यवतमाळ-वाशिम: अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेनेची वाट अवघड

– अजिंक्य पवार

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचा विशेष दबदबा आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असो, यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व ठळकपणे दिसते. कै. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याने राज्याला दिले आहेत. अगदी अलिकडच्या काळापर्यंत हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातही अनेक वर्षापर्यंत काँग्रेसच ‘दादा’ पक्ष होता .सध्या या लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा आहे . अकराव्या लोकसभेचा अपवाद वगळता येथे काँग्रेसची सत्ता होती. अकराव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे राजाभाऊ ठाकरे (१९९६ ते ९८) यांनी काँग्रेसच्या येथील वर्चस्वाला धक्का दिला. मात्र त्यासाठीही काँग्रेसनेच आतून हातभार लावला होता. त्याची पार्श्वभूमी उत्तमराव पाटील यांच्या राजकीय महत्वाकांक्षेत दडली आहे. सातव्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० मध्ये जिल्ह्यात उत्तमराव पाटील यांचा राजकीय उदय झाला. उत्तमराव पाटील यांचे वडील देवराव पाटील हे १९६२ ते १९७१ पर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेत खासदार होते. १९८० ते १९९६ पर्यंत उत्तमराव पाटील यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधीत्व केले. मात्र १९९६ मध्ये पक्षाने त्यांना तिकीट न देता राष्ट्रीय राजकारणातील महत्वाचे नेते गुलामनबी आझाद यांना यवतमाळ मतदारसंघातून रिंगणात उतरविले. त्यामुळे दुखावलेल्या उत्तमराव पाटील व त्यांच्या समर्थकांनी भाजपाचे उमेदवार राजाभाऊ ठाकरे यांना कुणबी कार्डावर अप्रत्यक्ष मदत करून निवडून आणल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यानंतर दोनच वर्षात १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेने पुन्हा उत्तमराव पाटील यांना तिकीट दिली आणि ते विजयी झाले. त्यानंतर एक वर्षातच १९९९ मध्ये पुन्हा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमराव पाटील परत काँग्रेसकडून निवडून आले. अपराजित ठरलेल्या उत्तमराव पाटील यांना २००४ मध्ये भाजपाचे हरिभाऊ राठोड यांनी पहिल्यांदा पराभूत केले.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले हरिभाऊ राठोड यांना लोकसभेची उमदेवारी देण्यात आली. तेव्हासुद्धा उत्तमराव पाटील व समर्थकांनी काँग्रेस उमेदवाराला मदत न करता भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना साथ दिली. काँग्रेसची ही खेळी शिवसनेच्या पथ्यावर पडली. तेव्हापासून यवतमाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व कमी होत गेले आणि आज या मतदारसंघातील काँग्रेस अंतर्गत कलहात जणू संपल्यात जमा आहे. भावना गवळी यांच्या रूपाने २००९ पासून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाला तरूण नेतृत्व मिळाले खरे; पण विकासाच्या मुद्यांऐवजी निवडणूक काळात घडणाऱ्या विलक्षण राजकीय घटना भावना गवळी यांच्या विजयाला पुरक ठरल्या. भावना गवळी यांची ही चौथी टर्म आहे. मात्र सध्या त्यांचे राजकीय स्थान डळमळीत असल्याचे मानले जाते. जिल्ह्यात शिवसेनेत गेल्या दोन वर्षांपासून ‘ताई विरूद्ध भाऊ’ असा सामना रंगला आहे. भाऊ अर्थात विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय वर्चस्व नाकारता येत  नाही. मात्र या वर्चस्वाच्या लढाईत दोन वर्षापूर्वी भावना गवळी यांनी संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीची थेट ‘मातोश्री’वर तक्रार करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्याचे शिवसैनिक सांगतात. त्यावेळी ‘मी शांत राहतो’, असा शब्द संजय राठोड यांनी पक्षप्रमुखांना दिला आणि तो खराही करून दाखवला. संजय राठोड यांचे असे गप्प राहणे हे पक्षहिताचे नसल्याचा साक्षात्कार मातोश्रीला अलिकडेच झाला. यवतमाळ-वाशिममध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवायचा असेल तर भावनाताई आणि संजय भाऊंमधील वाद सामोपचाराने मिटला पाहिजे, यासाठी थेट पक्षप्रमुखांनी मध्यस्थी केली. एक महिन्यापूर्वी मातोश्रीवरूनच जिल्ह्यातील या दोन्ही नेत्यांना पक्षहितासाठी सर्व मतभेद विसरून काम करण्याचे आदेश देण्यात आले.

या दोन वर्षात बरेच पाणी वाहून गेले. महाराष्ट्रात  एकमेव यवतमाळ जिल्ह्यात या दोन नेत्यांच्या सोयीप्रमाणे तब्बल तीन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भावनाताई व संजय राठोड यांच्या समर्थकांमध्ये उभी फूट पडली. ताईंना धडा शिकवायचा आणि भाऊंच्या वर्चस्वाला धक्का द्यायचे मनसुबे दोन्ही गटात रचले गेले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीने आदेश दिल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी सामान्य शिवसैनिक अजूनही अस्वस्थ आहे. गेली दोन वर्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले, आता एकमेकांच्या समर्थनार्थ जनतेसमोर कसे जायचे, या प्रश्नाने शिवसैनिक अधिक बेचैन झाले आहेत. मातोश्रीवरील बैठकीनंतर भावना गवळी व संजय राठोड हे दोन्ही नेते जिल्ह्यात एकदाही सार्वजनिक मंचावर एकत्र आले नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद केवळ छायाचित्र काढण्यापुरताच मिटला की काय, अशी शंका राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे. नेत्यांच्या सांगण्यावरून मतभेद मिटल्याचे दाखवता येईलही, मात्र या काळात झालेले मनभेद कसे मिटवायचे असा प्रश्न दोन्ही नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनाही पडला असल्याचे जाणवते.

भावना गवळी या चार टर्म या भागाच्या खासदार असताना विकासाच्या कोणत्याच खुणा मतदारसंघात दिसत नाही. ‘नागपूर-यवतमाळ-नांदेड’ या धिम्यागतीने काम सुरू असलेल्या रेल्वेमार्गाचे तेवढे पालुपद खासदार मिरवत असतात. या रेल्वेमार्गाचे खरे श्रेयसुद्धा काँग्रेसचे आहे, हे जनतेलाही माहीत आहे. निवडणूक आली की खासदार सार्वजनिक कार्यक्रमांसह मतदारसंघात सक्रिय होतात, अशी तक्रार मतदारांमधून केली जाते. जनतेची प्रचंड नाराजी, काँग्रेसने कुणबी, मराठा उमदेवार दिल्यास मतांचे होणारे विभाजन यामुळे यावेळी यवतमाळ-वाशिमचा गड राखणे शिवसेनेला कठीण जाईल, असेच संकेत आहेत. शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणातही यवतमाळ-वाशिमची जागा धोक्याच्या रेषेत आहे. हाच धागा पकडून मतदारसंघातील भावनाताई विरोधक एकवटले आहेत. केंद्रात युतीची सत्ता हवी असेल तर धोक्याचा इशारा असलेल्या यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेचा उमेदवार बदलविण्यात यावा, असा घोषा सुरू आहे. त्या अनुषंगाने यवतमाळ, दिग्रस, कारंजा येथील विद्यमान विधानसभा सदस्यांनी नुकतीच मुंबईत बैठक घेऊन यवतमाळ-वाशिमचा युतीचा संभाव्य उमदेवार बदलविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मनधरणी केली. यात विरोधकांना किती यश येते किंवा भावनाताईंना ‘तुम्ही मतदारसंघात कामाला लागा’ असे आदेश देणारे पक्षप्रमुख आपल्या शब्दावर कितपत ठाम राहतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

(टीम मीडिया वॉच)

००००००००००००००

Previous articleअकोला लोकसभा: आंबेडकर व काँग्रेसच्या भांडणाचा फायदा भाजपलाच
Next articleगांधीजी आणि जवाहरलाल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.