बुलडाणा लोकसभा :डॉक्टर वाढविणार प्रतापरावांचा ‘बीपी’

 
राजेंद्र शिंगणे यांच्या उमेदवारीने चुरस
-अजिंक्य पवार
राजकारणात अतिशय सुरक्षित अंतर राखून भल्याभल्यांचा ‘गेम’ करणारे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी २०१९ ची निवडणूक सोपी राहिलेली नाही. राष्ट्रवादीचे बुलडाण्यातील दिग्गज समजले जाणारे डॉ.राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहिर झाल्याने प्रतापरावांचा राजकीय ‘बीपी’ वाढणार आहे. २००४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी शिंगणे यांना मिळाली असून त्याची सुरवात त्यांनी बुलडाण्याच्या जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत शिवसेनेला कॉर्नर करून केली होती. आता थेट लोकसभेतच ‘चेकमे’ट देण्याच्या तयारीत ते आहेत. 
बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील आताच्या लढतीचा विचार करण्याआधी थोडा मागोवा घ्यावा लागतो.   तब्बल दोन दशके आरक्षित असलेला हा मतदारसंघ २००४ च्या लोकसभा निवडणुकीत खुला झाला अन् त्याच वेळी मेहकर विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्याने मेहकरचे तत्कालीन आमदार असलेल्या प्रतापराव जाधवांना दिल्लीचे दरवाजे खुले झाले. २००४ पर्यंत प्रतापराव यांचे साम्राज्य मेहकरपुरतेच मर्यादित होते. पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करतांना त्यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांना थेट विरोध कधीच केला नाही. उलट सहकारामध्ये त्यांचे समर्थक म्हणूनच राहण्यात त्यांनी धन्यता मानली. एकीकडे मतदारसंघ खुला झाल्याने त्यांची लोकसभेचा उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली. दुसरीकडे त्याच दरम्यान डॉ.राजेंद्र शिंगणे यांना  राज्य मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचे कॅबीनेट मंत्रीपद देऊन त्यांच्या पक्षाने त्यांचे राजकीय वजन वाढविले होते . शिंगणे व जाधव हे दोन्ही नेते मराठा समाजात लोकप्रिय होतेच मात्र इतर समाज घटकांमध्येही त्यांची प्रतिमा सर्वसमावेशच अशीच होती. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, अशी शक्यता नव्हती.
    खरंतर  बुलडाणा हा काँग्रेसचे हेवीवेट नेते मुकुल वासनिक यांचा मतदारसंघ. काँग्रेसमध्येच लोकसभेसाठी इच्छुकांची मोठी संख्या. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळेल, अशी अपेक्षाच राष्ट्रवादीला कधी नव्हती. मात्र आर.आर.पाटील यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने  बुलडाण्यात आले आणि शिंगणे हेच आमचे ‘पैलवान’ अशी घोषणा त्यांनी केली.  त्यामुळे शिंगणे यांना निवडणुकीची तयारी करावी लागली. शिंगणे हे ऐनवेळी उमेदवार झाले, तेव्हा पक्षाचीही बांधणी त्यादृष्टीने नव्हती, वासनिक बुलडाण्यातून गेल्यामुळे काँग्रेसच्या एका गटाचे जणू त्राणच गेले होते तो गट त्या निवडणुकीत निष्क्रीय राहिला.   सर्वात महत्वाचे म्हणजे शिंगणे हे सिंदखेडराजातून निवडून येतील, आमदार होतील पण प्रतापरावांना मतदारसंघच नाही अशी भावना तेव्हा वाढीस लागली अन् प्रतापरावांचे पारडे जड होत गेले. त्यातच घाटाखाली शिंगणेपेक्षा प्रतापरावांचे आकर्षण मोठे होेते.  त्यामुळे त्यांना घाटाखालुन रसद मिळाली व शिंगणेचा पराभव झाला.
      ‘साहेब हरले, भाऊ जिंकले’ अशी भाषा त्यावेळी झाली. मात्र जिंकलेले भाऊ अवघ्या काही महिन्याच साहेबांचे समर्थक दिसले ते जिल्हा सहकारी बँकेत. शिंगणे यांच्या नेतृत्वात प्रतापरावांनी ती निवडणूक लढविली व पराभूत झालेले शिंगणे बँकेचे अध्यक्ष तर खासदार झालेले प्रतापराव हे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर सहकरात मोठी उलथापालथ झाली, जिल्हा बँक बरखास्त झाली. २००९ ला शिंगणे उमेदवार राहिले नाहीत अन् मोदी लाटेत प्रतापराव तरले.  शिंगणे यांनी २००९ ची विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला.  त्यावर ते ठाम राहिले.  मात्र गेली  पाच वर्ष  कोणतेही पद न घेता त्यांनी संपर्क कायम ठेवला. आता या पृष्ठभूमीवर २०१९ ची निवडणुक होत आहे. आता प्रतापरावांच्या विरोधात एन्टी इन्कम्बनसी आहे.  शिवसेनेतच गटबाजी उफाळून आली आहे. बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अनेकदा खुलेपणाने आपला विरोध प्रकट करून गटबाजी अधोरेखित केली आहे, आता मोदी लाट नाही, प्रतापरावांच्या पाठीशी राहणारे भाजपाचे दिग्गज नेते भाऊसाहेब फुंडकर हयात नाहीत.  अन् सर्वात महत्वाचे म्हणजे शिंगणे यांच्या पाच वर्षाच्या विश्रांतीमुळे त्यांच्याप्रती सहानुभुती वाढली आहे . 
      या मतदारसंघातील लढतीचा विचार करताना अलीकडच्या काळातील काही राजकीय घडामोडींचाही विचार करावा लागतो . बुलडाणा जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढली मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपाला सेनेच्या मदतीची गरज असताना सेनेच्या ताठर भूमिकेमुळे भाजपाने राष्ट्रवादीला जवळ केले. शिंगणेनी ही संधी ओळखून प्रतापरावांच्या सेनेला सत्तेपासून दूर ठेवले.  आता हे सर्व मुद्दे प्रतापरावांना अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळेच त्यांचा ‘बीपी’ आता वाढला असेल, तर नवल नाही . वरवर पाहता शिंगणे यांच्यासाठी ही निवडणूक अशी सोपी दिसत असली तरी  तेवढी ती सहज नाही. काँग्रेसला सोबत ठेवण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे. जिल्हाध्यक्ष व आमदार राहूल बोंद्रे हे त्यांचे  सहकारातील मित्र असले तरी त्यांच्या मतदारसंघात शिंगणेचा गट बोंद्रेच्या विरोधात असतो., बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ हे शिंगणेंच्या पाठीशी सर्व ताकद लावतील. कारण त्यांना शिंगणेंचे घडयाळ बांधून पंजा मजबूत करायचा आहे.  मात्र या दोघांसोबतच काँग्रेसमधील इतरही अनेक सरदार सांभाळण्याची कसरत शिंगणे यांना करावी लागणार आहे. याशिवाय ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशेषत: प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांनी जिल्हा बँकेच्या मुद्यावर शिंगणेंचे अक्षरक्ष: वस्त्रहरण केले होते त्याच तुपकारांना अ‍ॅडजेस्ट करून स्वाभिमानीची मते वळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे. आघाडीचे उमेदवार म्हणून शेवटपर्यंत तुपकरांच्या नावाची चर्चा होती . मात्र राष्ट्रवादी हा मतदारसंघ स्वभिमानीला द्यायच्या अजिबात मूडमध्ये नव्हती . यामुळे तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते नक्कीच नाराज झाले आहेत . अशा परिस्थितीत आपली नाराजी बाजूला ठेवून तुपकर हे  शिंगणेंचा प्रचार कसा करतात , हे बघणे इंटरेस्टिंग असेल .
  २००४ ची निवडणूक शिंगणे पराभूत मानसिकतेत लढले आता त्यांची मानसिकता बदलली असेल, तर ही निवडणूक ते जिंकू शकतात. मात्र प्रतापरावही मुरब्बी आहेत. एकदा त्यांना हसत म्हटले होते,  ‘भाऊ, तुमच्या दाढीचा पांढरा झालेला एक केस तुम्ही काळा कधी केला हे बाजूच्या केसालाही कळत नाही.’ तेव्हा त्यांनी केलेले हास्य हेच त्यांच्या मुरब्बीपणाचे लक्षण आहे.  त्यामुळे चुरस आहे, टसल आहे, थेट ठेवणीतले आरोप आहेत.  फक्त बाजी कोण मारतो, हेच पाहायचे आहे.
(टीम मीडिया वॉच)
Previous articleगांधीजी आणि जवाहरलाल
Next articleपवार नावाचा करिष्मा आणि महिमा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.