‘माडिया’ जमातीमधील पहिली महिला डॉक्टर

कित्येक शतकं घनदाट जंगलाशिवाय दुसरं जग माहीत नसलेल्या माडिया आदिवासी जमातीतील कोमल मडावी  ही तरुणी नुकतीच डॉक्टर झाली आहे . अज्ञान आणि अंधकाराच्या दाट जंगलात हरवून बसलेल्या माडिया समाजासाठी काही शतकाचं अंतर पार करण्याची ही क्रांतिकारी गोष्ट आहे .

-अविनाश दुधे

झिंगानूर…महाराष्ट्राच्या नकाशात हे गाव शोधायला गेलात तर दुर्बीण घेवून शोधलं तरी सापडणार नाही. मुंबईपासून हजारेक किलोमीटर अंतरावर  गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलातील हे चिमुकलं गावं. या गावातील कोमल कासा मडावी ही तरुणी नुकतीच डॉक्टर झाली आहे . महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो मुली डॉक्टर होतात. कोमल डॉक्टर झाली, यात नवल ते काय? नवल हे आहे की महाराष्ट्राच्या अतिपूर्वेला असलेल्या सिरोंचा-भामरागडच्या अरण्यप्रदेशातील माडिया या आदिवासी जमातीतील ती पहिली महिला डॉक्टर आहे. सिरोंचा-भामरागडचा परिसर आणि माडियांचं जगणं माहीत असल्याशिवाय कोमलचं डॉक्टर होण्याचं महत्व लक्षात येत नाही. मुंबई, पुणे, औरंगाबाद  किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही शहरातून २४ तासात चंद्रपूर –गडचिरोलीत पोहचता येतं. पण त्यापुढील जग मात्र संपूर्णत: वेगळं आहे. कल्पनेपलीकडचं आहे. बाहेरच्या जगात एकविसावं शतक सुरू होवून वीस वर्ष लोटलीत, येथे मात्र काळ जणू खोळंबलाय. चारही बाजूने वेढून असलेलं जंगल सोडलं तर या परिसराला अजूनही दुसरं जग माहीत नाही. बाहेरच्या जगात काय चाललंय याची तिळमात्र खबर येथे नसते. या परिसरातील माडिया आदिवासींसाठी ‘सिरोंचा’ हे त्यांनी पाहिलेलं सर्वात मोठं गाव असतं.

अलीकडच्या काही वर्षात येथील नद्यांवर पूलं बांधल्या गेल्यापासून बाहेरचा वारा येथे येण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही पावसाळ्याचे चार महिने सिरोंचा-भामरागड तालुक्यातील झिंगानूरसारखी शेकडो गावं जगापासून तुटली असतात. शहरी भागातील पुराच्या- महापुराच्या बातम्या होतात. मात्र येथे बातम्या करायलाही कोणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे येथील घनदाट जंगलातील अर्धपोटी माडियांची गाऱ्हाणी लोकांसमोर येत नाही. तेथील माणसाच्या उपासाचा चेहरा कुठल्या वृत्तवाहिनीवर झळकत नाही. येथील माडिया तोंडाला चव यावी म्हणून मिठाऐवजी तांबड्या मुंग्यांची चटणी खातात. पावसाळ्यात बाहेर पडणं अवघड असताना आगीभोवती जमणारी पाखरे मारून ते दुष्काळाची बेगमी करतात, हे दाहक वास्तवही बाहेरच्या जगाला फारसं माहीत नसतं. येथील दुर्गम पाड्यांवर अवघडलेली एखादी बाळंतीण किंवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्याला रुग्णालयात पोहोचवायला २०-२५ किलोमीटरची रपेट करावी लागते, हेही कधी बाहेर येत नाही. येथील माणसांना आजारी पडलं तर दवाखान्यात जायचं असतं, हेही आताआतापर्यंत माहीत नव्हतं . कुठलातरी भुमका, तांत्रिक, मांत्रिकाचे उपचार घेत मरून जायचं असतं, एवढंच त्यांना माहीत असतं.

  त्यामुळेच शतकानुशतके अभावाचं जीवन जगणाऱ्या माडिया समाजातील कोमल मडावी ही डॉक्टर होते तेव्हा स्वाभाविकच ती बातमी होती. ज्या समाजातील हजारो स्त्रीया उपचाराअभावी, अंधश्रद्धेपोटी अकाली मृत्यूला सामोरे गेल्या त्या समाजातील कोमल डॉक्टर होणे, ही क्रांती आहे. गंमत म्हणजे माडिया समाजातील आपण पहिली महिला डॉक्टर आहे , याची खबरबात कोमलला नव्हती. सोशल मीडियात तसे अभिनंदनाचे संदेश झळकायला लागलेत. त्यातून तिला ते समजले. याच समाजातील कन्ना मडावी नावाचा तरुण काही वर्षांपूर्वी डॉक्टर झाला. एम. डी. झाला. तो माडिया समाजातील पहिला डॉक्टर. त्याच्यावर नामवंत साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी ‘हाकुमी’ नावाची कादंबरी लिहिलीय. त्यात माडियांचं जगणं अगदी सविस्तर आलंय. (त्या कादंबरीवर ‘लाल सलाम’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. )डॉ. कन्ना मडावी हे आता अहेरी या आदिवासीबहुल भागात रुग्णसेवा करतात.

स्वाभाविकच डॉ. कोमलचाही आदर्श डॉ. कन्नाच आहे. आरोग्यसेविका असलेली कोमलची आई श्यामला यांनी दुर्गम भागात वैद्यकीय सेवा करताना त्या भागातील रुग्णांची वैद्यकीय सेवेअभावी होणारी फरफट पाहून मुलीला डॉक्टर करण्याचा निर्धार केला होता. झिंगानूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या कोमलचा डॉक्टर होण्याचा प्रवास सोपा नव्हता. भाषेपासून वेशभूषेपर्यंत आणि आहारापासून शहरी जीवनशैलीसोबत जुळवून घेण्यापर्यंत खूप अडचणी होत्या. मात्र संपूर्ण शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण करणाऱ्या कोमलने या सर्व अडचणींवर मात करत मैलाचा दगड गाठला. तिच्यापाठोपाठ आता तिची लहान बहिण पायल ही सुद्धा डॉक्टर होण्याच्या वाटेवर आहे . ती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाला आहे. कोमलचा हा प्रवास, तिचं डॉक्टर होणं हे बाहेरच्या जगासाठी नवलाईचं नसलं तरी अज्ञान आणि अंधकाराच्या दाट जंगलात हरवून बसलेल्या माडिया समाजासाठी काही शतकाचं अंतर पार करण्याची ही क्रांतिकारी गोष्ट आहे .

(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)

8888744796

(साभार :दिव्य मराठी)

 

 

 

 

 

 

Previous articleफिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदर
Next articleतंदुरी मुर्ग ची जन्मकथा–
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.