‘मी टू’…एका संपादकाचा कबुलीजबाब !

-प्रवीण बर्दापूरकर

‘मी टू’च्या निमित्तानं अनेक गौप्यस्फोट सध्या होताहेत त्यात सत्यता किती हे कळायला मार्ग नसला तरी अनेकांचे बुरखे टर्राटरा फाटले जाताहेत . ‘इतक्या वर्षानी का’ , ‘किती जुनं झालं’, इथपासून ते भाषक आणि प्रादेशिक वादही त्यात आणला जात आहे ; ते सर्व निरर्थक आहे ; वनवासातून परतल्यावर सीतेलाही पावित्र्याची परीक्षा द्यायला लावणारी मानसिकता आता बदलायला हवी . शोषण आणि अन्याय कधीच ‘पडेल’ नसतो , तो कधीच ‘शिळा…जुना’ होत नाही कारण , शोषण असो की अन्याय त्याला कारणवश वाच्यता फुटली नाही किंवा फोडता आली नाही तरी न दिसणारी ती एक कायम भळभळती जखम आणि असह्य ठसठसणारी वेदना असते ; म्हणून या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायलाच हवी . जे काय असेल ते सत्य प्रकाशात यायलाच हवं ; दोषी आढळतील त्यांना शिक्षा आणि दोषी नसतील त्यांना क्लीनचीट द्यायला हवी .        

१९७८ साली मी पत्रकारीतेत आलो आणि १९८३पासून सतत ज्येष्ठ पदावर आहे ; बारा वर्षांपेक्षा जास्त काळ निवासी संपादक आणि संपादक राहिलो . ज्येष्ठ आणि कनिष्ठ पदावरील शेकडो स्त्री आणि पुरुष सहकार्‍यांसोबत काम करता आलं . ते सर्व एकजात सभ्य होतेच असं नाही . वाईट अनुभव कमी आले असले तरी आले , हे मात्र खरंय . ‘मी टू’ मोहीम सुरु झाल्यापासूनच मीडियातील अशा घटनांबद्दल काय , अशी पृच्छा समाज माध्यमांवरुन झाली . माध्यमात एकच रंगीला रतन नाही , अनेक आहेत ; त्यांच्या विषयी लिहावं किंवा नाही असा संभ्रम होता . कुणाही सहकारी स्त्रीनं तेव्हा आणि आतापर्यंत त्यासंदर्भात तक्रार केलेली नाही . दुसरं म्हणजे , आपण चाळीस वर्ष घालवली त्या बिरादरीला कशाला आणखी बदनामीच्या खाईत लोटायचं , असा तो संभ्रम होता . माझ्या एके काळच्या सहकारी भक्ती चपळगावकर-भाळवणकर आणि नीता कोल्हटकर यांनी लिहिलेल्या पोस्ट वाचल्यावर मनातला संभ्रम दूर झाला .

समंजस वयातील परस्पर संमतीनं असलेल्या स्त्री-पुरुष संबधाविषयी मला काहीच म्हणायचं नाहीये ; तो त्यांच्या धारणा , आनंद आणि स्वातंत्र्याचाही भाग आहे , अशी माझी भूमिका आहे . व्यावसायिक पदाचा गैरवापर करुन सहकार्‍यांसोबत झालेल्या अशा प्रकारांना मात्र माझा विरोध आहे . वैयक्तिक पातळीवर ( म्हणजे आपल्या व्यावसायिक कक्षेच्या   बाहेर ) कोण कुठे काय करतो , याबद्दल अवाक्षर उच्चारायचं नाही ; त्याची दखलच घ्यायची नाही हे भान मी कटाक्षांनं पाळतो . मात्र , एक ‘लीडर’ म्हणून अशा प्रकारांना मी कधीच माझ्या टीममध्ये स्थान मिळू दिलं नाही किंवा ‘…व्यभिचारात आनंद आहे’ सारखे सूचक डायलॉग्ज मारत त्या प्रकारांचं कधीही समर्थन केलेलं नाही . अशा अनेक घटना पूर्वीही सभोवताली घडत होत्या आणि त्याबद्दल कुजबूज ऐकू यायची हे खरं . विशेषत: केवळ मुद्रीत माध्यमं असतांना तर प्रसिद्धीसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे स्त्री आणि पुरुष दिसायचे . मुद्रित माध्यमांचा विस्तार झालयावर त्या घटनांत मोठी वाढ झाली . त्याचा सूचक बोभाटा मीडियाने केला . कधी प्रसिद्धीची हौस भागवून घेण्यासाठी , कधी आगतिकतेनं तर कधी खुशीनं या घटना घडत असल्याचं बघायला मिळालेलं आणि मिळत आहे . ( प्रसिद्धीसाठी पार्ट्या देणारे आणि भेटवस्तूंचा मारा करणारे पुरुष पूर्वी असायचे/आताही आहेत . ) अशा घटनात रस घेणारे काही  वार्ताहर , उपसंपादक आणि संपादक मला ठाऊक आहेत . स्त्री शोषणाच्या माध्यमांतील घटनांची संख्या आणि  व्याप्ती मोठी असली आणि डावे-उजवे , पुरोगामी-प्रतिगामी असे सर्व आकंठ बुडलेले असले तरी त्या घटनांना आजवर फारशी प्रसिद्धी लाभली नाही .

अगतिकता कशी असते हे मला मुख्य वार्ताहर असतांना समजलं . आमचे बॉस एक नामवंत हस्ती होते . ते दौर्‍यावर जातांना त्यांच्यापेक्षा वयानं सुमारे पंचवीस वर्ष लहान असणार्‍या एका महिला उपसंपादकाला सोबतीला नेत असत . त्याची खूप कुत्सित चर्चा आमच्या कार्यालयात आणि पत्रकारीतेतही होती . एक दिवस न राहावून ‘तू असं का करतेस’, असं मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली , ‘तुम्हाला काय वाटतं मी काय स्वखुशीनं करते ? त्यांच्यासोबत जाणं आणि त्यांना सर्व प्रकारे रिझवणं ही माझी आगतिकता आहे . मला नोकरीची किती गरज आहे ते तुम्हाला ठाऊक नाही . माझी ही नोकरी गेली तर माझं कुटुंब उपाशी मरेल . त्यांच्या जागी तुम्ही आलात तर मी तुमच्यासोबतही येईन…’ असं बरंचं काही ती बोलली . ते तिचं सांगणं अंगावर कांटा उभा करणारं आणि संपादकाविषयी घृणा निर्माण करणारं होतं . त्यानंतर त्या संदर्भात शहर वृत्त विभागात होणार्‍या चर्चा मी बंद करायला लावल्या . दिसायला सुंदर असलेल्या एका विवाहित उपसंपादकालाही या महाशयांनी त्यांच्यासोबत शय्यासोबत करण्यासाठी भरपूर त्रास दिला पण , तिनं दाद दिली नाहीच . अखेर मित्रवर्य ( आता दिवंगत ) हेमंत करकरे यांच्या पदाचा वापर करून त्या महिला सहकार्‍याची अन्यत्र बदली करण्यात यश आलं .

आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक म्हणून ‘अशा’ तीन घटनांना मला सामोरं जावं लागलं ; महत्वाचं म्हणजे या तिन्ही घटनांत कोणाही स्त्री सहकार्‍यांनं किमान तक्रार देण्याची तयारी दर्शवली नाही . मी निवासी संपादक झाल्यावर ज्या पहिल्या सहा नियुक्त्या झाल्या त्यात नुकतीच पदवी मिळवलेले , पत्रकारीतेत क्रांती करण्याच्या भाबड्या चैतन्यांनी सळसळलेले तीन युवक आणि तीन युवती होत्या . त्या सर्वांची निवड माझ्या ज्येष्ठ सहकार्‍यांच्या एका समितीनं केलेली होती . ती समिति हा निवड प्रक्रियेत सहकार्‍यांना सहभागी करुन घेण्याचा माझ्या कार्यशैलीचा एक भाग होता पण , ते असो . निवड समितीत असलेल्या तेव्हा ४४ वर्षांचा अविवाहित , एका ‘संस्कार आणि संस्कृतीचा ठेकेदार’ असलेल्या सहकार्‍याचा एका तरुणीच्या नियुक्तीसाठी जरा जादाच आग्रह होता . ती तरुणी सुंदर होती आणि मोकळ्या संस्कृतीत वाढलेली शिवाय कुशाग्र म्हणता येईल अशी होती त्यामुळे     तिची निवड अपेक्षितच होती . आमच्या संस्कारी सहकार्‍यापेक्षा ती २० वर्षानी तरी लहान असावी . काही दिवसांनी त्या दोघांविषयी चर्चा सुरु झाली ; गावातही ते दोघे दोन-तीन   वेळा एकत्र दिसले पण , मला त्याच्याशी काहीच देणं-घेणं असण्याचं कारण नव्हतं . काही दिवसांनी सहकार्‍यांनी त्या दोघांच्याविषयी लेखी तक्रार केली . त्या कन्येला बोलावून  विचारणा केली तेव्हा ती म्हणाली , ‘लोक काहीही बोलतात . त्यांच्या माझ्या वयात वीस वर्षांचं अंतर आहे . शिवाय अशा ऑर्थोडॉक्स माणसाशी लग्न करायला मी काही वेडी नाही . माझं लग्न ठरलेलं आहे . तो अमेरिकेतून आला की आम्ही लग्न करणार आहोत .’ मी विषय संपवून टाकला .

त्यानंतर काही महिन्यांनी इंग्लंड दौरा आटोपून मी मुंबई विमान तळावर उतरलो . मोबाइल सुरु केला आणि पहिलाच एसएमएस वाचून दचकलो . तो एसएमएस ‘ती वेश्यावृत्तीची आहे’ , अशा आशयाचा होता आणि तो तिनेच मला फॉरवर्ड केलेला होता . ताबडतोब तिला फोन केला आणि विचारलं तर ती रडवेल्या म्हणाली ‘मी नकार दिल्यावर त्या ज्येष्ठ सहकार्‍यानंच तो एसएमएस अनेकांना पाठवलेला आहे’ . हे माहिती असावं म्हणून तिनं तो मला पाठवलेला होता . नागपूरला परतल्यावर मी तिला बोलावून घेतलं . केबिनमधे आल्या आल्याच त्या सहकार्‍यानं तिच्या संदर्भात इतरांना वाटलेलं एक पत्रक माझ्या हातात ठेवलं . ते वाचल्यावर मी तिला म्हटलं ‘तू तक्रार दे . आपण पोलिसांकडे जाऊ’ . आमच्या लीगल सेलच्या प्रमुखाशीही मी लगेच बोललो . पण , त्या कन्येनं तक्रार देण्यास ठाम   नकार दिला . ‘एक तर बदनामी होईल . दुसरं म्हणजे लग्न झालं की मी लगेच परदेशात स्थायिक होणार आहे ; पोलिस केसचं झेंगट परवडणार नाही मला’ , असं तिचं म्हणणं होतं . थोडा वेळ शांततेत गेल्यावर तिनं पर्स उघडली , नोकरीचा राजीनामा काढला आणि माझ्या हाती दिला .

चौकशी केली तर तो ज्येष्ठ सहकारी कार्यालयातच होता . त्याला बोलावलं . आल्यावर तिच्याकडे पाहून तो निलाजरा हंसला . मी उठलो आणि त्याच्या कानाखाली एक खाडकन  आवाज काढला . अनपेक्षित झालेल्या या आघातानं तो हेलपांडला , दोन खुर्च्याही पडल्या . तो आवाज ऐकून काही सहकारी धावत आले . तिच्या राजीनाम्याचा कागद फडकावत , टेबलवरचा कोरा कागद पुढे सरकवत मी कडाडलो , ‘तिनं तुझ्या घाणेरड्या वर्तणुकीची तक्रार केलीये . राजीनामा दे ताबडतोब नाही तर पोलिसांकडे पाठवतो हे प्रकरण’ . त्यानं थरथरत्या हातांनी राजीनामा लिहिला . माझ्याकडे दिला आणि खाली मान घालून तो बाहेर पडला . ती कन्या म्हणाली , ‘त्यांना मारलं तेवढी शिक्षा पुरेशी होती . राजीनामा घ्यायला नको होता . उघड्यावर पडतील ते . तुम्हाला सांगते सर , आम्हा मुलींना हे प्रकार काही नवीन नाहीत ; अंगाला हात नाही लावू दिला की पुरुष असेच विकृत वागतात . आम्हाला संवय होते    त्याची…’ तिचं म्हणणं ऐकून मी नि:शब्द झालो . स्त्रिया किती मोठ्या मनाच्या आणि वैपुल्यानं समंजस असतात हे जाणवून ओशाळलोही . त्यानंतर त्या महापुरुषाला नागपुरात कुठेही मी नोकरी मिळू दिली नाही . तो कोणत्याही वृत्तपत्राकडे गेल्याचं कळलं की फोन करून त्याचे प्रताप कळवत असे ! ती कन्या अजूनही माझ्या संपर्कात आहे .

आमचा एक सहकारी मूळचा सोलापूरकर . त्याची प्रत्येक नोकरी अशा पत्रकारिताबाह्य कारणासाठी गेलेली तरी कुमार केतकर यांच्या अनाकलनीय लोभामुळे त्याला पुण्यात नोकरी मिळालेली होती . जास्तच ‘कर्तृत्व’ गाजवल्यानं त्याला अखेर माझ्याकडे नागपूरला शिक्षा म्हणून पाठवण्यात आलं . खमकेपणानं हाताळल्यानं काही कारनामे करण्याआधीच त्याची हकालपट्टी करण्यात आम्हाला यश आलं . त्याच्या हकालपट्टीच्या संदर्भात तेव्हा ‘लोकसत्ता’च्या अंकात चौकटीत सुचनाही प्रकाशित झाली होती . नंतरही त्याच्या नोकर्‍या याच कारणांनी गेल्या हे जगजाहीर असूनही पत्रकार संघटना त्या रंगीला रतनला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करतात , सन्मान स्वीकारतात…त्या बातम्या वाचताना आपण पत्रकार असल्याची लाजच वाटते…

माझ्या एक दिवंगत सहकार्‍याच्या विधवा पत्नीकडे रात्री बेरात्री माझ्या टीममधील एक सहकारी जातो हे कळल्यावर तिने तक्रार द्यावी असं मी सुचवलं . तिनं नकार दिला . बदनामीची भीती , हेच कारण . अखेर त्याची आडवळणाच्या गावी बदली केली आणि तो आदेश सोपवतांना कानाखाली एक आवाज काढून बदली का केली हे त्याला सांगायला मी विसरलो नाही .

गेली अनेक वर्ष या घटना मनात होत्या पण , त्या लिहिण्याचा किंवा सांगायचा धीर होत नव्हता . भक्ती चपळगावकर-भाळवणकर आणि नीता कोल्हटकर यांच्यामुळे हा कबुलीजबाब देण्याचं धैर्य आलं ; ‘धन्यवाद’ म्हटलेलं त्या दोघींनाही आवडणार नाही .

आणखी एक कबुलीजबाब- याचा अर्थ कामाच्या ठिकाणी मी कुणा महिला सहकार्‍याशी गैर हेतूनं वागलो नसलो तरी फ्लर्ट मात्र केलं आहे . ही गुस्ताखी मी चक्क एका ज्येष्ठ सहकार्‍यासोबत केली . ते फ्लर्ट आयुष्यातल्या सर्व भल्या-बुर्‍या , अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे . ते फ्लर्ट आणि मी गेली ३४ वर्ष कधी वाद घालत तर कधी सुखाने नांदत आहोत . त्या फ्लर्टचं नाव आहे मंगला !

( भक्ती चपळगावकर-भाळवणकर यांच्या लेखाची लिंक अशी-  http://bit.ly/2ybyMP2  नीता कोल्हटकर यांचं ट्विट असं- A Marathi senior editor wt whom I was travelling in a cab yrs ago, while I sat in a corner, grabbed my face to try & kiss. I pushed him away. But left me disgusted @nashikar )

-प्रवीण बर्दापूरकर       

Cellphone  +919822055799

 

 

लेखकाच्या ‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515

=====================

Previous articleतो स्पर्श …ती नजर
Next articleहरिजन सेवा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.