ब्लॅक स्क्रीनवरचं व्यक्तिकेंद्रित मनोरंजन!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२०

-मुक्ता चैतन्य

इंटरनेटच्या क्रांतीनंतर आपण माहितीच्या युगात प्रवेश केला खरा; आणि आपल्याला प्रामाणिकपणे असं वाटायलाही लागलं की, आपण माहितीच्या युगात जगतो आहोत; पण प्रत्यक्षात आपण माहितीच्या नाही, तर मनोरंजनाच्या युगात जगायला सुरुवात केली आहे. एकदा आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर नजर टाकून बघा, खरीखुरी, आपल्याला लागणारी, आपल्यासाठी नवी असणारी किती माहिती आपल्यापर्यंत पोचतेय आणि येनकेन पद्धतीने आपलं मनोरंजन करणारं किती कन्टेन्ट आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन्समध्ये येऊन पडलेलं आहे. कुठलंही क्षेत्र घेऊया, मग ते राजकारण असो, क्रीडा असो, फूड इंडस्ट्री असो नाहीतर लोकशाहीचा आधारस्तंभ असलेलं पत्रकारितेचं क्षेत्र असो; या प्रत्येक क्षेत्रात माहिती कमी आणि मनोरंजन अधिक, अशी  परिस्थिती आहे. एक काळ होता जेव्हा माहिती आणि मनोरंजन यांचा मिलाफ झालेला आहे आणि एनफोटेंमेंट नावाचं एक नवं क्षेत्र उदयास आलेलं आहे, याच्याबद्दल आपण मोठ्या कौतुकाने गप्पा मारायचो. पण, बघता बघता माहिती पुसट होत गेली आणि आपला स्क्रीन टाइम निरनिराळ्या प्रकारच्या, दर्जाच्या मनोरंजनाने व्यापून गेला.

     टीव्हीचा पडदा जाऊन मोबाईलचा ब्लॅक स्क्रीन प्रचंड गतीने आपल्या हातात आला. त्यावरच आपल्याला सिनेमे, सीरिअल्सपासून बातम्यांपर्यंत सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या आणि मनोरंजनाकडे बघण्याचा आपला पूर्ण दृष्टिकोनच बदलायला लागला.

   म्हणजे नेमकं काय झालं? तर, आपलं मनोरंजन फक्त आपल्यापुरतं मर्यादित झालं. आपण आपला फोन आणि आपलं मनोरंजन अशी एक डबी तयार झाली आणि आपण सतत त्या डबीत दार बंद करून बसलेले असतो. घरातल्या हॉलमधल्या टीव्हीचं महत्त्व कमी झालं. मी लहान असताना टीव्हीला नाक लावून बसलेली मुलं सगळ्या मोठ्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय होता. पण, आता वाटतंय की मुलं आणि मोठे सगळे टीव्हीला नाक लावून बसले असले, तरीही ती एक सामूहिक क्रिया होती. घरातल्या ठराविक वेळी ठराविक कार्यक्रम लागले की, घरातल्या बाकीच्यांना आवडो न आवडो, सगळे ते कार्यक्रम बघत असतं. मुलांना बातम्यांमध्ये रस नसला, तरीही घरात बातम्या लागल्यामुळे आपोआप मुलांच्या कानावर घडामोडी पडत, आईला तिची सीरिअल बघायची आहे म्हणून मग सगळेच ती सीरिअल बघत. एकमेकांसाठी काही प्रमाणात का होईना तडजोड करण्याची सगळ्यांनाच सवय होती. सिनेमा बघायला जाणं, हा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. या सगळ्यातून कुटुंबाच्या, मित्रमैत्रिणींच्या म्हणून काही आठवणी तयार होत होत्या. आज मात्र जसं मनोरंजन खासगी आहे, तसंच आपल्या मनोरंजनाशी निगडित आठवणीही फक्त आपल्यापुरत्याच मर्यादित आहेत. आपण मनोरंजनाशी निगडित आठवणी बनवणं एकतर बंद केलंय किंवा त्या इतक्या वैयक्तिक आहेत की, त्यांच्याही बारक्या बारक्या डब्या तयार झाल्या आहेत, ज्याच्याशी आपल्या आयुष्यात असलेल्या इतर माणसांचा कसलाच कनेक्ट नाही.

OTT चॅनल्स म्हणजे ‘ओव्हर द टॉप चॅनल्स’ ज्यात नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, वुट, झी 5 आणि अनेक चॅनल्सचा समावेश होतो. या OTT प्लॅटफॉर्म्सनी आपल्या मनोरंजनाचा पोत बदलून टाकला आहे. ते अधिकाधिक एकलकोंडं बनवून टाकलं आहे.

कसं ते बघूया!

     एक घर. घराचा हॉल. तिथे आईबाबा, नातवंड आणि आजी-आजोबा बसले आहेत. जो तो आपल्या हातातल्या गॅझेटमध्ये डोकं खुपसून बसलेला आहे. आई-बाबा त्यांच्या आवडीची सीरिअल OTT बघत असतात, मुलं युट्यूब नाहीतर OTT आणि आजी-आजोबा युट्यूब किंवा व्हॉट्सअ‍ॅप; आणि हे सगळं एका खोलीत बसून पण स्वतंत्रपणे सुरू असतं. आई-बाबांना माहीत नसतं मुलं काय बघतायेत, ना मुलांचं आजी-आजोबांबरोबर मनोरंजनाचं शेअरिंग असतं. जो तो आपल्या ब्लॅक स्क्रीनमध्ये डोकं खुपसून स्वतःचं मनोरंजन करण्यात रममाण झालेला असतो. बिंज वॉचिंगची आवड फक्त तरुणांना आहे असं नाही, तर बिंज वॉच करणारे सगळ्या वयोगटात दिसायला लागले आहेत. वीक एन्ड बिंज वॉचर्स असा एक नवा गट निर्माण होऊ लागला आहे. कोण असतात हे लोक? तर असे सगळे, जे शनिवार-रविवारी फक्त OTT चॅनलवर पडीक असतात. तिथल्या सीरिअल्सचे सीजनवर सीजन बघून संपवत असतात. आठवडाभर काम केल्यानंतर विकेंडला रिलॅक्स होण्याचं हीच एकमेव पद्धत त्यांना माहीत असते. सुट्टीच्या दिवसात इतर काही करून बघण्याची इच्छाही त्यांच्या मनाला शिवत नाही. हे अतिशय धोकादायक आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक क्रियेची चांगली वाईट, आवडती, नावडती पण, एक मेमरी आपण तयार करत असतो. ती प्रत्येक आठवण हा एक अनुभव असतो. पण OTT चॅनल्सवर दिवसरात्र फक्त सीरिअल्स आणि सिनेमे बघणारी माणसं त्यांच्या आयुष्यात निर्माण होऊ शकणार्‍या अनेक आठवणी कळत नकळतपणे नाकारतात. OTT चॅनल्स आपल्या हातात असतात. आपल्याला हवं तेव्हा, हव्या त्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याची मुभा असते. प्रवासात, मीटिंगला जाताना, कुणासाठी तरी वाट बघत असताना आपण OTT बघू शकतो आणि आपोआपच आपल्या आजुबाजूला घडणार्‍या घटनांपासून आपण स्वतःला तोडत जातो. आजुबाजूचे आवाज पुसट होत जातात, कारण आपल्या कानात इयरफोन्स असतात. आपल्याला काहीही दिसेनासं होतं, कारण आपली नजर फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेली असते. आपण काय खातोय, पितोय, आपल्याशी कुणी काही बोलतंय, या कशाचीही जाणीव आपल्याला होत नाही, कारण आपलं सगळं लक्ष फक्त त्या ब्लॅक स्क्रीनवर हलणार्‍या आकृत्यांकडे आणि त्यातून येणार्‍या आवाजाकडे लागलेलं असतं. हे असं जेव्हा दीर्घकाळ चालू असतं, तेव्हा आपण किती प्रकारचे आवाज, अनुभव, दृश्य, चवी मिस करतो, याचा हिशेब न केलेला बरा!

     OTT चॅनल्स… मनोरंजन करून घेण्याच्या आपल्या सवयी झपाट्याने बदलत आहे. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स जाहीरपणे म्हणतात की, त्यांची स्पर्धा इतर OTT चॅनल्स किंवा युट्यूबशी नाही तर माणसांच्या झोपेशी आहे. सहज हसण्यावारी न्यावी, अशी ही गोष्ट नाही. माणसं जितकी कमी झोपतील तितके OTT चॅनल्स प्रबळ होत जाणार आणि मग माणसांच्या मनोरंजनाच्या सवयी त्यांना हव्या तशा ते तयार करणार, वाकवणार, मोडणार… हे वास्तव आहे, जे बदलता येऊ शकत नाही. कोरोना महामारीनंतर तर OTT वर जाण्याचं प्रेक्षकांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे आणि अर्थातच त्यांचं अर्थकारणही. घुबडासारखी रात्र-रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं, हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला, तरीही अमुक एक वाजताच ही भानगड नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली, तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.

     शिवाय या माध्यमांना कसलीही सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार, जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात, सहज बघण्याची सोय आहे. ते दाखवावेत की नाही, त्यांची मूळ कथानकाला गरज असते का, वगैरे मुद्दे वेगळे; पण एरवी हिंदी सिनेमातला एखादा जेमतेम लव्हसीन म्हणता येईल असा सीनही घरात सगळ्यांच्या सोबत बघायला अवघडलेल्या आपल्या समाजाला अचानक माणसांचे नग्न देह आणि त्यांचे आकर्षक व्यवहार बघायला मिळू लागले आहे. जो OTT मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे, हे नाकारून चालणार नाही.

     मग मुद्दा उपस्थित होतो तो हे सगळे OTT प्लॅटफॉर्म्स चालतात कसे? म्हणजे यांचं अर्थकारण चालत कसं ? कारण इथे दिसणार्‍या मालिका आणि सिनेमे यांच्यात ना जाहिरातींचे ब्रेक्स असतात, ना अजून काही. मग हा सगळा व्यवहार किफायतशीर होतो कसा? 2023 पर्यंत भारतातलं OTT मार्केट 5 बिलियन डॉलर्सचं असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. याचाच अर्थ असाही होतो की, या माध्यमावर आपण जे काही बघतो त्याचे आपण मोजकेच पैसे मोजत असलो किंवा फुकट वापरात असलो, तरीही या हे चॅनल्स तोट्यात नाहीत. फायद्याचे गब्बर आकडे दिसल्याखेरीज भारतात टिकून राहण्यासाठी धडपड होणारच नाही. पण मग सध्या हे चालतंय कसं? तर, बहुतेक OTT चॅनल्स सब्स्क्रिप्शनवर चालतात. म्हणजे महिन्याचे किंवा वर्षाचे पैसे भरणारे ग्राहक या चॅनल्सकडे आहेत. अर्थातच, भारताच्या एकूण मार्केटच्या प्रमाणात हा आकडा सध्या विशेष नसला, तरी या सगळ्या चॅनल्ससाठी भारत ही ग्राहकांची सोन्याची खाण आहे. नेटफ्लिक्सवर भारतातील टॉप 10 सिरीयल्स कोणत्या हे बघितलं की, भारतात सेक्स आणि हिंसा सगळ्यात जास्त खपते, हे सहज लक्षात येतं. या दोन गोष्टींचा उघड आणि मुबलक पुरवठा होत राहिला की, आपोआप भारताचं मार्केट वाढत जाणार.

     OTT चॅनल्सचे आर्थिक व्यवहार समजून घेण्यासाठी प्रसिद्ध लेखक, कवी  क्षितिज पटवर्धन याच्याशी संपर्क साधला. त्याने त्याच्या अनुभवातून काही गोष्टी अधिक स्पष्ट केल्या. तो म्हणतो, ‘‘OTT चॅनल्स आता तरी भारतीय बाजारपेठेकडे गुंतवणूक म्हणून बघत आहेत. जसजसा इंटरनेट, स्मार्टफोन्सचा वापर वाढेल,  कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, OTT चं जाळं पसरत जाईल. भारतात फक्त मुबलक  कन्टेन्ट देऊन चालणार नाही, त्याबरोबर चांगला कन्टेन्टही द्यावा लागेल. मला वाटतं, OTT प्लँटफॉर्म्स सध्या त्याचा पाया तयार करत आहेत. त्यांचा ग्राहक आणि प्रेक्षकवर्ग तयार करत आहेत. हे चॅनल्स फायद्यात आहेत की तोट्यात, यापेक्षा आपला एकनिष्ठ ग्राहक निर्माण करण्यावर आता या चॅनल्सचा भर आहे. शिवाय या चॅनल्ससमोर आता भारतीय चॅनल्सची मोठी स्पर्धा उभी राहिलेली आहे. सध्या भारतात 80 पेक्षा जास्त OTT चॅनल्स आहेत. आणि एरवी आपण नेटफ्लिक्स, प्राईम या विदेशी प्लॅटफॉर्म्सची कितीही चर्चा करत असलो तरीही, भारतीय चॅनल्सची लोकप्रियता आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग या चॅनल्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि दिवसेंदिवस वाढतोय. शिवाय या स्वतंत्र प्लॅटफॉर्म्स बरोबरच युट्यूबवरही अनेक वेब सिरीज चॅनल्स आहेत. त्यांची बाजारपेठ अजूनही वेगळी आणि झपाट्याने वाढणारी आहे. कोरोनानंतर ती अधिकच वेगाने वाढत जाणार, असं दिसतंय. थिएटर्स बंद असल्याने सिनेमे या प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. त्याला मिश्र प्रतिसाद मिळत असला, तरीही या निमित्ताने सिनेमा बनवणे, प्रदर्शित करणे, बघणे या सगळ्याच गोष्टी फक्त थिएटर्सवर अवलंबून नाहीत, हेही निर्मिती करणार्‍यांच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात यायला लागलं आहे. सीरिअल्सपासून सिनेमापर्यंत प्रत्येक गोष्ट ग्राहकाच्या सोयीची झालेली आहे. ग्राहकाला हवं तेव्हा उपलब्ध झालेली आहे आणि ही एका अर्थाने क्रांतिकारक गोष्ट आहे.

पण, दुसरीकडे मुळातच इतक्या प्रचंड मनोरंजनाची आपल्या गरज असते का, हाही प्रश्न उरतोच. 80 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म्स, त्यावर उपलब्ध असणार्‍या हजारो सीरिअल्स आणि सिनेमे आणि बघणारा मेंदू एक! आपल्याला खरंच दिवसरात्र मनोरंजनाची गरज असते का? मुळात मनोरंजन आपल्याला का हवं असतं? त्यातून आपल्याला काय मिळतं? एका छोट्या डबीत स्वतःला कोंबून फोनच्या छोट्या स्क्रीनवर सतत काहीतरी बघितल्यामुळे आपल्याला खरंच रिलॅक्स वाटतं का? आपण खरंच खुश होतो का? ज्याप्रमाणे आपल्यापर्यंत पोचणार्‍या सगळ्या माहितीची आपल्याला गरज नसते, माहितीचा कधीही न संपणारा कचरा आपण सातत्याने गोळा करत असतो, तसंच काहीसं आपल्या मनोरंजनाच्या गरजेचं झालं आहे का? बिंज वॉचिंग आपण का करतो? हे सगळे प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची आज नितांत गरज आहे. आपण आपल्या गरजेतून निर्माण केलेली बाजापेठ 2023 पर्यंत 5 बिलियन डॉलर्सची होणार आहे. आपल्या जीवावर अनेक लोक मोठे होणार आहेत, पण त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे? आपलं खरंच मनोरंजन होतंय, की आपणही फक्त कचरा गोळा करतोय, की अजून काही?

हे सुद्धा नक्की वाचा-झाेपेचा साैदा!– https://bit.ly/3s4ePn6

     अजून काही यासाठी की, गेल्या काही वर्षात नेटफ्लिक्स सिंड्रोम किंवा इन्फिनिट ब्राऊझिंग मोड हे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले आहेत. म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर माणसं निरनिरळ्या OTT  चॅनल्सवर जातात, काय बघायचं हे ठरवण्यासाठी तासन्तास त्यावर भटकत असतात, पण प्रत्यक्षात बघत काहीच नाही. कुठलीही वेब सिरीज किंवा सिनेमा न बघता माणसं नुसतीच त्या प्लॅटफॉर्म्सवर रेंगाळत बसतात. यात त्यांचा प्रचंड वेळ जातो आणि इतका वेळ देऊनही आपल्याला काहीच आवडीचं बघायला मिळालं नाही, याचं नैराश्यही येतं. हा विचित्र ट्रॅप आहे, ज्याचं मूळ सतत हव्या हव्याशा मनोरंजनात आहे. आणि त्याची जबर किंमत आपण मोजतो आहोत. ती झोपेच्या स्वरूपात आहे, एकलकोंड्या मनोरंजनाच्या स्वरूपात आहे किंवा काहीच न करता नुसतंच भटकून आलेल्या प्रचंड मानसिक थकव्याच्या स्वरूपात आहे.

     आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि वसुलीही होतेच. म्हणूनच आपण कशाचा सौदा करतोय याकडे बारीक लक्ष हवंच!

(लेखिका समाज माध्यमांच्या अभ्यासक आहेत)

९८२३३८८८२८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here