भारतीय राजकारणातील सौहार्दपर्वाची अखेर ……..

राज कुलकर्णी

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील सुसंवाद  दिलदारपणा, स्नेह आणि विरोधकांशी सौहार्द या पर्वाचा आज अंत झाला असेच वर्णन करावे लागेल.
अटलजी, म्हणजे खराखुरा  ‘स्टेट्समन’! प्रभावी वक्ता, दिलदार वृत्ती! संवेदनशील ह्रदयाचा आणि कवि मनाचा राजकारण विरहित राजकीय धोरणे अंगीकार करणारा अजातशत्रु म्हणावा असा धुरंधर राजनेता म्हणून त्यांचे स्थान भारतीय इतिहासात अमर राहील.

मी तारूण्यात प्रवेश केला तेंव्हा आमच्या समोर आदर्श राजकारणी म्हणून असणारं व्यक्तीमत्व अटलीजींचेच होते!  त्यागमुर्ती म्हणून आमच्यासमोर त्यांचीच प्रतिमा होती. नरसिंहराव यांच्यानंतर अटलजी पंतप्रधान झाले तेंव्हा मी एकोणिस वर्षाचा होतो. त्यावेळी शहर पोलिस स्टेशन जवळ असणा-या एका बोर्डवर ‘पं.नेहरूंनी ज्यांचा भावी पंतप्रधान उल्लेख होता’ या शब्दांत त्यांचे वर्णन केले होता, कॉलेजात सायकलवरून जाताना तो बोर्ड वाचला आणि मी ही आनंदी झालो. कारण नेहरूंच्या व्यक्तिमत्वाने मी भारावलेला होतो. त्या अपरिपक्व मनाला बाकी राजकारणाशी कांही देणं घेणं नव्हतं. पण अटलजींच्या त्या वेळेसच्या व्यक्तिमत्वामुळे भाजपाबद्दल आकर्षण निर्माण होऊन एबीव्हीपी या संघटनेत कांही काळ कामही केलं!

मी विज्ञानाचा विद्यार्थी! पण काळ पुढे सरकत गेला, तसे वाचन वाढले आणि  मी एबीव्हीपी पासून आपसूकच दुर गेलो! त्यातच सन 1997 मधे ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक वाचले आणि या पुस्तकाने माझ्या विचाराची आणि एकूनच जीवनाची दिशाच बदलून गेली. अण्वस्त्रांच्या वापराचा विषय हा निव्वळ विज्ञानाचा वा लष्करी डावपेचाचा नसून तो मुळातच राजकीय भुमिकांचा आहे, याची जाणीव झाल्यावर मी राजकीय विचारधारा आणि राजकारण या अनुषंगाने विचार करू लागलो आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, अण्वस्त्रप्रसारबंदी, जागतिक शांतता या अनुषंगाने नेहरूंच्या अभ्यासाकडे वळलो. पण अटलजींबद्दल आदर कायम मनात राहीला. नेहरूंची अण्वस्त्राबाबतची भुमिका आणि अटलजींची ‘जंग न होने देंगे’ या कवितेतील विचार  मला ‘बाराला दहा कमी’ या पुस्तकातील मानवतावादी संदेशाशी एकरूप आहेत, याची जाणीव झाली. अटलजींच्या काळात अणुस्फोट झाले तेंव्हा, मी या अण्वस्त्रचाचणीची समिक्षा करणारा एक लेख दै.संघर्ष या वृत्तपत्रात लिहीला होता. तरीही अटलबिहारी हे माझ्या मनात कायम आदर्श नेता म्हणून राहीले!

स्वतंत्र प्रतिभा आणि स्वतंत्र विचारधारा असणारा परखड नेता म्हणून अटलजींना इतिहास सदैव आठवणीत ठेवणार! भारतीय राजकारणात नेहरूपर्वापासून असणारा  उमदेपणा हा त्यांचा सर्वात मोठा सदगुण! अटलजी 1957 च्या निवडणूकीत जनसंघातर्फे उभे होते आणि नेहरूंनी त्यांच्या मतदारसंघात सभाच घेतली नाही. पण  शेजारील मतदार संघात सभेच्या वेळी नेहरू म्हणाले “जनसंघमें,भी कुछ अच्छे लोग है, वो चुनकर संसद में आना जरूरी है” वाजपेयी ‘डिसीसिव्ह डेज’ या पुस्तकात म्हणतात नेहरूंच्या या वक्तव्यामुळे माझा विजय सुकर झाला! अगदी अशीच घटना लातुर मतदार संघातही घडली! जेंव्हा अटलजी शिवराज पाटील चाकुरकरांच्या विरोधात प्रचारासाठी आले आणि त्यांनी भाजपाच्या प्रचारसभेत पाटील यांचे भरभरून कौतुक केले! बाकीचे अनेक मुद्दे कारणीभूत असले तरीही  परीणामी कॉग्रेसचे शिवराज पाटील पुन्हा निवडून आले!

नेहरूंनी वाजपेयींचा उल्लेख भावी पंतप्रधान असा केला होता! पण संसदेत नेहरूंच्या  भाषणावर टिका केल्यावर उमदेपणाने वाजपेयी म्हणाले होते “पंडितजी, आपमें मुझे चेंबरलेन और चर्चिल दोनो एकसाथ नजर आते है! वाजपेयी जेंव्हा जनता सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री झाले तेंव्हा, परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातील नेहरूंची प्रतिमा हटवली गेली. ते त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती प्रतिमा पुन्हा त्या भितींवर सन्मानाने बसविण्यास सांगीतली! आम्ही म्हणाले ” भारतकी विदेशनितीमें सबसे बडा योगदान पंडीतजीका है, इसे नकारना गलत बात है ” अटलजींकडे हा मनाचा मोठेपणा होता!

नेहरूंचा संपुर्ण कालखंड वाजपेयींनी जवळून पाहीला होता!  नेहरूंच्या कार्याबद्दल व व्यक्तीमत्वाबद्दल ते म्हणतात  “ In Panditji’s life  , we get a glimpse of the noble sentiments to be found in the saga of Valmiki. like Ram, Nehru was the orchestrator of the impossible and inconceivable” .राजकीय विचारधारा परस्पर विरोधी असताना सुद्धा वाजपेयी जेंव्हा नेहरूंना मर्यादा पुरूषोत्तम रामाची उपमा देतात, तेंव्हा त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा आणि  हे अटलीजींचे मोठेपण आहे!

पाकीस्तानचा पराभव करून बांग्लादेशाची  निर्मीती करणा-या इंदिरा गांधींना त्यांनी दुर्गा  संबोधले तर राजीव गांधींची हत्या झाल्यावर, राजीवजी किडनीच्या शस्त्रक्रियेसाठी मला युरोपात घेऊन गेले म्हणून मी आज हयात आहे अशी आठवण ही सांगीतली. राजेश पायलट यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर कलकत्याचा दौरा रद्द करून, खूुद्द पंतप्रधान वाजपेयी दौसा इथं पायलट यांच्या घरी अंत्यविधी होईपर्यत बसून होते. संघपरीवार ‘जन गण मन’ या गीतास पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी रविंद्रनाथांनी हे गीत लिहीले म्हणून त्यांना पंचम जॉर्जचे भाट ठरवत असताना जेंव्हा रविंद्रनाथाचे नोबेल पारीतोषिक चोरीला गेले तेंव्हा, ते प्रचंड सदगदीत झाले आणि रविंद्रनाथांबद्दल
केल्या जाणा-या अपप्रचाराचा विरोध केला!

राजकारणाच्या पलिकडे भारतीय म्हणून विचार करणारे वाजपेयी संसदेतच एकदा म्हणाले होते ” पिछले साठ सालोंमें हमारे देशने बहुत तरक्की की है! पिछली सरकारोंने कुछ काम नही किया ऐसा कहना इस देश के पुरूषार्थ प्रश्नचिन्ह लगाना है!” असे म्हणणारे वाजपेयी रथयात्रेपासून दुर राहीले आणि त्याचबरोबर बाबरी मशीद पाडल्यानंतर हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसंग असल्याचेही म्हणाले! गुजरात मधील 2002 च्या दंगलीत गुजरात राज्य सरकारच्या प्रमुखांना त्यांनी राजधर्म काय असतो, हे समजावून सांगीतले! त्यामुळे त्यांना स्वत:च्या पक्षाकडूनच टिकेचा भडीमार सहन करावा लागला!

इंडिया शायनिंग च्या प्रचारानंतरही सन 2004 साली, वाजपेयी पराभूत झाले! पण ‘ किंचित भयभित नही मैं, क्या हार क्या जीत’ अशी खिलाडू वृत्ती जोपासणा-या वाजपेयींनी एकदा सिमल्यात लहान मुलांशी संवाद साधला, तेंव्हा एक मुलगा त्यांना म्हणाला ‘ नेहरूजीको हम चाचा नेहरू कहते है, आपको हम मामा कहेंगे तो आपको अच्छा लगेगा क्या?  अटलजी नेहरूचाचा नंतर देशातील सर्व लहान मुलांचे मामा बनले! ते म्हणाले ” मामा कहते हो, अच्छा लगा, मगर मामा की नौकरी अब चली गई है, जीतना हो सके आपके लिए करता रहुंगा”

नेहरू गेल्यावर कैफी आझमींनी नेहरूंवर एक गीत लिहीले होते ‘मेरी आवाज सुनो त्यात एक कडवे आहे, जे नेहरू चाचांबरोबर
अटलमामांनाही लागू पडते!

नौनीहाल आते ही,
अर्थी को किनारे करलो
मै जहां हूं, उन्हे वहांसे जाना है आगे
जमीं इनकी आसमां इनका
है इनके जहां मेरे जहांसे आगे
इन्हे कलीयां न कहो, चमनसाज सुनो
मेरी आवाज सुनो ……….

अटलजींच्या जाण्याने त्यांच्या पक्षाची काय क्षती झाली हे त्यांच्या शोधावी लागेल कारण भारतीय राजकारणात असलेले  सौहार्दाचे पर्व आज अस्तंगत झाले, आज हा सौहार्द संपलेला आहे  असेच या क्लेषकारक प्रसंगाचे वर्णन करावे लागेल!

विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील टिकेवर भाष्य करताना अटलजी म्हणाले होते. ‘चुनाव के दौरान गाली गलोच हो सकती है, जैसे होली के दिन एकदुसरेंपें किंचड उछालना! इसका मतलब ये नही की सालभर एक दुसरेंपर किंचड उछाला जाएं”

वाजपेयींच्या व्यक्तीमत्वातून,  विचारातून, कृतीतून देशातील सर्वच पक्षांना खूप कांही शिकण्यासारखे आहे. अगदी त्यांच्या पक्षाच्या राजकीय विरोधकांनीही शिकण्यासारखे आहे,  परंतु हे शिकण्याची नैतिक जवाबदारी त्यांच्या पक्षातील अनेकांवरच जास्त आहे,  हे व्यवहारीक वास्तव आहे. आज घडीला वाजपेयींचे  विचार अंगीकारण्याची गरज कधी नव्हे एवढी भाजपा या पक्षास आहे!

भारतभुमीचे महान सुपुत्र अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

(लेखातील रेखाचित्र गजानन घोंगडे , अकोला 9823087650)

© राज कुलकर्णी
       उस्मानाबाद

९४०४५३५३८६

Previous article‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे
Next articleबहुमताचे असत्य, अल्पमताचे सत्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here