बाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे !

लेखक- विजय चोरमारे

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचा कांगावा करीत राहायचे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारख्या लोकांनी हिंदुराष्ट्राचे ढोल वाजवत मुस्लिमद्वेष पसरवायचा. निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाने अत्यंत नियोजनपूर्वक ही मोहीम सुरू केली आहे. केवळ सोशल मीडियावरून प्रचार किंवा अपप्रचार करून ते गांभीर्याने घेतले जात नाही. म्हणून मग मध्यवर्ती धारेतील प्रसारमाध्यमे हाताशी धरून आपला हेतू तडीस न्यायचा, असा हा एकूण डाव आहे.
न्यूज 18  लोकमत वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेली संभाजी भिडे यांची मुलाखत हा या मोहिमेतला आणि निवडणूकपूर्व हंगामातला पहिला टप्पा म्हणता येईल. असे अनेक टप्पे नजिकच्या काळात येतील. त्यासाठी इतरही वाहिन्या आणि वृत्तपत्रे वापरली जातील. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू मांडण्याची संधी म्हणून चुकीच्या गोष्टी लादण्याचे हे षड्.यंत्र ओळखायला हवे. ही बाजू मांडण्याची संधी म्हणजे खोट्याचा प्रसार करण्याची संधी हे संबंधितांना चांगले ठाऊक असतानाही ते मु्द्दाम केले जाते. दुसरी बाजू लोकांसमोर यायला पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. संभाजी भिडे यांच्यासंदर्भात काही गैरसमज पसरवणारी माहिती प्रसारित झाली असेल तर त्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. पत्रकारितेने ती द्यायलाच पाहिजे, परंतु दुसरी बाजू म्हणजे खोट्याचा प्रचार नव्हे. परंतु या मुलाखतीत भिडे यांनी धादांत खोट्या गोष्टी सांगितल्या. भिडेंना खोटे ठरवून उघडे पाडण्याच्या काही जागा असतानाही त्या तशाच संशयास्पद राहू दिल्या.
मुलाखतीतल्या अनेक मुद्द्यांची चर्चा करता येईल. परंतु इथे फक्त उदाहरणादाखल एकच मुद्दा घेतोय. तो मनू आणि मनूस्मृतीसंदर्भातला.

संभाजी भिडे यांनी मुलाखतीमध्ये बेधडकपणे सांगितले की, राजस्थानच्या विधानभवनासमोर मनूचा पुतळा बसवण्यात आला आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. मनू हा जगातील पहिला कायदेपंडित होता, असे बाबासाहेबांनी मनूचा गौरव केलेले वाक्य त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर लिहिले आहे, असेही भिडेंनी मुलाखतीमध्ये सांगून टाकले.
संविधानाचं लोकार्पण करताना बाबासाहेबांनी संसदेत सांगितलं आहे की, हे संविधान मी मनुस्मृती अभ्यासून लिहिलं आहे, असंही संभाजी भिडे यांनी ठोकून दिलं. आणि त्याचे पुरावेही तुम्ही शोधले तर सापडतील असं म्हणाले. एवढं सगळं असताना मनूच्या नावानं शिमगा करण्याचा रोग अनेकांना जडला आहे, असाही आरोप त्यांनी केला.
म्हणजे मनू्च्या अनेक गोष्टींचं बाबासाहेबांनी कौतुक केलं आहे का ? या प्रश्नावर ‘हो हो’ असा दमदार होकार भिडेंनी भरला. पुरावेदेखील उपलब्ध आहेत का? या प्रश्नावर भिडे म्हणाले की, ‘लोक वाचत नाहीत, पाहात नाहीत. ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवतात. मनूवाद… कसला दगडाचा मनूवाद? मनूने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. आजही मलायामध्ये सभागृहात मनूचा पुतळा उभारलाय. जपानसारखे राष्ट्र मनूला मानते. अनेक पाश्चात्य विद्यापीठांतून मनूस्मृतीचा अभ्यास करताहेत. वगैरे.’
‘मनुस्मृती जाळून टाका, अशीदेखील मागणी केली जातेय याची आपल्याला जाणीव आहे का? त्याबद्दल काय सांगाल? आंबेडकरी चळवळीतून तशी मागणी झाली होती –’ या प्रश्नावर संभाजी भिडे म्हणाले, ‘दुर्दैव आहे.’

मुलाखतीतला एवढाच भाग वाचला तर पहिलीच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे संभाजी भिडे म्हणतात त्याप्रमाणे राजस्थान विधानभवनासमोर मनूचा पुतळा नाही, त्यामुळे राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्याचे अनावरण होणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी उपस्थित असणे या गोष्टी धादांत खोट्या ठरतात. बाबासाहेबांनी मनूचा गौरव केलेले वाक्यसुद्धा काल्पनिकच ठरते.
जयपूरमध्ये मनूचा पुतळा आहे, पण तो जयपूर हायकोर्टासमोर.
जयपूर हायकोर्टाच्या जवळच दोन मे १९८७ रोजी राष्ट्रपती आर वेंकटरमण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे दोन फेब्रूवारी १९८९ रोजी पद्मकुमार जैन नामक जयपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नरेंद्र कासलीवाल नामक मुख्य न्यायाधीशांना उच्च न्यायालयाच्या परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी म्हणून मनूचा पुतळा बसवण्याची मागणी केली. त्यांच्या संमतीनंतर स्थानिक लायन्स क्लबच्या मदतीने चार फूट उंचीचा मनूचा पुतळा बनवण्यात आला आणि २८ जून १९८९ रोजी त्याचे अनावरण झाले. त्याविरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी त्यासाठी २००० साली आंदोलन केले. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या रामदास आठवले यांनीही त्याचवर्षी राजस्थानचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मनूचा पुतळा हटवण्याची मागणी केली होती. अलीकडं गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवाणीनं मनूचा पुतळा तोडण्याचा इशारा दिला आहे.

मुद्दा असा आहे की, वस्तुस्थिती समोर आणण्याची जबाबदारी माध्यमांची असते. एरव्ही किरकोळ गोष्टींचा रिअॅलिटी चेक घेतला जातो. त्यामुळे  संभाजी भिडेंची मुलाखत प्रसिद्ध करणाऱ्या न्यूज 18  लोकमत वाहिनीनं संभाजी भिडे यांच्या मुलाखतीचा रिअॅलिटी चेक घ्यायला पाहिजे. राजस्थान विधानभवनासमोर पुतळा खरोखर आहे किंवा नाही, हे तपासून घ्यायला पाहिजे. तो नसेल तर संभाजी भिडे खोटं बोलताहेत हे सांगायला पाहिजे.
परंतु हे केलं जाण्याची शक्यता कमी आहे. कारण ते करायचं असतं तर संभाजी भिडे जेव्हा बाबासाहेबांनी मनूचा गौरव केल्याचं खोटं सांगत होते, तेव्हाच बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्याचं सांगून त्यांची बोलती बंद करता आली असती. परंतु बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्याचं मुलाखतीदरम्यान सांगितलं गेलं नाही.

बाबासाहेब आणि मनूस्मृतीसंदर्भातील वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हेही जाणून घ्यायला हवे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृती जाळली. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. मनुस्मृतीसंदर्भातला परिषदेतला ठराव असा : ‘शूद्र जातींचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटविणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक, राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदुमात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्त्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे, असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे.’
मनुस्मृती जाळण्याचे कारण बाबासाहेबांनी तीन फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही स्पष्ट केले आहे. मनुस्मृती जाळण्यासंदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र आले होते. त्याला उत्तर देताना बाबासाहेब लिहितात,‘आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.’

१९२७-२८मध्ये बाबासाहेबांची मनुस्मृतीसंदर्भात एवढी स्पष्ट मते होती. आणि संभाजी भिडे सांगतात की, मनुस्मृतीचा अभ्यास करून संविधान लिहिले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा गौरव केला आहे.

उद्या आणखी एखादा मनोरुग्ण नथुराम गोडसेची थोरवी सांगायला पुढं येईल.

महाराष्ट्राच्या नथुरामचे पुतळे मध्यप्रदेशसह आणखी कुठं कुठं उभारल्याचे दाखले देऊन नथुरामची थोरवी पटवण्याचा प्रयत्न करेल.
….
विजय चोरमारे

Previous articleमेघदूताच्या आषाढधारा
Next articleभारत एका धर्माचे राष्ट्र बनेल हा विचार प्रतिगामीच नव्हे , तर उथळही!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.