महात्मा फुलेंच्या विचारप्रसारासाठी झोकून देणारा माणूस

महाराष्ट्रात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून होते. ‘शाहू,
फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात..’ हे येथील राजकीय व सामाजिक नेत्यांचं तोंडपाठ असलेलं आवडतं वाक्य आहे. मात्र या महापुरुषांबद्दलचा आदर हा केवळ एवढय़ापुरताच मर्यादित आहे. बहुजन समाजातील काही संस्था-संघटनांचा अपवाद वगळता इतरांकडून या तिघांचेही विचार आणि कार्याच्या प्रसाराबाबत जाणीवपूर्वक अनास्था बाळगली जात असल्याचा अनुभव नेहमीचा आहे. शासकीय स्तरावरही काही वेगळं घडत नाही. लक्ष्मण तानका देवरे या जळगावच्या सेवानिवृत्त विक्रीकर अधिकार्‍याने या विषयातील विदारक वास्तव समोर आणलं आहे. बहुजन, शेतकरी, शोषित व स्त्रियांना आपल्या उद्धाराचा मार्ग दाखविणार्‍या महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार हेच जीवनध्येय मानून त्यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत जावेत यासाठी देवरे कित्येक वर्षापासून काम करत आहेत. महात्मा फुलेंचे ‘गुलामगिरी’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’, ‘शेतकर्‍यांचा आसूड’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘जातिभेदविवेकसार’ आदी पुस्तकं स्वत:च्या खर्चाने विकत घेऊन, देणगीदार मिळवून लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम अव्याहतपणे ते करत आहेत. महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयाच्या जवळपास दीड लाख रुपये किमतीच्या प्रती आतापर्यंत त्यांनी वाटल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये फुले दाम्पत्याच्या प्रतिमा लागाव्यात यासाठी सहा वर्षापासून ते झपाटल्यासारखे प्रयत्न करत आहेत. त्यांचे या विषयातील अनुभव व्यथित करणारे तर आहेच, सोबत महाराष्ट्राचा ‘खरा’ चेहरा दाखविणारेही आहेत.

2006मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण देवरे यांनी महाराष्ट्रातील सर्व 35 जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना माहितीच्या अधिकारांतर्गत तुमच्या अधिनस्थ किती शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या महाराष्ट्र सरकारने अधिकृत केलेल्या प्रतिमा लागल्या आहेत याची विचारणा केली. गमतीची गोष्ट म्हणजे एकाही अधिकार्‍याने त्यांना उत्तर देण्याची तसदी घेतली नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या देवरेंनी प्रत्येक जिल्ह्याला भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित केला. आतापर्यंत 22 जिल्हा मुख्यालयी ते जाऊन आले आहेत. तेथे गेल्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, बीडीओ आदी प्रमुख अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन फुले दाम्पत्याच्या प्रतिमा तुमच्या कार्यालयांमध्ये लागल्यात काय? याची चौकशी ते करतात. बहुतेक ठिकाणी ‘तुम्ही चौकशी करणारे कोण? तुम्हांला हे विचारण्याचा काय अधिकार?’ असा भाव आढळल्याने ते सोबत महाराष्ट्र सरकारचे अधिकृत परिपत्रक घेऊन जातात. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत चार वेळा महात्मा फुलेंच्या प्रतिमा सरकारी कार्यालयात लावणे आवश्यक असल्याचे आदेश काढले आहेत. पहिले परिपत्रक 4 जुलै 1969ला निघाले. त्यानंतर 26 फेब्रुवारी 1988, 6 ऑक्टोबर 1993 आणि शेवटचे परिपत्रक 18 ऑगस्ट 2000मध्ये निघाले. चार वेळा असे आदेश निघूनही 99 टक्के सरकारी कार्यालयांत महात्मा

फुलेंच्या प्रतिमा लागल्या नाहीत. प्रतिमा का लागल्या नाहीत, या प्रश्नाला मिळणारं उत्तर मोठं नमुनेदार असतं. ‘आम्ही प्रतिमा लावली होती. मात्र फुटल्याने ती दुरुस्तीला दिली आहे,’ असं सांगितलं जातं. काही ठिकाणी ‘तुम्ही खालच्या अधिकार्‍याला भेटा,’ अशी वेगवेगळी कारणं दाखवून बोळवण केली जाते. देवरे चिकाटी सोडत नाही. फुलेंची प्रतिमा कोणत्या दुकानात दुरुस्तीला टाकली आहे याचा पत्ता ते विचारतात. ‘मी ती प्रतिमा माझ्या खर्चाने दुरुस्त करून आणतो,’ असेही सांगतात. यामुळे अधिकार्‍यांची मोठी गोची होते. शेवटी ‘फोटो लावलाच नाही किंवा एकदा फुटला तो दुरुस्त केला नाही. आता नक्की लावू,’ असे उत्तर ते देतात. अनेक कार्यालयांत फुले-आंबेडकरांचे फोटो अडगळीत टाकून दिल्याचे देवरेंना पाहावयास मिळाले. देवरेंनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्यात त्यापैकी पुण्याचे विभागीय आयुक्त कार्यालय आणि सोलापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय या दोनच ठिकाणी त्यांना शासनाद्वारे अधिकृत महात्मा फुलेंची प्रतिमा सन्मानपूर्वक लावलेली पाहावयास मिळाली. बाकी ठिकाणी टोलवाटोलवीच त्यांच्या वाटय़ाला आली. शासकीय अधिकार्‍यांच्या बेपर्वाईचे असे अनेक अनुभव गाठीशी असल्याने देवरेंनी आता नवीन मार्ग शोधला आहे. आता ते प्रत्येक कार्यालयाचा अहवाल तयार करतात. ‘आपण माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अमुक कार्यालयाला आज दिनांक रोजी भेट दिली असून तिथे शासनाच्या आदेशानुसार महात्मा

फुले, सावित्रीबाई फुलेंची अधिकृत प्रतिमा अजूनही लागली नाही. अमुक अधिकार्‍याला विचारणा केली असता त्यांनी असे-असे उत्तर दिले,’ असे ते आपल्या अहवालात लिहितात. संबंधित अधिकार्‍याला सांगून ते हा अहवाल राज्य सरकारचे प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाला पाठवितात. देवरे यांची ही मात्रा अनेक ठिकाणी लागू पडते. ‘प्लीज! असा अहवाल पाठवू नका. आम्ही लवकरच प्रतिमा लावू,’ असे आश्वासन अधिकारी त्यांना देतात. देवरेंना या फसव्या आश्वासनांचीही सवय झाली आहे. त्यामुळे ते म्हणतात, ‘लवकरच नाही. आत्ताच माझ्यासोबत तुमच्या कार्यालयाचा माणूस द्या. मी प्रतिमा विकत घेऊन येतो.’ त्यांच्या या चिवटपणामुळे बर्‍याच शासकीय कार्यालयांत आता महात्मा फुलेंच्या प्रतिमा दिसायला लागल्या आहेत. शिक्षण आणि कृषी विभागाने यासाठी बर्‍यापैकी पुढाकार घेतला आहे.

शासकीय कार्यालयासोबत शाळा-महाविद्यालयांमध्येही महात्मा फुलेंच्या प्रतिमा लागल्या पाहिजेत यासाठी देवरेंची धडपड सुरू असते. सध्या प्रत्येक महिन्यात स्वत:च्या खर्चाने ते वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शंभर सरकारी कार्यालये आणि तेवढय़ाच शाळा-महाविद्यालयांना भेटी देतात. आपली भूमिका अतिशय नम्रपणे मांडून शासनाचे आदेश अधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापकांसमोर ठेवतात. त्यांच्या गाठीला आता अनेक चांगलेवाईट अनुभव आहेत. ज्या पुणे शहरामध्ये बहुजन समाजाला, स्त्रियांना शिक्षण घेता यावे यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाईंनी दगडधोंडे आणि शेणाचा प्रसाद खाल्ला त्या शहराची प्रतिगामी वृत्ती अजूनही कायम असल्याचे त्यांना दिसून आले. पुणे विद्यापीठासह तेथील 85 टक्के शाळांमध्ये दोघांच्याही प्रतिमा नसल्याचे त्यांना आढळले. विचारणा केल्यास ‘असा काही नियम आहे का?’ अशी उद्धट विचारणाही त्यांना काही ठिकाणी झाली. फग्र्युसन कॉलेजमध्ये मात्र अतिशय सन्मानाने मोठय़ा आकारातील प्रतिमा लावली असल्याचे त्यांना दिसून आले. धुळ्याच्या कमलाबाई स्कूलमध्येही असाच अनुभव आला. बाकी बहुतांश ठिकाणी त्यांना ‘आतापर्यंत लावायची राहून गेली. आता नक्की लावू, अशी उत्तरे मिळाली. या अनुभवांमुळे समृद्ध झालेले लक्ष्मण देवरे आपला निर्धार सोडायला तयार नाहीत. आता उरलेलं आयुष्य याच कामासाठी झोकून देणार असल्याचं ते सांगतात. त्यांना त्यांच्या या प्रेरणादायी कामासाठी आपण शुभेच्छा देऊ या. त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर : लक्ष्मण तानका देवरे, 29, प्रज्ञा कॉलनी, निमखेडा रोड, जैन पाईप कम्पाउंड, मु.पो.ता.जि.जळगाव (मोबाईल : 9423187535)

(लेखक दै. ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : 8888744796

Previous articleअमरावती रिपाईपासून मिळविणे सोपे; जिंकणे कठीण!
Next articleपंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.