अमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लीक्स, हॉटस्टार आदींसारख्या ओटीटी (ओव्हर द टॉप) सेवा लोकप्रिय झाल्या असल्या तरी हा प्रकार अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. फाईव्ह-जी नेटवर्कमुळे याला गती मिळू शकते. यामुळे वृत्तवाहिन्यादेखील बर्‍याच प्रमाणात बदलू शकतात. फोर-जी नेटवर्कमुळे बर्‍याच ठिकाणी ओबी व्हॅनसारखी महागडी साधने कालबाह्य होण्याच्या मार्गावर असतांना याच्या पुढील आवृत्ती ही वृत्तवाहिनीचे स्ट्रक्चरच पूर्णपणे बदलू शकते. म्हणजे सॅटेलाईटच्या महागड्या आकारणीपेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून वृत्तांचे प्रक्षेपण हे सोपे होणार आहे. यामुळे अर्थातच कमी मूल्यात इंटरनेटवर आधारित वृत्तवाहिन्यांचा वर्गदेखील अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही वर्तमानपत्रे सुपरफास्ट इंटरनेटच्या मदतीने आपल्या मुद्रीत माध्यमाला डिजीटलची जोड देऊ शकतील. यासाठी अर्थातच कोणतीही महागडी साधने लागणार नाहीत. मुद्रीत आणि डिजीटल अशा संकरीत म्हणजेच हायब्रीड मीडियाला फाईव्ह-जी नेटवर्क गतीचे पंख प्रदान करण्याची शक्यता आहे.

४) इमर्सिव्ह जर्नालिझम : पाचव्या पिढीतील इंटरनेटचा सुसाट वेग हा आभासी सत्यता अर्थात, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीला गती देण्याची शक्यता आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये हा प्रकार अतिशय मर्यादीत प्रमाणात वापरला जात आहे. फाईव्ह-जी नेटवर्कच्या प्रचलनामुळे ३६० अंशातील त्रिमीतीय (थ्रीडी) आणि अतिशय हाय रेझोल्युशनच्या इमेजेस व व्हिडीओजचा वापर प्रचलीत होणार ही बाब स्पष्ट आहे. कोणतेही वृत्त अथवा रिपोर्टमध्ये वाचक, प्रेक्षक वा युजरला थेट त्या ठिकाणी उपस्थित असल्याची अनुभूती यातून घेता येईल. अर्थात, या नेटवर्कमुळे इमर्सिव्ह जर्नालिझमला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अतिशय भन्नाट प्रकार असून याबाबत मी लवकरच सविस्तर लिहतो.

५) कृत्रीम बुध्दीमत्ता : वर नमूद केल्यानुसार स्मार्टफोन व मोबाईल इंटरनेटचा वेग हा सुसंगत पध्दतीत वाढत असतांना तंत्रज्ञानाच्या अन्य काही शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू आहेत. यातील आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. खरं तर, थेट रोबो जर्नालिझमचे युग येण्यासाठी खूप अवकाश असला तरी एआय ने युक्त असणारे टुल्स हे पत्रकारितेत मोलाची भूमिका निभावतील. यात व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीने कार्यान्वित होणार्‍या सेवा प्रामुख्याने पत्रकारितेत प्रचलीत होऊ शकतात. गुगल असिस्टंट वा अलेक्झा यांच्या मदतीने सध्यादेखील बातम्या ऐकता येतात. हा प्रकार फाईव्ह-जी वापरात आल्यानंतर अगदी हायपर लोकल अर्थात स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतो. किंबहुना आपले कंटेंट हे व्हर्च्युअल असिस्टंटशी संलग्न असावे असा प्रत्येक मीडिया हाऊसचा प्रयत्न असेल. अर्थात, या माध्यमातून पुल जर्नालिझम कडून पुश जर्नालिझमचा प्रवास (याबाबत मी आधी लिहले असून आपण याला माझ्या ब्लॉगवर वाचू शकतात. ) हा अधिक गतीमान होऊ शकतो.

या पाच महत्वाच्या क्षेत्रांच्या माध्यमातून फाईव्ह-जी नेटवर्कमुळे पत्रकारितेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खरं तर या नेटवर्कच्या गतीमान इंटरनेटमुळे अनेकविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून याचे प्रतिबिंबदेखील पत्रकारितेत उमटणार हे निश्‍चित. जगातील काही ख्यातनाम मीडिया हाऊसेसनी फाईव्ह-जी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आपल्याला सज्ज केले असून याचे विपुल संदर्भ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पत्रकारितेत काम करणार्‍यांनी आगामी कालखंडातील हा संभाव्य बदल लक्षात घेऊन पुढे आगेकूच करण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास आपण खर्‍या अर्थाने अपडेट राहू शकतात. अन्यथा फक्त सोशल मीडियात अ‍ॅक्टीव्ह असणे म्हणजे डिजीटल पत्रकारितेत पारंगत असणे असे नव्हे ! दर्जेदार व वर्तमानाशी सुसंगत कंटेंट क्रियेशन आणि याच्या अचूक डिलीव्हरीचे गणित जमले पाहिजे. मीडिया हाऊसेसच्या मालकांच्या लक्षात ही बाब आलेली आहे. आता पत्रकार मित्रांनी याला समजून घ्यावे हीच अपेक्षा.

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous article उद्धवा , हाती चाबूक घ्या ! 
Next article|| हवंतर ||
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.