भाजपचे महात्मा गांधी व्हाया संघ!

-संजय सोनवणी
महात्मा गांधी आजही जगभरच्या लोकांवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव टाकुन असणारे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे. जगभरच्या स्वातंत्र्य लढ्यांना अहिंसा आणि सत्याग्रहाच्या अभिनव हत्याराने झुंजण्याचे आत्मीक बळ गांधीजींनी दिले. सहनशीलता आणि सहिष्णुता त्यांच्या जीवनाचा एक अतुट भाग होता. आता भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पोलिटिकल विंग आहे हे सर्वश्रुत आहेच. हे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यालाही गांधीजींसमोर नतमस्तक झाल्याचा देखावा करणे भाग पडले हे महात्मा गांधींच्या जागतीक जनमानसात टिकून राहिलेल्या प्रतिमेमुळे.
पंतप्रधान मोदी जेथेही परदेशात गेले तेथे तेथे त्यांना गांधीजींचा पुतळा गाठत त्यासमोर नतमस्तक व्हावे लागले. हेच नव्हे तर गांधीजींचेही अपहरण करण्याचा कट राबवला जातो आहे की काय अशी शंका यावे एवढ्या नौटंक्या केल्या गेल्या. मोदींनी गांधीजींच्याच जगप्रसिद्ध पोजमध्ये बसुन सुतकताईचे फोटो काढुन तर घेतलेच पण विदेशी पाव्हण्यांनाही गांधीदर्शनासाठी त्यांच्या आश्रमात नेण्याची रीत सुरु केली. या नादात आधी आपण पटेलांना डोक्यावर घेत गांधीजींनी नेहरुंसाठी त्यांचा कसा बळी दिला याच्या सुरस कथा रचत भक्त संप्रदायामार्फत व्हायरल केल्या होत्या हेही ते विसरले. भारतातील गांधीजींच्या अनुयायांना यामुळे सावध भुमिका घ्यावी लागली इतके गांधीप्रेम भाजपाई दाखवु लागले. अगदी “स्वच्छ भारत” च्या बेगडी प्रयत्नांच्या ढीगभर जाहीराती करतांनाही गांधीजींचा चष्माच त्यांनी प्रतीक म्हणून वापरला.
अर्थात भाजपचीही एक अडचण अशी होती व आहे की जगभरच्या सोडा, भारतातील जनमानसावर मोहिनी असणारा तत्वज्ञ-राजनीतिज्ञच मुळात त्यांच्याकडे नाही. अगदी गोळवलकर गुरुजींचेही विचारधन अंशत: का होईना, संघ प्रमुखांनाच नाकारावे लागले. दीनदयाळ उपाध्यायांचे चातुर्वर्ण्य आणि जातीसंस्थायुक्त “एकात्म भारत” तत्वज्ञान जाहीर स्वीकारण्याची हिंमत केली तर आजचे त्यांचे अंधभक्तही पिसाळतील अशी स्थिती. गांधींनाच स्विकारण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय तरी काय होता? आणि हे खुद्द स्वयंसेवकांना कितपत मान्य होते?
पण एखाद्या महामानवाचे नांव घेणे, वारंवार गौरव करणे, पुतळ्यांसमोर नतमस्तक होत फोटो काढुन घेणे आणि त्या महामानवाचे तत्वज्ञान अंगिकारने यात मात्र जमीन आस्मानाचा फरक असतो हे मात्र भाजपच्या लक्षात आले नाही. किंबहुना सत्तेत आल्यापासुन गांधीजींच्या तत्वज्ञानाचे मुडदे पडत गेले. खरे तर कट्टरतावाद हा गांधीवादाचा शत्रु आहे. हे सरकार तर कट्टरतावाद्यांनीच भरलेले. सत्तेत आल्याआल्या शिक्षणातच वैदिक विज्ञान, संस्कृत आणि तत्वज्ञान आणण्याचा घाट घालत भारताला अंधारयुगात फेकण्याचे निर्णय घेण्याचे सुतोवाच होत गेले. गायीचे महत्व अतोनात वाढवत माणसाचे मूल्य घटवण्यासाठी गोहत्याबंदी कायदा आणला. याने नुसते शेतक-यांचे अर्थविश्व उध्वस्त केले नाही तर कोणी काय खावे व काय नाही यावरच बंधने आल्याने घटनात्मक स्वतंत्रतेच्या तत्वालाच हरताळ फासला गेला.
हे येथेच थांबले नाही. बीफ खाल्ले म्हणून अखलाक नांवाच्या पन्नास वर्षीय माणसाला दगड-वीटांनी ठेचुन मारत क्रुर, खुनशी उन्माद दाखवला गेला. या निमित्ताने मी गोहत्याबंदीविरुद्ध लिहिले तर मलाही “अखलाख करुन टाकु.” अशा धमक्या पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रातुन आल्या. अखलाख कसा गोचोर आहे, पाकिस्तानचा हस्तक आहे अशा वावड्या उडवत समाजात एक उन्मादी वातावरण निर्माण केले गेले. अखलाक ही तर सुरुवात होती. नंतर या उन्मादी गोरक्षकांच्या हिंसक प्रकारांनी देशभर धुमाकुळ घालत दलित व मुस्लिमांना टार्गेट करत भयभीत करुन सोडले. गांधीजींच्या तत्वात हे कोठे बसते याचा विचार देशवासियांनी त्या उन्मादी लाटेत केला नाही. उलट संघाने रुजवलेल्या दलित व मुस्लिम द्वेष्ट्या विचारांच्या समर्थकांना आनंदाच्या उकळ्या फुटत राहिल्या.
गांधीजींबद्दलचे भाजपला आलेले उमाळे अजब आहेत. खरे तर जागतीक किर्तीचे मानसशस्त्रज्ञही गोंधळून जातील अशी अजब मानसिकता भाजपाची आहे. म्हणजेच पंतप्रधान ते स्वयंसेवक-कार्यकर्त्यांची आहे. तत्वांत धरसोड व संभ्रम नको हे गांधीजींनी आमरण जपलेले तत्व. पण उत्तरपुर्वेत, गोव्यात एक तत्व तर अन्य राज्यांत दुसरे तत्व आणि त्याचीही विसंगत स्पष्टीकरणे यातुन गोहत्याबंदीने उन्मादी हिंसा आणि भयभीत सामान्य यापलीकडे काही झाले नाही. कारण गायी-बैल रस्त्याने नेणेही धोकादायक बनुन गेले. नुसत्या संशयाने मारहाण ते ठेचुन हत्या होत असतील तर लोक तरी काय करणार?
गांधीजींबाबतचे यांचे प्रेम एवढे थोर की हे सरकार सत्तेत आले ते जणु नथुरामच्या उदात्तीकरणाचा एक हेतू मनात घेऊन आले की काय असे वाटावे. साक्षी महाराज म्हणाले की नथुरामला “राष्ट्रभक्त” घोषित करावे. नथुरामचे मंदिर बनवण्याचे प्रयत्न झाले. या सर्वात बदनाम होत राहिला तो हिंदु धर्म. हे नांव हिंदुत्वाचे घेतात पण गोहत्या हे पाप वगैरे सगळी वैदिक धर्माची तत्वे. ही सर्व वैदिक धर्मीय तत्वे एवढी आचरणात आनण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजपाने केला की वर्णसंकराची भिती दाखवत एक प्रकारे वंशवादाला प्रोत्साहन देणा-या गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्यात यावे अशा मागण्या केंद्रीय मंत्र्यांनीच सुरु केल्या. आंतरजातीय विवाहांत होणा-या हत्यांचे जे पीक भारतात आजवर आले आहे ते केवळ या “संकराच्या” कल्पनेच्या अशास्त्रीय पगड्यातुन. त्यातुन समाजाला बाहेर काढायचे की त्यातच गुंतवत न्यायचे हे भान भाजपाला राहिले नाही. आणि मुलात हिंदुंचा या वैदिक तत्वांशी संबंधच नसला तरी संघ व भाजप नांव हिंदुच वापरत राहिल्याने हिंदुच विनाकारण बदनाम होत आहेत याचे भान हिंदुंनाही आले नाही.
गांधीजींचे तत्वज्ञान हेच मुळात साधनशुचितेवर आधारीत आहे. संघाचे आणि म्हणुणच भाजपाचे तत्वज्ञान त्याउलट आहे. द्वेषाच्या पायावरच ही संघटना उभी आहे. सरसंघचलक जे बोलतात तसेच वास्तव असते असे नाही. करणी आणि कथणी यात फरक राहिलेला आहे. म्हणजेच साधनशुचितेशी भाजपचा काही संबंध दिसून येत नाही. सहिष्णुता आणि अहिंसेच्या तत्वांना भाजपाने हरताळच फासला. अगदी लोकशाही पद्धतीत सरकार चालवतांना सर्व मंत्र्यांना काम व जबाबदा-यांचे वितरण अपेक्षित असते तेही चित्र या सरकारने निर्माण केले नाही. संघाप्रमाणेच “एकचालकानुवर्ती” असे हे मोदी सरकार राहिले आहे. तेच संरक्षण मंत्री, तेच विदेश मंत्री आणि तेच स्वच्छता मंत्री असे ’सबकुछ’पंण लोकशाहीच्याच मुल्यांच्या विरोधात आहे आणि राष्ट्रपित्याने देशाला घालुन दिलेल्या दिशादर्शक तत्वांच्या विरोधात आहे याचे भान ना भाजपाला आहे ना सामान्यांना आहे.
गांधीहत्येनंतर संघ किती आनंदला होता याचे वर्णन कोकणचे गांधी म्हणुन ओळखले जाणा-या पटवर्धनांनी करुन ठेवले आहे. रत्नागिरीत कशी मिठाई वाटली गेली याचीही वृत्त उपलब्ध आहेत. किंबहुना जेवढा मुस्लिम द्वेष संघ स्वयंसेवकांत ठासुन भरलेला आहे तेवढाच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक गांधीद्वेष हा संघाचा पाया राहिलेला आहे. या सरकारला आपली प्यादी पुढे आणण्याचे साहस न होता त्याच्याच समोर तोंडदेखले का होईना नतमस्तक व्हावे लागणे हा त्यांचा दैवदुर्विलास आहे. पण त्यांची करणी हीच मुळात गांधीजींच्याच तत्वज्ञानाची उघड पायमल्ली करत असल्याने या वरकरणीच्या नतमस्तकपणाला फक्त दांभिकता म्हणता येते.
गांधीविचारच भाजपला मान्य नसल्याने ते गांधीजींचे होऊ शकत नाहीत. ते व्हायला जी मानवता आणि अहिंसक वृत्ती आवश्यक आहे ती येईपर्यंत ते शक्यही नाही. आणि तशी भाजपची प्रामाणिक इच्छाही नाही. गांधीजींचे विशाल आभाळ त्यांच्या कवेत बसनारे नाही कारण संकुचिततेने त्यांना ग्रासले आहे. ही वेगळीच मनोरुग्णता आहे आणि त्यावर औषध कसे शोधायचे हा आपल्यासमोरील यक्षप्रश्न आहे!
(लेखक अभ्यासक व विचारवंत आहेत)
Previous articleतुझी दया येते रे नथुरामा !
Next articleभारत आणि गांधी – श्री. सुरेश द्वादशीवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.