बंदिनी : बकुळफुलासारखी दरवळणारी

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)

-मिथिला सुभाष

आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहाची सांगता आहे आज. या संकल्पनेकडे गांभीर्याने बघणारी, त्याची खिल्ली उडवणारी, असे दोन्ही गट आपण पाहतच असतो. त्यानिमित्ताने मला प्रकर्षाने हिंदी सिनेमातल्या काही नायिका आठवल्या. ज्या काळात स्त्री-स्वातंत्र्याबद्दल कंठाळी आक्रोश होत नव्हते त्या काळात अतिशय उत्तम दर्जाचे नायिकाप्रधान सिनेमे झालेत. ‘बंदिनी’ची नायिका त्यातलीच. ‘बंदिनी’ म्हणजे, तुरुंगात जन्मठेप भोगणाऱ्या एका मनस्विनीची, एका तेजस्विनीची, एका प्रेमिकेची गोष्ट. प्रेमासाठी कुठल्याही संकटात सर्वार्थाने झेप घेणाऱया एका उत्कट प्रेमिकेची – कल्याणीची – तितकीच चटका लावणारी प्रेमकहाणी…‘बंदिनी’! मैं बंदिनी पिया की, मैं संगिनी हूं साजन की…

तुम्ही बकुळीची फुलं पाहिलीयेत? नक्की पाहिली असणार. त्यांना काही खास रंगरुप नसतं. साधी मातकट रंगाची, अनाकर्षक दिसणारी अशी असतात ही फुलं! पण एकदा ती तुमच्या आयुष्यात आली की मग तुम्ही त्यांना विसरु शकत नाही. याचं कारण, त्यांचा कधीही न संपणारा आणि दररोज बदलत जाणारा मधाळ गंध…! रुमालात बांधून कपाटात ठेवा, वही-पुस्तकात ठेवा नाहीतर अगदी निर्माल्यात असू द्या त्या बकुळफुलांना. त्यांची आठवण आली की तो दरवळ आपल्याभोवती रुंजी घालायला लागतो…थेट आत्म्यापर्यंत भिनतो…! बिमल रॉयच्या ‘बंदिनी’सारखा… नूतनच्या ‘बंदिनी’सारखा…!

हे सुद्धा नक्की वाचामधुबाला: आइये मेहरबां-https://bit.ly/3pCgkqI

‘बंदिनी’मधेही छानछान कपडे, रंगढंगांची उधळण करणारं नाचकाम आणि देदिप्यमान सेटिंग वगैरे काहीही नव्हतं. पण तरीही ‘बंदिनी’ आठवला की त्या बकुळगंधाने मन भरुन जातं…नव्हे, भरुन येतं. सगळ्या हिंदी सिनेसृष्टीसाठी ललामभूत ठरावा असा हा सिनेमा 1963मधे प्रदर्शित झाला. 1930-35 च्या आसपासची ब्रिटिशराजची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाची गोष्ट खरी असण्याची दाट शक्यता आहे. कारण कथालेखक जरासंध हे त्याकाळी जेल सुपरिटेन्डन्ट होते आणि त्यांनी त्यांच्या तुरुंगातल्या अनुभवांवर आधारित ज्या काही गोष्टी लिहिल्या त्यातलीच एक ही ‘बंदिनी.’ 1959मधे बिमलदांनी नूतनला घेऊन ‘सुजाता’ केला होता. ‘बंदिनी’च्या दरम्यान मात्र तिचं लग्न झालं आणि ती क्षेत्रसन्यास घेण्याच्या मूडमध्ये होती. त्यामुळे तिला पुन्हा विचारण्याचा प्रश्नच नव्हता. पण अशोककुमारने ‘बंदिनी’ची कथा ऐकल्यावर बिमलदांना गळ घातली की तुम्ही नूतनलाच विचारा, तीच या भूमिकेला न्याय देऊ शकेल. अशोककुमारने हा आग्रह करुन आणि बिमलदांनी त्याचा मान राखून आपल्यावर केवढे थोर उपकार केले आहेत, याचा प्रत्यय बंदिनी पाहतांना पावलोपावली येतो.

 तो ज़माना रोमँटिक मेलडीज़चा होता. ‘बंदिनी’मधली गाणीही अवीट गोडीची होती. पण ती रोमँटिक मेलडी होती?… हो! रोमँटिक मेलडीच होती ती. उत्कट प्रेम करणाऱ्या प्रेमिकेची गोष्ट होती ती.

एका मध्यमवर्गीय पोस्टमास्तराची आईवेगळी मुलगी कल्याणी. साधी, सावळी, अवखळ! वाचनाचे वेड असलेली, कवितांवर प्रेम करणारी अशी ग्रामीण मुलगी. देशात सगळीकडे इंग्रजांविरुद्ध वातावरण. घरात देशभक्तीचं बाळकडू. एकुलताएक भाऊ क्रांतिकारी म्हणून फासावर गेलेला. अशातच गावात एक भूमिगत क्रांतिकारी तरुण येतो – बिकाशमोहन. दोघांत प्रेम फुलतं… लग्नाच्या आणाभाका होतात. ही दोघं लग्न करणार हे सगळ्या गावाला कळतं आणि त्याला त्याच्या वरिष्ठांकडून गाव सोडून जाण्याचा आदेश मिळतो. लवकर परत येण्याचे आश्वासन देऊन बिकाश जातो. ही वाट पाहात राहाते, तो परत येत नाही. गावखेडय़ाचा माहौल, 1930 चा ज़माना. चार तोंडं, चारशे गोष्टी. पोरगी बदनाम होते. बाप हाय खातो. बाप मेल्यावर तिला गाव सोडावं लागतं. डोक्यावर आग, पायाखाली फुफाटा आणि हातात चार कपडय़ांचं गाठोडं घेऊन ती निघते. गावातल्या घरांची कौलारु छपरं, ज्या अंगणांतून बागडली त्या अंगणांची आता तिच्यासाठी बंद झालेली काटेरी कवाडं, नदीचा घाट आणि देवळांची घुमटं मनात, डोळ्यात साठवत कल्याणी जात राहते आणि पार्श्वभूमीवर मुकेशच्या आवाजातली भटियाली… ओ जानेवाले हो सके तो लौटके आना, ये घाट, तू ये बाट कहीं भूल न जाना… आपण रडून बरबाद होत असतो. पण तिच्या डोळ्यात आसवाचा थेंब नसतो. तिचे कोरडेठाक डोळे आपल्या काळजाचा ठाव घेतात. ती सुन्न मनाने शहरात येते.

शहरातल्या इस्पितळात एका मूर्ख आणि हट्टी, हेकट आणि विक्षिप्त बाईच्या देखभालीचं काम कल्याणीला मिळते. अत्यंत स्थितप्रज्ञ मनाने त्या बाईचा सगळा विक्षिप्तपणा, द्वेष, संताप कल्याणी सहन करत राहते. एक दिवस तिला कळतं की ही बिकाशमोहनची – आपल्या प्रियकराची बायको आहे. मग मात्र ती शांतपणे त्या बाईचा खून करते. गुन्हा मान्य करते आणि जन्मठेप भोगायला तुरुंगात जाते. दरम्यान, तिला हेही कळतं की क्रांतिकारी दलाच्या वरिष्ठांचा आदेश म्हणून बिकाशमोहनने अनिच्छेने त्या विक्षिप्त बाईशी लग्न केलेले असते. पण तोवर उशीर झालेला असतो. तुरुंगातला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेन (धर्मेंद्र) तिच्या प्रेमात पडतो. काही वर्षानंतर तिची शिक्षाही माफ होते. डॉक्टर देवेन तिला मागणी घालतो. सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचलेली कल्याणी त्याचा प्रस्ताव स्वीकारते.

हे सुद्धा नक्की वाचा-‘कीमिया’गिरी: साहिर-https://bit.ly/3pPLiM9

 दोघं देवेनच्या घरी जायला निघतात. स्टेशनवर येतात. तिथेच बोटींचे बंदरही असते. धक्क्यावर बोट लागायला अजून अवकाश असतो. ट्रेनही आलेली नसते. तो तिला एका पार्टिशनच्या आड असलेल्या बाकावर बसवून ट्रेनचं तिकिट आणायला जातो. पार्टिशनच्या पलीकडे एक आजारी माणूस कण्हत बसलेला असतो. कल्याणी त्याला पाहायला जाते आणि बेचैन होऊन आपल्या जागेवर परतते. तो बिकाशमोहन असतो. तिची द्विधा स्थिती होते. गर्दीतला बाऊल गायक मोरे मांझीsss… सुरु करतो. ते शब्द नि सूर तिचं आणि आपलं काळीज चिरत जात राहतात…मोरे साजन हैं उस पार, मैं मन मार, हूं इस पार, ओ मेरे मांझी अबकी बार, ले चल पार… बिकाशमोहनची बोट धक्क्याला लागते. त्याचा सोबती त्याला आधार देऊन नेत असतो, कल्याणी डोळ्यात प्राण आणून त्याला पाहात असते. बाऊलगायक गात असतो, मुझे आज की बिदा का मरकर भी रहता इंतज़ार… मेरे साजन हैं उस पार..

एवढय़ात तिची ट्रेन येते, ती त्यात चढतेही. आपल्याला वाटतं, संपलं सगळं…पण नाही. बाऊलगायक गातो, मेरा खींचती है आँचल, मनमीत तेरी हर पुकार… मेरे साजन हैं उस पार… आणि कल्याणी ट्रेनमधून उतरुन धावत सुटते…बोटीच्या दिशेने.. धक्क्यावरुन बोटीच्या तराफ्यावर जाण्यासाठी लावलेल्या फळ्या एक, एक करुन हटवल्या जातात…ती धावत असते. बोटीचा भोंगा वाजतो, समोर बोटीचं, मागे ट्रेनचं इंजिन घरघरतं… मागून हाका येत असतात, कल्याणीsss… कल्याणीsss… आणि कल्याणी पुढे जात असते…ओ मेरे मांझी अबकी बार ले चल पार… या वेळेला तरी मला माझ्या सजणापर्यंत पोहोचव रे… मेरे साजन हैं उस पार… धक्क्यावरुन तराफ्यावर जाण्यासाठी लावलेली शेवटची फळी काढायला एकजण वाकतो आणि ज्योतीवर झेप घेणाऱ्या पतंगासारखी कल्याणीची पावलं त्यावर धावू लागतात. ती थेट बिकाशमोहनजवळ पोचते, त्याला काही कळण्याच्या आधी त्याच्या पावलांवर झुकते आणि तो वाकून तिला मिठीत घेतो, संपूर्ण सिनेमात पहिल्यांदाच. इथे बंदिनी पूर्ण होतो.

बिकाशमोहन झालेल्या अशोककुमारची भूमिका तशी लहानच आहे, पण त्याचं प्रसन्न दर्शन आणि सहज अभिनय वाखाणण्यासारखा आहे. डॉक्टर देवेन झालेल्या धर्मेंद्रला फारसं काही करायचं नव्हतं. (बिमलदांने कदाचित म्हणूनच तिथे त्याची योजना केली असावी. असो.) ‘बंदिनी’ म्हणजे सबकुछ नूतन! आधीची तरुण, सालस, देखणी प्रेमिका आणि नंतरची शांत, गंभीर, स्वाभिमानी बंदिनी, ही दोन्ही रुपे नूतनने समर्थपणे उभी केलीयेत. पलंगावर लोळत दिलखुलासपणे मोरा गोरा अंग लई ले, मोहे शाम रंग दई दे… गाणारी कल्याणी, तिचे नितळ, गव्हाळ पाय आणि पोटरीपर्यंत सरकलेले चांदीचे पैंजण डोळ्यांसमोरुन हलत नाहीत. (हे गुलज़ारचं पहिलं गाणं बरं का!) तुरुंगात लंपट जेलरला शांतपणे सुनावणारी कल्याणी मनात उतरते आणि शेवटी बिकाशमोहनकडे जिवाच्या आकांताने धाव घेणारी कल्याणी ‘प्रेमिका’ म्हणून अमर होते.

त्याकाळातल्या सिनेमांचं संगीत सुमधुरच असायचं. संगीत कर्णकर्कश्श असू शकतं हा शोध बराच नंतरचा. सचिनदेव बर्मन यांनी दिलेलं ‘बंदिनी’चं संगीत आजही लोकप्रिय आहे. जोगी जबसे तू आया मेरे द्वारे आणि मोरा गोरा अंग ही लताने गायलेली दोन्ही गाणी गोड होती. पण या सिनेमात स्वतः एसडी आणि मुकेशच्या बरोबरीने उत्तम गाणी मिळाली ती आशाला. ओ पंछी प्यारे आणि अबके बरस भेज भैया को…! मला माहेरी नेण्यासाठी दादाला पाठव ना ग आई, अशी विनवणी करणारं तुरुंगाच्या माहौलमधलं हे गाणं आशाबाईंने असं काही गायलंय की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा यावा. खूप दूर लग्न करुन गेलेल्या मुली आजही हे गाणं ऐकून रडतात.

‘बंदिनी’ एक अप्रतिम सिनेमा होता. प्रदर्शित होऊन खूप वर्ष झाली म्हणून त्याला फ्लॅशबॅकमध्ये टाकायचं, खरं तर असे सिनेमे कधीच जुने होत नाहीत… त्यांचा सुगंध कायम असतो. बकुळाच्या फुलांसारखा…

*******

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

Previous articleस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक
Next articleधर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.