मार्क्स, लेनीन समजून घेताना …

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ९

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

 

तेरा वर्षांच्या अंतराने नेहरू युरोपात आले होते. या काळात जेवढा बदल भारताच्या राजकीय व सामाजिक स्थितीत झाला तेवढाच किंबहुना त्याहूनही अधिकच युरोपात झाला होता. मुळात ते सहा महिन्यांसाठी युरोपात आले होते. पण कमला नेहरूंच्या प्रकृतीचे दिवसेंदिवस खालावत जाणे, देशातले राजकीय वादंग तसेच असणे आणि युरोपात एकाहून एक मोठ्या घडामोडी होताना पाहणे यामुळे त्यांचा हा मुक्काम लांबला. तरी त्यांचा अधिकांश सहवास, २१ महिन्यांचा, स्वित्झर्लंडमधील मोन्टाना येथील सॅनिटोरियममध्ये कमला नेहरूंच्या सुश्रृततेच गेला.

यावेळी रशियात राज्यक्रांती झाली होती. झारची सत्ता जाऊन  तेथे प्रथम मेन्शेव्हिक व पुढे त्यांना घालवून लेनिनच्या नेतृत्वातील बोल्शेव्हिकांचा पक्ष सत्तेवर आला होता. १९२३ मध्ये लेनिनचाही संशयास्पद मृत्यू झाला आणि रशियन राजसत्तेची सूत्रे स्टॅलिनच्या हाती आली होती. मार्क्सवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले जगभरचे अनेकजण तो सर्वत्र फडकाविण्याची भाषा तेव्हा उत्साहात बोलत होते. जगभरच्या कामगारात त्याने आशा जागवली तर उद्योगपतींना अंतर्मुख केले होते… पहिल्या महायुद्धाने युरोपात सगळी उलथापालथ केली होती. देशांच्या सीमा बदलल्या होत्या. नवे देश जन्माला आले होते. जर्मनीला ‘लिग ऑफ नेशन्स’मध्ये पूर्वी न मिळालेले स्थान मिळाले होते. इंग्लंडमध्ये कोळसा कामगारांचा संप सुरू होता आणि त्या देशाने रशियाशी संबंध तोडले होते. निकाराग्वेत क्रांती झाली होती. झेकोस्लोव्हाकियात सत्ताबदल झाला होता आणि पोलंडमध्ये सत्ताबदल होऊन पिल्सूडस्की सत्ताधारी झाला होता. पूर्वेत चीनमध्येही चँग कै शेखने नानकीनवर कब्जा केला होता. जपानचे ज्ाुने राजे जाऊन तेथे नवे व युद्धाकांक्षी राजपूत्र हिरोहिटो सत्तेवर आले होते.

नेहरूंनी युरोपात रोमॉ रोलाँ यांची भेट घेतली. त्यांनी गांधीजींचे जागतिक स्तरावरचे पहिले चरित्र लिहून त्यांना जागतिक कीर्ती व मोठेपण प्राप्त करून दिले होते. हिटलरविरुद्ध संघर्ष करणार्‍या व पुढे आत्महत्या करणार्‍या टौलारलाही नेहरू या काळात भेटले. मोतीलालजींची मादाम सन् यत्  सेनची भेट झाली होती. तो काळ युरोपातील समाजवाद्यांच्या व साम्यवाद्यांच्या हिटलरविरुद्ध झालेल्या सख्याचा होता. फारकाळ टिकलेल्या त्यांच्या मैत्रीचा व्हायचा तो परिणाम नेहरूंवरही झाला. आरंभी हे सख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर होते आणि दोन्ही स्तर परस्परांच्या सोयी सांभाळत होते. हे दोन्ही वर्ग फॅसिझमविरुद्ध लढणारे असल्यानेही नेहरूंना त्यांच्याविषयी आरंभी कुतूहल व आपुलकी होती. फॅसिझमचे क्रौर्य हे जसे त्यांच्या रोषाचा विषय होते तसे इंग्लंड व फ्रान्स या लोकशाही देशांनी त्यांच्या ताब्यातील वसाहतींचे चालविलेले शोषण हाही त्यांच्या रागाचा विषय होता. फॅसिस्ट देश क्रौर्य लपवत नाहीत आणि स्वत:ला लोकशाहीवादी म्हणविणारे देश वसाहतींचे शोषण दडवत नाहीत ही बाब त्या दोहोंपासूनही नेहरूंना दूर नेणारी होती. ब्रिटनचा समाजवादी पक्षही तेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याच्या बाज्ाूचा नव्हता. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीने इंग्लंडमधील, विशेषत: मँचेस्टरमधील अनेक कापड गिरण्या व उद्योग बंद पाडले होते. त्यामुळे तेथे बेरोजगारी ओढवलेल्या कामगारांची बाजू घेणे आणि त्यासाठी गांधीजींच्या चळवळीला विरोध करणे हे तेथील समाजवाद्यांनाही भाग होते. तात्पर्य हा सारा कमालीचा गोंधळात टाकणारा काळ होता. त्यातच जागतिक मंदीचे संकट येऊ घातले होते. लिग ऑफ नेशन्सची परिणामशून्यता दिवसेंदिवस उघड होती. चर्चिलचे इंग्लंडच्या राजकारणातले वजन वाढले होते आणि  चर्चिल साम्राज्यवादाचे समर्थक व वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत कमालीचे कडक व विरोधी धोरण स्वीकारणारे होते. कॉन्झर्व्हेेटिव्ह विरोधात, लेबर पार्टी तिच्या अडचणींमुळे विरोधी भूमिका घेणारी, समाजवादी जवळचे वाटले तरी दुबळे आणि कम्युनिस्ट रशियासमर्थक असले तरी त्यांची राजवटही फॅसिस्टांसारखीच हुकुमशाही. यातले कोणीच आपली बाजू  घेण्याजोगे नव्हते आणि त्यातले कोणी भारताचे मित्र होऊ शकणारेही नव्हते.

यावेळपर्यंत नेहरूंनी मार्क्स वाचला नव्हता. तो त्यांनी १९३०  मध्ये अभ्यासाला घेतला. मात्र युरोपातील वास्तव्याने त्यांना भांडवलशाही आणि साम्राज्यवाद यांचे नाते जसे समजावून दिले तसेच फॅसिझम आणि कम्युनिझम यांच्यातील अतिरेकी राज्यवाद आणि त्यांचे माणसांकडे पाहण्याचे क्षूद्रपणही ध्यानात आणून दिले होते. भांडवलशाहीला उद्योग उभा करायला आणि ते चालवायला कच्चा माल लागतो तसे स्वस्त दरात मिळणारे कामगारही लागतात. या दोन्ही गोष्टींसाठी भांडवलशाही देशांना वसाहतवादाचा स्वीकार करणे भाग असते. वसाहतीतून त्यांना कच्चा माल आणि मजूर या दोन्ही बाबी सहजपणे व अत्यल्प दरात आणता येतात. भांडवल जसजसे वाढते तसतशी या कच्च्या मालाची व मजुरांची गरज मोठी होत जाते. परिणामी वसाहतवाद वाढत जातो. भांडवलदार देश आपसात जी युद्धे करतात तीही मोठ्या वसाहतींचा ताबा मिळविण्यासाठी. मग दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य आशिया, द. आशिया व दक्षिण-पूर्व आशियातील देश गुलाम बनविले जातात. त्यामुळे वसाहतवाद संपवायचा तर त्यासाठी केवळ साम्राज्यवादाशी लढणे उपयोगाचे नाही. त्यासाठी खरा घाव भांडवलशाहीवरही घातला पाहिजे, या निर्णयावर नेहरू आले.

त्याचवेळी फॅसिझममध्ये माणूस हे साधन व राष्ट्र हे साध्य होते. साध्यासाठी साधनाचा बळी देता येतो. हे साध्य म्हणजेही अधिकाधिक सत्ता व अधिकार. ते मिळवायला माणसे गुलाम करता येतात. त्यांना कमी मोबदला देऊन  त्यांच्यावर जास्तीचे श्रम लादता येतात. स्वातंत्र्य, समता व न्यायासारख्या मूल्यांचा बळी देता येतो. फॅसिस्ट हुकुमशहा सांगेल ती पूर्वदिशा. तिला विरोध करतील ते देशाचे विरोधक व सत्तेचे द्रोही ठरविले जातात. कम्युनिझममध्ये कामगारांचे राज्य येते असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ते कामगारांचे न राहता त्यांचे म्हणविणार्‍या पक्षाचे असते. तो पक्षही स्वतंत्र नसतो. त्यावर त्याच्या नेत्याचा एकाधिकार चालतो. ती कामगारांची हुकुमशाहीही नसते. प्रत्यक्षात त्या नेत्याची ती हुकूमशाही असते. त्याला विरोध हाच मग मरणदंड ठरतो.

नेहरूंचा यावेळचा पेच हा की त्यांना भांडवलशाही मान्य होणारी नव्हती आणि फॅसिझमही चालणारा नव्हता. कम्युनिझममध्ये जोवर समाजातील दुर्बलांच्या वर्गांचा विचार होतो तोपर्यंत तो विचार त्यांना चालणारा होता. मात्र त्यातले क्रौर्य व हुकुमशाही अजिबात मान्य होणारी नव्हती. ही विचारपद्धती मग नेहरूंना गांधीजींच्या अन्त्योदयाच्या विचारापर्यंत पोहोचविणारी ठरली. गांधीजी अखेरच्या माणसाचे कल्याण हेच आपले ध्येय मानत. मात्र त्यासाठी ते इतरांना मारण्याची भाषा बोलत नसत. समाजाच्या उत्थानाची ते चर्चा करीत आणि त्यासाठी त्यांना वसाहतीची गरज नव्हती. माणूस, माणसाचे श्रम आणि त्याचे स्वतंत्र असणे याच बाबी माणसाला खर्‍या सत्यापर्यंत व आनंदापर्यंत पोहचवितात आणि भारताचीही गरज तीच आहे असे ते मानत. त्यामुळे गांधीच भारताला त्याच्या कल्याणाच्या दिशेने नेणारा नेता आहे येथवर नेहरूंचा विचार जात असे.

मात्र हा विचार करताना नेहरूंना इतर राज्यपद्धतींमधल्या चांगल्या गोष्टीही जाणवतच होत्या. मोठे उद्योग आणि त्यातले प्रचंड उत्पादनाचे तंत्र ही भांडवलशाहीची बाजू आणि नियोजनबद्ध विकासाची कम्युनिस्टांनी रशियात स्वीकारलेली कार्यपद्धती. या यांत्रिक आणि तांत्रिक बाबींना जोड द्यायची तर ती गांधीजींची. त्यांचा अन्त्योदय, त्यांची करुणा, त्यांची माणुसकी, सर्वधर्मसमभाव आणि देशाएवढीच माणसांविषयी त्यांना वाटणारी आस्था. यंत्रांना करुणेची जोड कशी द्यायची असते, उद्योगांना माणूसपण कसे शिकवायचे असते आणि शस्त्रांवर शांतीचा संस्कार कसा घडवायचा असतो? असे नेहरूंच्या मनात यायचे.

मार्क्सचा विरोधविकासवाद हा नेमक्या याच वळणाने जाणारा आहे. कामगारांच्या क्रांतीनंतर भांडवलशाहीतील प्रचंड उत्पादन करणारे उद्योग कायम राहतील. पण त्यावरील मूठभर उद्योगपतींची मालकी संपेल. सारे कारखाने व उत्पादनाची मोठी तंत्रे कामगारांच्या मालकीची होतील असे मार्क्स मानतो. नेहरूंना मोठे उद्योग हवे होते, मात्र त्यांचा लाभ गरिबांच्या व सामान्य माणसांच्या वाट्याला यावा असे त्यांना वाटत होते. यात त्यांना अन्त्योदय दिसे आणि समाजाचे आर्थिक उत्थानही पाहता येई. मार्क्सने सांगितलेली कामगारांची हुकूमशाही आणि त्याने क्रांतीतील हिंसेचे केलेले समर्थन मात्र त्यांना मान्य नव्हते.

‘मार्क्सचा विचार हा कामगार व शेतकर्‍यांच्या कल्याणाचा अखेरचा विचार आहे आणि त्याच्या चौकटीत हे जग बसवायचे आहे.’ हे आपणही मनात आणायचे हा लेनीनने आपल्या अनुयायांना दिलेला संदेश याच स्वतंत्र वृत्तीमुळे नेहरूंना पटणारा होता. १९३३ मध्ये इंदिरा गांधींना लिहिलेल्या एका पत्रात लेनीनचे कौतुक करताना ते म्हणतात ‘मार्क्सचा जो विचार रशियात लागू होईल तो युरोपात लागू होईलच असे नाही. इंग्लंडला लागेल ते फ्रान्सला लागणार नाही. स्थलकाल परिस्थिती ही विचारांना वळण व वेगळेपण देत असते. ही लेनीनची भूमिका मला मान्य होणारी आहे.’ नेमक्या याच बाबीसाठी नेहरू भारतातील कम्युनिस्टांवर टीका करीत. येथील कम्युनिस्टांनी मार्क्सच्या विचारांच्या पोथ्या बनविल्या आणि त्याचा शब्द न् शब्द त्यांना येथे जसाच्या तसा अंमलात आणायचा आहे अशी त्यांची धारणा होती. या देशाची व समाजाची स्थिती आणि मानसिकता मार्क्सचे चष्मे लावलेल्यांना कधी कळायची नाही. त्यासाठी गांधीजींचीच स्वच्छ नजर आत्मसात करावी लागेल. राजकीय व आर्थिक बाबींची काही उत्तरे गांधीत एखादेवेळी नसतील तरी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सारी उत्तरे केवळ त्यांच्याच जवळ आहेत. येथील गरिबांचे मन व आत्मा त्यांनाच गवसला आहे या निर्णयावर मग नेहरू येत.

मात्र देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून चालणार नाही. त्यात  आर्थिक उभारणीसाठी आणि गरिबांच्या उत्थानासाठी प्रयत्न करूनच भरीवपण आणावे लागेल. राजकीय स्वातंत्र्य हे साधन आहे तर समाजाचे कल्याण हे आपले खरे साध्य आहे. त्याचमुळे गांधी मला कधीकधी अतिशय मागासलेल्या विचारांचे वाटत असले तरी त्यांच्या एवढा क्रांतीकारी विचार करणाराही मला  दुसरा कोणी दिसत नाही.’ असे त्यांनी या काळात नोंदविले आहे.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

Previous articleदिल धड़कने का सबब याद आया
Next articleजनमत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.