भीमबेटका: आदिमानवांचे आश्रयस्थान

-राकेश साळुंखे

आदिमानवाविषयी आतापर्यंत खूप संशोधन झाले आहे . तरीही त्याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनात जिज्ञासा असतेच . याच जिज्ञासेपोटी फेब्रुवारी २०२० मध्ये मी भीमबेटकाला भेट दिली . एक लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असणारे  हे स्थान भोपाळ पासून ४५ किमी. अंतरावर आहे .येथे आदिमानवाचे आश्रयस्थान असलेले  मोठाले खडक असून भीमबेटकाच्या या खडकांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे .  भोपाळ ते होशंगाबाद महामार्गालगत असलेले हे आश्रयस्थान (रॉक शेल्टर्स) रायसेन जिल्ह्यातील भय्यापूर गावाजवळ आहे.  भोपाळला गेल्यावर सांची स्तूप पहाण्याबरोबरच भीमबेटकाला अवश्य भेट द्यावी . भीमबेटकाला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च  हा काळ उत्तम असतो . उन्हाळा अतिऊष्णतेमुळे टाळावाच.  पावसाळ्यात भेट दिली तर चालू शकते. हा भाग विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रातापानी वन्यजीव अभयारण्यात येतो . आता हे  अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

   आदिमानवाचे आश्रयस्थान आणि  त्यामधील चित्रे  हे या प्राचीन विंध्याचल पर्वतरांगांतील  भीमबेटकाचे मुख्य आकर्षण आहे . डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर यांनी १९५७-५८ मध्ये भीमबेटका येथे अदिमानवाची  खडक आश्रयस्थाने आणि चित्रे शोधली. ७५० खडक निवाऱ्यापैकी ५०० निवारे चित्रांनी सुशोभित केलेली आहेत . अगदी लोअर पॅलिओलिथिक काळापासून ते  मध्ययुगीन काळापर्यंत येथे चित्रे रेखाटली गेली आहेत . यामध्ये मानवी आकृत्यांची शिकार करणे, स्वार होणे,  नृत्य, युद्ध आदीचा समावेश असलेली अनेक  रेखाचित्रे आहेत . भीमबेटका येथे खडकाच्या पृष्ठभागावर बनविलेले कपमार्क हे त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते .  त्यामुळे भीमबेटका हे जगातील अशा प्रकारच्या स्थानांपेक्षा  हजारो वर्षे पुरातन आहे असे मानले जाते

      येथे पुरातन किल्ल्याची तटबंदी, लहान स्तूप, शिलालेख आणि  मंदिरे यांचे अवशेष आहेत . अष्टभुजा देवीची भग्न मूर्ती तसेच अनेक लहान मोठ्या पिंडी या परिसरात आढळतात . भीमबेटका येथे रेखाटलेल्या चित्रांकरिता लाल , केशरी पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे मानवी आकृत्यांबरोबरच मानवाचे  दैनंदिन जीवनही चित्रांत रेखाटण्यात आले आहे. वाघ, सिंह , हरीण, घोडे, रानडुक्कर, कुत्रे व मगरीचीही चित्रे रेखाटली आहेत.  एक मोठे रानडुक्कराचे चित्रही प्रसिद्ध आहे.

 आदिमानवाने राहण्यासाठी हे  जे ठिकाण निवडले ते अतिशय सुंदर आहे. भीमबेटकाच्या प्रवासाला सुरुवात करताच या परिसराचे सौंदर्य नजरेत पडायला सुरुवात होते .  भीमबेटकाच्या अर्क्यालॉजीकल साईटच्या एन्ट्रीला जाण्यासाठी झाडीमधून जाणारा  एक छोटासा सुंदर घाट आहे .  गेटमधून आत गेल्यानंतर दाट झाडीत आढळणाऱ्या मोठ्या दगडांच्या गुहा आणि तेथून  दूरवरचे दिसणारे मनोहारी दृश्य  पाहिले की या स्थानाच्या सौंदर्याची जाणीव होते. एक आश्रयस्थान तर त्याचे दरबार स्थानच असावे इतके भव्य आणि सुंदर आहे.  हम्पी येथील दगड व येथील दगड सारखेच वाटतात. येथे हम्पीच्या  दगडातील आश्रयस्थानांची आठवण येते. तसेच भव्य किंवा त्याहूनही मोठे दगड, तीच रंगछटा !  जणूकाही आदिमानवाने रहाण्यासाठी अशीच ठिकाणे जाणूनबुजून निवडली असावीत .  बदामीतील अदिमानवाची गुहा मी पाहिली नाही. मात्र परिसर  पहिला आहे . तेथील परिसरातील दगडही असेच आहेत.

भीमबेटका हे भीमाचे बसण्याचे ठिकाण होते असे सांगितले जाते. कित्येक ठिकाणाचे नाते असे प्राचीन कथांशी जोडलेले असते. जसे की पांडव लेणी , त्याप्रमाणेच भीमबेटका ! भीमबेटका ते भोपाळ दरम्यान रायसेन जिल्ह्यातील भोजपूर येथे परमार राजा भोज याने बांधलेले एक मोठे मंदिर आहे. त्यामध्ये भव्य अशी शंकराची पिंड आहे. फोटोवरूनच मंदिराची भव्यता लक्षात येते. एका उंच खडकाळ टेकडीवर  पिवळसर खडकात हे मंदिर आहे.त्यासाठी मोठमोठे दगड वापरण्यात आले आहेत. भोज  राजाने इथून जवळच बंधाराही बांधलेला होता. भीमबेटकाला गेल्यास हे ठिकाणही आवर्जून पाहावे .

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

Bhimbetaka – A journey through our past.- By Rakesh Salunkhe

 

Previous articleलोकशाहीच्या संरक्षणासाठी काय करायला हवे?
Next articleआशिकी@30
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here