मुजऱ्याच्या पाऊलखुणा!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२०

-समीर गायकवाड

    बहुतांश लोकांना वाटते की, वेश्यावस्तीत राहणार्‍या सर्व बायका देहविक्रय करत असाव्यात. हे म्हणजे कंट्री बारमध्ये कुणी पाणी जरी प्याला, तरी लोकांनी मात्र त्याने दारूच ढोसली असे समजावं, तसं आहे. असो ! उत्तर भारतातील सर्व मुख्य शहरातील वेश्यावस्त्यांत देहविक्रय करणार्‍या स्त्रियांव्यतिरिक्त नाचगाणं करणार्‍या कलावंतिणी आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ, जालंधर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, वाराणसी, झांशी, दरभंगा, बिलासपूर, भोपाळ अशी अनेक नावं आहेत. आपल्याकडे चक्क मुंबईच्या कामाठीपुर्‍यातल्या अकराव्या लेनमध्ये एका इमारतीत अगदी देखणं नाचगाणं सादर होतं. बॉलीवूडमधल्या हिरॉइन्स झक माराव्यात अशा लावण्यवती इथे आढळतात. असं सांगितलं जातं की, ‘मुकद्दर का सिकंदर’चा पूर्ण स्टोरीप्लॉट आणि रेखाने साकारलेली जोहराबाई ही इथलीच देण आहे. इथलं नाचगाणं जरी अप्रतिम असलं, तरी ते देहमिलनाच्या वाटेवरचे नाही हे नक्की!

     इथं आधी चिकाचे पडदेही होते, नंतर मण्यांचे पडदे आले, आता काही मोजक्याच घरात पडदा आहे. बाकी कुठे पडदा नाही. पहिल्यांदा अशाच एका पडदानशीन घरात गेल्यावर वादक मंडळी, गायिका आणि कोठेवाली मालकीण हे सर्व बिर्‍हाड पडद्याबाहेर होतं आणि त्या तलम पडद्याआड एक खाशी लावण्यवती होती.

आधी एकदोन चीजा सुनावून झाल्या, एक मुजराही झाला, मग गायिकेने विचारले, ‘क्या सुनना पसंत करोगे ?’

माझं ध्यान जागेवर नव्हतंच मुळी! डोक्यात नेहमीप्रमाणे दुसरेच विचार सुरू होते.

मग न राहवून पडद्याआडच्या त्या रूपगर्वितेच्या कंठातून कोमल स्वर बाहेर पडले, ‘कुछ फर्माईये तो सही…’

काळजातून सुरा आरपार जावा, पण कळ न यावी इतकी मधाळ धार त्या आवाजाला होती !

एक सेकंद काही सुचले नाही, सावध झाल्यावर तिला म्हटलं, ‘एक शेर अर्ज करना चाहता हूं.’

माझ्या अवताराकडे बघून मी शायरी वगैरे काही करत असेन यावर त्यातील कोणाचाही तीळमात्र विश्वास नसावा, हे त्या सर्वांच्या प्रश्नांकित मुखकमलाकडे बघताच कळले.

त्यांचा मुद्दा ओळखत मी पुस्ती जोडली. ‘कलाम मेरा नहीं दाग जी का है, अपने दाग देहलवीजीका !’

आतून तो जीवघेणा नाजूक आवाज आला –

‘इर्शाद !!’

मग काय ‘दास रामाचा हनुमंत नाचे’ या उक्तीचा आधार घेत मी आज्ञापालन केले आणि शेर सुनावला –

‘ख़ूब पर्दा है कि चिलमन से लगे बैठे हैं

साफ़ छुपते भी नहीं सामने आते भी नहीं…’

शेर ऐकताच टपाटप हिरेमोती पडावेत तसं खळखळून ती सौंदर्यवती हसली. तिथला माहौलच बदलला…. हिराबाईची गाठ या लोकांनी घालून दिली. माझं मोठं काम एका शायराच्या शायरीने केलं. सीमाब अकबराबादींच्या शायरीचे स्मरण करताना ही आठवण होतेच. तसं बघितलं, तर निगुतीने मुजर्‍याचा इतिहास शोधत बसलं, तर शेकडो पाने लिहून होतील. पण, रेड लाईट एरियाचा पूर्वी असलेला संबंध इतकाच मुद्दा समोर ठेवून काही बाबी मांडता येतील.

     1930 च्या आसपास विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी ‘हिंगेर कचोरी’ (हिंगांची कचोरी) ही कथा लिहिली. त्यांच्या मृत्यूनंतर 19 वर्षांनी आणि कथेच्या लेखनानंतर 40 वर्षांनी त्यावर अरविंद मुखर्जी यांनी ‘निशी पद्मा’ हा बंगाली सिनेमा बनवला. सिनेमा खूप चालला, त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 1972 मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित‘अमर प्रेम’ बनवला. यातला राजेश खन्नाने साकारलेला आनंदबाबू आणि शर्मिला टागोरने साकारलेली पुष्पा विसरणं अशक्य गोष्ट आहे.

     विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या आयुष्यात इतके चढउतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की, त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर एका वर्षात निवर्तली. तेव्हा त्यांचे वय होते 19 वर्षे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना तारादास नावाचा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर 4 वर्षांनी आताच्या झारखंडमधील, पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे त्यांचे 1951 साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ 27 वर्षे ते विधुर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले. त्यांनी 16 कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

     कोलकात्याच्या बदनाम गल्ल्यात ‘हिंगेर कचोरी’ मधील अनंगबाबू त्यांना वास्तवात भेटला होता. त्याचा जीव की प्राण असलेली पुष्पा तिथेच गवसली होती. विभूतीभूषणनी त्यांना नानाविध रंग चढवत आपल्या कथेत गुंफले. कोलकात्यात एकोणिसाव्या शतकात दोन प्रकारच्या वेश्या होत्या, एक देहविक्रय करणार्‍या आणि दुसर्‍या कोठेवाल्या. यातल्या कोठेवाल्यांचा शोध प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांनी देखील घेतला होता. दरम्यान काही काळातच त्यांचे निधन झाले. पण, ‘प्यासा’त याची एक झलक दिसते. विभूतीभूषणना या कोठेवाल्या पुष्पाने भुरळ पाडली आणि त्या दरम्यान त्यांना मानहानी सहन करावी लागली. कोलकत्यात असलेल्या कोठेवाल्या तवायफ स्त्रियांत देखील वर्गवारी होती. याचा उल्लेख ‘पाकिजा’त छुप्या पावलांनी येतो. मुजरा करणार्‍या स्त्रियांची मूळ गावे आणि त्यांच्या मालकिणींचे कुळ यावर ही वर्गवारी ठरायची. यात बहुतांश बोलीभाषा आणि उर्दू-हिंदीतील गायकी सादर व्हायची. जिचा क्लास उंचा असे तिच्याकडे येणारा कदरदानही श्रीमंत असे, असा सारा मामला होता. बिहार, झारखंड, स्वातंत्र्यपूर्व भारतातील पूर्व बंगाल, आसाम, उत्तरप्रदेश येथून या कोठ्यांच्या मालकिणी तिथे आल्या होत्या आणि तिथे येऊन त्यांनी आपले बस्तान मांडले होते. काहींचे कोठे हवेलीवजा उंची होते. या सर्व स्त्रियांचे मूळ शोधायला गेलं, तर ते लखनौमध्ये सापडतं. तिथून या स्त्रिया विस्थापित होत वेगवेगळ्या प्रांतात स्थायिक होत गेल्या.

     मुजर्‍याचा इतिहास मुघलांपासून सुरू होतो. जयपूरमध्ये सर्वात आधी मुजरा सादर केला गेला. तिथे त्याचे स्वरूप कौटुंबिक आणि राजेशाही थाटाचे होते. कत्थक नृत्यशैलीला ठुमरी आणि गझल गायकीची जोड दिली गेली आणि मुघलांनी आपल्या दिवाणखान्याची शान वाढवण्यासाठी मुजरा वरती उत्तरेत आणला. बहादूरशहा जफरच्या काळात याचे खूप पेव फुटले होते. मुजरा सादर करणार्‍या कलावंतिणी स्त्रियांची सुरुवातीची माहिती सांगते की, आईकडून मुलीला ही कला वारसा हक्कात दिली जायची. कोठ्याची मालकी देखील सोबतच यायची. विविध कदरदान लोकांसमोर कला सादर करताना कधी कधी त्यांचे बीज यांच्या गर्भात रुजायचे. त्याला टाळता येणं जवळपास अशक्य नसलं, तरी कठीण होतं, पण सर्वच कोठेवाल्या याला राजी नसत. मग जी स्त्री अंगाला हात लावू देत नसे, तिचा मुक्काम एका जागी टिकतच नसे. शेवटी कंटाळून तिला कुणाचा न कुणाचा आश्रय घ्यावा लागे.

     लखनौ आणि बनारस ही मुजरा कलावंतांची दोन प्रमुख केंद्रे झाली. त्यातल्या बनारसमधल्या अदाकारा गंगेकाठची एकेक नगरे पार करत कोलकात्यात जाऊन वसल्या. पुष्पा ही त्यातीलच एक होती. असं असलं, तरी या बायकांकडे जाणं म्हणजे खूप मोठं लांच्छन समजले जाई. त्यामुळे मोठमोठे आमीरजादे इच्छा असूनही त्यांच्या दारी जात नसत; पण छुप्या पद्धतीने त्यांच्या मैफली आपल्या इलाख्यात भरवत, त्याचा आनंद घेत. बर्‍याचदा एखाद्या धनिकास पसंत पडलेल्या कोठेवालीस तो अंगवस्त्र समजून ठेवून घेई, तिची उमर ढळेपर्यंत तिची देखभाल करे. पण, सर्वच ठिकाणी असे होत नसे, अनेकदा त्यांना वापरून टाकून दिले जाई. मात्र गायकीवर – नृत्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या आणि स्त्री सौंदर्याचे रसिक असलेल्या सर्वसामान्य माणसांनी या कोठ्यांना भरभरून प्रेम दिले.

     अनेक दशके हीच परिस्थिती होती. लखनौच्या नवाबपदी आलेल्या शुजाउद्दौलाने हे चित्र पालटले. हा शुजाउद्दौला मराठ्यांच्या इतिहासात आढळतो. अहमदशहा अब्दालीच्या खांद्याला खांदा लावून त्याने पानिपतमध्ये मराठ्यांचा दुर्दैवी पराभव केला होता. याच शुजाचा इंग्रजांनी बक्सरच्या लढाईत 1764 मध्ये दारुण पराभव केला होता. या लढाईने इंग्रजांचा पाया बळकट झाला होता. हा शुजाउद्दौला एका वेगळ्या कारणाने लखनवी इतिहासात प्रसिद्ध झाला, तो इतिहास म्हणजे त्याचा बायकांचा शौक ! हा माणूस कमालीचा शौकीन होता. त्याचा हा शौक कधी कधी पिसाटासारखा वाटायचा. हा पहिला नवाब होता, ज्याने महालात मजा घेण्याऐवजी कोठेवाल्या बायकांच्या कोठ्यावर जाऊन बसून मैफली लुटल्या आणि शीलही लुटले. पण, बदल्यात अफाट दौलतजादा केली !

     शुजाउद्दौलाच्या या नव्या पायंड्याने तवायफकडे जाणं, हा अमीरांचा रंगीन शौक झाला. धनवानांच्या या शौकाचा उल्लेख ‘साहिब बिवी और गुलाम’मध्ये रेहमानच्या तोंडी आहे. रात्रीच्या अंधारात येणारे हौशी लोक किंवा स्त्रीसुखाचा हेतू मनात ठेवून आलेले लोक वा निखळ गीत-संगीत रसिक यांच्या व्यतिरिक्त कोठ्यांवर कोणीच येत नसे. शुजाउद्दौलाने या संकेताच्या चिंधड्या उडवल्या. ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली आणि अनेक श्रीमंत लोकांनी या गल्ल्यांतील देखण्या आणि उच्च वर्गाच्या तवायफ स्त्रियांशी लागेबांधे ठेवले. यामुळे इतरत्रही लोक मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागले. म्हणूनच बहादूरशहा जफरच्या काळात यांना सोन्याचे दिवस आले होते.

     हीच टूम कोलकत्यातल्या गल्ल्यांमध्ये आली तेव्हा तिथल्या श्रीमंतांनी आपले मोर्चे तिकडे वळवले. याच लोकात एक होता अनंगबाबू, जो विभूतीभूषण बंदोपाध्यायांच्या एकांत सफरीत भेटला असावा. तसेच, मुंबईचा कामाठीपुरा अत्यंत भरात होता. तेव्हा तिथल्या 14 लेनपैकी एक लेन खास मुजरावाल्या बायकांची होती. मुजरा-गली असं तिचं नाव होतं. अनेक हिंदी सिनेमात तवायफ आणि कोठ्यांचे विषय मांडले गेले. ‘देवदास’, ‘पाकिजा’, ‘उमराव जान’, ‘जिंदगी या तुफान’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘घुंगरू’, ‘जहां आरा’, ‘मिर्झा गालिब’, ‘अमर प्रेम’, ‘एक नजर’, ‘शराफत’, ‘बाजार’, ‘मंडी’, ‘आप के साथ’, ‘चेतना’, ‘दस्तक’, ‘रज्जो’ इत्यादी चित्रपटात या विषयावर प्रकाश टाकला गेलाय. ‘मुकद्दर का सिकंदर’मधील जोहराबाई ही मुंबईच्या बदनाम गल्ल्यांची देण होती.

     जी स्थिती कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि लखनौत होती, तीच देशातील अनेक छोट्या मोठ्या शहरात होती. आताच्या बिहार राज्यात 38 जिल्हे आहेत, त्यात 50 रेड लाईट एरिया आढळतात. या पैकीच एक म्हणजे ‘चतुर्भुज स्थान’ आहे. या अनोख्या नावाचा रेड लाईट एरिया बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातला आहे. मुघलपूर्व काळात इथे भगवान चतुर्भुज यांचे विख्यात मंदिर होते आणि परिसरात त्याचा खासा लौकिक होता. इथल्या लोकसाहित्यात त्याचे उल्लेख आढळतात. मुघल काळात या भागाचे हिमालयन पर्वतरांगांशी असलेलं भौगोलिक स्थान या नात्याने लष्करी तळाच्या सोयीच्या भूमिकेतून पाहिले गेले. याच काळात येथे घुंगरू, तबला आणि हार्मोनियमचे स्वर ऐकू येऊ लागले. बघता-बघता ती या भागाची ओळख बनून गेली. हा भाग मुजर्‍यासाठी इतका प्रसिद्ध झाला की, प्रसिद्ध साहित्यिक शरतचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांची पारो येथे गवसली. तिचे मूळ नाव होते सरस्वती. त्यांनी तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावले आणि भारतीय साहित्य-कला दालनात अजरामर केले.

     मुजफ्फरपूरचे हे ठिकाण हा जणू मुजरा आणि तवायफ यांचा बाजार झाला. पन्नाबाई, गौहरजान, चंदाबाई यांच्यासारख्या नामवंत कलाकार इथे आपली गायकी पेश करून गेल्या. हा बाजार इतका रुजत गेला की, इथल्या लोकवस्तीत प्रथाच पडली की, इथल्या स्त्रियांना सर्व प्रकारच्या शारीरिक संबंधातून जन्माजा आलेल्या मुलींना त्याच धंद्यात परंपरेने आणले जाऊ लागले. खरे तर हा कलंक होता, पण लोकांनी त्याला रूढीचे गोजिरवाणे नाव दिले आणि स्त्रियांचे शोषण सुरू ठेवले. स्वातंत्र्योत्तर भारतात इथला मुजरा काळाच्या पडद्याआड होत गेला, मात्र स्त्रियांचे भोग काही संपले नाहीत. इथल्या स्त्रिया वेश्याव्यवसायात ओढल्या गेल्या. मुळातच मुजरा, कोठा, तवायफ आणि वेश्या यांच्यातल्या सीमा खूपच धूसर होत्या, भरीस भर म्हणून लोकांचे अनेक प्रवाद आणि किस्से जनमानसात प्रचलित होते. त्यांना वेश्यावृत्तीने बळकटी दिली.

     21 व्या शतकात आपल्या देशभरात याच क्षेत्रातल्या मुली डान्स बार कल्चरमध्ये गेल्या आणि डान्स बार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी ब्रिजजवळील जुन्या काँग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकवला जातो. मात्र, इ.स.2000 पर्यंत आताच्या बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चौबीस परगणा, बार्दवान, बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र सांगायचे झाल्यास, बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांची काही संख्या आहे. अन्यत्र त्यांचे अस्तित्व खूप तुरळक आहे. एव्हढेच नव्हे, तर अलीकडील हिंदी सिनेमातदेखील मुजरानृत्ये घटत चालली आहेत. कदाचित लोकांना त्यात पूर्वीसारखी आवड राहिली नसावी. डिजिटल युगाच्या करमणुकीच्या व्याख्या वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो. कारण काहीही असले, तरी हे प्रमाण खूप कमी झाले आहे, हे मान्यच करावे लागेल. एका अर्थाने हे बरे देखील आहे, कारण यातून स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषणही व्हायचे, तसेच याच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य काही कौशल्य नव्हते, त्यांच्यावर मात्र या उदासीन वृत्तीमुळे कुर्‍हाड कोसळली. त्यांना उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने निवडला. अलीकडील काळात इंटरनेटसह अन्य अनेक कारणामुळे व मनोरंजनाच्या बदलत्या व्याख्यांमुळे आपल्याकडे तमाशा कलावंतांची जसजशी उपासमार होऊ लागलीय आणि त्यांच्याकडे देहविक्रयाच्या संशयाने पहिले जाऊ लागलेय, तसेच काहीसे मुजरा कलावंतांच्या अखेरीस घडले होते. आजही बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तरांचल या भागात चाळीशीत पोहोचलेल्या अनेक वेश्या या कलेच्या याच क्षेत्रातून त्यात ओढल्या गेल्याचे पाहावयास मिळते.

     मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार पाकिस्तानच्या लाहोरमधील ‘हिरामंडी’ मध्ये भरतो. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरामंडी ही मुजर्‍याची काशी पंढरी होय. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेली मुजरा नर्तिका अनारकलीचे मूळ लाहोरमध्येच सापडते. ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक-ए- जहांगिरी’ अर्थात ‘जहांगीरनामा’ या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच 1611 मध्ये लाहोर येथे पोहोचला तेंव्हा त्याला अनारकलीविषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटिश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही, मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे. लाहोरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे.

     मुजरा नृत्य करणार्‍या बायकांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरे तर, यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ आणि लाघवी असतात. त्याही सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात. यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरूर असतो, हे येथे नमूद करावेच लागेल. जिथं सामान्य माणसांच्या मनात खोट असू शकते, तिथे यांच्या मनात का असू नये? आपल्यातल्या कुणालाच ‘आनंदबाबू’ बनायचे नाही, पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला, तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं, हे आपल्या संस्कारावर अवलंबून आहे. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र, त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो, हे काळच सांगेल.

     ‘मुक्कद्दर का सिकंदर’ मध्ये जोहराबाई एकदा सिकंदरला म्हणते की, ‘एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है.’ आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बीभत्स आणि हिडीस नृत्य करणार्‍या तोकड्या कपड्यातील नर्तिकांचा (?) धांगडधिंगा घालणार्‍यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात, त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे, हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले, तरी मुजर्‍याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या, हे नक्की!

     आयुष्यात जेव्हा कधी पाकिस्तानला जायचा योग येईल, तेव्हा लाहोरच्या ‘हिरामंडी’ला नक्की भेट देईन आणि माझ्या पोतडीत काही नवी चीजा सामील करून घेईन.

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

८३८०९७३९७७

Previous article‘रामप्रसाद की तेरहवीं’: मनोरंजनाच्या पलीकडे जाणीवेपर्यंत नेऊन ठेवणारा चित्रपट
Next articleमुशायरा जिवंत ठेवणारा शायर-राहत इंदोरी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.