मालदीव: पृथ्वीला पडलेले निळेशार स्वप्न

-राकेश साळुंखे

मनापासून एखादी इच्छा बाळगली किंवा स्वप्न बघितले तर ते थोड्याशा प्रयत्नाने सत्यात उतरतेच, याची प्रचिती मला नुकतीच आली. खूप पूर्वीपासून मालदीवला भेट द्यायची, हे मी ठरवत होतो आणि अलीकडेच अचानक ती संधी चालून आली. जसजसा मालदीवला जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला, तसतशी मनातील हुरहूर वाढू लागली. या देशाविषयी वाचलेले आणि ऐकलेले डोळ्यासमोर यायला लागलं.

मुंबई ते माले हा पावणे तीन तासांचा विमान प्रवास करून मी रात्री आठच्या दरम्यान मालेला पोचलो. अचानक आलेल्या पावसाने प्रवास थोडा लांबला. मालेपासून छोट्या बोटीने एका सुंदरशा रिसॉर्टमध्ये मुक्कामी गेलो. उशालाच समुद्र असल्याने त्याची गाज सतत कानांवर पडत होती. येथील लोकांच्या आदरातिथ्याने मी खूप भारावलो. इथल्या दिवसाची सुरुवात डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शांत समुद्र, लाटांची मंद गाज, समुद्रातून हळू हळू वर येणारा सूर्य, निळेशार पाणी , आकाशात झालेली विविध रंगांची उधळण… सारेच विलक्षण. समुद्रातील पाणी सुद्धा स्फटिकासारखेच स्वच्छ, पांढरी शुभ्र वाळू . कुठेही कचरा, घाण नाही. समुद्राचे पाणी किनार्‍यावर पारदर्शक त्यानंतर चितामणी रंगाचे तर सर्वांत आत गडद निळे. जणू काही शाईची दौतच सांडलीय. स्वच्छ पाण्यामुळे १० फूट खालचा तळ स्पष्टपणे दिसत होता. त्यात विहरणारे विविधी रंगीबेरंगी मासेही स्पष्ट दिसत होते. इथे रात्री स्वच्छ आकाशात टिपूर चांदणे न्याहाळायची चैन करता येते. काळ्याकुट्ट आकाशात चांदण्यांचा जणू सडाच पडलाय असे वाटते. मध्यरात्रीचे Milky way (आकाशगंगा)चे दृश्य तर अप्रतिम !

इथे पर्यटक निवांतपणा उपभोगायलाच /रिलॅक्स  होण्यासाठीच येतात. त्यामुळे इथले व्यवहार सावकाश चालतात. स्वच्छ समुद्रकिनार्‍यांवर तासन् तास पहुडलेले युरोपियन येथे मोठ्या संख्येने  दिसतात. मालदीव हे निसर्ग संपन्नतेसाठी तसेच सुट्टी आरामात घालवण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘मालदीव’ हा हिंदी महासागरातील एक स्वतंत्र देश आहे. येथे भेट देण्यासाठी योग्य कालावधी म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल हा होय. मे नंतर मान्सून सुरू होतो. स्वतंत्र देश असल्याने पासपोर्ट अनिवार्य, भारतीयांना Visa on Arrival  आहे. मुंबई ते माले किंवा त्रिवेंद्रमवरूनही मालेला फ्लाईट्स आहेत. बरेचसे भारतीय पर्यटक श्रीलंकेला जोडून या देशाला भेट देतात. येथील हवामान वर्षभर उष्णच असते. त्यामुळे येथे सुती कपडे वापरणे योग्य ठरते. मालदीव हे सुट्टी घालवण्याचे, मौजमला करण्याचे ठिकाण असले, तरी येथे सार्वजनिक ठिकाणी वावरताना पोशाखाचे बंधन आहे. पुरुष व स्त्रिया दोघांनीही गुडघ्याखाली येणार्‍या पँटस् व टीशर्ट वापरणे बंधनकारक आहे. रिसॉर्टमध्ये तसेच बीचेसवर मात्र हे बंधन नाही.

हा देश बेटांचा समूह आहे. 26 Ring Shaped बेटे आहेत. 1000 पेक्षा जास्त कोरल आयलँड्स आहेत. त्यापैकी काही आयलँड्सवर 3 स्टार , 5 स्टार ,7 स्टार रिसॉर्टस आहेत. एका रात्रीचे रूम  टेरिफ सरासरी 6000- 68000 रुपये या दरम्यान आकारले जाते. मालदीवचे चलन ‘रुफिय्या’ (Rufiyya) आहे. 1 रुफिय्या म्हणजे 4.61 भारतीय रुपये होत. मात्र इथले सर्व व्यवहार डॉलरमध्ये होतात. भारतीय चलन स्वीकारले जात नाही. ‘माले’ हे राजधानीचे शहर असून या देशातील बहुसंख्य  लोक हे  या शहरातच राहतात . हे मुस्लिम राष्ट्र असल्याने इथला प्रमुख धर्म इस्लाम आहे . इथल्या संस्कृतीवर भारत, श्रीलंका, मलेशिया, अरब, पर्शिया, इंडोनेशिया, आफ्रिका यांचा प्रभाव जाणवतो. स्थानिक लोकांचा आहार हा प्रामुख्याने मासे व भात आहे. टुना मासा आवडीने खाल्ला जातो. ‘नारळ’ हा सुद्धा प्रमुख अन्नघटक म्हणून येथे वापरला जातो. भाज्या मात्र कमी प्रमाणात वापरल्या जातात. भाज्या पिकवण्यासाठी तेवढी जमीनच उपलब्ध नसल्याने त्या पिकवल्या जात नाहीत. चिकन, मटण, बीफ हे समारंभ असेल तरच खाल्ले जाते. मात्र पर्यटकांना रिसॉर्टसमध्ये सर्व प्रकारचे अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल सर्व पदार्थ मिळतात. शुद्ध शाकाहारी पदार्थही उपलब्ध असतात. पाणी मात्र फारच किंमती आहे. चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेला देश असल्याने त्यांना जवळ-जवळ सर्वच गोष्टी आयात कराव्या लागतात अगदी पाणीसुद्धा.

Mother and her son playing on the beach in Maldives island resort.

मालदीवची राष्ट्रभाषा ‘दीवेई’ (dhivehi) आहे. परंतु English  भाषा सर्रास बोलली जाते. स्थानिक लोक मृदू, मितभाषी, शांतताप्रिय व अगत्यशील आहेत. पर्यटन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्टस् अंतर्गत वॉटर स्किईंग, स्नॉर्केलिंग, स्कुबा डायविंग, विंड सर्फिंग, काईट बोर्डिंग, बनाना राईड इ. विविध अ‍ॅक्टिव्हिटीज येथे आहेत. डॉलरमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याने ते थोडे महाग आहेत. पण शेवटी हौसेला मोल नसते. स्नॉर्केलिंग व स्कुबा डायविंग करताना समुद्रातील जलचर व कोरलस्चे दृश्य मन मोहवून टाकतात. स्कुबा डायविंग करतेवेळी आपल्याला प्रशिक्षित कोचकडून प्रथम Training  दिले जाते. व नंतरच समुद्रात नेले जाते. आपल्या सुरक्षिततेची परिपूर्ण काळजी घेतली जाते. पर्यटकांना सुरक्षितता व प्राधान्य देणारा हा देश आहे.

आयुष्यात एकदा तरी आवर्जून भेट द्यावी, असे हे ठिकाण आहे. माझ्या मते ‘मालदीव’ हे पृथ्वीला पडलेले निळेशार स्वप्नच आहे.

क्रमशः

Maldives- By Rakesh Salunkhe- हा Video पाहायला विसरू नका

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleमाध्यमांची फोकनाडबाजी !
Next articleपंजाब का धुमसतोय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.