मोदींची ‘अराजकीय’ मुलाखत!

-अतुल विडूळकर
———————————-

राजकारण हे सत्ताप्राप्तीसाठी करायचं असतं, हेच राजकारणातील एकमेव सूत्र आहे. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी जे जे करावं लागतं, जे जे कुणी करतं, त्याला राजकारणच म्हणतात. इतकं साधं, सोपं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीला ते म्हणतात म्हणून अराजकीय म्हणणं, म्हणजे भक्तांच्या नंदनवनात वावरण्यासारखं आहे. ती मुलाखत का बरं अराजकीय; तर त्यात राजकीय प्रश्न नव्हते म्हणून !! लोकसभा निवडणुकीत मतदानाचे तीन टप्पे पार पडलेत. सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. त्याहीपेक्षा अधिक ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी आहे. अशा धामधुमीत अक्षय कुमारला मुलाखत देणं म्हणजे बोअर होतंय म्हणून गावगप्पा करणं आहे की काय ! प्रश्न केवळ राजकीय नाहीत म्हणून ती मुलाखत अराजकीय ठरत नाही. आणि अक्षयकुमार पत्रकार नाही म्हणून ती टिंगलटवाळीचा विषय देखील ठरत नाही. त्यासाठी भाजपला कोणत्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करायचं आहे, ते आधी समजून घ्यावं लागतं.

आता सतराव्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत भाजपचं मुख्य प्रॉडक्ट कोणतं असेल तर ते नरेंद्र मोदी ही व्यक्ती आहे. हेच प्रॉडक्ट 2014च्या निवडणुकीतही भाजपने उतरवले होते. ‘अबकी बार भाजप सरकार’ नव्हतं म्हंटलं त्यांनी. ‘अबकी बार मोदी सरकार’ ही टॅगलाईन होती. बरं, राष्ट्र प्रथम वगैरे म्हणणाऱ्या पक्षाला ‘व्यक्ती प्रथम’ म्हणत मतं का मागावी लागत असतील, याचा विचार केला तर ही पहिलीच वेळ होती, असं म्हणता येत नाही. ‘अबकी बारी अटल बिहारी’ ही घोषणा त्याचं पूर्वसूत्र आहे.

जनसंघ आणि भाजपचा इतिहास पाहिला तर त्यांच्या पक्षाच्या राजकीय विचारसरणीला जनतेचा किती अल्प पाठिंबा होता, हे लक्षात येतं. खरंतर, बाबरीपतनापर्यंत भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा हा काही गर्दी खेचणारा नव्हता. तोपर्यंत पक्ष जिवंत ठेवताना, पक्षाचा संघर्ष कायम ठेवताना ‘परमपूज्य’ या यशस्वी फॉर्म्युलाचा आधार घेत अटलबिहारी वाजपेयी यांच्याभोवती एक ‘ऑरा’ कायम ठेवण्याचं त्यांनी कसोशीने पाळले. अटलजीचं व्यक्तिमत्व महान असलं तरीही त्यांच्याभोवती भक्तिभाव निर्माण करणं पक्षाची गरज होती. कारण, पक्षाचे जे ‘डायहार्ट’ समर्थक होते, त्यांना अशाच पद्धतीच्या परमपूज्यची सवय लागली होतीच.

दुसरीकडे, अद्याप जिल्हा आणि तालुका पातळीवर पक्षाचं नेतृत्व निर्माण व्हायचं होतं. नंतर ती संधी ‘कारसेवा’ने दिली. पण तोपर्यंत विविध राज्यांसह केंद्रीय सत्तेत पाय रोवून बसलेल्या काँग्रेसला लढत देण्यासाठी ‘व्यक्तीकेंद्रित’ रणनीती आखणे, ही भाजपची निकड होती. ग्रामीण स्तरावर जिथे नेतृत्व आणि कार्यकर्तेही नाहीत, तिथे गावागावात पुढारी असलेल्या काँग्रेसशी लढायचं कसं ? गांधीजी-नेहरू-इंदिरा यांच्या केवळ नावावर ‘वाह रे पंजा, आया पंजा’ अशा घोषणांनी गावागावातील भिंती चुना आणि गेरूने रंगल्या असायच्या, तेव्हा केवळ पडक्या घरांच्या भिंती कमळाच्या वाट्याला यायच्या. बाबरी आंदोलन आणि त्यापूर्वीची लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा यामुळेच भाजपला एक पक्ष म्हणून गावखेड्यापर्यंत पोहचता आलं. तोपर्यंत ‘आयडिओलॉजी’ ऐवजी ‘पर्सनॅलिटी’ चं मार्केटिंग करणे भाग होते. तेच भाजपने केलं. त्याचाच परिणाम म्हणजे ‘अबकी बारी अटल बिहारी’ ही निवडणुकीतील घोषणा.

हा अलीकडचा इतिहास एकदा नजरेखालून घातला की ‘अबकी बार, मोदी सरकार’चे संदर्भ सुलभ होत जातात.

अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार जाऊन डॉ मनमोहन सिंग सरकार सत्तेत आलं. ते चांगलं दहा वर्षे टिकलं. या काळात भाजपने देशातील गुजरात, मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड अशा काही राज्यांची सत्ता मिळविली. हा काळ देशाच्या दृष्टीने महत्वाचा होता.

एकीकडे जागतिकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीची फळं दृश्यरुपात येत असताना सेवाक्षेत्र प्रचंड वाढलं. प्रत्यक्षात संपत्तीनिर्मिती न करताही आर्थिक सुबत्ता वाढलेला उच्च मध्यमवर्ग देशात निर्माण झाला. त्यांच्या राजकीय मताला काँग्रेसप्रणित सरंजामी वृत्तीच्या राजकारणात काडीचीही किंमत नव्हती. किंवा त्यांचं काही राजकीय मत असू शकतं, हे देखील काँग्रेसला माहीत नसावं. त्यामुळे या वर्गातून निर्माण होऊ पाहणाऱ्या नेतृत्वासाठी देखील काँग्रेसकडे कोणताच कार्यक्रम नव्हता. ही ‘स्पेस’ भाजपने भरून काढली. सोशल मीडियाच्या उदयाबरोबर या वर्गाला भाजपने आपल्याकडे खेचले. आज जे काही आयटी सेल आणि भक्त म्हणून ज्यांची टिंगल होते, ते याच वर्गातील अधिक आहेत. हा केवळ योगायोग नसतो.

नव्या तंत्रयुगात इतका मोठा पाठिंबा मिळत असेल तर निव्वळ हिंदुत्वाचे नाव घेत सुधारणावादाला फारकत देण्याएव्हढा भाजप दूधखुळा नव्हता. त्यामुळे गुजरात दंगलींचा इतिहास मागे सोडून विकासाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी नावाचे प्रॉडक्ट राष्ट्रीयस्तरावर लाँच झाले. पुन्हा ‘आयडिओलॉजी’ ऐवजी ‘पर्सनॅलिटी’चं मार्केटिंग करणं गरजेचं होतं. त्यासाठी सर्व मार्गांनी व्यूहरचना आखण्यात आली.

याला आणखी एक कारण होते. डॉ मनमोहन सिंग यांचा काळ समाप्त होऊन राहुल गांधी यांचा काळ सुरू होणार, हे स्पष्ट झालं होतं. राहुल गांधींच्या हाती काँग्रेसची सूत्र जाणं आणि पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहुल याचंच नाव पुढे असणार, हे स्पष्ट होताच भाजपचं अर्धे काम सोपे झाले. इथून पुढे जे काही भाजप आणि त्यांच्या रणनीतीकारांनी केलं तर ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील तुलना.

‘नमो व्हर्सेस रागा’ हा प्रायोजित कार्यक्रम याच रणनीतीचा भाग. राहुल गांधींची पप्पू म्हणून ओळख निर्माण करणं हा देखील त्याचाच भाग. कारण, एखाद्या व्यक्तीला महान ठरवायचं म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्धी व्यक्तीचे चारित्र्यहनन करायचे, ही सनातन स्ट्रॅटेजी. याला राहुल गांधी यांच्या वागण्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाने देखील काही प्रमाणात हातभार लावला. सोबतीला सोशल मीडिया होताच. केवळ सोनिया गांधी, डॉ मनमोहन सिंग नव्हे तर ”character assisination’च्या रणनीतीतून कुणीच सुटलं नाही. परिणाम एकच, मोदीजी म्हणजे 56 इंच, मोदीजी म्हणजे लाल आंखे, मोदीजी म्हणजे सुपरमॅन. बाकीचे सर्व गये गुजरे.

2014 ची लोकसभा निवडणूक ही दोन पक्षातील निवडणूक नव्हती. तर ती दोन व्यक्तींमधील निवडणूक आहे, हे ठसविण्यात भाजप यशस्वी झाला. ‘प्रेसिडेंशीअल इलेक्शन मोड’वर ती निवडणूक नेण्यात भाजप यशस्वी झाला तेव्हाच निवडणुकीचा निकाल लागला होता.

पाच वर्षांनी आज काय परिस्थिती आहे ? विकास, रोजगार, भ्रष्टाचार, गुड गव्हर्नस हे तेव्हाचे मुद्दे या निवडणुकीत अगदी पहिल्या प्रचारसभेपासूनच गायब आहेत. त्याऐवजी पुलवामा हल्ला, बालाकोट एअर स्ट्राईक, पाकिस्तान, राष्ट्रवाद हे मुद्दे रेटल्या गेले. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडताच हे मुद्दे अपिलिंग वाटत नसल्याचं लक्षात आले आणि भाजपची गाडी हिंदुत्वाच्या रुळावर आली. नाहीतर बॉम्बस्फोटाचे आरोप असलेल्या कथित साध्वीला भोपाळ मधून उमेदवारी मिळती ना !

आता हा मुद्दा उलटणार असे दिसताच भाजपने पुन्हा व्यक्तीमहात्म्याचा सहारा घेतलाय. ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषणा आहेच.

जनतेला आपल्यातला माणूस आपला नेता हवा असतो. ‘मोदीजी आपल्यातील आहे. आपल्यासारखे जोक्स करतात. आपल्यासारखे त्यांना मित्र आहेत. त्यांनाही आपल्यासारखे आईला भेटावंसं वाटतं. त्यांनाही आंबा खायला आवडतो. त्यांनीही भांड्यात जळते कोळशे घालून कपडे इस्त्री केलेत. लहानपणी त्यांचीही आपल्यासारखीच खायची सोय नव्हती. ते आपल्यातील आहेत. ते पंतप्रधान होणे म्हणजे आपण पंतप्रधान होणे आहे.’, असं जनतेला वाटावं, यासाठी घेतलेली मुलाखत अराजकीय असू शकते काय ????

अक्षय कुमार जेव्हा म्हणाले, ‘मै आपसे कोई राजनीती का सवाल नही पुछूगा,’ तेव्हाच तर स्पष्ट झालं होतं की, ‘अरे वाह, आपल्याला असाच तर पंतप्रधान पाहिजे. निवडणुका सुरू असतानाही जो राजकारणावर बोलत नाही’.

(लेखक ‘मीडिया वॉच’ चे उपसंपादक आहेत)

8408858561

 

 

Previous articleविदर्भातील निकाल कमालीचे धक्कादायक असणार !
Next articleनवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.