बजाज म्हणाले ते खरंच आहे !गुजरात मॉडेलचा पोपट मेलाय !

-ज्ञानेश महाराव

(संपादक, साप्ताहिक चित्रलेखा)

भारतातील प्रत्येक राज्याची, प्रदेशाची आणि जिल्ह्याची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत.* काही जिल्हे मात्र निराकार निर्गुण आहेत. तेही त्यांचे वैशिष्ट्यच आहे. आजच्या संदर्भात सांगायचं तर, राजस्थान हे अनेक गुणांनी संपन्न असे राज्य आहे. राजस्थानातले मेवाड, मारवाड आणि शेखावटी, हे प्रदेश राजस्थान प्रमाणेच भारताचीही  ओळख आहे. मेवाड त्याच्या शौर्यासाठी , मारवाड त्याच्या व्यापार उदिमासाठी आणि शेखावटी हा प्रदेश औद्योगिक मानसिकतेसाठी  प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण, खानदेश हे जसे  वैशिष्ट्यपूर्ण आहेत, तसे हे प्रदेश आहेत.  राजस्थानातील शेखावटीत झुनझुनू, चुरू आणि सीकर, हे जिल्हे येतात. तिथले लोक शेकडो वर्षांपासून भांडवलदार आहेत. ते जाट, रजपूत, शीख, ठाकूर आणि मुघलांना कर्जे देत असत. भामा शाहची कहाणी इतिहासात प्रसिद्ध आहे. तसा शाह पुन्हा झाला नाही.

       असो. औद्योगिक क्रांतीचे लोण भारतात तसे उशिराच दाखल झाले. तरीही भारतात औद्योगिक क्रांती स्थिरस्थावर करण्याचे योगदान शेखावटीचे आहे. तसे ते पारशी समुदायाचेही आहेच. पण लेखनास तात्कालिक कारण  शेखावटीचे आहे. जगात शेखावटीचे नाव लक्ष्मीनिवास मित्तल यांनी नेले. बजाज, बिरला, दालमिया, पोतदार, खेतान, मोरारका, मोदी, लोहिया, सिंघानिया अशा अनेक उद्योगपतींची मातृभूमी शेखावटीच आहे. उद्योग चालवावे किंवा ज्यांना उद्योगपती म्हणावे, असा इतिहास यांचाच आहे. मल्या अथवा संदेसरा यांचा नाही.

      शेखावटीतल्या ‘बजाज’ या नावाला तर मोठा इतिहास आहे. जमनालाल बजाज या घरातले मोठे कर्तृत्ववान गृहस्थ. ज्या काळी पोटार्थी लोक आपल्या आहार- निद्रा- भय यातच मग्न होते; ब्रिटिशांची माफी मागत होते ; त्या काळात ब्रिटिशांची खप्पा मर्जी होण्याची दाट शक्यता असतानाही जमनालाल बजाज स्वातंत्र्य लढ्यात सामील होते. त्यांना महात्मा गांधीजींनी आपला ‘पाचवा पुत्र’ मानले होते. प्रस्तुत लेखाचा विषय बजाज यांचे महिमामंडन करण्याचा नाही. तर समकालीन परिस्थितीत बजाज कुटुंबीय आपले विहित कर्तव्य पार पाडत आहेत, ते लोकांच्या निदर्शनास आणून देणे हा आहे.

        वाहन निर्मितीत ‘हमारा बजाज’ असा लौकिक वाढवलेले उद्योगपती राहुल बजाज सहा महिन्यांपूर्वी दैनिक ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. स्टेजवर  गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सितारमण, रेल्वेमंत्री पियुष गोयल हे मान्यवरही होते. त्यावेळी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेला देशभक्तीचे प्रमाणपत्र संसदेत देऊन टाकले होते. त्या संदर्भाचा उल्लेख करून राहुल बजाज म्हणाले होते, ”आमच्या उद्योग क्षेत्रातले कुणीच आज स्पष्ट बोलत नाही. आमच्या क्षेत्रात स्पष्ट बोलणे म्हणजे, ‘चढ जा बेटे सुली पर’ असे आहे. माझ्या राहुल या नावाबद्दल कुणाला आक्षेप असू शकतो. पण काय करणार ? माझे राहुल हे नामकरण केले तेच मुळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी! पण तरीही मी आज जे वाटते त्याबद्दल बोलणार आहे. देशात भीतीचे,असहिष्णुता आणि झुंडबळीचे वातावरण आहे. हे वातावरण स्वच्छ व्हायला हवे. ‘युपीए-२’च्या वेळी आम्ही स्पष्ट बोलत होतो. आता हे वातावरण नाही. माझी टीका होकारार्थी घ्या आणि हे वातावरण बदला.”

राहुल बजाज अमित शहांसमोर काय बोलले होते? नक्की पाहा. क्लिक करा http://bit.ly/2OEhFxD

     गेल्या ६ वर्षांत मोदी-शहा यांच्या डोळ्यांत डोळे घालून आणि समोर असे कुणीच बोलत नाही. ते राहुल बजाज बोलले. कारण सत्ताधारी पुढारी आणि नोकरशहा यांचे बूट चाटून वा थुंकी झेलून ते मोठे झालेले नाहीत. ‘आपण आणि आपला उद्योग भला,’ एवढ्यावरच आपले उद्योग जगत थांबत नाही. त्यापेक्षा आपला स्वार्थ मोठा कसा राहील, याचा हिशेब करूनच देशातले उद्योग जगत वागते, बोलते, चालते. यात दोष त्यांचाही नाही. कारण *एखादा मोठा मॉल आणि चार-दोन बिल्डिंगी एवढाच ज्यांचा आर्थिक विकास होऊ शकला असता, ते आपल्याकडील आर्थिक रचनेमुळे पेट्रोल- डिझेलमध्ये नाफ्ता मिसळून आणि अल्कोहोलमध्ये पाणी मिसळून उद्योगपती म्हणून मिरवत आहेत. अशा कथित उद्योगपतींचा जीव सरकारच्या आर्थिक धोरणात आहे.* ते खरे कसे बोलतील? ते तर मोदी-शहा यांनी शेंबूड शिंकरला तरी त्याला पैलू पाडून ‘कॅरेट’वर विकणारे चोक्सी आहेत.

       या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ संकटाच्या मध्यकाळात आपण उभे असताना, राहुल बजाज यांचे पुत्र राजीव यांनी आपल्या बजाज कुटुंबाची देशहितासाठी सत्तेला सत्य सुनावण्याची परंपरा राखली आहे.

अंधभक्ती सोडा, वास्तव बघा

      राजीव बजाज यांनी राहुल गांधी यांच्याशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला. सध्याच्या काळात जवाहर, राहुल, राजीव या नावांची मोठीच ॲलर्जी असताना हा संवाद झाला. या संवादाने भारताच्या उद्योग जगताला स्पष्टपणे संदेश दिलाय की, “अर्थव्यवस्थेतला ‘गुजरात मॉडेल’चा पोपट मेलाय !” राजीव बजाज म्हणाले, “मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात जो ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला, तो सारासार विचार करून जाहीर करण्यात आला नाही. ‘लॉकडाऊन’ जाहीर करताना ‘कोरोना’चा आलेख जो वरवर जात होता, तो आलेख ‘लॉकडाऊन’मुळे खालीखाली येईल, असे सांगितले होते. तसे झाले नाही. आता आपण ‘लॉकडाऊन’मधून बाहेर यायला लागलोत. तेव्हा ‘कोरोना’चा ‘कर्व्ह’ पुन्हा वर जाताना दिसतो आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अर्थव्यवस्थेतेचे मात्र अपरिमित नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्थेचा आलेख-ग्राफ-कर्व्ह भुईसपाट झालाय. सक्तीच्या पोलादी ‘लॉकडाऊन’मध्ये असे छेद अथवा छिद्र होती की, जणू चाळणीत पाणी !’

     राजीव बजाज आणि राहुल गांधी यांच्यातील या संवादाची प्रमुख बातमी बनली. पण राजीव बजाज हे आत्ताच बोलत आहेत,असे नाही. काही दिवसांपूर्वी ‘केंद्र सरकार’ने आर्थिक आघाडीवरील संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी जे २० लाख कोटी रुपयांचे तथाकथित ‘पॅकेज’ जाहीर केले आणि त्याचे तपशील समोर आले, तेव्हाही राजीव यांनी ‘हे पॅकेज आर्थिक स्वरूपाचे नव्हे, तर हा अर्थसंकल्पाचा विस्तार आहे,’ हे स्पष्ट केले होते.

      ‘केंद्र सरकार’च्या या ‘घुमा फिरा के पॅकेज’ ऐवजी जर मालक आणि कामगार, विक्रेता आणि ग्राहक यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली असती, तर अर्थव्यवस्था वाचली असती. वाढली असती. ‘भाजप’ सरकार असणाऱ्या राज्यांनी कामगार कायदे निलंबित करून थातुरमातुर उद्योग विकास योजना जाहीर केल्या. तेव्हाही राजीव बजाज म्हणाले होते की,‘अशा थर्ड क्लास पॉलिसीने वर्ल्ड क्लास बिझनेस कसा काय होणार ? ’ असे थेटपणे बोलायला मुळातच अंगात स्वातंत्र्याचे पाणी आणि रक्तात पूर्वसंचित असे काही तरी असायला हवे असते. ते राजीव बजाज यांच्यात आहे. अझीम प्रेमजी यांच्यातही आहे. इतरही प्रामाणिक उद्योजकांत आहे. पण ते खूपच कमी बोलतात.

      राजीव बजाज यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर झालेल्या २० ते २५ मिनिटांच्या संवादात अमेरिका- युरोप, जपान आदि देशांचे संदर्भ दिले. ते खरे आहेत. ‘कोरोना- लॉकडाऊन’ काळात अमेरिकेत सरकारकडून प्रतीव्यक्ती १ हजार डॉलर, म्हणजे ७५ हजार रुपये थेट मदत म्हणून दरमहा मिळत आहेत. युरोपातल्या काही देशांनी मदतीच्या बाबतीत इतकी पुढची पावलं टाकलीत की, तिथले लोक म्हणतात, ‘आम्ही सरकारकडून यापेक्षा जास्ती मदतीची अपेक्षाच करू शकत नाही.’

    *’लॉकडाऊन’च्या बाबतीत ‘मोदी सरकार’ने पाश्चात्त्य देशांचे अनुकरण केले. पण मदतीच्या बाबतीत आपण फक्त बांगलादेशच्या ४ पावलं पुढे आहोत. ‘मोदी सरकार’ने अनेक बाबतीत घातलेला धोरण गोंधळ देशाच्या ‘जीडीपी’ला आता शून्यावर घेऊन आला आहे.* हे विदारक वास्तव ‘पुनश्च हरिओम’ची बोंब ठोकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. ते अंधभक्तांचे डोळे उघडण्यास पुरेसं आहे.

      देशात अडीच महिने कठोरपणे राबवलेला ‘लॉकडाऊन’ आता ढिला पडत चाललाय. पण ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येत पहिल्या ५ देशांत भारत झपाट्याने वाटचाल करीत आहे. १२ फेब्रुवारीला राहुल गांधी यांच्या प्रमाणे अनेक जाणकारांनी या महामारीच्या तीव्रतेची जाणीव करून दिली होती. त्याच दिवशी आपले प्रधानमंत्री बिहारची सुप्रसिद्ध डिश ‘लिट्टी चोखा’चा आस्वाद घेतल्याचे ‘ट्वीट’ करत होते. मग देशाचे ‘कोरोना’ काळातील वर्तमान हे वेगळे कसे असणार? असो. तूर्तास या देशातल्या उद्योजकांनी, कंपनी मालकांनी आणि  कामगारांनी राजीव बजाज यांचे मनापासून आभार मानायला हवेत. कारण त्यांनी उशिरा का होईना सांगितलेय, “गुजरात मॉडेलचा पोपट मेलाय!”

लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे !

    ‘आयएएनएस’ आणि ‘सी व्होटर’ या संस्थांनी केलेल्या एका सर्वेक्षण अहवालानुसार, देशातील ‘लोकप्रिय मुख्यमंत्री’च्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असून ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील ‘काँग्रेस’चे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के); तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री  पी. विजयन (८०.२८);  चौथ्या क्रमांकावर ‘वायएसआर काँग्रेस’चे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के); तर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’चे नेतृत्व करणारे ‘शिवसेना’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (७६.५२ टक्के) आहेत.

     या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारताना उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाचा कोणताही अनुभव नाही, असे म्हटले जात होते. त्याच उद्धव ठाकरे यांचे या यादीतील स्थान खूप महत्त्वाचे ठरलेय. कारण महत्त्वाच्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावर मोहोर उमटवलीय. ती मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. शिवाय राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्मितीसाठीही त्याचा उपयोग होईल.

       विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावाटपाच्या मुद्यावरून ‘शिवसेना’ने ‘भाजप’शी युती तोडली आणि  ‘काँग्रेस’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे संसदीय कामकाजाचा कसलाही अनुभव नव्हता. ते विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्यही नव्हते. अत्यंत कठीण परिस्थितीत मुख्यमंत्रिपदी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी हळूहळू कामकाज समजून घ्यायला सुरुवात केली होती. तोच ‘कोरोना’च्या रूपाने साथीच्या रोगाचे मोठे संकट आले. गेल्या तीन महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ‘कोरोना’ संकटाशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. त्याची दखल ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकानेही घेतलीय.

      देशात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात मुंबईत; ‘कोरोना’चे सर्वाधिक रुग्ण असले, तरीही परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या कामाची पावतीच या सर्वेक्षणातून मिळालीय. मात्र हे सर्वेक्षण नेमके कोणत्या काळात केले आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची प्रश्नावली वापरली, हे मात्र तपशिलाने समोर आलेले नाही. कारण ‘कोरोना’च्या काळात सर्वाधिक चांगले काम करणारे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच उत्तम काम करणारे अरविंद केजरीवालही सहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्या सहा क्रमांकांमध्ये ‘भाजप’ची सत्ता असलेल्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान मिळालेले नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे तर शेवटून पहिल्या क्रमांकावर आहेत.

       दरम्यान, यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रियाही खूप महत्त्वाची आहे. त्यांनी म्हटलेय की, ‘लोकप्रियतेत माझा नंबर आधी येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल, हेच माझे ध्येय आहे. हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. शिवसैनिकांचे प्रेम आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही.’

   उद्धवजींची ही ‘लोकप्रिय’तेची झेप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शान वाढवणारी आहे. ती वाढतीच राहो!

उत्सवांच्या अतिउत्साहात कोरोना समर्थ

    भारतातील ‘लॉकडाऊन’ प्रभावीपणे राबविण्यासाठी जीवघेण्या ‘कोरोना’च्या भयापेक्षा पोलिसी लाठीमाराची दहशत अधिक उपयुक्त ठरलीय. ‘कोरोना’ची लागण अजून वाढती आहे. तरीही बंद पडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ची बंधनं ढिली केलीत. हा आगीतून उड्या मारण्यासारखा खेळ आहे. पण तो शिस्तीने खेळण्यासारखा आहे. तथापि, लोकं अडीच महिने घरात बसली; सरकारी सूचनांचे पालन करीत राहिली, म्हणजे यापुढे ते सार्वजनिक जीवनात नियमांचे पालन करतील, शिस्तीत वागतील, उत्सवांचे उत्साह टाळतील, अशा समजुतीत राहू नये. याची साक्षच ६ जूनच्या ‘शिवराज्याभिषेक दिनी’ मिळालीय.

      तिथी-तारीख वादाला मूठमाती देऊन गेली १० वर्षं ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा ६ जूनला रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होतो. या सोहळा-उत्सवासाठी २५-३० हजारांहून अधिक ‘शिवभक्त’ रायगडावर येतात आणि भारतीय लोकशाहीची मजबुती अभेद्य ठेवणाऱ्या स्वराज्य, स्वातंत्र्य, बंधुता या शिवसूत्रांचा प्रेरणादायी विचार घेऊन घरी परततात. यंदा ‘कोरोना- लॉकडाऊन’मुळे हा उत्सव ‘पंढरीच्या वारी’प्रमाणे रद्द करण्यात आला. ‘छत्रपतीं’च्या घराण्यातील सदस्य व १० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तो ठरल्याप्रमाणे ‘रायगडा’वर पार पडला. पण त्याच वेळी काहींनी जिथे ‘छत्रपती शिवरायांचा’ पुतळा असेल, तिथे लोक जमवून ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्याचा प्रकार महाराष्ट्रात काही ठिकाणी झाला. तो आवश्यक त्या नियमांचे पालन करून, तोंडाला फडकी बांधून केला असला, तरी ते चुकीचे आहे.

      ‘शिवजयंती’ गावोगावी, सर्वत्र करा. दिवाळीसारखी घराघरात साजरी करा. पण ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा-उत्सव फक्त ‘रायगडा’वरच झाला पाहिजे. ‘स्वराज्य निर्माण’ सोहळा हा रस्त्यात वा चौकात साजरा करण्याचा प्रकार नाही. त्या दिवशी रायगडावर हजर राहाण्याला महत्त्व आहे. ते शक्य नसल्यास शिवरायांच्या जीवनकार्या वरची व त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन  सामाजिक-मानसिक गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठीचे मार्गदर्शन करणार्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. तथापि, *’शिवराज्याभिषेक दिन’ सोहळे, असेच जर रस्त्यावर साजर होऊ लागल्यास, महाराष्ट्राच्या आठ महसूल विभागात जशी अष्टविनायकांची आणि तालुक्या-तालुक्यांत ‘प्रति-पंढरपूर’ची दुकानं उभी राहिलीत ; तसे चौकाचौकांत ‘रायगड’ उभे राहातील.* हा अतिउत्साहाचा उत्सव वेळीच आवरला नाही, तर तेही अटळच आहे.

    प्रश्न त्याचा नाही. ‘लॉकडाऊन’ कठोर होता, तेव्हा महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, कामगार दिन हे सार्वजनिकरीत्या साजरे करण्याचा मोह आवरलाच ना ! तेच बंधन ‘कोरोना’चे समूळ उच्चाटन होईपर्यंत काटेकोरपणे पाळलेच पाहिजे. मावळ्यांनी तरी ‘तबलिगीं’सारखे वागू नये. अन्यथा, दहीहंडीसाठी डोकी फोडून घेण्यासाठी आणि गणपती उत्सवासाठी करोडो रुपये पाण्यात विसर्जित करण्यासाठी सज्ज राहा. अशांचं भलं करण्यासाठी ‘कोरोना’ समर्थ आहे !

9322222145

(साभार: साप्ताहिक ‘चित्रलेखा’)

बघा राजीव बजाज लॉकडाऊन’ बाबत काय म्हणाले –

Previous articleमॅक्सिम गॉर्की: लेखणीने क्रांतीचं वादळ आणणारा लेखक
Next article‘मैत्री’ आली धावून!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here