माझ्या आध्यात्मिक अनुभूती

– किशोर देशपांडे

आध्यात्मिक अनुभूती हा केवळ मेंदूतील रसायनांचाच खेळ असतो की खरंच तशी अनुभूती येते, असे प्रश्न उपस्थित करून संपादकांनी मला माझ्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे लेख लिहिण्याचे सुचविले. आध्यात्मिक क्षेत्रातला मी कोणी अधिकारी पुरुष आहे, असा ‘मीडिया वॉच’च्या संपादकांचा अथवा माझा स्वतःचाही गैरसमज नाही. त्यामुळे कोणत्याही अपेक्षांचे ओझे न बाळगता, मोकळ्या मनाने आठवेल तसे लिहायला मी मोकळा आहे.

माझ्या लहानपणी आमच्या घरात बरेचसे जुने धार्मिक रीतीरिवाज आणि काहीसे सुधारक गांधी-नेहरूवादी विचार, असं गमतीदार मिश्रण होतं. देवघरातील देवांच्या गर्दीबरोबरच, आमच्या घरी वर्षातून सहा कुळाचार देखील होत असत. पण, बालपणापासून मी कधीही मनोभावे देवांपुढे हात जोडले नाहीत. नैवेद्याकडे लक्ष ठेवून आणि मोठ्यांना दुखवायचे नाही म्हणून आपला कसाबसा कोरडा नमस्कार करायचो. किंबहुना, देवळांमध्येही मी कधीच स्वेच्छेने गेलो नाही. लहानपणी कीर्तन ऐकायला किंवा रामनवमी, जन्माष्टमी, महाशिवरात्र, एकादशी, श्रावण सोमवार वगैरे निमित्तांनी आईसोबत जावे लागायचे. शाळेत असताना नववी ते अकरावी दरम्यान शेजारचा एक देवभक्त मित्र मला आग्रहाने सोमवारी शंकराच्या, मंगळवारी आणि शुक्रवारी देवीच्या, गुरुवारी दत्ताच्या, तर शनिवारी मारुतीच्या देवळात घेऊन जात असे. त्यातही एकाच देवळात जाऊन त्या मित्राचे समाधान होत नसे; तर पायी चालता यावे इतक्या परिघात त्या प्रत्येक दिवशीच्या विशिष्ट दैवताची जितकी म्हणून देवालये असतील, त्या सर्व ठिकाणी जाऊन लोटांगण घातल्याखेरीज तो स्वस्थ बसत नसे. माझा तो मित्र अभ्यासात अतिशय हुशार, माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे आणि सालस होता. त्याला दुखवू नकोस असे स्वतःलाच बजावत, मीदेखील एक औपचारिक नमस्कार त्या त्या देवाला करून टाकायचो.

शाळेत असतानाच एका ट्रीपसोबत मी गुजरातमध्ये फिरून आलो. त्या ट्रीपचे दोन अनुभव सांगावेसे वाटतात. आम्ही वेगवेगळ्या वयोगटांचे एकूण शे-दीडशे लोक तेव्हा सोबत होतो; आणि मी तर जेमतेम १२ -१३  वर्षांचा असेन. गिरनार पर्वत चढत असताना कसा कोण जाणे, पण मी इतरांपासून वेगळा झालो आणि चांगला तास दोन तास एकटाच त्या पर्वतावर भटकत राहिलो. माझा स्वभाव साहसी नाही आणि मी भित्रादेखील आहे. पण, त्या दीड-दोन तासांच्या कालावधीत मला किंचितही भय वाटले नाही; उलट एखादी पूर्वपरिचित जागा आपण पुष्कळ वर्षांनी जशी उत्सुकता ठेवून काहीशा आनंदाने न्याहाळतो, तसे माझे झाले होते. गिरनार पर्वतावर सिंहांची वस्ती असल्याचे मला माहीत होते आणि तशी सूचना देखील मोठ्यांनी देऊन ठेवली होती. सोबतच्या मंडळींशी नंतर योगायोगाने पुन्हा भेट झाली आणि मी परत ‘नॉर्मल’ झालो. दुसरा अनुभव द्वारकेच्या श्रीकृष्ण मंदिरात आला. तिथेही मी काही खुशीने गेलो नव्हतो; तर केवळ नेण्यात आलं, म्हणून सर्वांसोबत गेलो इतकंच. परंतु मंदिरात असताना थोड्याच वेळात मला हृदयावर काहीसा दाब जाणवू लागला आणि तिथून शरीरात आनंद पसरत असल्याचे जाणवले. वास्तविक द्वारकेला जाण्यापूर्वी आम्ही सोमनाथच्या मंदिरातही जाऊन आलो होतो, पण तिथे मला काहीच जाणवले नव्हते.

 

गिरनार आणि द्वारका इथले ते दोन्ही अनुभव मी लवकरच विसरूनही गेलो आणि ‘नॉर्मल’ जगत राहिलो. आमच्या घरी त्याकाळी ‘कल्याण’ मासिकाचे विशेषांक येत. विविध पुराणांवर ते बेतलेले असायचे. मला त्या पुराणकथा अगदीच अवैज्ञानिक आणि हास्यास्पद वाटायच्या आणि तरीही मी त्या वाचून काढायचो. मूळ महाभारताचा मराठी अनुवाद असलेले बरेच खंडदेखील आमच्या घरी होते. एखाद्या कादंबरीसारखे मी ते सर्व खंड दहावी-अकरावीत असताना आवडीने वाचून काढले. परंतु त्यामुळे माझे रंजन होऊन, काही प्रमाणात बुद्धीला खाद्य मिळाले इतकेच. शालेय जीवनात माझ्यावर गांधी, नेहरू, विनोबा, साने गुरुजी यांची मोठी छाप होती. कॉलेजमध्ये असताना दादा धर्माधिकारी, लोहिया, लास्की, रसेल, एरिक फ्रॉम वगैरे विचारवंतांची पुस्तकं मी आवडीने वाचली. एरिक फ्रॉम तर मला खूपच भावायचा. कार्ल मार्क्स, चार्ल्स डार्विन आणि सिग्मंड फ्रॉईड या सर्वांचे सत्त्व घेऊन फ्रॉम त्याची एक वेगळी मांडणी करत असे. त्याच्या मांडणीला काहीसे आध्यात्मिक सुद्धा म्हणता येईल. कारण, मानवी जाणिवेने जर अधिक उंच टप्पा गाठला नाही, तर नुसती राज्य वा अर्थव्यवस्था बदलून काहीच उपयोग होणार नाही; असे फ्रॉम सोव्हिएत रशिया व दुसऱ्या महायुद्धाचे दाखले देऊन लिहीत असे. त्याच्या मते दुसऱ्या व्यक्तीवर निरपेक्ष प्रेम करता येणे, हेच जाणीव उन्नत होण्याचे खरे लक्षण होय. माझ्या बुद्धीला आणि हृदयाला जरी फ्रॉम वाचून समाधान मिळत असले, तरी सभ्यतेच्या थराखाली दडी मारून बसलेले आपल्यातले ‘पशुत्व’ हे केवळ वैचारिक परिवर्तनामुळे नष्ट होत नाही, असेही माझ्या लक्षात येत होतेच. एकदा पुण्याला गेलो असताना मी मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांना असे विचारले की, “कार्यकर्त्यांच्या जाणिवांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणता लेखक सुचवाल?” तेव्हा त्यांनीसुद्धा फ्रॉमचेच नाव घेतले.

वयाच्या २० -२१ व्या वर्षी प्रथमच मला एका शिबिरासाठी पंढरपूरला जावे लागले. तिथेही सोबतचे सगळे लोक गेले, म्हणून मीदेखील त्यांच्यासह विठ्ठल मंदिरात गेलो. त्यावेळी तिथे मुळीच गर्दी नव्हती आणि आम्हा सर्वांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आले. त्यावेळी तिथल्या पुजाऱ्याने माझे डोके दाबून विठ्ठलाच्या चरणावर धरले आणि एकाएकी विठ्ठलाचे ते दगडी चरण हे एखाद्या मऊ स्पंजासारखे दबून, त्यासोबत माझे कपाळही खाली दबत असल्याचे मला स्पष्टपणे जाणवले. मंदिरातून बाहेर पडल्यावरही माझ्या कपाळात पूर्वी कधीच न अनुभवलेली एक चुणचुण सुरू झाली, जी त्यानंतर तब्बल दोन महिने कायम राहिली. ती चुणचुण म्हणजे केवळ मला होत असलेला भास आहे, असे स्वतःला बजावत मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असे; पण तरीही तिचे एक ठोसपण कायम असायचे. शेवटी दोनेक महिन्यांनी ती हळूहळू विरून गेली.

१९७० -८० च्या दशकात इतर अनेक तरुणांप्रमाणे मीही सामाजिक, आर्थिक व राजकीय क्रांतीच्या प्रेरणेने भारावून गेलो होतो. मग ऐन विशीतली दहा वर्षे मी त्या क्षेत्रात घालवली. जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयोगानंतर डाव्या पक्षांची आणि संसदबाह्य मार्गांनी परिवर्तन घडवू पाहणाऱ्या संघटनांची शकले झाली व माझा बराच भ्रमनिरास झाला. मग मात्र क्रांतीपेक्षा उत्क्रांतीच्या थिअरीवर माझा जास्त विश्वास बसू लागला. समाज एका दीर्घकालीन प्रक्रियेत पण सावकाश बदलतो, असं जाणवू लागलं. शिवाय समाजाला जर समजून घ्यायचं असेल, तर त्याच्या बाहेर राहून नव्हे, तर त्याचा एक सामान्य घटक बनून जगावं, असं ठरवून मी वयाच्या तब्बल एकतिसाव्या वर्षी कायद्याचे शिक्षण घेणे सुरू केले.

१९८२  सालची गोष्ट. केव्हातरी दुपारच्या वेळी मी काहीतरी वाचत बसलो असताना, अचानक मला एक खूप आतून अशी प्रबळ प्रेरणा झाली की ‘ज्ञानेश्वरी’ वाचावी. मग तडक उठून मी माझ्या एका मित्राकडे गेलो आणि त्याला ज्ञानेश्वरी वाचायला मागितली. वास्तविक माझ्या त्या मित्राकडे तो ग्रंथ आहे की नाही, याचीदेखील मला कल्पना नव्हती. कदाचित माझं ते काहीसं झपाटलेपण असावं; पण त्या मित्राने लगेच साखरे महाराजांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी काही न विचारता माझ्या हाती ठेवली. ज्ञानदेवांची तत्कालीन मराठी समजणं मला सुरुवातीस जरा अवघड गेलं, पण तिसऱ्या अध्यायानंतर मात्र बऱ्यापैकी समजू लागलं. सहावा अध्याय वाचत असताना एकाएकी माझ्या गुदद्वाराच्या जवळून आणि पाठीच्या कण्याला धरून काहीतरी वेगाने वर सरकत असल्याचे जाणवले. ते जे काही होते, त्यात एक शक्ती आणि वेग होता. वर-वर सरकत त्या शक्तीने माझ्या मस्तकाला आतून धडका देऊन आणखी वर जाण्याचा प्रयत्न चालवला होता आणि मी एका आनंदकल्लोळात न्हाऊन निघत होतो. भीतीचा तर त्यात लवलेशही नव्हता. माझी ही स्थिती अर्धाएक तास राहिली आणि मग ती शक्ती विरून गेली. त्यानंतर देखील काही दिवस मी तो सहावा अध्याय वाचायला घेतला की, पुन्हा लगेच ती शक्ती खालून उफाळून वर मस्तकापर्यंत चढायची आणि वर धडका देत राहायची. अखेर मी ज्ञानेश्वरी वाचणे बंद केले आणि तो ग्रंथ मित्राला परत केला. पण, नंतर एक वेगळाच अनुभव आपोआप सुरू झाला. माझ्या देहाच्या कातडीवर एक अतिशय गोड असा सायीसारखा थर पसरला असल्याचे मला सतत जाणवू लागले आणि मी त्या गोडव्यातच रमू लागलो.

याच दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालवणारा माझा एक जुना जिव्हाळ्याचा मित्र त्याच्या काही कामानिमित्त अमरावतीस आला होता. तेव्हा मी त्याची आवर्जून भेट घेतली. माझ्या या मित्राने संमोहन शास्त्राचाही सखोल अभ्यास केला असून, समोरच्या व्यक्तीला संमोहित करून त्याचे भ्रम नि भास दूर करणे त्याला जमते, असेही मी ऐकले होते. त्यामुळे माझ्या त्या मित्रास मी या अनुभूतींविषयी माहिती दिली आणि हा माझा भ्रम आहे का व असल्यास तो संमोहनाद्वारे दूर करता येईल का, अशी मी त्याला विचारणा केली. त्यावर त्या मित्राने दिलेले उत्तर मला फारच अनपेक्षित होते. संमोहित करणारा व्यक्ती हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अशी जर संमोहित होणाऱ्याची पूर्वधारणा असेल, तरच ती संमोहन प्रक्रिया यशस्वी ठरते; अन्यथा समोरच्या व्यक्तीला संमोहित करणे शक्य होत नाही. तू मला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीस हे मला माहीत आहे; त्यामुळे मी तुला संमोहित करू शकणार नाही, असे त्या मित्राचे म्हणणे होते. अर्थात त्याचे हे विधान पडताळून पाहण्याचा मीदेखील प्रयत्न केला नाही. अध्यात्मशास्त्रात ज्याला कुंडलिनी जागरण असे म्हणतात, त्याप्रकारचा माझा अनुभव असावा. मी एकाग्र होऊन ज्ञानेश्वरी वाचणं बंद केल्यावर, यथावकाश त्या शक्तीचे वर उड्या मारणेही बंद झाले आणि माझ्या देहावर सायीसारखा पसरलेला गोडवाही विरत गेला.

सामाजिक क्षेत्र सोडून व्यक्तिगत/पारिवारिक क्षेत्राकडे वळण्याचे कामी ज्या एका व्यक्तीची मला अत्यंत मोलाची साथ लाभली, त्या व्यक्तीचा इथे थोडक्यात परिचय करून देणे आवश्यक आहे. एकदा माझा घनिष्ठ मित्र डॉ. सुरेश खैरनार हा 1974-75 मध्ये केव्हातरी मी वर्ध्याला असताना माझ्याकडे आला आणि म्हणाला की, “तुला जर एका जगावेगळ्या व्यक्तीशी परिचय करून घ्यायचा असेल, तर माझ्यासोबत चिमूरला चल.” मग आम्ही दोघे चिमूरला गेलो आणि मोहन थुटे यांना भेटलो. ते माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे आहेत. ईश्वरप्राप्तीसाठी मेडिकल कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडणारा बहाद्दर, अशी त्यांची ओळख सुरेशने मला आधीच सांगितली होती. तिथल्या 2-3 दिवसांच्या सहवासात मला मोहन यांचं व्यक्तिमत्त्व आवडलं. शांत स्वभाव, अनाग्रही भूमिका, दुसऱ्याचं म्हणणं खुल्या मनाने व जिव्हाळ्याने ऐकून घेणं, नेमके प्रश्न विचारून तुमच्या मांडणीतले अंतर्विरोध हे तुमचे तुम्हालाच स्पष्ट होऊ देणं, असे त्यांचे गुणविशेष जाणवले. पण तिथून परतल्यावर मी स्वतःहून मोहन थुटे यांना पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला नाही; मात्र पुढे जाऊन मोहन हे स्वतःच मला येऊन भेटले आणि आमचा स्नेह दृढ होत गेला. एखाद्या निष्णात मनोविश्लेषकाप्रमाणे माझ्या मनातील अनेक गाठी उकलण्यात नि गुंते सोडवण्यात मोहन यांनी मला खूप मदत केली. त्यांची जाणीव जणू आपल्या अंतरंगात शिरते आणि आपल्या नेणिवेत असलेल्या गाठी नि गुंते समजून घेते; मगच आपल्याला त्यांची उकल करणे शक्य होते, असा अनुभव तेव्हाही यायचा व अजूनही येतो. मोहन यांची स्वतःची अशी जी काही आध्यात्मिक साधना असेल, ती ते बहुतेक एकांतात करत असावेत; कारण आमच्या बोलण्यात ‘अध्यात्म’ हा विषय फार कमी आणि व्यक्तिगत, कौटुंबीक, सामाजिक, राजकीय इत्यादी विषयच जास्त असायचे. त्याकाळी मला असे वाटायचे की, इतका चांगला माणूस कशाला त्या भ्रामक ध्यान-धारणेमागे लागून वेळ वाया घालवतोय. त्यांनी मात्र कधीही मला ध्यान करत जा वगैरे उपदेश केले नव्हते.

पण, जेव्हा मलाच कुंडलिनी जागरणाचा स्वतंत्र अनुभव आला, तेव्हा मात्र त्या अनुभवाच्या निमित्ताने आमच्या अध्यात्मावर चर्चा झडू लागल्या. मोहन थुटे हे श्रीअरविंद- योगाची साधना करत होते. एकदा त्यांनी मला त्यांच्यासोबत Pondicherry ला येण्यास सुचविले. त्यानुसार मी, मोहन व आमचे अजून एक जवळचे मित्र विजय कुबडे मिळून Pondicherry ला गेलो. मला चहा-तंबाखूचे व्यसन आहे. शिवाय त्यावेळी बद्धकोष्ठ आणि दातांच्या दुखण्यामुळे मी काहीसा अस्वस्थही असायचो. दातांचे दुखणे हे फक्त अतिगरम वा अतिथंड पदार्थांचे सेवन करतानाच जाणवायचे. पण, Pondicherry शहराच्या हद्दीत आमची बस शिरली आणि लगेच मला डोक्यावर एक दाब येत असल्याचा प्रत्यय आला; तो अगदी श्रीअरविंद आश्रमाच्या गेस्ट-हाऊसमध्ये पोहोचेपर्यंत कायम राहिला. आदल्या दिवशी अमरावतीहून निघाल्यापासून मला शौचाला झाली नव्हती. गेस्ट-हाऊसमधल्या खोलीत सामान ठेवताच मला शौचाची भावना झाली आणि मी गेल्या अनेक वर्षांत अनुभवली नसेल, इतकी ती मला व्यवस्थित झाली. किंबहुना Pondicherry च्या वास्तव्यात तोच अनुभव मला रोज येत गेला. अमरावतीला परतल्यावर मात्र पुन्हा पूर्वीसारखा त्रास सुरू झाला. शिवाय, तेथील वास्तव्यात दातांचे दुखणे देखील थांबले – अगदी कोणत्याही औषधाशिवाय. अलीकडेच 2-3 वर्षांपूर्वी ते पुन्हा उमळले.

अशा त्या Pondicherry तील श्रीअरविंद आश्रमात ध्यानाचा कोणताही विधी नसतो. समाधीच्या अवतीभोवती लोक नुसते शांतपणे बसतात – कोणी डोळे मिटून, तर कोणी उघडे ठेवून. दरवेळी तिथल्या वास्तव्यात मी समाधीजवळ बसलो की, माझ्या डोक्यापासून ते छातीपर्यंत एक वेगळीच चेतना बाहेरून संथपणे आत शिरते आहे, अशी जाणीव व्हायची. ती चेतना म्हणजे नक्की काय आहे, कोणाची आहे, माझ्या देहात ती काय करते आहे, यांपैकी मात्र काहीच मला समजत नसे. पण, तिथे मला बसून राहावसं वाटत असे. गुदद्वारापासून निघून डोक्यापर्यंत धडका मारणारी शक्ती मी यापूर्वी अनुभवली होती; पण अशी बाहेरून डोक्यामार्फत संथपणे माझ्यात शिरणारी शक्ती मी प्रथमच अनुभवत होतो.

त्यानंतर मी सातत्याने श्रीअरविंदांचे साहित्य वाचून त्यांच्या योगाचा उद्देश व कार्यपद्धती समजून घेण्याचा प्रयास करीत राहिलो. अर्थात मोहन थुटे यांच्यासोबत होणार्‍या चर्चांमधून अधिक स्पष्टता येत गेली आणि ही योगसाधना करण्याकडे माझा व माझ्या कुटुंबाचाही कल वाढत गेला. म्हणूनच आम्ही Pondicherry ला अधून-मधून जात राहतो आणि तिथली चेतना आमच्या आतमध्ये भरून घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी घरी परतल्यावर सुद्धा आम्ही त्या चेतनेच्या संपर्कात राहण्याचा जमेल तसा प्रयत्न करतो. पारंपरिक अध्यात्मात मोक्ष अथवा निर्वाण प्राप्तीला बरेच महत्त्व दिल्या गेले आहे. जग आहे तसेच राहणार, प्रकृती काही केल्या बदलत नाही, त्यामुळे संसार असार असून जिवाने जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळविणेच श्रेयस्कर होय, अशी रूढ धारणा आहे. या उलट श्रीअरविंद असे म्हणतात की, प्रकृती ही सतत उत्क्रांत होत असून, मानवी जाणीवदेखील हळूहळू उन्नत होत आहे. प्रकृतीच्या अशा उत्क्रांतीला मानवी प्रयत्नांची जोड मिळाल्यास, उत्क्रांतीचा वेग हा निश्चितच वाढू शकतो.

माझ्या वैयक्तिक अनुभवातून व मोहन थुटे आणि इतर काही मित्रांकडून ऐकलेल्या अनुभवांतून मी इतकेच सांगू शकतो की, आपल्या भौतिक देहाबाहेर सुद्धा वेगवेगळ्या स्तरांवरील निरनिराळ्या प्रकारच्या गुह्य चेतनांचे अस्तित्व आहे. ते अस्तित्व जाणवावे म्हणून मी स्वेच्छेने कधीच कोणते प्रयत्न केले नाहीत. माझे एक मित्र असे म्हणतात की, कदाचित पूर्वजन्मीचे संचित असल्यामुळे मला तसे अनुभव येत असतील. मला तर पुनर्जन्म असतो की नाही, हे देखील माहीत नाही; त्याबद्दल ऐकून आहे फक्त. मागील काही वर्षांपासून मला छातीच्या मध्यभागापासून मागे असलेल्या भागात एक वेगळीच उपस्थिती जाणवते. जणू माझाच एक हिस्सा – पण माझ्या बाह्य व्यक्तित्वापेक्षा अधिक सुजाण, शांत नि समंजस असलेला. त्यालाच ‘अंतरात्मा’ म्हणतात की काय, हेदेखील मी नक्की सांगू शकत नाही. पण, हा कुठलाही भ्रम नसून एक ठोस वास्तव आहे, असे मात्र निश्चित सांगू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात तसं ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,’ असा प्रत्यय मला रोज येतो. त्या माझ्याच आतल्या हिश्श्याशी मी जाणीवपूर्वक जुळून राहण्याचा प्रयत्न करत राहतो (खटाटोप करून नव्हे, तर सहज जमेल तसं). माझ्या स्वभावात पुष्कळ चांगले बदल होत आले आहेत आणि बदलांची ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यासाठी मला कुठलाही आटापिटा करावा लागत नाही. मोह, मत्सर, हेवा, संताप, चिडचिड, भय, निराशा, हट्ट, आग्रह, लोभ यांसारखे विकार बरेच क्षीण झाले असून; आनंद, समाधान, इतरांची बाजू समजून घेणे आणि कामातील एकाग्रता वाढत आहे. अशाच स्वरूपाचे बदल मी माझ्या कुटुंबात व अन्य काही मित्रांमध्ये सुद्धा अनुभवतो आहे. अगदी Pondicherry च्या आश्रमात जाण्याची देखील आता फार ओढ वाटत नाही. कारण आमचा आनंद किंवा समाधान हे आता बाह्य परिस्थिती अथवा घटनांवर फारसे अवलंबून नाही. मोहन थुटे यांची मात्र अधून-मधून आवर्जून भेट घेत असतो. पसायदानात ज्यांचे वर्णन ‘चेतना चिंतामणी’, ‘अलांच्छन चंद्रमे’, ‘तापहीन मार्तंड’ असे केले आहे, तशा ईश्वरनिष्ठांच्या श्रेणीतले त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

आता वरील बाबींमध्ये मेंदूतल्या काही रासायनिक प्रक्रियांचा हात आहे काय, हे मला समजत नाही. स्वयंसूचना मात्र मी स्वतःला कधीच देत नाही. शिवाय ध्यानाची किंवा योगाची प्रक्रिया ही नेमकी कशी असावी, याबाबतही मी कोणाला मार्गदर्शन अथवा सल्ला देऊ शकत नाही; कारण स्वतःच ठरवून कोणत्याही विशिष्ट पद्धतीने मी साधना केलेली नाही. मला असे वाटते की, अध्यात्म या संकल्पनेचा उगाच जास्त बाऊ केल्या जातो. शेवटी पृथ्वीवरील उत्क्रांतीचा इतिहास हा जडभौतिकातून चेतनेच्या विकासाचा देखील इतिहास आहेच. अचेतन पदार्थांच्या आधारे क्रमशः चैतन्य प्रगटत आहे (Graded Evolution of Consciousness in Matter). त्या विकासाचा सध्या असणारा सर्वोच्च टप्पा म्हणजे विवेकशील नि बुद्धिमान असा मानवप्राणी. कदाचित पूर्वीच्या काळी झालेल्या उत्क्रांतीच्या ओघात आवश्यक असलेले विकार हे चेतनेच्या पुढील विकासाला बाधक ठरत असतील; तसे असल्यास ते विकार नि त्यांना जपणारा अहंकाराचा कोष हे येत्या काळात नष्ट होतीलच. शेवटी मानवी चेतनेने अधिक व्यापक, ज्ञानी, तरल नि लवचीक होत राहणे हेच अध्यात्म! जितक्या प्रमाणात आईबाप हे कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या अपत्यांचे संवर्धन करतात, तितक्या प्रमाणात तेही आध्यात्मिक असतातच. ‘हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर आपण पां जाहला ॥’ या ज्ञानदेवांना अपेक्षित असलेल्या अवस्थेकडेच वाटचाल होणार आहे – यथावकाश! आजच्या तरुण पिढीला अवघे विश्व आपले घर वाटू लागले आहे. लवकरच अतिरेकी राष्ट्रवाद आणि धर्मांधता ही कालबाह्य मूल्ये ठरतील. कामुकतेला उत्तेजन देणारा अफाट मसाला आज इंटरनेटवर व अन्यत्र उपलब्ध असूनही, आताची तरुण पिढी ही वासनांध झालेली दिसत नाही. म्हातार्‍या लोकांनी आपापल्या बालपणापासूनचा काळ आठवून पाहावा; आजची तरुण पिढी ही बरीच ‘फोकस्ड’ आहे.

मानवाच्या नकळत एक दिव्यचेतना ही भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्था यांचा आधार घेत हे सगळं परिवर्तन घडवून आणत असेल का? केवळ विचार किंवा संस्कार हे आमच्या जाणिवेत मूलभूत परिवर्तन घडवून आणू शकतात का? मेंदूतल्या विद्युत -रासायनिक प्रक्रिया या कारणस्वरूप असतात की परिणामस्वरूप? – की दोन्ही? शरीर, मन व बुद्धी मिळून जर एक अखंड अशी रचना (Continuum) असेल, तर ते सर्वच घटक हे परस्परांवर परिणाम करणारच. चेतनेचे विविध स्तर हे जर का खरोखरच अस्तित्वात असतील, तर अधिक उंच स्तरावरील चेतना ही मानवजातीमध्ये अवतरून आमच्या जाणिवेची पातळी बदलू शकणार नाही का? कृत्रिम बुद्धिमत्ता, इन्फोटेक, बायोटेक या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन त्यासाठी साहाय्यक ठरू शकेल. शिवाय, मानवप्राणी जर अधिक उच्च दर्जाची व्यापक चेतना धारण करण्यास अक्षम ठरला, तर कदाचित मानवाऐवजी दुसर्‍याच एखाद्या सक्षम प्राण्याची निर्मिती निसर्गाकडून होऊ शकते. अशाप्रकारे जडातून चैतन्याचा अधिकाधिक व्यापक, ज्ञानी, सूक्ष्म आणि उन्नत होण्याचा उत्क्रांतीक्रम हा जारी राहील! कारण निसर्गाजवळ भक्कम प्रयोगशीलता, भरपूर फुरसत, अफाट कौशल्य आणि अमाप सामग्री असल्याचे पृथ्वीवरील उत्क्रांतीच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. निसर्गाने इन्फोटेक आणि बायोटेक यांची ‘डी.एन.ए.’च्या रूपाने घालून ठेवलेली सांगड ही थक्क करणारी नाही का?

मागे एकदा गप्पांमध्ये मोहन थुटे मला म्हणाले, “तुझ्यात ऑनेस्टी आहे, पण सिन्सिरिटी नाही.” त्यांच्या या वाक्यामुळे मी खूप विचारात पडलो. कारण ऑनेस्टी म्हणजेच सिन्सिरिटी, असे मी त्यावेळी मानत होतो. पुढे श्रीअरविंदांचे साहित्य वाचताना लक्षात आले की, आपण जसे आहोत तसे स्वीकारणे, हा झाला प्रामाणिकपणा म्हणजे honesty. पण आपल्या जाणीवेला जितका उंच स्तर गाठता येत असेल, त्या स्तरावर सातत्याने राहून जगण्याचा प्रयत्न करणे ही आहे sincerity. विवेकी बुद्धीचे वैभव हा मानवप्राण्याच्या रूपात निसर्गाने आतापावेतो गाठलेला जाणिवेचा सर्वात उंच टप्पा दिसतो. परंतु आपल्यातले भय, संताप, चिडचिड, लोभ, अहंकार इत्यादी विकार हे बुद्धीला विचार करतेवेळी नकळत ग्रासून टाकतात. शेवटी अशा विकारांना शांत करून अथवा दूर सारूनच बुद्धीत विवेक प्रगटतो. उदाहरणार्थ ‘हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरीही या धर्मात राहून मी मरणार नाही,’ अशी डॉ. आंबेडकरांची जाहीर प्रतिज्ञा त्यांच्या ऑनेस्टीचा प्रत्यय देते. परंतु, संविधानाचा व हिंदू कोड बिलाचा आराखडा तयार करतेवेळी या धर्मातील शास्त्रे व रूढी याबद्दल वेळोवेळी तीव्र संताप व्यक्त करणारे डॉ. आंबेडकर हे शांतपणे चार संस्कृत पंडितांची नेमणूक करून, त्यांचेमार्फत हिंदू धर्मातील शास्त्रे व रूढी समजून घेत होते आणि आपला पूर्वग्रह बाजूला ठेवून सर्वांसाठी हितकारक असे मसुदे तयार करत होते. यातूनच त्यांची त्यावेळची सिन्सिरिटी देखील अनुभवास येते.

माझ्यातले विकार व अहंकार स्वतःहून कमी करणे मला शक्य नव्हते. परंतु, श्रीअरविंद समाधीतून माझ्यात शिरणारी चेतनाच माझ्या बुद्धीत, मनात व देहात अशा तर्‍हेचे बदल घडवून आणते, असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. इतरांबद्दल काहीही बोलण्याचा मला अधिकार नाही; परंतु विकार-रहित विवेकी बुद्धीकडे सामान्य माणसांची देखील वाटचाल होत राहिल्यास, जगभर अधिकाधिक सुसंवाद व सामंजस्याचे वातावरण खचितच निर्माण होईल, अशी आशा मात्र आहे.

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३)

(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)

9881574954

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here