फॅशिस्ट मुस्कटदाबी फार काळ टिकत नसते.

भारत सरकारच्या वॉट्सॅप उद्योगांचे भांडे फुटले. आणि मग या साऱ्या इतिहासाची उजळणी करावीशी वाटली.
————

– मुग्धा कर्णिक

नाझी काळात जर्मनीतून एक नियतकालिक निघत असे- ‘द जर्मन क्वार्टर्ली’. १९३८ साली या नियतकालिकात ‘लोक आणि नेता’ (फोक उंड फ्यूरर) या नावाचा एक लेख छापून आला. यात असे म्हटले होते की जगातील कोणत्याही लोकशाही राष्ट्रापेक्षा जर्मनीतील लोकशाही बळकट आहे. कारण जर्मनीतील लोकांचे नेतृत्व हिटलरसारख्या महान आत्म्याकडे आहे. लोकांच्या आशा-आकांक्षा, इच्छा हिटलरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कुणालाही कळू शकत नाहीत. संसद, विधानसभा वगैरेंकडून लोकशाहीची अपेक्षा फोल ठरते कारण ते केवळ हितसंबंधांचे खेळ खेळतात, तडजोडी करतात.
क्योनिस्बर्ग विद्यापीठातील एफ ए सिक्स नावाच्या प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या परिषदेतसमोर केलेल्या भाषणात असे प्रतिपादन केले की ‘नाझी माध्यमे हीच खरी जनहिताची, लोकशाही स्वरुपाची माध्यमे आहेत. इतर राष्ट्रांतील स्वतंत्र माध्यमे ही नाझी माध्यमांइतकी बौद्धिक शुचिता, नैतिकता, सामाजिकता नागरिकांना देऊच शकत नाहीत. ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेतील माध्यमांना जे करता येत नाही ते जर्मन माध्यमे लोकांसाठी करतात.’ संपूर्ण देशासाठी एकच वृत्तपत्र नसणे, जाहिराती किंवा लोकांना निवडीचे स्वातंत्र्य असणे हे या प्राध्यापक महोदयांच्या मते लोकशाहीसाठी नुकसानकारक असते. आणि त्या दृष्टीने केवळ जर्मन वृत्तपत्रेच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आहेत.
हे वाचून हसण्याचे दिवस आता आपल्याकडे सरत आले आहेत, तरीही अजूनही आपण नाझी राजवटीच्या उंबरठ्यावरच असल्यामुळे हसून घेऊ शकतो.
हिटलरच्या जर्मनीबद्दल आपल्याला तशी बरीच माहिती होते कारण हिटलर आणि त्याची नाझीसेना मुसोलिनी आणि त्याच्या फॅशिस्ट सेनेपेक्षा अधिक प्रभावी ठरली. पण मुसोलिनीचे विचार दडपण्याचे मॉडेल काय होते हे पाहाण्यासारखे आहे. सध्याच्या राजवटीचे एक प्रपितामह मुसोलिनीला भेटून आले होते म्हणून ते अधिक महत्त्वाचे ठरते.
फॅशिझमचे जन्मस्थान असलेल्या इटलीमध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर थेट गदा न आणता मागल्या दाराने सेन्सॉरशिप आणली गेली होती. नागरिकांनी, नियतकालिकांनी कुठे काय बोलावे, लिहावे, कसे लिहावे, राजवटीसंबंधी काय प्रकट करावे, काय लपवावे या विविधांगी सेन्सॉरनियमांमध्ये माध्यमे, उच्चारस्वातंत्र्य सारेच जखडले गेले.
राजवटीच्याविरुद्ध सार्वजनिकरित्या काहीही लिहिले गेले तर ते उजेडातच येऊ दिले जात नसे किंवा काढून टाकले जात असे. ज्यातून राजवटीचा विरोध, संशयाचे वातावरण, फॅशिझमसंबंधी शंका व्यक्त होतील असे काहीही लिखाण प्रसिद्ध होऊ दिले जात नसे.
सर्व जनता आपल्याला एकमुखी पाठिंबा देते आहे असे चित्र निर्माण करण्यासाठी माध्यमे किंवा लोकमतावर सातत्याने लक्ष ठेवले जात असे.
या शिवाय स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर अभिलेख तयार करण्यात आले होते. त्यात प्रत्येक नागरिकाची फाईल ठेवली जात असे. प्रत्येकाच्या कल्पना, सवयी, नातीगोती, त्याच्या हातून घडलेल्या आक्षेपार्ह किंवा लज्जास्पद कृत्यांची माहिती त्यात नोंदलेली असे.
सेन्सॉरशिपच्या शस्त्राने वैचारिक विरोध, राजवटीवरील टीका, राजवटीने आरंभलेल्या ‘सांस्कृतिक’ कार्याला विरोध मोडून काढला जात असे.
मुसोलिनीने इटालियन नागरिकांची मने ‘घडवण्याचा’ प्रकल्पच हाती घेतला होता. सेन्सॉरशिप आणि प्रचार अशा दोन शस्त्रांनी त्याने हे काम करायला घेतले होते. लोकमानसातील विश्वासाची मशागत करतानाच नागरिकांच्या मनात योग्य मात्रेत भयाची पेरणी हे इटालियन फॅशिस्टांचे वैशिष्ट्य होते. राष्ट्रवादाचे ढोल बडवून नागरिकांच्या मनात एकसुरी निष्ठा निर्माण करण्याचा हेतू यात स्पष्ट होता.
मुसोलिनी हा एक उत्तम वक्ता होता, प्रचारकी थाटाचे घणाघाती भाषण करणे हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता. राष्ट्रप्रेमाचा जबरदस्त देखावा उभा करून सत्ता कशी प्राप्त करता येईल याचे त्याला नेमके भान होते. आणि देखावा उभा करायचा तर त्यात अडथळे आणणारे सत्य कधीही बाहेर येता कामा नये, दिसता कामा नये याची त्याला पक्की जाणीव होती.
माध्यमांच्या स्वातंत्र्याशी फार हुषारीने खेळला मुसोलिनी. वर म्हटल्याप्रमाणे थेट गदा न आणता त्याने सेन्सॉरशिपची कानस वापरली. १९२९मध्ये त्याने वृत्तमाध्यमांसाठी एका हायकमिशनची स्थापना केली. हे हायकमिशन कधीही वृत्तपत्रस्वातंत्र्याला बाध येऊ देणार नाही असे तो ठासून सांगत असला तरीही त्याचा उजवा हात आल्फ्रेडो रोको, यात केले जाणारे अपवाद हळूच सांगत असे. स्वातंत्र्याला बाध येऊ न देण्यात अपवाद होते- राष्ट्रीय हितसंबंध दुखावणारे कोणतेही लिखाण सहन केले जाणार नाही, पितृभूप्रती निष्ठा असणे सर्वात महत्त्वाचे आहे… त्यापुढे बाकी सारे दुय्यम. वगैरे. पत्रकारिता म्हणजे अखेर देशसेवा आहे, आणि इटालियन लोकांच्या मानसिक, नैतिक घडणीत पत्रकारितेचा मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. वगैरे. देशाच्या शासनावर अविश्वास दाखवत चौकस लिखाण करणे ही देशाची गरज नसून राष्ट्रबांधणीसाठी एकात्मतेने आणि लढाऊपणे लिखाण करणे गरजेचे आहे. वगैरे. या राष्ट्रबांधणीसाठी काही सत्ये, गुपिते तळघरात ढकलून देणे श्रेयस्कर असल्यास तसे अवश्य करावे, राष्ट्रबांधणीच्या कार्यात पत्रकारांनी अडथळा आणू नये असे मुसोलिनी स्पष्ट सांगत असे. (राफेल राफेल म्हणू नका.) सेन्सॉरशिप ही अशा तऱ्हेने राष्ट्रकल्याणाच्या एकमेव हेतूने लादली गेली होती. मुसोलिनीच्या नेतृत्वाला अबाधित ठेवणे हा त्यामागचा हेतू अर्थातच नव्हता(!).
तेव्हाच्या इटलीतील वृत्तपत्रे, माध्यमे ही अशा तऱ्हेने स्वतःवरच बंधने घालून घेऊ लागली, राष्ट्रबांधणीसाठी कटिबद्ध झाली.
मुसोलिनी हा स्वतः चांगला लेखक होता, संपादक होता. विचार व्यक्त करणारे शब्द रत्नेही असतात आणि शस्त्रेही असतात याची त्याला पक्की जाण होती. आणि त्यामुळे संसदीय लोकशाहीकडून स्वतःच्या एकाधिकारशाहीकडे देशाला ओढत नेताना त्याला शब्दांवरच्या नियंत्रणाची गरज कुणी शिकवावी लागली नाही. सत्तेत शिरकाव केल्याबरोबर १९२३मध्येच त्याने माध्यमांवरील नियंत्रणाचे, सेन्सॉरशिपचे विधेयक आणले. सेन्सॉरशिप कडक केल्यानंतरही प्रेस ऑफिसने नियतकालिके, प्रकाशने बॅन करण्यापूर्वी त्याची स्वतःची मान्यता घ्यावी असाही नियम त्याने नंतर केला होता. अगदी स्थानिक वृत्तपत्रांनाही केंद्रीय परवानग्या लागू लागल्या. सारी सेन्सॉरशिप केंद्रीभूत होत गेली.
फॅशिस्ट इटलीमध्ये सुरुवातीला फॅशिस्ट पायदळ अनौपचारिकपणे धाडी घालणे, प्रकाशने बंद पाडणे वगैरे उद्योग बिनबोभाट करीत असे. त्याला कायद्याचे अधिष्ठान नव्हते. पक्षाकडून गुपचूप होकार मिळाला की फॅशिस्ट बजरंग दल कारवाई करायला सुटत असे. त्यांना विरोध करणारांना मारपीट केली जात असे. या उचापतींना मुसोलिनीने कायद्याची चौकट पुरवल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरेपूर नाकेबंदी झाली.
एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की पहिल्या महायुद्धानंतर सत्तेत असलेल्या इटालियन शासनानेही १९१५नंतर सेन्सॉरशिप कडक ठेवली होती. मुसोलिनीच्या हातात मिळालेली शासनव्यवस्था अगोदरपासूनच मोडकळीला आलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याने समृद्ध (!) होती. युद्धाचा विरोध करणारे समाजवादी, उदारमतवादी आधीच खच्ची झाले होते. मुसोलिनीला अशा गतप्रभ, चेतनाहीन विरोधकांमुळे स्वसत्ता स्थापन करणे सोपे झाले होते आणि स्वतंत्र पत्रकारितेच्या मुसक्या आवळायला फार काही कष्टही पडले नाहीत.
मुसोलिनीने हिटलरला दीक्षा दिली आणि मग हिटलरच्या प्रचार मंत्रालयाने पुन्हा मुसोलिनीला दीक्षा दिली. हिटलरची प्रचार यंत्रणा पाहून मुसोलिनीने नव्याने सेन्सॉरशिप कडक केली. मुसोलिनीचा जावई गॅलिआझो सियानो हा त्याच्या प्रेस ऑफिसचा प्रमुख होता. त्याने नाझींच्या मंत्रालयाकडून प्रचारयंत्रणेची ब्लूप्रिंट मिळवली. आणि थोडे ढिसाळपणे चाललेले मुस्कटदाबीचे काम आता पद्धतशीर शिस्तीत होऊ लागले. सियानोचे प्रेस ऑफिस १९३३च्या मुसोलिनी-हिटलर भेटीनंतर भरभराटीला आले आणि १९३४पर्यंत त्याचे रुपांतर ‘माध्यमे आणि प्रचार सचिवालया’मध्ये झाले. नंतर हेच काम मिनिस्ट्री ऑफ पॉप्युलर कल्चर नावाने करण्यात येऊ लागले. आता चोरट्या रीतीने जुलूम करण्याची गरजच उरली नाही. शब्द आणि विचारांवरचा वरवंटा कायद्याच्या मदतीने फिरू लागला.
या काळात नाझी नेत्यांनी मुसोलिनीवर केलेली स्तुतीसुमनांची उधळण लक्षात ठेवण्यासारखी आहे. वाः मुसोलिनीजी वाः… वाः हिटलरजी वाः… असे आदानप्रदान सुरूच होते. गोबेल्सने विकसित केलेले प्रचाराचे मॉडेल इटलीत सियानोने तसेच्या तसे राबवले.
जर्मन नाझींनी ज्या प्रकारे व्यक्तिगत माहिती गोळा करून सांस्कृतिक अभियान राबवले तसेच इटालियन फॅशिस्टांनीही केले. शुद्धीकरण मोहीमेत असे नॅशनल रजिस्टर उपयुक्तच पडते. शिवाय हा अत्याचार आहे म्हणायला स्वतंत्र बाण्याचे, निर्भयबुद्धीचे पत्रकार शिल्लक उरलेच नव्हते.
सेन्सॉरशिप, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी, दहशत आणि बहिरा करणारा प्रचार या कुठल्याही हुकूमशाहीच्या पिरमिडच्या चार बाजूच असतात. लोकांचे सरकार म्हणवत लोकांची तोंडे विविध प्रकारे गप्प करण्याचे फॅशिस्ट तंत्र इटलीतही हेच होते आणि इतरत्र कुठेही हेच असेल. इटलीमध्ये युद्धाच्या काळात प्रचंड प्रचारसाहित्य तयार झाले. आपण जगातील एक महासत्ता आहोत, प्रगत युरोपीय राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून आपण उभे राहू शकतो हे फॅशिस्टांना स्वतःच्या जनतेच्याच गळी उतरवायचे होते. यासाठी युद्धज्वर आणि राष्ट्रवादाचा डांगोरा हे आवश्यक होते. आणि चुकूनमाकून सत्य बाहेर निसटून येऊ नये म्हणून अभिव्यक्तीची, उच्चारस्वातंत्र्याची गळचेपी पूर्ण साध्य करण्याला पर्याय नव्हता.
सियानोने आपल्या प्रसिद्धी-प्रचार मंत्रालयाच्या पंज्याखाली पर्यटन, कॉपीराईट ऑफिस, नाट्यगृहे आणि सिनेइन्स्टिट्यूटही आणली. सिनेमाद्वारे प्रचार किती प्रभावी ठरतो, कोणतीही असत्ये त्यातून कशी घुसडता येतात याचे भान मुसोलिनीच्या काळापासून आहे हे यातून स्पष्ट होते आजच्या फेकू बायोपिक्सच्या जमान्यात ही कला कळसाला पोहोचली आहे असे म्हणता येईल फार तर- पण नवीन काहीच नाही.
चित्रे, शिल्पे यातूनही होणारी अभिव्यक्ती फॅशिस्ट अजेंड्याच्या दावणीला बांधली गेली होती. इटलीच्या देदीप्यमान विजयांसंबंधीची, राष्ट्रनिष्ठेची म्यूरल्स रस्तोरस्ती लागली. जणू सारीकडे कमळेच कमळे.
इटालियन फॅशिस्टांच्या प्रचारात अविवेक, अविचार, धार्मिक चिन्हांचा वापर मुबलक होता. राष्ट्रासंबंधीच्या दंतकथा, इटलीमातेच्या कहाण्यांची भरमार होती. आणि यातच ठिगळे होती औद्योगिक विकासाच्या स्वप्नांची.
मुसोलिनीचे महात्म्य वाढवण्याचा उद्योग अर्थातच दडपशाहीच्या पायावरच उभा होता. १९४३मध्ये त्याला अटक झाली तेव्हा तो एकतंत्री हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा होता. प्याला ओठाशी आला होता.
त्याच्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने इटालियन उदारमतवाद, विवेकविचार यांना पार उखडून फेकले होते. मुसोलिनी मेल्यानंतरही दीर्घकाळापर्यंत उदारमतवाद आणि विवेकवादाचे पुनरुज्जीवन होणे अवघड झाले यावरून त्याने केलेले दमन समजू शकते.
जॉर्ज ऑर्वेलने यासाठी एक शब्द वापरला आहे- वैचारिक वातावरण. मुसोलिनीनी सेन्सॉरशिप, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, दडपशाही आणि प्रचार यांचा मारा करून इटलीतील वैचरिक वातावरण दूषित करून टाकले. आणि या दूषित वातावरणातून आधुनिक प्रगतीचा श्वास घ्यायला या देशाला फार काळ घुसमटत रहावे लागले आहे.
आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा अशा वैचारिक वातावरणबदलाचा जीवघेणा काळ वेशीवर उभा आहे असे दिसते.
इटलीमध्ये नुकताच म्हणजे या वर्षीच्या मे महिन्यात निर्वासित स्थलांतरितांविरुद्ध एक कायदा संमत झाला. या कायद्यावर टिप्पणी करणारा, आणि त्याची तुलना बेनिटो मुसोलिनीच्या वंशद्वेषी कायद्याशी करणारा एक छोटासा व्हिडिओ इटलीतील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला. या बद्दल त्यांच्या शिक्षिकेला सज्जड दम मिळाला आहे आणि पंधरा दिवसांसाठी तिचे निलंबनही करण्यात आले आहे. पुन्हा एकदा मुसोलिनीच्या बजरंगदलाची पावले उमटू लागली आहेत.
तिथेही, इथेही…
या फॅशिस्ट हुकूमशाहीच्या प्रणेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करताना एका महत्त्वाच्या गोष्टीचा विसर पडतो. धोकादायक वाटणारे विचार, कल्पना दडपल्या तर त्या अधिक धोकादायक होऊन कालांतराने सामोऱ्या येतात. म्हणजेच स्वतंत्र विचारांचे शब्द कधीही कायम मूक होत नाहीत. थोडा काळ अवघड होते जगणे… एखादे राष्ट्र काही वर्षे मागे जाते… काही आयुष्यांना चूडही लागते. पण तोंड दाबून विचार कायमचे मुके होत नसतात.
अभिव्यक्ती, उच्चार, विचार हे सारे उसळी मारून पुन्हा अविवेकाला मात देतात.
आशा याचेच नाव.

(लेखिका अभ्यासक असून परखड लेखनासाठी प्रसिद्ध आहे)

Previous articleफराळ मनाला आणि बुद्धीलाही हवा असतो
Next articleकाँग्रेस राष्ट्रवादी आत्मघातकी वळणावर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here