माय सिस्टर्स अँड ब्रदर्स…

अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत दि. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी “माय सिस्टर्स अँड ब्रदर्स” हे ओजस्वी भाषण केले. या ऐतिहासिक भाषणाला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत…….. त्यानिमित्त विशेष लेख……..

-संदीप सारंग

आधुनिक युगात भारतीय भूमीवर जे महापुरुष जन्माला आले त्यात स्वामी विवेकानंदांचा समावेश अगदी निर्विवादपणे करावा लागेल. आयुष्य अवघे 39 वर्षांचे ! परंतु एवढ्या छोटया जीवनपटावरही त्यांचे कार्य वीज चमकावे तसे चमकून गेले. वाट्याला आलेला काळाचा चिमुकला तुकडा त्यांनी अक्षरश: जिवंत, रसरशीत आणि चैतन्यमय केला. ते गेल्यानंतर गेले शतकभर त्यांच्या अजोड व्यासंगाची, ओजस्वी वाणीची आणि जगभर केलेल्या अथक संचाराची चर्चा सतत होत राहिली. भारतीय परंपरेचा त्यांनी अखिल विश्वात केलेला उच्चार आणि प्रचार प्रत्येक भारतीयाला अभिमान देत राहिला.

दुर्दैवाने त्यांच्या पश्चात् त्यांना एकाच रंगात रंगविण्यात आले. भारतीय परंपरा म्हणजे वैदिक परंपरा असे एक गृहितक मानण्यात येते आणि तिला संस्कृतीची मुख्य धारा समजण्यात येते. वैदिक परंपरा ही मेन स्ट्रीम आहे की नाही हे तपासण्याच्या फंदात मात्र फारसे कुणी पडत नाही. फंदात न पडण्याचीही आपल्याकडे थोर परंपरा आहे ! संस्कृती आणि इतिहासाकडे डोळे झाकून पाहण्याच्या या सवयीमुळे बरेच घोटाळे होत राहिले. अभिमानाने आपली परंपरा वैदिक मानायची, परंतु प्रत्यक्षात भारतीय समाजाच्या उत्थानासाठी अवैदिक परंपरेत उगम-विकास पावलेले कार्यक्रम सांगत राहायचे, हाही घोटाळा त्यातलाच !

प्रारंभी स्वामी विवेकानंदांसारखे प्रज्ञावंतही या घोटाळ्याचे बळी ठरले. ते स्वतःला वैदिक मानत. वेदांन्ताचे समर्थन करत. परंतु पुढे आयुष्यभर त्यांनी जे कृतिकार्यक्रम मांडले ते मात्र वेद व वेदांन्तात कुठेही न बसणारे होते. “आपण वैदिक आहोत” ही धारणा परंपरेने मनात पक्की केलेली असल्यामुळे वेद-वेदांन्ताचा जयजयकार करणे त्यांना “बाय डिफॉल्ट” भाग पडत होते. परंतु त्याचवेळी भारत हे जगातले एक शक्तिशाली, विज्ञानवादी, आधुनिक राष्ट्र बनवायचे असेल तर वेद-वेदांन्ताचा उपयोग नाही हेही त्यांच्या लक्षात येत होते. याच मानसिक-वैचारिक द्वंद्वात ते कायम असत. त्यांनी म्हणताना वेद चांगले आहेत असे म्हटले, परंतु त्याचवेळी वेदांचा गाभा असलेल्या यद्न्यसंस्कृतीला, त्यातल्या हिंसेला, कर्मकांडांना बेधडक झुगारले. वैदिक परंपरेने संस्कृतीच्या क्षेत्रात शब्दप्रामाण्याचा जो दबदबा उभा केला होता तो त्यांनी निर्धाराने नाकारला आणि द्न्यानाला, बुद्धिप्रामाण्याला प्राधान्य दिले. दुःखमुक्त्ती, दारिद्रयनिर्मूलन, सेवाभाव, करूणा, परोपकार यासाठी प्रसंगी उपनिषदातील अद्वैत सिद्धान्त खुंटीवर टांगण्याची तयारी दर्शविली. समाजातील सुखदु:खाशी सोयरसुतक न मानणाऱ्या आणि रात्रंदिवस वैयक्तिक मोक्षाच्या पाठीमागे लागलेल्यांची त्यांनी रेवडी उडविली. ही सर्व लक्षणं वैदिक परंपरेची नव्हती. ती वैदिकांच्या विरोधातील बंडखोरीची होती. तोंडाने ते प्रस्थापित परंपरेची भाषा बोलत होते, परंतु कार्यक्रमांतून विद्रोह शिलगावत होते. त्यांच्या विद्रोहाचा हा मार्ग अर्थातच बुद्धाच्या महामार्गावर येऊन पोहोचत होता. भारतीय इतिहासात बुद्धमार्ग हा सेवाभाव, करुणा, परोपकार, ऐहिकता, समता यांचा कृतिशील पुरस्कार करत होता. विद्न्यान आणि विवेकाची दिशा अनुसरत होता.

महात्मा गांधी यांच्या उदाहरणावरून विवेकानंदांमधला हा अंतर्विरोध समजू शकेल. गांधी सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. विवेकानंदांप्रमाणेच तेही स्वतःची परंपरा वैदिक मानत. गंमत अशी की, त्यांनी आयुष्यभर प्राणप्रिय मानलेल्या सत्य व अहिंसा या तत्वांचा मागमूसही वैदिक परंपरेत आढळत नाही. वैदिक परंपरेत जन्म झालेल्या एखाददुसऱ्या माणसाने सत्य, अहिंसा, समता, मानवता सांगणे निराळे आणि त्या परंपरेने अधिकृतपणे या तत्वांचा हिरीरीने पुरस्कार करणे निराळे ! प्रत्येक परंपरेत अपवाद असतातच. या अपवादांचे उदात्तीकरण न करता त्या त्या परंपरेत मुख्य आणि मान्यताप्राप्त काय मानले जाते, हे नीट पाहावे लागते. वैदिक परंपरा ही यज्ञसंस्कृतीवर उभी होती आणि हिंसा हा या संस्कृतीचा पायाभूत घटक होता. याच परंपरेने सत्य ही संकल्पनाही धाब्यावर बसविली. जे वैदिक धर्मशास्त्रांना सुसंगत असेल तेच सत्य आणि तेच अंतिम, अशी सत्याची सोयीस्कर व्याख्या केली. अनुभवाला, चिकित्सेला, विद्न्यानाला (म्हणजे खऱ्या सत्याला) तेथे किंमत नव्हती. विशिष्ट मंडळींना विद्या, धन, प्रतिष्ठा यासारखे उदंड विशेषाधिकार आणि उर्वरीत लोकांच्या नशिबी क्रमाक्रमाने अप्रतिष्ठा, गरीबी, गुलामी हे या संस्कृतीचे प्रमुख वैशिष्टय होते. या व्यवस्थेलाच “धर्म” संबोधण्यात येत असे. या विषमतावादी धर्मव्यवस्थेचा वैदिक संस्कृतीने वर्षानुवर्षे पुरस्कार केला. असे असताना गांधींसारख्या सत्य, अहिंसा, मानवतेच्या महान पुजाऱ्याला स्वत:चा वारसा वैदिक परंपरेचा सांगावा लागत होता.

विवेकानंदांची स्थिती ही अशी होती. अर्थात, जसजसे तथ्य जाणवत गेले तसतसे विवेकानंद (आणि गांधी) या विसंगतीतून बाहेर पडू लागले. “भारतीय संस्कृतीत बुद्धाचा विचार हाच सर्वश्रेष्ठ विचार आहे,” अशी नोंद विवेकानंदांनी अनेकदा केलेली आढळते. “बौद्ध धम्म आणि स्वत: गौतम बुद्ध यांच्याबद्दल मला सर्वाधिक आदर आहे,” असे विधान त्यांनी वारंवार केले आहे. मधल्या काळात बौद्ध धम्माला प्राप्त झालेले स्वरूप आणि कालक्रमात त्याचा करण्यात आलेला विपर्यास याबद्दल खेद व्यक्त करून असा विपर्यास करणाऱ्यांवर त्यांनी टीकेचे आसूडही ओढले आहेत. त्याचवेळी शंकराचार्यांचा सर्व व्यवहार सनातनी आणि समाजविघातक होता हेही त्यांनी निर्भीडपणे सांगून टाकले आहे.

शिकागो येथे झालेली जागतिक सर्वधर्मपरिषद हा विवेकानंदांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग ! जणू क्लायमॅक्स ! आज काही लोक “विवेकानंदांनी शिकागो येथे हिंदू धर्माची महती गायली” असा प्रचार करत असतात. प्रत्यक्षात, ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून बोलत असल्यामुळे त्यांना तिथल्या श्रोत्यांना हिंदू धर्माचा रीतसर परिचय करून देणे भाग होते. आयोजकांची तशी लेखी सूचना होती. त्यामुळे हिंदू धर्मावर भाषण करणे ही विवेकानंदांसाठी एक प्रकारची औपचारिकता होती. मुळात, वैदिक धर्ममार्तंडांनी विवेकानंदांना या परिषदेला जाण्यास विरोध केला होता. विवेकानंद ब्राह्मण नसल्यामुळे त्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही, या कारणास्तव हा विरोध होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत ते कसेबसे अमेरिकेत पोहोचले. इकडे भारतात मात्र त्यांचे निंदासत्र उत्साहात पार पडत होते. धर्मपरिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना “ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत” असे एकही शिफारसपत्र मिळू शकले नाही. अखेर श्रीलंकेहून आलेले विख्यात बौद्ध धर्मगुरू अनगारिक धम्मपाल आणि हॉवर्ड विद्यापीठातील प्रोफेसर जॉन राईट यांनी मध्यस्थी करून त्यांना बोलण्याची संधी मिळवून दिली आणि मग स्वामींनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने ती सभा जिंकली.

भाषणाच्या प्रारंभीच काढलेल्या “माय सिस्टर्स अँड ब्रदर्स…” या उद्गारासरशी उभी सभा हेलावली. केवळ तीन शब्दांनी त्यांनी सभा खिशात घातली होती. काय जादू होती या शब्दांमध्ये ? शब्दासारखे शब्द पण भावना अथांग आपुलकीची ! ही भावना कुठे होती वेद आणि वेदांन्तामध्ये ? माणसामाणसाला जोडणारा भगिनीभाव/बंधुभाव ही कुणाची देण होती ? प्रेमाचा, आपलेपणाचा हा विचार कुठून आला होता ? विवेकानंद कुणाचे विचार जगाच्या वेशीवर मांडत होते ? कोणता वसा आणि वारसा सांगत होते ?

सर्वधर्मपरिषद संपल्यानंतर अमेरिकेत (आणि युरोपमध्येही)  अनेक ठिकाणी त्यांनी “गौतम बुद्ध” या विषयावर व्याख्याने दिली. Brooklyn Ethical Society येथे झालेल्या भाषणात ते म्हणाले, “I have a message to the West, as Buddha had a message to the East.”

आपल्याकडे सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचे एक मोहक भ्रमजाल आहे. समाजाच्या भल्याचा विचार मांडणाऱ्यांना शक्य त्या सर्व प्रकारे कड़वा (प्रसंगी हिंसक) विरोध करायचा आणि असे करूनही पुढेमागे तोच विचार समाजाकडून स्वीकारला गेला तर “तो विचार आमचाच आहे” म्हणून रेटून सांगायचे, याला आपण सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता म्हणत आलो. मात्र त्या चांगल्या विचारांचे मूळ प्रणेते जेवढे साईडट्रॅक करता येतील तेवढे करायचे आणि वर आम्हीच कसे मेनस्ट्रीवाले आहोत हा अहंकार जोपासायचा, असा प्रयत्न पिढ्यानपिढ्या इथे होत राहिला. आजही हे प्रयत्न थांबलेले नाहीत. नक्की कुणाचा विचार समाजाच्या उत्कर्षाचा आहे हे गुलदस्त्यात ठेवायचे, इहवादी पुरोगामी तत्वांना सामावून घेण्याचा आव आणायचा आणि प्रत्यक्षात भोंगळ प्रतिगामी धारणाच जनमानसात टिकून राहतील याची व्यवस्था करायची आणि हे सारे प्रयत्न सर्वसमावेशकतेच्या कोंदणात मिरवून घ्यायचे, ही आपली कथित मेन स्ट्रीम आहे. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता ही चांगली मूल्ये असली तरी याच शब्दांच्या आधारे बनेल लोक भाबड्या लोकांना बेमालूमपणे फसवत आलेत. विवेकानंदांच्या रूपाने या लबाडीला सुरुंग लागायला सुरुवात झाली होती, तेवढ्यात त्यांचा अंत झाला. (किंवा करण्यात आला.)

शेवटी काही प्रश्न उरतातच ! कोणत्याही समाजाची मुख्य धारा सांस्कृतिक अरेरावीवर ठरते की उदात्त जीवनमूल्यांवर ठरते ? काय प्रस्थापित झाले आहे, यावर ठरते की काय प्रस्थापित व्हायला हवे, यावर ठरते ? कोण जिंकत आले, यावर ठरते की कोण जिंकणे समाजहिताचे आहे, यावर ठरते ? विवेकानंदांच्या तोंडी असलेला भाषेचा रम्य पिसारा बाजूला काढला आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या कृतिकार्यक्रमांचा आशय तपासून “माय सिस्टर्स अँड ब्रदर्स” चा खरा अर्थ शोधला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात. याच उत्तरांची आज गरज आहे. म्हणूनच विवेकानंद आजही हवेहवेसे आहेत…

-संदीप सारंग

9773289599/9969864685

Previous articleनागपूरची आगळीवेगळी परंपरा – काळी आणि पिवळी मारबत
Next articleदेव भेटला वाळवंटात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here