भीमराव रामजी आंबेडकर- सर्व देवांचे निर्दालन करणारा विचारवंत

– प्रताप भानू मेहता

(अनुवाद -मुग्धा कर्णिक)

जयंती-पुण्यतिथी असे वार्षिक कार्यक्रम एकंदरीत यशापयशाचा लेखाजोखा मांडण्याची निमित्ते असतात. पण भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बाबतीत मात्र असे काही करण्याचा प्रयत्न आगाऊपणाचा आणि थिल्लरपणाचाही ठरेल. अनेक महान नेत्यांचे मूल्यमापन करताना आपण त्यांचे कर्तृत्व नागरसंस्कृतीच्या आदर्शांच्या आणि दर्जाच्या मापात मोजतो. पण आंबेडकरांच्या बाबतीत मात्र नेमके उलटे होते. त्यांच्या कर्तृत्वाचा मापदंड लावून आपल्याला आपली संपूर्ण नागरसंस्कृतीच किती तोकडी आहे ते मोजावे लागते. आपले आदर्श काय आहेत यावरून त्यांचे मोल ठरवता येत नाहीत, तर आपल्याला आपले मोल नेमके किती ते समजून घ्यायचे असेल तर त्यांना आदर्श मानावे लागेल. आंबेडकरांशी नाते जुळताना, त्यांची उंची किती ते मोजून चालणार नाही- आपली उंची किती राहिली आहे ते तपासावे लागते… त्यांची न्यायाची हाक, त्यांचा बुध्दीनिष्ठेचा आग्रह, संस्थात्मक विचार करण्याची त्यांची सखोल क्षमता यांना सामोरे जाताना आपण का मागे हटत रहातो आहोत हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ते एक आरसा आहेत… त्या आरशात स्वतःला पाहायची हिंमत नाही होत आपली. त्यांचे वैचारिक अस्तित्व ही एक सतत टोचणी लावणारी गोष्ट आहे आपल्या असद्विवेकाला… आणि आपल्या असत् श्रध्दांना.

आंबेडकरांवर लिहिणे हे फार कठीण आहे- याची कारणे अनेक आहेत. एक अगदीच धोबड कारण म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचे चीज म्हणावे तसे झाले नाही. त्यांचे अत्युत्तम, सर्वसमावेशक असे चरित्र अजूनही आलेले नाही. काही फुटकळ प्रयत्न झाले आहेत, त्यातले काही मराठीतल्या लिखाणाचे आहेत. पण त्यांचे सर्व लिखाण अधिकृत, विश्लेषक संपादनानिशी अजूनही प्रसिध्द झालेले नाही. त्यांचा पत्रव्यवहार अजूनही विखुरलेलाच आहे, अजूनही त्यातील पार मोठा भाग मिळू शकत नाही कारण विविध संस्थांच्या ताब्यात, मालकी हक्कांच्या वादात तो अडकून आहे. १२५व्या जन्मदिनानिमित्त कोणते काम प्रथम प्राधान्याने करायला हवे असेल तर ते हेच. त्यांचे सारे लिखाण, निबंध, प्रबंध आणि पत्रव्यवहार एकत्र संपादित केले जायला हवेत. त्यांचे सारे काम पालथे घातले तरीही ही एक व्यक्ती अशी आहे की ती गांधी-नेहरूंप्रमाणे सहजगत्या आवाक्यात येत नाही. विद्वत्ता, संस्थात्मक कार्य, गाढ सामाजिक पाठबळ आणि समकालिनांनी लिहून ठेवलेल्या आठवणी यांमुळे गांधी-नेहरूंच्या कार्याचे, लेखनाचे विद्वत्तापूर्ण संग्रह निर्माण झाले. आंबेडकरांच्या तेजावर तुलनेने दुर्लक्षाचा पडदा टाकून ठेवण्यात आला.

आंबेडकरांना दुर्लक्षित ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्या तेजःपुंज राजकीय आणि नैतिक शक्तीला कदापि झाकोळू शकणार नाहीत. त्यांच्या पिढीतील कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांना अधिक अनुयायी मिळाले. कोट्यावधी अनुयायी- ज्यांच्यासाठी ते एखाद्या धार्मिक प्रतिकापेक्षा अधिक आहेत… दलितांच्या वस्त्यावस्त्यांमधून, गल्ल्याबोळांतून त्यांची स्मृती जागवली जाते, त्यांना देवस्वरूप मानले जाते… याच्याशी कुणाही साध्यासुध्या राजकीय नेत्याच्या तुलनेचा प्रश्नच नाही… भूतकाळात होऊन गेलेल्या धर्मक्रांत्यांशीच केवळ याची तुलना होऊ शकते. ‘जय भीम’ हे दलित चळवळीचे पवित्र मानले जाणारे अभिवादन, अगदी धीमेधीमे पण कणखरपणे एका जोरदार शक्तीस्रोतात बदलून पसरत चालले आहे- ‘जय सियाराम’ला मागे टाकलंय त्या अभिवादनाने. ते आता केवळ नेते उरलेले नाहीत, तर अन्यायाला दूर करणारा प्रेषित म्हणूनच पाहिले जात आहेत.

आंबेडकरांनी नेहरूंविरुध्द एक सर्वात बोलका आरोप लावला होता- नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियामधून त्यांनी भारतीय भूमीतील अन्यायावर एक प्रकारचे अवगुंटन टाकले. नेहरूंवर त्यांनी अनेकदा ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप केला.

प्रेषितांवर लिहिणे हे अकदा दोन परस्परविरुध्द कारणांमुळे अशक्य होत असते. अनुयायांसाठी- त्यांनी दिलेले देवत्व किंवा संतपद- ज्याबद्दल आंबेडकरांनी स्वतःच सर्वांना सावध केले होते- यामुळे सखोल अभ्यास करण्याच्या वाटा बंद होतात, त्यामुळे आंबेडकर हे विचारांचा केंद्रबिंदू न होता एक महान अधिकारी व्यक्ती म्हणून सीमित होते. आंबेडकरांबद्दल लिहितानाही एक प्रकारचे संशयाचे जाळे असते. दलितेतरांसाठी एक मानसिक पगडा असतो- की ते त्यांच्याबद्दल लिहू शकत नाहीत. गेली अनेक दशके, हे एक विचारप्रवर्तक व्यक्तिमत्व आपण सर्वांनी या ना त्या रीतीने दुर्लक्षित ठेवले ते असे. जणू साऱ्या समाजाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला पुरेसा अवकाश मिळू दिला नाही, आणि मग एवढे करूनही ते यशस्वी झाले तेव्हा सारा समाज नाचतबागडत त्यांच्या मिरवणुकीत सामील झाला. अशीही शंका येते की आंबेडकरांचा वापर करताना त्यांचे सौम्य रूप मांडून ठेवण्याचा प्रयत्न होतो. आंबेडकरांसाठी आदर असल्याचे तोंडदेखले दर्शवून त्यांच्या उग्र विचारांना सामोरे जाण्याचे टाळता येते. उदाहरणार्थ भाजपच्या आंबेडकरांना ‘आमचेच ते’ म्हणण्याच्या प्रयत्नांतून ते स्पष्टच जाणवते. काँग्रेसने त्यांना अगदीच कोपऱ्यात ठेवायचा प्रयत्न केला त्या तुलनेत भाजपचे हे प्रयत्न निदान काहीतरी राजकीय विचार दाखवतात. निदान आता त्यांच्याबद्दल थोडे अधिक बोलले जाऊ लागले आहे. पण या प्रयत्नातून ‘आमचेच ते’ या खेळीच्या मर्यादाच लक्षात येतात. त्यांच्यासमोर माथे झुकवले म्हणजे त्यांचे टोकदार विचार अंतरात घुसू नयेत अशीही तजवीज करता येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडे, आंबेडकर स्मारकाची पायाभरणी करण्याच्या समारंभात, एक फारच सुरेख शब्दांत ढाळलेले आवाहन केले- आंबेडकरांना केवळ दलितांचे नेते म्हणून पाहू नये असे ते आवाहन होते. अर्थातच हे अगदी उघडपणे योग्यच आहे- न्याय आणि लोकशाही दोहोंचीही चाड असलेल्या कुणालाही त्यांच्या विद्वत्तेच्या प्रभेचा लाभ होतोच. पण ते दलितांचेच नेते नाहीत असे म्हणणे हे केवळ तोंडदेखले म्हणून चालणारे नाही. ते आपणा सर्वांचे नेते व्हावेत यासाठी आपणा सर्वांना स्वतःलाच फार खोलवर प्रश्न विचारावे लागतील, तरच आपल्याला त्यांचे वैचारिक नेतृत्व लाभेल. आंबेडकरांनी नेहमीच वैश्विक सत्ये मांडली. पण त्यांना ‘आमचे’ म्हणण्याचा हक्क ज्याचा त्याने मिळवावा लागेल याची त्यांना स्वतःला जाणीव होती. जेव्हा दलितांची मुक्ती साधेल तेव्हाच त्यांना आमचे म्हणण्याचा हक्क इतरांना मिळेल. दलितांचेच नव्हे तर सर्वांचेच नेते म्हणून त्यांना ओळखायचे असेल तर ती कसोटी देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर आहे.

दलितांमध्ये एक प्रकारची अगदी समर्थनीय अशी भयशंका आहे. ते केवळ दलित नेतेच नव्हेत तर सर्वांचे नेते आहेत या सारवासारवीतून त्यांचे उग्र विचार गुळगुळीत करून टाकण्याचा कावा आहे असे त्यांना वाटते. त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला अन्यायाविरुध्दचा धगधगता, टोकदार संताप जरा मऊ करून टाकला की दलितेतरांना ते बरे वाटू लागतात. पण हा त्यांचा संताप त्यांच्या इंग्रजी लेखनापेक्षा मराठीतून अधिक थेटपणे उतरतो. अन्यायाला उघडे पाडणे हा त्यांच्या संपूर्ण करीअरमधला एकसंध धागा आहे. अन्यायावर कोणत्याही प्रकारे, कसल्याही प्रकारचा अगदी पातळसाही पडदा टाकू पाहाणारे कोणतेही कारण, राष्ट्र, सत्ता, संस्कृती किंवा संपत्ती त्यांना स्वीकार्य नव्हती. अरुण शौरींसारखे त्यांचे टीकाकार त्यांच्यावर नेहमीच ही टीका करीत आले आहेत- की ते राष्ट्रवादी नव्हते. ज्याचा पाया न्यायाधारित नाही अशा कशालाही राष्ट्र मानण्यासच त्यांनी नकार दिला यातच त्यांची थोरवी होती. दलितांवरील अन्याय, त्यांचे शोषण दृष्टीआड करण्यासाठी सारी तत्वज्ञाने वापरली जातात, पोटात दडलेल्या अन्यायाचे अंतरंग उघडे पडू नये म्हणून अमूर्त कल्पनांच्या धुक्याचा जाड पडदा सारला जातो हे त्यांनी सतत ठासून सांगितले. ती उघडीवाघडी हिंसा, छुपे, फसवे अत्याचार, रोजचे अपमानित जिणे हे सारे जे दलितांच्या वाट्याला आले त्याकडे आपण सारे नजर भिडवून पाहणेही टाळतो. दलितांच्या वाट्याला आलेला जुलूम, हिंसा हे सत्य होते हेसुध्दा धडपणे मान्य केले जात नाही… आणि मान्य केले गेलेच तर त्याचे गांभीर्य कमीतकमी ठेवूनच- त्यावर खोटेपणाची पांघरुणं घालत किंवा बचाव तयार ठेवतच ते मान्य केले जाते. त्यांनी नेहरूंवर गांधीपेक्षा जास्त जळजळीत टीका केली याचे कारण हेच होते- नेहरूंमध्ये भारतीय समाजातील हिंसकता किती मध्यवर्ती आहे हे ओळखण्याची क्षमताच नव्हती. त्यांनी लिहिले: ‘जवाहरलाल नेहरूंकडे पहा. ते स्फूर्ती घेतात, जेफर्सनच्या जाहीरनाम्यामधून. पण त्यांनी स्वतः कधीही या देशातल्या सहा कोटी अस्पृश्यांच्या स्थितीबद्दल दुःख, शरम व्यक्त केलेली नाही. त्यांच्या लेखणीतून स्रवणाऱ्या साहित्यकृतींच्या धबधब्यात कधीतरी त्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे?’

‘स्पृश्यां’वर आंबेडकर सातत्याने जो आरोप लावतात त्यात तथ्य आहेच. ते म्हणत- ‘त्यांना ते समजतच नाही’. खरंच समजतंय का आपल्याला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीच.

त्यांचा हा संताप अतिशय सकारात्म उत्पादक राहिला, कारण त्यांनी त्यात कधीही सूड उतरू दिला नाही. त्यांनी सातत्याने केवळ धारदार टीका केली समाजावर. पण त्यांच्यातील सूडाचा अभाव वापरला गेला आणि त्यांचे विचार उग्र नव्हतेच असा आभास निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. इथे दोन प्रश्न उद्भवतात. एक म्हणजे साध्य आणि साधने यामधील संबंधावर आंबेडकरांनी जो सखोल विचार केला तो प्रश्न- त्यावर आपण नंतर बोलू. पण दलितांमध्ये -योग्यच आहे ते- एक भावना आहे की आंबेडकरांनी सूडाच्या विचाराविना जो विचार मांडला त्याचाच वापर दलितेतर करतात आणि मग त्यांना समाजाच्या रचनेत चिणल्या गेलेल्या दलितांवरील अत्याचाराची असावी तितकी चीड असत नाही. गांधीबरोबर चर्चा करीत असताना त्यांनाही याचाच संताप आलेला. दलितांची मुक्ती व्हायची असेल तर त्यांचे सबलीकरण झाले पाहिजे याला दुय्यम पर्याय सुचवला जात होता. वरच्या जातींनी निर्माण केलेला हा प्रश्न आहे ही गांधींची मांडणी सबलीकरण टाळण्यासाठी केली जाणारी फसवी खेळी आहे असेच त्यांना वाटत होते. गांधी-आंबेडकर वादाबद्दल लिहायची ही जागा नव्हे- (पण ज्यांना वाचायचे असेल त्यांनी डी आर नागराज यांचे द फ्लेमिंग फीट अँड अदर एसेज् : द दलित मूवमेन्ट इ इंडिया हे पुस्तक वाचावे. थोर लेखन आहे ते- आणि उपलब्ध असलेल्यात सर्वोत्तम). आंबेडकरांनी हेही ठासून सांगितले की दलित यापुढे गुपचूप बळी जाण्ची भूमिका निभावणार नाहीत- याचा सबब म्हणून वापर करून त्यांच्यावर आजही जे जुलूम होतात ते सोयिस्करपणे विसरले जाते. त्यांनी घटनात्मक राजकारणाचे महत्त्व अधोरेखित केले त्याचा आधार घेऊन दलितमुक्तीला मर्यादा घालणे, तोंडदेखले घटनात्मक तुकडे फेकणे ही फसवणूक केली जाते. प्रामाणिक असाल तर, आंबेडकरांचे स्वतःचे लिखाण वाचल्यानंतर पोळून निघाल, असाहाय्य वाटेल तुम्हाला. काय अजब मिश्रणे तयार झाली आहेत… ‘आमचेच ते’च्या धोशाने आता त्यांना अगदी सुरक्षित निरुपद्रवी बनवून टाकले आहे जणू. त्यांच्या विचारांत हलवून सोडणारे जणू काही नव्हतेच. आदरणीय महनीय व्यक्तिमत्व म्हणून उभे करून सर्वसहमतीची एक आकृती सापडली आहे जणू सर्वांना.

पण भारताच्या आत्म्याशी भिडणारा मूलभूत संघर्ष उभा करण्याच्या हृदयस्थानी तेच आहेत हेच सत्य आहे.

आंबेडकर अनेकविध पातळ्यांवर विचारप्रवर्तन करतात. त्यांच्या पिढीतील कुणाही नेतृत्वापेक्षा त्यांची वैचारिक स्पष्टता सर्वात जास्त बलदायी आहे. वास्तवाचे अचूक विश्लेषण आणि तर्कशुध्द मांडणी यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. नेहरूंच्या युक्तीवादांत अनेकदा भावनिकतेचे प्राबल्य दिसते त्याचा लवलेशही त्यांच्या मांडणीत नसतो. त्यांच्या सुरुवातीच्या डॉक्टरल लेखनामध्येही हे दिसते. आर्थिक विश्लेषण, बॉम्बे लेजिस्लेटिव असेंब्ली आणि कन्स्टिट्युअन्ट असेंब्ली या दोन्ही ठिकाणी कायदेतज्ञ म्हणून केलेले लेखन अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील लेखनातही हा विशेष त्यांनी जपला आहे. त्यांची विद्वत्ता, व्यासंग आणि संदर्भासह लेखन करण्याची क्षमता अजोड आहे. अथक तर्कशुध्द विचारांची मांडणी आणि स्फटिकशुध्द स्पष्ट लेखनाची मेजवानी झोडायची असेल तर त्यांचे थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक वाचून पाहावे- या विषयावर आजतागायत दुसरे इतके स्वच्छ दृष्टीने लिहिलेले, तरीही आक्रमक मांडणी करणारे पुस्तक नाही. हिंदू राष्ट्रवादी आणि पाकिस्तान घडवू पाहाणारे असे दोघेही यातील निवडक उतारे अझूनमधून वापरताना दिसतात. पण दोन्ही भूमिकांचे ऍड ऍब्सर्डम- म्हणजे ती भूमिका स्वीकारल्यास किती चुकीचे, विचित्र परिणाम दिसतात हे दाखवणारी अगदी स्पष्ट मांडणी आंबेडकर करतात. आंबेडकरांचे लिखाण अस्वस्थ करणारेच असते कारण त्यांची मांडणी सतत कोणत्या ना कोणत्या पातळीवर आपला दुटप्पी दिखाऊपणा फाडून काढत असते. केवळ अन्यायाचे वास्तव मांडण्याबद्दल मी हे वरवर म्हणत नाही. असे आहे, की ते कोणतीही आदर्श कल्पना उचलतात आणि दाखवून देतात की आपण कोणत्याही आदर्शाच्या अंतिम तात्पर्यांसोबत कधीही कसे रहात नाही.

गांधींवरील त्यांचे आरोप हे केवळ गांधी दलितांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांच्या मते गांधींनी दलितांच्या मागण्यांची धार कमी करण्याचे जे अनैतिक उद्दिष्ट होते त्यासाठी अहिंसा तत्वाचा वापर केला. अहिंसेच्या आदर्शाचाही गांधींनी खोलवर असा पराभवच केला. अहिंसेच्या तत्वाचे समर्थन करणाऱ्या कुणालाही गांधींच्या या धोरणात्मक खेळ्यांच्या केंद्रस्थानी मानसिक जबरदस्तीच सापडेल असे ते म्हणत. त्यातील काही जबरदस्ती ते स्वतःवरही करतात असेही त्यांनी फार धारिष्ट्याने बोलून दाखवले. हा गांधींचाही मोठेपणा होता, की त्यांनी त्या आरोपातील तथ्य काही प्रमाणात मान्य केले. आंबेडकरांनी त्यांच्यावर आरोप केला की घटनात्मक संस्कृतीमध्ये सत्याग्रह हा एक प्रकारे हिंसेचाच प्रकार होतो आणि केवळ स्वतःला पटलेल्या सत्यासाठी इतर काही वास्तव आहे हे नाकारणे हा स्वमग्न आत्मप्रेमाचीच साक्ष ठरते हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. अन्यायाच्या अनुभवांचे संचित गाठीशी असतानाही आंबेडकरांची निष्ठा घटनात्मक पध्दतींवर होती, हे गांधींच्या अहिंसेच्या कल्पनेपलिकडले अधिक प्रखर अहिंसेचे दर्शन होते. अत्याचारांची इतकी खोल जखम वागवत असतानाही संतापाच्या उद्रेकाचे आवाहन न करण्यात जे नीतीधैर्य लागते ते फार वेगळे, फार धीरगंभीर असते हे लक्षात घ्यायला हवे. किंबहुना आंबेडकरांनी दलितांना घटनेचे पाईक बनवून अहिंसेची दीक्षा दिली ती गांधींनी दिलेल्या अहिंसेच्या शिकवणीपेक्षा कित्येक पटींनी अधिक धीरगंभीर होती- अजूनही काही दलित नेते यामुळे आपले हात बांधले गेले असल्याची तक्रार करताना दिसतात.

संपत्तीची समाजात परिवर्तन आणण्याची क्षमता ओळखणाऱ्या मूठभर नेत्यांपैकी एक आंबेडकर होते. समाजातील वरच्या जातींतील लोकांनी विरक्तीची, त्यागाची भाषा करणे काही प्रमाणात सार्थ असले तरीही ज्यांच्यापाशी काही नाहीच त्यांच्यासाठी ही भाषा एख क्रूर विनोद ठरतो एवढ्याच पुरते त्यांचे त्यागावरील आक्षेप मर्यादित नव्हते. संपत्तीचे समाजशास्त्रीय महत्त्व ओळखणे हे आधुनिक भारताची भाषा करणाऱ्या कुणीही दुर्लक्षून चालणार नाही याची त्यांना सखोल जाण होती. त्यांचा एक फार सुंदर निबंध आहे- बर्ट्रांड रसेलच्या ‘रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी’ या पुस्तकावरील टीका त्यात आहे. त्यांनी उमरावी रहाणीतून घडलेल्या रसेलला त्याच्या ‘पैशाचं प्रेम’ वरील उथळ भाष्यावरून, पैशाला पापमूलक म्हणण्यावरून बरेच झोडले. आंबेडकर लिहितात, “ रसेल म्हणतो ‘पैशाचे प्रेम’ पापमूलक आहे, यात तो नवीन तत्वज्ञान काहीच मांडत नाही- इतिहासात ते वेळोवेळ मांडून झालेले आहे… संकल्पनात्मक चूक कुठे होते- तर तो जेव्हा पैशाचा हेतू लक्षात न घेता पैशाचे प्रेम या गोष्टीवर टीका करतो तेव्हा. मन निरोगी असेल त्यांना पैशाचे प्रेम या अमूर्त कल्पनेचा विचारही नसतो हे अधोरेखित केले पाहिजे. पैशाचं प्रेम हे नेहमीच कोणत्यातरी उद्दिष्टासाठी असतं. आणि ते उद्दिष्ट काय आहे त्यावरून त्याचे भलेबुरे श्रेय ठरते. त्यामुळे पैशाचे प्रेम म्हणून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणे हे सुध्दा विविध गुणांनी प्रेरित असते.” पैशाची ही सांगड अशा वैविध्याशी घातल्यामुळे आणि केवळ एकच एक गणवेषीकरण अमान्य केल्यामुळे उठवळ नैतिकतेतून आलेल्या कडवट टीकेपेक्षा खरी ठरते.

आंबेडकर पुन्हा अस्वस्थ करून टाकतात. गांधींपेक्षाही पुढे जाऊन ते अहिंसा तत्वाला घटनात्मक तार्किकतेपर्यंत नेऊन भिडवतात. आधुनिकतेला वैविध्यापर्यंत नेऊन भिडवून ते नेहरूंच्याही पुढे जातात आणि त्यांची इतिहासाची जाणीव त्यांना इतर कुणाहीपेक्षा अंधाऱ्या, दुष्ट अवकाशांचा वेध घेण्यास प्रवृत्त करते. हे करीत असताना, ते आपणा साऱ्यांच्या निष्ठा नेमक्या कशाशी आहेत, त्या निष्ठांच्या मर्यादा काय आहेत हे डोळे उघडून पाहायला भाग पाडतात.

आंबेडकरांच्या विचारांनी अजूनही अस्वस्थ होतो आपण- भारताच्या आत्म्यावरून चाललेला आजचा संघर्ष ज्या मुद्द्याला मध्यभागी ठेवून चाललेला आहे त्यासंबंधीच्या त्यांच्या दाव्यावरून ती अस्वस्थता निर्माण होते. त्यातील त्यांचा पहिला दावा असा की हिंदू समाजाच्या संरचनेमध्ये हिंसा ही मध्यवर्ती आहे. हिंसा ही अपवाद म्हणून होत नाही किंवा अचानक पाण्याबरोबर वाहात आलेल्या काडीकचऱ्यासारखी ती नाही- की तेवढं काढून टाकलं की तळातला हिंदू समाज दाखवणारं निवळशंख निर्मळ पाणी दिसू लागेल. ही हिंसा हिंदू समाजाची ओळख आणि कामकाजासाठी मध्यवर्ती आहे. आंबेडकरांना न्यायासाठी हिंदुत्वाविरुध्द एक प्रकारचे युध्दच पुकारावे लागले या वास्तवाला कुणालाही फाटा देता येणार नाही. त्यांनी गांधींना लिहिलेल्या उत्तरात म्हटले, “मी महात्म्याला ठामपणे सांगू इच्छितो, की माझ्या मनातील घृणा आणि तुच्छता ही केवळ हिंदूंच्या किंवा हिंदुत्वाच्या अपयशामुळे निर्माण झालेली नाही. मला हिंदू आणि हिंदुत्वाचा तिरस्कार वाटतो कारण माझी खात्री पटलेली आहे की ते चुकीचे आदर्श कवटाळतात आणि चुकीचे सामाजिक जीवन जगतात. हिंदू आणि हिंदुत्वाने स्वीकारलेल्या सामाजिक वर्तनातील त्रुटींशी माझे भांडण नाही. माझा विरोध मूलभूत आहे. त्यांच्या आदर्शांशीच माझा संघर्ष आहे.”

आंबेडकरांचे हे प्रखर निवेदनच आजच्या संघर्षांच्या केंद्रस्थानी आहे. न्याय प्रस्थापित करण्यासाठी केवळ रूढी-परंपरा यात सुधारणा करणे, त्यांचे आदर्श अंमलात आणणे एवढेच पुरेसे नव्हते. न्यायासाठी परंपरेचा संपूर्ण उच्छेद आश्यक होता. नव्या दलित जाणिवांना ज्या प्रकारे विद्यापीठांमध्ये बळ मिळते आहे, त्यावरून असे स्पष्टच दिसते की वर्तमान भारतात हा सर्वात मोठा सांस्कृतिक भेदाचा तडा दिसू लागणार आहे. आंबेडकर-पेरियार गटाचे कार्यकर्ते एकीकडे आणि अभाविपचे दुसरीकडे हे चित्र या अंतःप्रवाहाचीच साक्ष देते आहे. आणि विद्यार्थीजगातील राजकारण अस्मितेच्या प्रश्नावर का तीव्रतर होत जाते आहे याचेही कारण हेच आहे. आजवरच्या साऱ्या सामाजिक रचनांमध्ये एकमेव असे ब्राह्मणवादाचे केवळ आश्चर्यकारक असे, साऱ्या समाजालाच कैदेत पाडणारे समाजरचनेचे तंत्र येथे निर्माण झाले यावरच आंबेडकरांचा पूर्ण रोख होता. हिंदू मांडणीतील इतर अब्राह्मणी प्रवाहांवरही या ब्राह्मणवादाची इतकी घट्ट श्वास कोंडणायला लावणारी पकड होती, की न्यायाच्या प्राथमिक अपेक्षां पूर्ण होण्यासाठीही ती संरचना ध्वस्तच करणे प्रथम आवश्यक आहे.

आंबेडकरांच्या साहित्यसंपुटातील काही भाग जे पुन्हापुन्हा वाचले की नवनवीन काही हाती लागते ते आहेत त्यांच्या समाजनिदानाचे. जातीसारखी सैतानी, दुष्ट, जुलमी संस्था निर्माण होण्यामागच्या कारणांचा ते अथक वेध घेत रहातात. त्यांचे अनेक प्रबंध समाजशास्त्रीय अचूक विवेचन करणारे आणि ऐतिहासिक सत्यांचा शोध घेणारे आहे. त्यांनी आर्यांच्या आक्रमणातून जित-जेते आणि म्हणून शोषक शोषित निर्माण झाल्याचा सिध्दांत सपशेल नाकारला आहे. वंशाच्या पायावर रचलेली सर्व समर्थने त्यांनी नाकारली. जातीसंस्थेची कर्मविभाजनासाठी निर्मिती झाल्याचे समर्थन तर त्यांना विशेषत्वाने तिरस्करणीय वाटते. जातीसंस्थेने कर्मांना उतरंडीत बध्द केले नाही, तर कर्म करणारांना उतरंडीत कैद केले. आंबेडकरांचे इंडॉलजिस्ट किंवा इतिहासतज्ञ म्हणून मूल्यमापन करण्याची ही वेळ नव्हे, पण अरविंद शर्मा यांनी “बी आर आंबेडकर, ऑन द आर्यन इन्वेजन अँड द एमर्न्स ऑफ द कास्ट सिस्टिम इन इंडिया” या त्यांच्या महत्त्वाच्या लेखात त्याचा उहापोह केला आहे त्यावरून त्यांचे योगदान मोठेच आहे हे स्पष्ट होते.

पण त्यांच्या या विश्लेषणातून दोन मोठे दावे आकार घेतात. पहिला असा, की आपण कुठूनही पाहिले तरी ऐहिक आणि कार्मिक समर्थने जातीसंस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकत नाहीत. अगदी पायाकडून सुरुवात होती ती काही दुष्ट अशा कारणमालिकेची, जी पुरोहित वर्गाने सत्तेसाठी सर्वांवर लादली. या संस्थेचे सातत्य राहिले कारण त्यात अस्पृश्यांना प्रगतीचे तीनही दरवाजे- सत्ता, संपत्ती आणि शिक्षण- बंद राहिले. यातली दुष्टता अशी की पायऱ्यापायऱ्यांची उतरंड तयार झाल्यानंतर एकमेकांना घसटून असलेल्या जातीसमूहांनी परस्परांवर अत्याचार करायला सुरुवात केली. एक कायमचे विभाजन जातीसंस्थेने जगण्याचा भाग म्हणून वस्तीला आणले. या समाजरचनेला कसलेही कार्यकारणाचे समर्थन देता येत नाही याच कारणामुळे ब्राह्मणवादाविरुध्दचा नैतिक संताप उद्भवतो. हा केवळ सत्तेचा डाव होता- अगदी निव्वळ, साधा डाव. वास्तवाची संकल्पनात्मक  विशिष्ट रचना मांडून सत्तेचा खेळ सुरू राहिला आणि म्हणूनच मुक्तीसाठी ही संकल्पनात्मक रचना तोडूनफोडून टाकली जायला हवी.

या मुद्द्याला थेट भिडण्याऐवजी, जातीसंस्थेवरील सारे हिंदू भाष्य पश्चात्तापाची भावना व्यक्त करून सुरू होते. “जातीसंस्था एका विशिष्ट काळात उपयुक्त होती,” आपण म्हणतो; “जातीसंस्थेचे सामाजिक वास्तव आदर्श संकल्पनेला धरून नव्हते”, जणू जातीसंस्था ही कधीकाळी समर्थनीय आदर्श होतीच; “तेव्हा त्यात खूपच लवचीकपणा होता आणि प्रवाही होती ती,” “जाती ही व्यक्तीच्या गुणकर्मावर आधारित होती- जन्मावर नव्हे.” जणू या गलिच्छ व्यवस्थेला ही सबब पुरते.

अखेरीस जातीसंस्थेचा किंचितसाही बचाव करणे हे या दुष्ट समाजरचनेच्या गलिच्छपणाला शृंगारण्यासारखेच आहे.

अधिकच वाईट म्हणजे, असा बचावात्मक पवित्रा घेणारे लोक असा युक्तीवाद करतात की हिंदुत्वात समानतेचा पुरस्कार आहे. ही तथाकथित समानता म्हणजे एक आध्यात्मिक अमूर्त संकल्पन होते- जुलमी सामाजिक रचनेशी सुसंगत असेच. आंबेडकरांच्या दृष्टीने पुरुषसूक्त हो वेदांमधे नंतर घुसडलेला भाग होता. पण त्यांनी त्यावरून इतकेच अनुमान काडले की आध्यात्मिक विचार हा अखेर सामाजिक उतरंडीच्या हातात हात गुंफूनच येतो. वेद किंवा गीतेच्या रुपकात्मक अर्थनिर्णयानेही हेच सिध्द होते की पारलौकिकाचा विचारही सामाजिक उतरंडीच्याच सेवेशी रुजू असतो. या दोहोंची सांगड मोडण्याचा कुठलाही प्रयत्न म्हणजे अश्रध्देचा शिक्का नक्कीच. त्यामुळे आंबेडकरांचा हिंदुत्वावरील विचार हा केवळ सामाजिक टीकेचा भाग आहे असे मुळीच नाही. ते दावा करतात की ही सामाजिक टीका अशी असायला हवी की संपूर्ण बौध्दिक वैचारिक रचनाच ढासळली पाहिजे. आपण अगदी कठोर प्रामाणिकपणे भारतीय बुध्दीवादी परंपरांतील क्षतीचा विचार करायचे ठरवले तर आपल्याला हे मान्य करावे लागते की पाश्चात्यांनी बाजूला ठेवल्यामुळेच  नव्हे तर सामाजिक प्रश्नाच्या उद्रेकामुळे या क्षतीने मूळ धरलेले आहे. ज्या बौध्दिक परंपरेच्या गाभ्याशी जुलमी, उतरंडीची, समाजाला तुकड्यातुकड्यांत विभागणारी सामाजिक रचना आहे त्या परंपरेची पाठराखण आपण कोणत्या तोंडाने, कोणत्या विश्वासाने करणार? ज्या परंपरेतून आलेला कोणताही प्रखर बौध्दिक विचार बहुतेकवेळा समाजातील पारंपारिक स्थिती जपण्यासाठीच कामी येतो त्या परंपरांचे आपण काय करणार?

परंपरांना बदनाम न करता परंपरा मोडीत काढून त्यांच्यावर डोके काढण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकल्पातील स्वातंत्र्यचळवळ हा अखेरचा बौध्दिक आचका होता असे म्हणता येईल… काही गोष्टी राखण्यासाठी काही सुधारणा करणे शक्य होते असा त्या प्रकल्पाचा रोख होता. आंबेडकरांनी या प्रकल्पापुढे एक आव्हान फेकले… गुलामी नष्ट करण्यासाठी धर्म नष्ट करणे आवश्यक आहे हे ते आव्हान.

पारलौकिक आणि सामाजिक यांमधील संबंधावर वैचारिक भाष्य करण्याची ही जागा नव्हे. आणि आंबेडकरांच्या तत्वज्ञानविषयक विचारांवर सामाजिक विश्लेषणवादाचा प्रभाव कसा होता यावर भाष्य नक्कीच होऊ शकते. पण हा प्रश्न अनेक हिंदुत्व समर्थकांसाठी किती नाजूक आहे हे सहजच लक्षात येते- जो कोणी हिंदू समाजातील सत्ता आणि उतरंडीच्या रचनेच्या पारंपारिक समर्थनावर आव्हानाचा प्रकाशझोत टाकतो तो ताबडतोब संशयितच ठरतो. शेल्डन पॉलॉकवरील हिंदुत्ववाद्यांनी नुकताच केलेला हल्ला हा केवळ तो पाश्चिमात्य आहे म्हणून झालेला नसून तो हिंदू परंपरांचा अर्थ लावताना सत्तासंबंधातल्या रचनांच्या संदर्भातून लावतो हे निरीक्षण त्याच्या मुळाशी आहे. परंपरेचा संबंध सत्ताकारणाशी कसा आहे हा मुद्दा कळीचा बनवणे, हे आंबेडकरांचे एकमेवाद्वितीय असे यश आहे. आंबेडकर आमचेच म्हणण्यातील स्पर्धा ही कशातून आली आहे- याचा विचार करता हा मुद्दा वादातीतपणे समोर येतो की सत्तेच्या संदर्भातील या नैतिकतेच्या प्रश्नापासून हिंदुत्वाची सुटका करण्याची एक संधी घेतली जात आहे… त्यांचे भारतीय नागरसंस्कृतीवरील भाष्य आजवर कुणीही केलेल्या मीमांसेपेक्षा अधिक प्रखर आहे हेच यामागील कारण आहे.

हिंदू अस्मितेची मानसिकता, नैतिकता खणून उघड्यावर आणण्याचे काम त्यांच्या भाष्याने केले असल्यामुळे त्यांचे वैचारिक अस्तित्व फारच डिवचून जात रहाते. या अस्मितेच्या बांधणीमध्ये किती हिंसा, किती तुच्छता थराथराने चढली आहे हे ते एकेक पदर सोलून उलगडून दाखवतात. लिंगाधारित हिंसा आणि जातीयवाद यांचे जातीशी असलेले संबंध पहिल्याप्रथम शब्दांत मांडणारे ते पहिले विचारवंत होत. त्यांच्या सुरुवातीच्या निबंधांतून त्यांनी जातीतल्या जातीत विवाह करण्याची पध्दत हा जातीसंस्थेचा मध्यवर्ती आधार आहे असे सांगितलेच, पण स्त्रियांवरील नियंत्रणे, विशेषतः विधवा किंवा कुमारिकांवरील नियंत्रणे ही जातीसंस्थेच्या रक्षणासाठी विशेष महत्त्वाची आहेत हेही सांगितले. ते म्हणतात, जातीचा प्रश्न हा – “अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्रिया” यांचा प्रश्न आहे. या अर्थाने स्त्रियांवरील नियंत्रणे ही जातीरक्षणासाठी मध्यवर्ती होती. जातीयवाद हा हिंदू अस्मितेच्या प्रमुख संरक्षक यंत्रणेचा भाग आहे अशे म्हणून त्यांनी सर्वात जालीम कोरडा ओढला होता. फार कडवटपणे ते म्हणाले होते, की एका जातीला दुसऱ्या जातीशी जोडलेले असण्याची जाणीवच नष्ट झालेली असते- ती जाणीव जागी होते फक्त जेव्हा हिंदू-मुस्लिम दंगे होतात. थोडक्यात हिंदूंना आपल्या अस्मितेच्या एकपणाची जाणीव होण्यासाठी, आणि एकत्र येण्यासाठी नेहमीच कुणातरी ‘दुसऱ्याची’ गरज पडते.

आपल्या अहिंसात्मक इतिहासासाठी भारतीय परंपरांतील मध्यवर्ती अहिंसातत्व जबाबदार आहे असे म्हणताच येत नाही. अगदी उलट आहे, भारतीय परंपरांमध्ये हिंसाच केंद्रस्थानी होती म्हणूनच ते शक्य झाले. ऑर्लँडो पॅटर्सन हा समाजशास्त्रज्ञ एकदा म्हणाला होता, की ग्रीसमध्ये स्वातंत्र्यावर विस्तृत विवेचन होऊ शकले कारण त्या समाजाच्या रचनेमध्ये गुलामी हा अविभाज्य भाग होता. स्वातंत्र्याची अधिकृत चर्चा झाली कारण समाजातील गुलामीचे वास्तव झुगारण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता होती. त्याचप्रमाणे, अहिंसेवरील विवेचन हेच तर दर्शवते की समाजात हिंसा अंतर्भूत होती.  अगदी ब्राह्मणवादानेही हिंसेचा विचार केला तेव्हा बौध्द टीका त्यांनी सामावून घेतली- आता त्यांना एक प्रतीक हवे होते. आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे कारण गोमांसाशी जोडलेले होते अशी मांडणी केली. अस्पृश्य मानण्याइतका तिरस्कार कसा निर्माण झाला हे स्पष्ट करण्यासाठी गोमांस खाण्याशी संबंध जोडावा लागतो. अस्पृश्यांबद्दल द्वेष का निर्माण झाला याचे कारण शोधणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. केवळ जुलूम किंवा विषमता याच्याशी हा संबंध जोडता येत नाही… शुध्दता, शुचिता केवळ आपल्याकडेच आहे हा समज राखण्यासाठी त्याची मदत झाली. ज्यांना हा इतिहास माहीत नाही, त्यांना आज भारतीय महाविद्यालयांच्या परिसरांमध्ये गोमांसावरून जो संघर्ष सुरू आहे त्याचे कारणच कळू शकत नाही.

थोडक्यात, आंबेडकरांचा हा प्रयत्न आजवर कुणीही कुठल्याही नागरसंस्कृतीबाबत केला नसेल असा फार मोठा प्रयत्न होता… पध्दतशीरपणे एका संस्कृतीचा पर्दाफाश करण्याचा अत्यंत धाडसी प्रयत्न होता तो. त्यात ‘मूल्यांचे पुनर्मूल्यन’ त्यांनी केले, चांगुलपणाच्या सांगीआड दडलेले दुष्टत्वाचे खरे स्रोत त्यांनी शोधून काढले. मूल्यांचे पुनर्मूल्यन हा नित्शेचा संदर्भ इथे उगीचच आलेला नाही. ते खरेच तसे होते. ते म्हणाले होते अहिंसेवर अधिकृत चर्चा झडण्यामागचे खरे कारण होते खोलवर दडलेली हिंसा. मज्जाव करण्याच्या परंपरांमागे  मानवी व्यक्तित्वाचे संपूर्ण विद्रूपीकरण करण्याचे हेतू दडलेले होते, एकात्म विश्वरचनेच्या आध्यात्मिक दाव्यांमागे दडल्या होत्या समाजाला पडलेल्या खोलखोल भेगा.

गायीला पवित्र मानून पूजण्यामागे दडला होता गोमांसभक्षण करणारांसाठी आंतरिक द्वेष… जणू गायीला प्रेमाने वागवताना इतरांवर उदात्त असे क्रौर्य दाखवणे साध्य होत होते. गोरक्षणासाठी सरसावणारे सारे इतर माणसांशी इतके दुष्टाव्याने कशी वागू शकतात असा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर- आंबेडकर वाचा. त्यांची टीका दंश करणारी आहे, कारण त्यात आपण आपल्या आदर्शांपासून ढळलो असल्याचा शोक नसून, आपल्या आदर्शांमागे- प्रत्येक पायरीवर हिंसा आहे, क्रौर्य आहे असे ते दाखवून देतात. ते दुःख व्यक्त करतात की ब्राह्मण्याच्या पगड्यामुळे भारतात कधीही वोल्तेअर निर्माण झाला नाही. फारफार तर इरॅस्मस झाले… अस्तित्वात असलेल्या सामाजिक रचनेच्या चौकटीत सुधारणा करू पाहाणारे किंचित् समाजसुधारक. पण संपूर्ण समाजरचनेच्या इमारतीला आव्हान देण्याची प्रखरता कुणीही दाखवली नाही.

आंबेडकरांचा विचार गांभीर्याने घेणे म्हणजेच त्यांच्या या टीकेवर गंभीरपणे विचार करणे. पण आंबेडकरांना पहिला प्रतिसाद मिळाला तो विरोधाचा. केवळ त्यांचे घटनेचा मसुदा तयार करण्यातील योगदान तेवढे अपवादाने महान मानले गेले. अत्यंत पध्दतशीरपणे त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचे प्रयत्न झाले. बचावाच्या पवित्र्यात तर सारे होतेच. दलितांवर होणारे अत्याचार हे अत्याचार नाहीतच असे सांगण्यासाठी आपण वाटेल तितके वळसे घेतो. त्यांचे सबलीकरण व्हावे म्हणून संधी देणे नाकारले जाणे तर सातत्याने चालते. बचावाचा पवित्रा राजकीय प्रांगणात काम करीनासा झाला की मग ‘आमचेच ते’चा घोष सुरू होतो. आरेसेसचे स्वयंसेवक त्यांच्या नावाचा उद्घोष करू लागलेत खरे- पण त्यांच्या हिंदुत्वावरील प्रखर टीकेला ते कसे पचवणार याची कल्पनाही करणे कठीण आहे. त्यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’वर अखेर बंदी घालण्यात आली होतीच. पण या ‘आमचेच ते’ मध्ये आंबेडकरांनी आपल्याला आपल्याबद्दल जे कठोर नागवे सत्य सांगितले तेच लपवायचा किंवा त्यांचे विचार आपल्या गोठ्यात बांधून अडकवायचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाच्या शिलेदारांनी त्यांची ती टीका वाचून मान्य केली तर ते निदान अधिक खरेपणाचे होईल.

असले आत्मज्ञान झाल्यानंतर राष्ट्रातील वैचारिक जीवन कशा प्रकारचे असू शकेल? ब्राह्मणवादाचा विनाश ही कोणत्याही न्यायदानाच्या प्रक्रियेची किंवा न्यायपुनर्प्रस्थापनेची प्रथम आवश्यकता आहे हे आंबेडकरांना पटले होते. पण ते स्वतःच बौध्द धर्माकडे वळल्यानंतर परंपरांचा प्रश्न गुंतागुंतीचा बनून राहिला. त्यांच्या या कृतीमागील मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्या ‘व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टु अनटचेबल्स’ या पुस्तकाला लिहिलेली हृदयस्पर्शी, मन हेलावून टाकणारी समर्पण पत्रिका वाचता येईल. ही समर्पण पत्रिका फार आगळीवेगळी आहे… कारण आंबेडकर लिहिताना कधीही आपल्या भावनांचे प्रदर्शन करीत नाहीत- या वेळी त्यांनी ती सावधगिरी बाळगलेली नाही. त्यांच्या मुलांच्या अकाली मृत्यूच्या वेळी त्यांनी दुःखाला, भावनांना वाट करून दिली होती तो आणखी एकच अपवाद “आमची मुले गेली- आमचे सारे जीवन जणू अळणी झाले आहे. बायबल म्हणते,  “ye are the salt of the Earth, if it leaveth the Earth, wherewith shall it be salted.”’ ही समर्पण पत्रिका एका ‘एफ्’ नावाच्या व्यक्तीसाठी लिहिली आहे. बुक ऑफ रुथमधील एका उद्धृताने त्या समर्पणपत्रिकेची सुरुवात होते. नाओमी आणि रूथ या दोघांमधील हा संवाद आहे. त्याचा शेवट होतो, “thy people shall be my people, and thy God my God. Where thou diest will I die, and there will be buried; the LORD do so to me and more also, if ought but death part thee and me.”याने. मग आंबेडकर जे लिहितात तो परिच्छेद संपूर्ण वाचण्यासारखा आहे. तो पुढे दिला आहे.

‘मला आठवते आपण बायबलचे वाचन एकत्र बसून करत असताना या परिच्छेदातील गोडवा आणि  कारुण्यामुळे तू फार हेलावून जायचीस. तुला आठवतंय का मला माहीत नाही, आपण एकदा रूथच्या ‘तुझे लोक ते माझे लोक, आणि तुजा देव तो माझा देव’ या वाक्यावरून चर्चा करायला सुरुवात केली. मला स्पष्ट आठवतंय, की आपला यावरून मतभेद झालेला. तू म्हणत होतीस की एका आदर्श पत्नीच्या दृष्टीने ही अगदी खरीखुरी भावना असते.’ आणि मी असं म्हणालेलो की या परिच्छेदाला सामाजिक दृष्टीकोनातूनही पाहायला हवे, आणि त्याचा खराखुरा अर्थ प्रा. स्मिथ यांनी सांगितल्याप्रमाणे प्राचीन समाज आणि आधुनिक समाज यातील फरक लक्षात घेण्याच्या दृष्टीने लावायला हवा. रुथचे वाक्य, ‘तुझे लोक ते माझे लोक असतील आणि तुझा देव तोच माझा देव असेल’ यातून प्राचीन समाजरचनेचं अंग लक्षात येतं, जो प्राचीन समाज माणूस आणि देव यांच्या अधिपत्याखाली आहे- आधुनिक समाज केवळ माणसाच्याच हाती आहे.(मी माणूस म्हणतो तेव्हा स्त्रिया आणि पुरुष दोघांचाही समावेश करतो बरं का…) तेव्हा माझे मत तुला पटले नव्हते. पण तरीही तुला त्यात रस होता, कारण तू मला या विषयाला धरून एक पुस्तक लिहायला सुचवलेस. मी तसे वचनही दिले. कारण मी पौर्वात्य असल्यामुळे मी ज्या समाजातून आलो तो समाज अजूनही प्राचीनच आहे आणि त्यात देवाचे स्थान माणसापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या त्या संवादातील आज मला सर्वांत महत्त्वाचे वाटते ते माझे वचन. असे काही पुस्तक मी लिहिलेच तर ते तुला समर्पित करीन असे मी तेव्हाच ठरवले होते. प्रा. स्मिथ यांनी लावलेल्या अर्थामुळे माझ्यासमोर जणू एक नवे दालनच उघडले गेले आणि मी तसे काही नक्कीच लिहीन ही आशा होती. त्या विचाराच्या अनुषंगाने आता पुस्तक लिहिणे अगदीच दुरापास्त वाटते आहे. तुला माहीतच आहे की राजकारणाच्या भोवऱ्यात सापडलो आहे आणि आता काही साहित्यिक कामगिरी करायला मला फुरसतच नाही. मी यातून कधी बाहेर पडेन मला माहीत नाही. पण दिलेले वचन पूर्ण करता आले नाही अशी रुखरुख मला युध्द सुरू झाल्यापासून लागून राहिली आहे. या युध्दात तुझाही बळी पडला तर… अशी भीतीही सतत वाटत होती. त्यामुळे मी पुस्तक लिहिले तरीही ते स्वीकारायला तू असशील की नाही ही शंका भेडसावत होती मला. पण अगदी अनपेक्षितपणे हे घडून आले आहे. तू मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडली आहेस. आणि इथे माझे हे पुस्तक आता तयार आहे- समर्पणपत्रिकाच काय ती बाकी आहे. या दोन गोष्टी अशा एकत्र जुळून आल्या आहेत याच्या आनंदातच मला ही कल्पना सुचली. माझे वचन पूर्ण करण्याची संधी पुढपुढे ढकलत रहाण्यापेक्षा, मी माझे हेच पुस्तक तुला समर्पित करू शकतो ही ती कल्पना. जरी याचा विषय वेगळा असला तरीही, एक वेगळा पर्याय म्हणून ते काही टाकाऊ नाही. तू त्याचा स्वीकार करशील कां?

ही समर्पणपत्रिका फार सुंदर आहे, त्यातील संवेदनशीलता मोहक आहे, आणि त्या समर्पणपत्रिकेतून डोकावणारी निष्ठाही गहिरी आहे. आपल्याला हे पुस्तक जिला समर्पित केले आहे त्या ‘एफ्’ नावाच्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नाही यावरूनही आपण आंबेडकरांकडे किती दुर्लक्ष केले तेच जाणवते. आंबेडकरांच्या धनंजय कीर यांनी लिहिलेल्या चरित्रात ती आंबेडकरांची बायबल शिक्षिका होती एवढाच त्रोटक उल्लेख येतो. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने यात आंबेडकरांनी आपली सारी मते खुलेपणाने येथे मांडली आहेत. आधुनिक समाज आणि प्राचीन समाज यांतील दरी ओळखताना त्यांची दृष्टी मानवकेंद्री आहे. यातील सर्वात महत्त्वाचे वाक्य, ‘मी ज्या समाजातून आलो तो समाज अजूनही प्राचीनच आहे आणि त्यात देवाचे स्थान माणसापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे’ त्यांच्या समाजाच्या परिस्थितीवर अगदी नेमके, शोकात्म भाष्य करते. मानवापेक्षा अमुक एक कोणतीही गोष्ट श्रेष्ठ आहे हा दावा मानवतेचा ऱ्हास करू पाहाणाराच असतो. ही स्थिती आपण बदलायलाच हवी. आंबेडकरांनी सर्व देवांचे निर्दालन करण्याचीच तयारी केली होती.

बौध्दधर्माचा त्यांनी केलेला स्वीकार हा याच संदर्भातून तपासायला हवा. मानवतेला केंद्रस्थानी ठेवणे आणि तेच सत्य मानणे हे त्यांनी सातत्याने केले. ते त्यांचे कार्य इतके अथक होते की देवाचे निर्दालन करताकरता त्यांनी साऱ्या अध्यात्मिकतेचेही निर्दालन केले. बौध्दधर्माने आंबेडकरांचे अनेक हेतू तडीस नेले. भारतीय इतिहासातील नैतिक संघर्षाचा अक्षच जणू बौध्दधर्म होता. संघटित असूनही हा धार्मिक पर्याय पुन्हा एकदा ब्राह्मणवादाच्या जोखडाखाली आला. बौध्दधर्माचा अंगिकार हा सामाजिक निषेधाचा एक मार्ग होता. बौध्दधर्म हा सामाजिक नैतिकतेचे एक क्रांतीकारी अस्त्र बनू शकेल अशीही शक्यता होती- स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक समन्वय अशा तीन तत्वांची एकत्र गाठ पडू शकत होती. स्वतःच्या निवडीने एकत्र आलेल्या, एकत्र नांदणाऱ्या लोकांचा बौध्दसंघ हे लोकशाही संघटनाचे एक आदर्श रूप बनू शकले असते. अनेक विद्वानांनी असे मत व्यक्त केले आहे की त्यांचा बौध्दधर्मातील रस हा कर्म किंवा अहम् यांच्याशी संबंधित आध्यात्मिकतेला स्पर्सही करीत नाही. बौध्दधर्माचे दोन दृष्टीकोन परस्परांपासून किती विभिन्न आहेत हे पाहायचे असेल तर समाजवादी नेते आचार्य नरेंद्र देव यांचा पाचशे पानी बौध्दधर्म इतिहास आणि आंबेडकरांचा बुध्द अँड हिज धम्म हे दोन समकालीन ग्रंथ अभ्यासावेत. नरेंद्र देव समाजवादी अशूनही, त्यांना बौध्दधर्माच्या सामाजिक नीतीशास्त्रात कणभरही रस नाही. आणि दुसरीकडे आंबेडकर बौध्दधर्मातील अध्यात्मात जेमतेम रस घेतात. एका अर्थाने या मुळे भारताची वैचारिक शोकांतिकाच समोर येते- एका बाजूला सामाजिक नैतिकतेच्या चर्चेविना गहन अध्यात्माची चर्चा होते आणि दुसरीकडे सामाजिक नैतिकतेच्या विचारवंतांना अध्यात्माबद्दल शंकाच वाटते. या दोहोंत संवाद संभवेनासाच झाला आहे, अंतर्विरोधाने भरलेल्या वैचारिक परंपरांचेच हे लक्षण आहे. अध्यात्मातील करुणाभाव अर्थनिर्णयाच्या संशयाच्या जाळ्यात अडकला आहे. बौध्दधर्म स्वीकारून आंबेडकरांनी जणू सांगितले की : आपल्याला एकतर सामाजिक नैतिकता मिळवता येईल किंवा मग खोट्या आध्यात्मिकतेच्या हातचे खेळणे बनून रहावे लागेल. दोन्ही गोष्टी एकत्र असंभव आहेत. मानवतेची सुटका करण्यासाठीच त्यांनी धर्मांतर घडवून आणले.

आंबेडकरांना बौध्दधर्मात रस होता तो बहुतांशाने त्यातील सामाजिक नीतीशास्त्रापुरताच मर्यादित होता. त्यांचे बंधुत्वाचे तत्व त्यांना बौध्द संघाच्या रचनेत दिसले. पण हा निव्वळ अपघात नव्हता. बुध्दाने कर्मकांड मोडून टाकले, तर आंबेडकरांना मानवाला कुठल्यातरी अनाम महाशक्तीच्या हातचे खेळणे बनवणाऱ्या, अमूर्त कल्पनांच्या जंजाळात पराभूत करणाऱ्या अध्यात्माचे उरलेसुरले अवशेषही नष्ट करायचे होते. नवल नाही, ते अनेकदा या गोष्टींचा मंत्रासारखा पुनरुच्चार करीत की माझा मार्गदर्शक तारा आहे स्वातंत्र्या, समता, बंधुता. त्यांनी अगदी स्पष्टपणे बंधुतेला सत्याचे स्थान दिले. ते म्हणाले होते, “बंधुतेसाठी, बंधुभावासाठी जे काही उपकारक आहे ते सत्यच आहे.” यानंतर साऱ्या प्रश्नांना एकाच दिशेने वळवावे लागते- स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची दिशा. हा एकमेव धर्म आंबेडकरांना मान्य होता.

या गुणत्रयीला आंबेडकरांनी तेजस्वीपणे स्वीकारले याचमुळे आपल्या काळातील लोकशाहीच्या स्वरुपासंबंधीच्या नव्या संघर्षातही त्यांची भूमिका केंद्रस्थानी रहाते. घटनेचा मसुदा लिहिण्यातील त्यांची विद्वत्ता कधीकधी आपले डोळे दीपवून टाकते आणि त्यांनीच घटनेच्या ज्या मर्यादा स्पष्ट केल्या त्याकडे आपले दुर्लक्ष होते. रॅडिकल इक्वालिटी: आंबेडकर, गांधी अँड द रिस्क ऑफ डेमॉक्रसी (स्टॅनफोर्ड युनिवर्सिटी प्रेस) या ऐश्वर्यकुमार लिखित पुस्तकात ते म्हणतात की आंबेडकर अनेक अर्थांनी उग्रवादी आहेत. लोकशाहीबद्दल भावनिक न होता आणि त्यातील कोणत्याही त्रुटी,चुका क्षम्य न मानण्याचा ते दृष्टीकोन ठेवतात म्हणून ते उग्र आहेत. ग्रोटने वापरलेले घटनात्मक नैतिकता नैतिक स्वनियंत्रणावर चालणारे शासन, रिवाजांचे पालन, मुक्त चर्चा हे शब्द आपलेसे करून वापरणारे, प्रचारात आणणारे ते एकमेव भारतीय विचारवंत आहेत. पण मुळात लोकशाही तत्वांचा अभाव असलेल्या भारतीय भूमीत हे शब्द म्हणजे केवळ सजावटीपुरतेच होते, पण तरीही घटनात्मक रुपबंध टिकवणे म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन नव्हे याबद्दल त्यांच्या मनात स्पष्टता होती. खरे तर त्यांनी घटनात्मक नैतिकतेच्या दोन मर्यादा फार द्रष्टेपणाने स्पष्ट करून ठेवल्या. पहिली मर्यादा ही होती, “प्रशासनाची कार्यशैली ही घटनेच्या रुपबंधाशी सार्थ आणि सुसंगत असायला हवी.” हेच कारण असावे की- माधव खोसला म्हणतात तसे- भारताच्या घटनात्मक कायद्यामध्ये प्रशासनाचे कामकाज ठरवून देण्यावर खूप भर देण्यात आला आहे. जणू सत्तर वर्षांनंतरही ते आपल्याला सावध करीत असतात की- “घटनेत काहीही बदल न करता, केवळ प्रशासकीय कार्यशैली बदलून घटनेचे विकृतीकरण करता येणे सहज शक्य आहे. घटनेच्या आत्म्याशी विसंगत किंवा विरुध्द पध्दतीने काम करणारे प्रशासन तेवढे सहज करू शकते.” तसेच, प्रातिनिधिक सरकार हे जनतेला प्रतिसाद देणारे सरकार अशेलच असेही नाही हेही त्यांनी सांगून ठेवले आहे. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, “मताधिकार सर्व प्रौढांना मिळाला म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले शासन निर्माण झालेच असे नसते.” शिवाय त्यांना एक लोकशाहीतला एक खोलवर लपलेला अंतर्विरोधही कळत होता : सामाजिक आणि आर्थिक विषमता असताना सत्तेत मात्र राजकीय समतेचे शासन आणण्याचा प्रयत्न हा तो अंतर्विरोध. कोणतीही लोकशाही हा ताण फार काळपर्यंत सहन करून तग धरू शकत नाही हे त्यांना उमजले होते.

या वातावरणात पुन्हा एकदा आठवण द्यावीशी वाटते- त्यांच्या मनात संशय होताच आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादाला न्यायापेक्षा मोठे स्थान मिळता कामा नये हे पुन्हापुन्हा विशद केले होते. त्यांनी अगदी स्पष्ट म्हणून ठेवले आहे, “राष्ट्रवाद म्हणजे काही अगदी सोवळ्यातली पवित्र वस्तू नाही. बाकी कशाचाही विचार न करता राष्ट्रवादालाच प्रथम प्राधान्य देण्याइतके ते काही चिरंतन तत्व नाही.”

लोकशाहीवरील ही सडेतोड टीका त्यांना नेहमीच्या चाकोरीतील उदारमतवाद्यांपेक्षा वेगळी ठरवते. आंबेडकरांना उग्रवादी रिपब्लिकन म्हणावे का असा मोह होतो. बंधुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांना रिपब्लिकन बनवतो, आर्थिक विषमता आणि खरीखुरी लोकशाही यांच्या साहचर्याविषयी त्यांच्या मनातील संशयही त्यांना रिपब्लिकन बनवतो. आणि स्वतःवर घालून घेतलेल्या बंधनांव्यतिरिक्त कोणतेही बंधन समर्थनीय असू शकत नाही हा त्यांचा दृष्टीकोनही त्यांना रिपब्लिकन बनवतो. पण मला वाटते आंबेडकरांना रिपब्लिकन ठरवणे हे तीन मुद्द्यांवर दिशाभूल करणारे ठरेल. प्रथम, आंबेडकरांना लोकांचे सार्वभौमत्व ही एकात्म गोष्ट आहे ही कल्पनाच विश्वासार्ह वाटत नाही. घटनेमध्ये चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे रोधनातून समतोल साधण्याच्या इतक्या जागा त्यांनी तयार केल्या आहेत त्यातूनच हे स्पष्ट होते. सार्वभौमत्व हे एकात्म असू शकत नाही आणि म्हणूनच ते कुणाही एकाच्या प्रतिनिधीत्वाने सत्यात येत नाही. दुसरे म्हणजे भारतीय सामाजिक स्थितीमधील नीतीभ्रष्टतेचे प्रमाण इतके आहे की त्यांना सामाजिक संबंधाचा पाया म्हणून केवळ चांगुलपणावर अवलंबून रहाण्यापेक्षा देशाच्या शासनाकडे सामाजिक सलोख्याची सूत्रे असणे अधिक विश्वासार्ह वाटले.  विकेंद्रीकरण आणि स्थानिकसत्ता यावर ते सातत्याने टीका करीत होते, कारण यातून केवळ स्थानिक जुलमी व्यवस्थांनाच बळ मिळेल असा त्यांना संशय होता. देशाचे शासन सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करून समाजाची पुनर्रचना करू शकेल यावर त्यांचा अधिक विश्वास असल्याचेही यातून दिसते. आणि अखेर, आंबेडकरांचा बंधुतेवर, नागरिकांच्या परस्पर सहकार्यावर अपेक्षायुक्त विश्वास असला तरीही त्यांच्या बंधुतेच्या कल्पनेत रिपब्लिकन विचारात दिसून येणारी एकतेबद्दलचा उत्साह तेवढासा दिसून येत नाही. आंबेडकरांचा, एका अत्यंत गंभीर पातळीवर व्यक्तीक्षमतेवर अधिक गाड विश्वास आहे असे दिसते. रिपब्लिकनवादाच्या एकतेच्या अमूर्त कल्पनेत त्यांना हा व्यक्तीवाद हरवून टाकायची इच्छा नसावी असे दिसते. काहीसे असे दिसते की त्यांच्या संवेदनांचे स्वरूप शब्दांत पकडणे कठीण व्हावे असे काहीसे मूलभूत एकलेपणाचे होते. यामुळेच ते रिपब्लिकनांपेक्षा वेगळे उठून दिसतात.

आंबेडकरांना हे निश्चितपणे माहीत होते की सामाजिक न्यायासाठी दलितांचे सबलीकरण व्हावे लागेल, आणि त्यांना सर्व प्रकारच्या सत्तेचा हिस्सा मिळावा लागेल. त्यांनी एकदा उपहासाने म्हटले होते, की बाकीच्या अनेक समाजव्यवस्था कुणालातरी वगळताना त्या गटाला एक किंवा दोन मुद्द्यांवर वगळतात. संपत्ती, शस्त्रे किंवा शिक्षण. काहीतरी एक किंवा दोन घटक त्यांच्या हाती लागू देत नाहीत. पण दलितांना वगळण्याचा जुलूम जरा जास्तच अतिरेकी होता कारण त्यांना तीनही साधनांपासून वगळण्यात आले होते. आंबेडकरांना केवळ शिक्षणाचे मोल होते असे नव्हे- त्यांनी महार रेजिमेन्टच्या स्थापनेला चालना दिली, संपत्ती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत दलितांना अवकाश मिळवून दिला, ही सारी सत्तेची साधने म्हणूनच ते पाहात होते.

शासकीय सत्तेविना या गोष्टी हातात ठेवणे अशक्य होते. दलितांना सत्तेमध्ये संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळवून देण्यासाठी त्यांनी जन्मभर प्रयत्न केले, कारण त्यांना ही जाण होती. सद्गुणांना महत्त्व देण्याच्या कल्पनेला विचारमंथनातून स्पष्ट करण्याची गरज त्यांनी प्रथम प्रतिपादन केली- कारण त्यातही जन्मदत्त अधिकारांचा प्रश्न होता. असल्या प्रकारची नैतिक विधाने करण्याची आपली पध्दत कायम आहे यावरूनच हे कळते की त्यांच्या आदर्शांपासून आपण किती दूर आहोत. दलितांना सकारात्मक पण उग्र, कणखर अशा सातत्यपूर्ण चळवळीची गरज आहे यात काही प्रश्नच नाही. न्यायाची ही अगदी प्राथमिक पायरी आहे. पण आरक्षणाची चौकट ठरवतानाही काही गोष्टी राहून गेल्या आहेत हा उपहास आहे. आंबेडकरांना दलितांवरील अत्याचाराचे एकमेवत्व नजरेस आणून द्यायचे होते, हा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या धोरणावर टीकाही झाली, कारण या एकमेवत्वाच्या आग्रहामुळे आंबेडकर कुणाही इतर गटांशी तडजोडी किंवा करार करीत नव्हते. भेदभावाचा जो विखारी अनुभव त्यांना आला होता तोच या आग्रहाच्या मुळाशी होता. याच कारणासाठी त्यांना दलितांसाठी वेगळी अल्पसंख्यांक ओळख हवी होती. ज्या पध्दतीने आरक्षणाची हाताळणी झाली त्यात या दोन्ही कल्पना बऱ्याच अंशी धुपून गेल्या. दलितांसाठी असलेले आरक्षण ओबीसींनाही मिळावे म्हणून जो नक्शा बदलण्यात आला त्यामुळे दोन गोष्टी एकत्रपणे घडल्या. जाती लढ्यात दलित इतिहासाचे एकमेव स्थान विरळ झाले. याच इतिहासावर इतर अनेकांनी हात मारला… ओबीसीमधील काही जाती ज्या दलितांवर अत्याचार करण्यात सहभागी होत्या त्यांनीही तो इतिहास आमचाही आहे असे दामटले.  सत्तासहभागाचे रूपक आणखी थोडे ताणल्यावर भेदभावाने ग्रस्त झालेल्यांवरील अन्याय जणू नजरेआडच झाले. आंबेडकरांना आशा होती की नव्या सत्तासंघर्षात नवीन नीतीमान संबंध परस्परांमध्ये प्रस्थापित होतील आणि प्रतिगामी शक्तींचा प्रतिकार होईल.  आंबेडकर या विचारातूनही आपल्याला अस्वस्थ करून जातात, कारण ते कोणत्याही भ्रामक राजकारणाला आव्हान देतात- परंपरांची भ्रामकता, सत्तेबद्दलचे भ्रम, हिंदुत्वाचे भ्रम, लोकशाहीबद्दलचे भ्रम, आध्यात्मिक गुणगुणीचे भ्रम… साऱ्यांनाच ते आव्हान देतात. पण आंबेडकरांच्या विचारप्रक्रियेच्या केंद्रभागी अतिशय गंभीर असे कारुण्यही आहे- मानवी नीतीभ्रष्टतेची अनेक रूपे पाहूनही, अत्याचारांचा अनुभव घेऊनही त्यांना स्वतःची आशा तेवती ठेवणे कसे शक्य झाले? हे त्यांचे चिरंतन श्रेय राहील… की त्यांनी कधीही कुणाच्या कुबड्या घेतल्या नाहीत. इतिहासाचा द्वंद्ववाद, आध्यात्मिकतेचे लटके समाधान, धर्माशी जुळवून घेण्याने साध्य झाली असते असे सामावणे. खोट्या विज्ञानवादाची खोटी आश्वासने सारे नाकारून त्यांनी शतकांच्या अवहेलनेवर आशेने मात केली.

एका बाबतीत त्यांचे गांधीशी फार जवळचे साम्य होते : आपली सदसद्विवेकबुध्दीचा ताठ कणा सोडता सामाजिक चळवळीसाठी कोणताही पाया नसतो हे दोघांच्याही बाबतीत खरे होते. ‘रानडे, गांधी अँड जीना’ या त्यांच्या आणखी एका प्रभावी निबंधात ते म्हणतात :

अनुभवाने सिध्द झाले आहे, हक्कांचे संरक्षण कायद्याने नव्हे समाजाच्या सामाजिक, नैतिक सदसद्विवेकामुळेच होते. समाजाची सदसद्विवेकबुध्दी जर कायद्याने मान्य केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करत असेल तरच ते संरक्षित रहातात, सुरक्षित रहातात. पण कुणाच्याही मूलभूत हक्कांना समाजाचा, जमातीचा विरोध असेल तर तर कोणताही कायदा, कोणतीही संसद, कोणतीही न्यायपालिका त्यांच्या अंमलबजावणीची खात्री देऊ शकत नाही. अमेरिकेतील निग्रोंना, जर्मनीतील ज्यूंना, भारतातील दलितांना मूलभूत हक्कांचा काय उपयोग होतो?  बर्क म्हणतो तसे- झुंडीला शासन करण्याची कोणतीही पध्दत अस्तित्वात नाही. कायदा एखाद-दुसऱ्या नाठाळ गुन्हेगाराला शासन करू शकतो. कायद्याचे उल्लंघन करायचेच असे ठरवून बसलेल्या झुंडीच्या विरोधात कायदा काहीही करू शकत नाही. कोलरिजची भाषा वापरायची तर सामाजिक सदसद्विवेक- हाच कधीही भ्रष्ट न होणारा नियामक आहे… तो नसेल तर सारी सत्ता, साऱ्या शक्ती केवळ एकमेकांविरुध्द उभ्या ठाकतील… मूलभूत असोत वा कोणतेही- सारे हक्क केवळ याच एका नियामकाच्या स्वाधीन आहेत.’

हा विचार फार आश्वासक असू शकतो किंवा मग फार चिंताजनक असू शकतो… आपल्या दृष्टीकोनावर ते अवलंबून आहे. अंतिमतः केवळ आपली सदसद्विवेकबुध्दीच आपल्याला मदत करू शकते, इतर कुणीही नाही- या जाणीवेने अगदी असाहाय्यही वाटू शकते… विशेषतः, आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे सदसद्विवेकबुध्दीवर अनेक खोट्या श्रध्दांचे पडदे पडू शकतात तेव्हा तर नक्कीच. आंबेडकर एका मर्यादेनंतर राजकीय कृतीचा सिध्दांत मांडत नाहीत… कदाचित् यामुळेच ते सध्याच्या ठरीव मापदंडांनुसार तेवढेसे परिणामकारक ठरले नाहीत. पण त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकाची शक्ती पुरेशी होती, जिच्या बळावर ते एका अख्ख्या नीतीभ्रष्ट संस्कृतीच्या विरुध्द ताठ उभे राहिले.

एकदा ते म्हणाले होते, “मी एखाद्या खडकासारखा आहे- जो वितळत नाही कधीच, उलट नदीचा प्रवाह वळवतो.” त्यांनी एका संस्कृतीचा ओघ नक्कीच न्यायाच्या दिशेने थोडातरी वळवलाच. पण त्यातून निर्माण झालेले संघर्ष, टणत्कारांचे प्रतिध्वनी अजूनही पूर्णपणे उठलेलेशमलेले नाहीत. भारतीय समाजातील आझादीच्या मागण्या आणि हिंसक प्रतिकारातून ते आता उलगडत चालले आहेत.

आंबेडकर हे काही सर्वांचे विचारवंत नाहीतच, कारण आपण सर्वांनी आपली वैचारिक पात्रता त्यांना साजेशी सिध्द केलेली नाही. ते सर्वांचे विचारवंत आहेत ते केवळ एकाच अर्थाने- ते अजूनही आपणा सर्वांना सावधगिरीचा इशारा देत उभे आहेत.

(प्रताप भानू मेहता सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च, नवी दिल्ली, या संस्थेचे अध्यक्ष आहेत. नामवंत स्तंभलेखक आणि सार्वजनिक चर्चांमध्ये भाग घेणारे विचारवंत आहेत.)

Previous article‘वर्क फ्रॉम होम’ नव्हे, ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी !
Next article‘ग्रेटेस्ट’ इंडियन!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.