बोराडेंचे परखड बोल आणि साहित्यातल्या टोळ्या !

-प्रवीण बर्दापूरकर 

उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ज्येष्ठतम साहित्यिक रा . रं . बोराडे यांनी साहित्य जगतात बोकाळलेल्या जातीयवादावर केलेल्या परखड भाष्याचं संवेदनशील साहित्यिक आणि वाचकांच्याकडून स्वागतच व्हायला पाहिजे . रा. रं . बोराडे यांनी मराठी साहित्याच्या कथा , कादंबरी , नाटक अशा विविध दालनात गेली पन्नासपेक्षा जास्त वर्ष मोठ्या ऐटदार व्रतस्थपणे मुशाफिरी केलेली आहे . लांगुलचालन करुन आजवर त्यांनी कांहीही मिळवलेलं नाही . घरी चालून आलेल्या मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तळहातावरचा  दिवा जपावा अशा काळजीपूर्वक निभावली आणि निर्विकारपणे सोडूनही दिली .  कुठे थांबावं याचं भान असलेले दुर्मीळ साहित्यिक रा . रं . बोराडे आहेत . ‘यापुढे कोणताही पुरस्कार नको’ अशी भूमिका त्यांनी २००२ साली घेतली आणि ती निभावताना स्वत:च पुरस्कार देणं सुरु केलं . उस्मानाबादच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली ; ते मिळणार हे स्पष्ट असतांनाही त्यांनी ते नाकारलं . कारण ‘मला घोडनवरा व्हायचं नव्हतं’ अशा शब्दात योग्य वयातच ते मिळायला हवं होतं’ , असं सूचित करण्याइतका बोचरा हजरजबाबीपणा बोराडे यांच्यात आहे .  

उस्मानाबादच्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना  रा . रं . बोराडे म्हणाले , “मराठी वाङ्मयात जातीयवाद आला आहे . अगदी उघड उघड . हे फार भयंकर आहे पण , याचा विचार कुणी करत नाही . जातीयवाद पोसणे हाही एक प्रकारचा दहशतवाद आहे .  या दहशतवादाबद्दल कोण बोलणार ? हा जातीयवाद साहित्याला पोखरणारा आहे , तो साहित्याचे तुकडे-तुकडे केल्याशिवाय राहणार नाही . हा माझ्या जातीतील लेखक आहे असे लेखक आता म्हणू लागले आहेत . पारितोषिकेही आपल्याच जातीतील लेखकाला दिली जात आहेत हे चित्र फार भयंकर आहे . गल्लीबोळातले पुरस्कार घेऊन लेखकही आनंदून जात आहेत . असे लेखक हे पाण्यावरचे बुडबुडे आहेत . कधी नष्ट होतील ते सांगता येत नाहीत.  चांगलं लेखक व्हायचं असेल तर आधी चांगला वाचक होता आलं पाहिजे पण , लेखक  दुसऱ्याचं  वाचत नाहीत . ते आत्मकेंद्री झाले आहेत . एक नवोदित लेखक या संदर्भात म्हणाला , आपल्या शेतात ऊस असेल तर दुसऱ्याच्या शेतातला खायचा कशाला?”… ते असं बरंच कांही परखड बोलले .

रा . रं . बोराडे यांच्या या परखड बोलाच्या वास्तवाबद्दल कुणालाही शंका नाही . ज्या साहित्याच्या क्षेत्रात बोराडे गेली पांच-साडेपांच दशके वावरत आहे त्या क्षेत्रात हे पीक अलीकडच्या अडीच-तीन दशकात जोमानं फोफावलं आहे याची कल्पना बोराडे यांना नव्हती का , त्यांनी हे बोलायला उशीर का केलाय , असे प्रश्न मात्र पडले . साहित्या जगतातल्या  बोराडे म्हणतात त्या आणि तशा अनेक अनिष्ट बाबींविषयी ते अनभिज्ञ असतीलच असं नाही . कारण लेखन आणि व्यासपीठ अशा दोन्ही ठिकाणी त्यांचा वावर आहे . उशीरा का होईना बोराडे परखड बोलले याचं स्वागत करतानाचा खरं तर , बोराडे यांनी साहित्य क्षेत्रातल्या एकूणच सुमारीकरण , थिटेपण आणि टोळ्यांवरही असंच टीकास्त्र सोडलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं .

अ . भा . ( ? ) साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुमार लेखकांची  ‘निवड’ होण्याची मध्यंतरी लाटच आलेली होती . ‘पार्थिवाचे अंत्यदर्शन’ आणि ‘सख्खे सहोदर’ असं अ. भा. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलणारे , टुकार मनोरंजनात्मक लिहून राजकारण्यांच्या आशीर्वादानं अध्यक्षपद भूषवणाऱ्याचा धुमाकूळ साहित्य प्रांती माजलेला होता ; गेली अनेक वर्ष साहित्य संमेलन कुणा न कुणा राजकारण्याच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे ; अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद  होती ; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्नित असणाऱ्या घटक संस्था कांही ठराविक लोकांचे ‘अड्डे’ झालेल्या आहेत . त्याबद्दल आजवर अनेकदा कुजबुज झाली पण , कुणाकडूनच कधीच पाहिजे तेवढा खणखणीत  आवाज उठवला गेलेला नाही . याशिवाय , साहित्या जगतात सध्या अनेक ‘टोळ्या’ धुमाकूळ घालत आहेत . जाती-पातीच्या आधारावर निर्माण झालेल्या टोळ्यांसोबतच कथित पुरोगामी आणि तितकेच कथित प्रतिगामी , सुमार आणि बेसुमार , प्रसिद्धीलोलुप , प्रकाशक , रविवार पुरवण्यांचे संपादक , दिवाळी अंक प्रकाशित करणारे , पारितोषिके वाटणारे अशा अनेक टोळ्यांनी साहित्याच्या क्षेत्रात उच्छाद मांडला आहे ; त्याबद्दलही बोराडे यांनी बोलायला हवं होतं .

आधीच आपल्याकडे निखळ , अभिजात , थेट जगण्याला भिडणारं साहित्य विपुल नव्हतं . साधारणपणे १९८०च्या आसपास साहित्याच्या असलेल्या त्या मुख्य प्रवाहात ग्रामीण  ,   दलित , आदिवासी , सामाजिक बांधिलकी मानणारे , वास्तववादी , अमूर्त , बंडखोर , परिवर्तनवादी  असे नवे उपप्रवाह निर्माण झाले . हे उपप्रवाह मिसळून साहित्य नावाचा जो कांही मुख्य प्रवाह होता तो अधिक सशक्त झाला . मात्र त्याचवेळी मराठी साहित्यात    जात-पोटजात-उपजात आणि धर्मनिहाय टोळ्या निर्माण झाल्या ;  प्रत्येक जात आणि धर्माच्या कथित अस्मितांची आणि राजकीय हेतूंची त्यात भर पडली . हे कमी की काय म्हणून अलिकडच्या सुमारे दोन-अडीच दशकात उन्मादांची झुंडशाही निर्माण  झाली . समाज माध्यमांचा प्रभाव वाढल्यापासून तर बहुसंख्य ‘हुच्चा’त ‘त्यांचे’ आणि ‘यांचे’ अशा (अंधभक्त ) ट्रोल्सच्या टोळ्यांची भर पडली . ‘टोळी’ म्हणजे कांही किमान सुशिक्षित , समंजस , सुसंस्कृत समाज नव्हे की त्याला कायदा , घटना , नियम असतात . टोळी प्रमुखाच्या मनाला येईल तेच खरं , तोच कायदा आणि तो सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असा हट्ट , दुराग्रह , हुल्लडबाजी...शेवटी दंडेली , असा तो मामला असतो .  हे साहित्याला घातक आहे याबद्दल कुणी ‘ब्र’ काढण्याचं धाडस मात्र क्वचितच  दाखवलं गेलं .

समकालीन मराठी साहित्य , समाज आणि समकालीन वास्तव यांच्याशी पाहिजे त्या  प्रमाणात ‘रिलेट’ होत नाही ; जागतिकीकरण आणि खूली अर्थव्यवस्था देशात आल्यावर ज्या भोवंडून टाकणार्‍या गतीनं समाज , माणसाचं बदलेलं जगणं , त्यामुळे त्याची झालेली मोठी घुसमट , दुसरीकडे त्याच्यात आलेली बधीरता आणि बदललेल्या मूल्यव्यवस्थेचं चित्रण मराठी साहित्यात प्रभावी आणि मुलभूतपणे उमटलेलं नाही . जी नवीन समाज रचना अस्तित्वात  आली , त्यात जुन्या समाजातला एक मोठा वर्ग मोडून पडला , कांही उध्वस्त झाला तर दुसरीकडे आर्थिक सुस्थिती असणारा सर्व जाती-धर्मीय नवीन वर्ग समाजात अस्तित्वात आला ; या नवीन समाजाचं भावजीवन , जगणं , आसोशी , समस्या याचं चित्रण फारच अपवादानं मराठी साहित्यात व्यक्त झालं .   

शिक्षणाचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण घिसाडघाईनं झाल्या(केल्या)मुळे लोक सुशिक्षित ऐवजी केवळ साक्षर झाले . त्यामुळे आकलन , निकोप दृष्टी आणि सांस्कृतिक समज असणारी पिढी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही . एकीकडे बर्‍यापैकी आर्थिक स्थैर्य आलं तरी सर्वसमावेशक ( म्हणजे अभिजात वाचन , श्रवण , वैयक्तिक-कौटुंबिक-सार्वजनिक वर्तन आणि व्यवहार , सांस्कृतिक समज येणं…इत्यादी ) प्रगल्भता समाजात वैपुल्यानं निर्माण झाली नाही . उलट टोळ्या तयार झाल्या आणि हुच्च’पण फोफावलं . त्यात भर घातली गेली ती अर्धवट राजकीय समजाची ; त्यातून बोकाळला तो सुमारपणा , एकारला कर्कश्शपणा आणि कोणत्या तरी राजकीय विचाराचे गडद चष्मे घातलेला ‘टोळीवाद’ .

मुंबई-पुण्याच्या , विदर्भ , मराठवाडा , कोकण , खान्देशच्या टोळ्या वेगळ्या , प्रत्येक माध्यम समूहाची वेगळी टोळी ( विश्वास बसत नसेल तर रविवार पुरवण्यातील लेखकांची नावं आणि कोणाच्या पुस्तकांची समीक्षणं प्रकाशित होतात याचं निरीक्षण करा ) आणि त्यांचा वेगळा अजेंडा . या सर्वांकडे संशयाच्या (Skeptical ) नजरेतून पाहणारीही आणखी एक टोळी आहे ! भाषा , शैली , आशय , समज आणि आकलन थिटे असणार्‍या या अशा सुमारांच्या गल्लो-गल्ली असणार्‍या अनेक टोळ्या अलीकडच्या कांही दशकात मराठी साहित्यात हुल्लड माजवत असून त्यांना जात-उपजात-पोटजातीच्या अस्मितेचे धारदार कंगोरे आहेत ही देखील आणखी एक वस्तुस्थिती आहे .

अलिकडच्या कांही वर्षात म्हणजे पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्यावर ; गेली सहा-सात वर्ष नियमितपणे पुरवण्यांचं अवलोकन केल्यावर बहुसंख्य संपादक आणि पुरवण्यांचे संपादक ही देखील साहित्यातील एक स्वतंत्र टोळी आहे अशा निष्कर्षाप्रत आलो आहे . राज्यभर प्रसार असणाऱ्या खपानुसार पहिल्या सात-आठ स्थानावर असणाऱ्या वृत्तपत्रांच्या पुरवण्यांच्या संपादकांच्या या टोळ्या आहेत . इथे आणखी एक मुद्दा माध्यमांचाच आहे . आपण बातम्या , लेख , स्तंभ , अग्रलेख लिहितो   ( आणि त्याची पुस्तकं प्रकाशित झाली ) म्हणजे आपण साहित्यिक आहोत आणि अमुक कवी/लेखक आपल्यामुळे घडला असा पुरवणी सांभाळणार्‍या तसंच बहुसंख्य अॅन्कर्स/पत्रकार/संपादकांचा गोड गैर समज आहे . आपल्यामुळेच साहित्य व्यवहार चालतो असा त्यांचा ठाम समज आहे . दिव्य’ भाषा बोलत आणि लिहित मराठी भाषेचे धिंडवडे काढणार्‍या माध्यमांतील बहुसंख्यांना साहित्य हा एक गंभीर विषय आहे याची फिकीर नसते ; त्यांच्यासाठी तो असतो केवळ एक ‘न्यूज इव्हेंट’ आणि आली वेळ मारून नेण्याचं कथित कौशल्य . आपल्याला माहिती आहे तेवढंचं ज्ञान अस्तित्वात आहे आणि त्या आधारे इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती जोपासणारी माध्यमांतील सुमारांची ही एक टोळी साहित्य प्रांती धुमाकूळ घालते आहे .  सुमारांची आणखी एक टोळी मराठी भाषा शिकवणार्‍या शिक्षक आणि प्राध्यापकांची आहे . भाषा शिकवतो म्हणजे आपण साहित्यिक आहोत असा त्यांचाही अनेक माध्यमाकारांप्रमाणे गोड गैरसमज आहे .

 कुणाच्या पुस्तकाचं समीक्षण (?) ते कुणाचा लेख  कोणत्या वृत्तपत्रात किती आकारात येऊ शकतो याचा अंदाज सहज बांधता येतो अशी स्थिती सध्या आहे . ठराविक लेखक आणि ठराविक वृत्तपत्र असं हे समीकरणचं बनलेलं आहे . बहुसंख्य दिवाळी अंकांबद्दलही स्थिती अमुक जाती-पातीचा-राजकीय विचार धारणेचा लेखक आणि अमुक दिवाळी अंक असं साटं-लोटं झालेलं आहे . मध्यंतरी एका पुरवणीत चुकीचा संदर्भ आला म्हणून त्या पुरवणीच्या संपादकाला फोन करुन प्रतिक्रिया पाठवतो म्हणालो तर तो उत्तरला , ‘तुमचं नाव बॅन आहे आमच्याकडे !’ आणखी एका पुरवणीच्या संपादकाचा असाच अनुभव आला . ‘तुम्ही अमुक एका वृत्तपत्रात लिहिता म्हणून आमच्याकडे तुम्ही नको’ असा अनुभव अनेक साहित्यिकांनी सांगितला . वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी हे वातावरण मुळीच अनुकूल नाही . मराठी भाषा आणि साहित्यासाठी या सर्व उन्मादी टोळ्या घातक आहेत .

समकालीन मराठी साहित्य हा असा , अनेक टोळ्यांचा एक गढूळ प्रवाह झाला असून त्यात अस्सल , कसदार , जगण्याला थेट भिडणारं , जागतिक बदलांचं भान असणारं जे कांही थोडं-बहुत लेखन आणि ते करणारे लेखक आहेत ते कोपर्‍यात अंग चोरुन उभे आहेत . थोडक्यात काय तर , बहुसंख्य मराठी साहित्य जगत  म्हणजे कांही सन्माननीय अपवाद वगळता हुल्लडबाजांच्या टोळ्यांचं  कुरण झालंय ; या टोळ्यांविरुद्ध आवाज उठवणारे  रा . रं . बोराडे मोठ्या संख्येनं हवे आहेत .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799


Previous articleसाहित्य पंढरीचा विठ्ठल- लोककवी विठ्ठल वाघ
Next articleकवितेशी एकात्म चित्रेही…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.