भाजपचं  पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शन’

प्रवीण बर्दापूरकर  


केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच भारतीय जनता पक्षाच्या विषय पत्रिकेवर ऑपरेशन कर्नाटकआणि ऑपरेशन उत्तरप्रदेशहोते . भाजपत अलीकडे घडलेल्या सर्व प्रमुख घटनांशी कर्नाटक कनेक्शन आहे ते कसं , या मजकुराच्या नंतरच्या भागात  येणारच आहे . ठरल्याप्रमाणे कर्नाटकमधलं ऑपरेशन पार पडलं असून त्यात बी . एस . येडीयुरप्पा यांनी बाजी मारली का पक्षश्रेष्ठींनी ( पक्षी : पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष नड्डा  ) बाजी मारली, अशी चर्चा आणखी काही दिवस होत राहील . यावेळी म्हणजे , चौथ्या वेळी मुख्यमंत्री झालेल्या येडीयुरप्पा यांचे दिवस तसे भरतच आलेले होते . येडीयुरप्पा यांनी २००८ पासून कर्नाटकात भाजप म्हणजे येडीयुरप्पाअसं समीकरण निर्माण केलेलं होतं. एकदा पक्षातून बाहेर पडावं लागल्यावर त्यांनी सरकारही कोसळवून पक्षाला बॅकफूटवर ढकलवून दाखवत सत्तेपासून वंचित ठेवलं होतं . २०१८च्या विधानसभा निवडणुकीनंतर खरं तर राज्यात जनता दलाचे एच . डी . कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपेतर पक्षांचं सरकार सत्तारुढ झालेलं होतं कारण भाजप सभागृहातला मोठा पक्ष असला तरी बहुमतापासून लांब होता . पण , जनता दलात फूट पाडून , कर्नाटकात पुन्हा सरकार स्थापन करुन दाखवण्याची ‘किमया’ येडीयुरप्पा यांनी साधली होती .

अत्यंत वादग्रस्त , गैरव्यवहाराचे अनेक आरोप होऊनही त्याला दाद न देण्याचा कोडगेपणा अंगी मुरलेले बी . एस . येडीयुरप्पा कर्नाटकातले निष्णातराजकारणी समजले जातात . बहुमत कसं मिळवावं आणि सरकार कसं पाडावं यात ते माहीर आहेत . कर्नाटकातलं राजकारण लिंगायत समाज तसंच मद्य  व खाण मालकांची लॉबी याभोवती फिरतं . लिंगायत समाज आणि मद्य व खाण दोन्ही लॉबींवर येडीयुरप्पा यांची चांगली पकड आहे . बंगलुरुचा एक पत्रकार मित्र एकदा म्हणाला ,  ‘तुमच्या शरद पवारांसारखे दहा शरद पवार म्हणजे एक येडीयुरप्पा आहेत ‘ , यातच सारं काही आलं . वयाची ७५ वर्षे पूर्ण केली म्हणजे ,अठ्ठयात्तरी गाठली म्हणून येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्यास सांगितलं , असं कारण जरी जाहीरपणे  सांगितलं जात असलं तरी त्यात काही तथ्य नाही . कारण २६ जुलै २०१९ला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तेव्हाच येडीयुरप्पा यांनी वयाची पंचात्तरी पार केलेली होती पण , तेव्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या अटीवरच जनता दलाचे आमदार फोडून सत्ता मिळवण्यात येडीयुरप्पा यशस्वी झाले होते . त्यामुळे भाजपचे नेते गप्प होते .

आताही  येडीयुरप्पा पायउतार झाले ते त्यांचे द्वितीय पुत्र विजयेंद्र यांच्यामुळे . येडीयुरप्पा जरी मुख्यमंत्री होते तरी सर्व सत्ता विजयेंद्रच्या हाती केंद्रीत होती . पडद्याआडचे मुख्यमंत्री विजयेंद्रच होते . मंत्र्यांच्या परस्पर अधिकाऱ्यांना बोलावून विजयेंद्र कारभार हाकत असल्याच्या तक्रारी होत्या . अलीकडच्या काळात तर दर आठ-दहा दिवसांतून एकदा विजयेंद्रच्या वाढतच चाललेल्या  हस्तक्षेपाबद्दलच्या तक्रारी दिल्लीश्वांराच्या कानी घालण्यासाठी भाजप आमदार आणि नेत्यांची  रीघ लागलेली होती . थोडक्यात प्रकरण ‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्यानं येडीयुरप्पा यांना हटवणं आवश्यक बनलेलं होतं . केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शोभा करंजलांदे यांची वर्णी लागली तेव्हाच येडीयुरप्पा जाणार हे निश्चित झालेलं होतं . अर्थात कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे येडीयुरप्पा यांचेच समर्थक आहेत आणि कर्नाटकात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या लिंगायत समाजाचे ते आहेत . त्यामुळे एकीकडे केंद्रीय नेतृत्वानं सत्तेचा तोल नीट सांभाळला आहे तर दुसरीकडे आपला समर्थक मुख्यमंत्री झाला असं समाधान येडीयुरप्पा यांना नक्कीच मिळालेलं आहे . थोडक्यात पक्षश्रेष्ठी आणि येडीयुरप्पा दोघेही जिंकले आणि दोघेही हरले अशी एकंदरीत परिस्थिती आहे .

भाजप हा ‘पार्टी वुईथ डिफ्रंस’ असं स्वतःला सांगणाऱ्या पक्षाला आणि आपल्या देशातल्या राजकारणाला साधनसूचितेशी कांहीही देणं-घेण कसं नाही याचं चपखल उदाहरण बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवड आहे . बसवराज बोम्मई हे मुळचे जनता दलाचे आहेत आणि विधानपरिषद सदस्यत्व मिळते म्हणून ते  भाजपत आले . बसवराज बोम्मई यांचे वडील एस . आर . बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री ( ऑगस्ट १९८८ ते एप्रिल १९८९ ) होते . दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्री होणारे पिता-पुत्र म्हणून त्यांची देशाच्या राजकीय इतिहासात नोंद होईलच !
उत्तरप्रदेशात पक्षश्रेष्ठी विरुद्ध मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील संघर्षाबद्दल तीन आठवड्यांपूर्वी लिहिलं ( लिंक https://bit.ly/2VuUNXD ) होतं . या सुप्त संघर्षाचा निकाल काय लागतो . त्यावर पक्षाचं येत्या विधानसभा निवडणुकीतील यश अवलंबून असेल असं त्या लेखात म्हटलेलं होतं . हा सुप्त संघर्ष आता संपुष्टात आला असून, ऑपरेशन उत्तरप्रदेश यशस्वी करुन घेण्यात भाजपच्या श्रेष्ठींना तूर्तास तरी  यश आलेलं आहे . उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यास योगी आदित्यनाथ राजी झाले आहेत अर्थात त्यासाठी संघाला बरेच रक्त आटवावे लागले आहे . गेल्या कांही महिन्यांपासून  उत्तर प्रदेश सरकारच्या शांतील जाहिरातीतून नरेंद्र मोदी गायब होते. एवढ्यात प्रकाशित झालेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या सर्व जाहिरातीत योगींसोबत नरेंद्र मोदी यांचेही छायाचित्र झळकले आहे , यातून हे संकेत मिळतात . उत्तर प्रदेशबाबत एक बाब आवर्जून नमूद करायला हवी आणि ती म्हणजे , अलीकडच्या सुमारे सव्वादोन दशकात विधानसभा निवडणुकीत या राज्यात सलग दोनवेळा कोणत्याही राजकीय पक्षाला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल प्राप्त होऊ शकलेला नाही ; भाजप सलग दुसऱ्यांदा असा कौल मिळवणार का ,? ही म्हणूनच उत्सकतेची बाब आहे . 

  कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडणाऱ्यात  बी . एल . या आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या बोम्माराबेट्टू लक्ष्मीजनार्दन संतोष यांची भूमिका कळीची ठरलेली आहे . भाजपाचे पक्षश्रेष्ठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री शहा आणि पक्षाध्यक्ष नड्डा असा सार्वत्रिक समज आहे . प्रत्यक्षात मात्र या यादीत बी .एल संतोष याचंही नाव आहे आणि ते कायम पडद्याआडच असतात . सरकार आणि पक्ष तसंच संघ आणि सरकार यांच्यात संवाद साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे .केंद्रीय मंत्रिमंडळातून कुणाला वगळायचं आणि कुणाला घ्यायचं या संदर्भात झालेल्या सल्लामसलतीतही ज्यांचा सहभाग होता त्यात संतोष होते , इतकं त्यांचं स्थान निर्णय प्रक्रियेत कळीचं आहे .  मंत्रिमंडळातून वगळल्याचा निरोप संतोष यांनीच सर्वांना दिला , असं वगळलेल्या एका मंत्र्यानं सांगितलं . इतके महत्त्व आहे म्हणूनच कर्नाटकात येडीयुरप्पा यांच्या जागी संतोष मुख्यमंत्री होण्याची शक्यता दिल्लीच्या माध्यमातून व्यक्त झाली होती .बी. एल . संतोष हे मूळचे कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातले . ते सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात . अमित शहा यांच्यासोबत उत्तरप्रदेशच्या गेल्या निवडणुकीत मोर्चेबांधणी करण्यात संतोषच होते .अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर काही काळ नोकरी केलेले संतोष हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या केडरमधले आहेत . संघाच्या केडरमधूनच ते भाजपमध्ये आले . ‘निवडणुकीचे रणनीतीकार’ अशी त्यांची पक्षातली ओळख आहे . प्रत्येक बाबीचा शांतपणे आणि सुक्ष्मात जाऊन अभ्यास करुन कोणताही गाजावाजा न करता काम करण्याची  त्यांची शैली आहे .

२००८ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपनं २२४ पैकी ११० जागा पटकावण्यामागे संतोष यांचीच रणनीती होती , असं सांगण्यात येतं . नव्या आणि जुन्यांचा समन्वय घडवून आणत पक्ष बळकट करण्यात त्यांचा हातखंडा आहे . एखाद्या  लोकप्रतिनिधीचं आकस्मिक निधन झालं तर  त्या रिक्त झालेल्या जागेवर त्याच्या आप्ताला पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा सर्वपक्षीय प्रघातच आता पडला आहे . मात्र , भाजपचे एक नेते तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीऐवजी तेजस्वी सूर्या या तरुणाला निवडणुकीत उतरवण्याची खेळीही संतोष यांचीच होती आणि आता कर्नाटक तसंच उत्तरप्रदेशातील शस्त्रक्रिया कुशलपणे पार पाडण्यातही संतोष यांचाच हात आहे . पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री  शहा यांच्या राजकीय मोहिमांचं पडद्याआडचं ‘कर्नाटक कनेक्शनहे असं आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसमाजशिक्षक
Next articleमूर्तिमंत साधे गणपतराव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.