युद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…

-प्रवीण बर्दापूरकर

  केवळ तोंड पाटिलकी करत युद्धस्य तु कथा रम्याअसं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो , त्यात माणुसकी लोप असतो आणि सत्याचा कडेलोट असतो . ( महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळतांना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो . )  अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद चढलाय त्या पिसाटलेल्या माध्यमकर्मी आणि नमो भक्तांना हे सांगून काहीही उपयोग नाही . पुलावामाच्या घटनेनंतर देशभक्तीच्या नावाखाली जो कांही धुमाकूळ बहुसंख्य संस्कारी वर्गाकडून सध्या देशात माजवला जात आहे आणि देशभक्तीचा स्टॅम्प मारायची जी घाई झालीये ती अत्यंत घातक आहे ; त्यामुळे भाजपला निवडणुकीत कांही लाभ होईलही पण, खरंच युद्ध झालंच तर भारत किमान दोन-अडीच दशक मागे जाईल , हे लक्षात घ्यायला हवं.

सध्या भारत आणि पाकच्या दरम्यान जो कांही तणाव निर्माण झालेला आहे तो तसा कांही कांही नवा नाहीये . आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ साली युद्ध झाली आणि प्रत्येक युद्धात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलेला आहे . मात्र या एकाही पराभवातून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतलेला नाही उलट प्रत्येक युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव आणि समस्यात वाढच झालेली आहे . दोन्ही देशातील मुस्लिमांत असुरक्षेची भावना वाढली ; परिणामी काश्मीर प्रश्न अधिकाधिक क्लिष्ट होत गेलेला आहे . याच काळात दोन्ही देशातील कट्टर पंथीयात एकमेकाच्या विरोधात लढण्याची खुमखुमीही चढया क्रमानं वाढतच गेलेली आहे . तिकडच्या देशातील धर्मांधांना वाटतं की भारताकडून झालेल्या आजवरच्या पराभवाचा दहशतवादाच्या तरी मार्गानं बदला घ्यावा तर इकडच्या देशातील धर्मांमांधांना आधीच्या पाकिस्तानवरील विजयामुळे आलेल्या नशेची चटक लागलेली आहे . यात आजवर किती सामान्य माणसांचे बळी गेले आणि किती पिढ्या व लोक दहशतीच्या छायेत सलग जगत आहेत ; दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या अगणित कळ्या न उमलताच कुस्करल्या गेल्या आहेत , याची माणुसकीच्या पातळीवर मोजदाद करण्याचा प्रयत्न करण्याचं भान कुणालाच राहिलेलं नाहीये .

१९७१च्या युद्धाच्या परिणामाचे त्याचे चटके सहन करावी लागलेली हयात असलेली माझी पिढी आहे . त्या युद्धाचे परिणाम देशभर झाले होते . अधिकृत आकडेवारीनुसार त्या युद्धात भारताचे ३ हजार ८४३जवान शहीद झाले तर पाकिस्तानचे ८ हजार जवान मारले गेले ; म्हणजे एवढ्या कुटुंबातील सर्वांनी घरातलं कुणी तरी गमावल . युद्धात किती नागरिक मारले गेले आणि युद्धभूमीच्या बाहेर एकूण किती नुकसान झालं याची आकडेवारी जगातील आजवरच्या कोणत्याही युद्धानंतर कधीच जाहीर झालेली नाहीये . १९७१च्या युद्धाआधी आणि नंतरही बांगला देशातून जे निर्वासितांचे लोंढे भारतात आले त्याचा अति अतिरिक्त भार जनतेवर पडला . देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागात स्थानिक विरुद्ध बांगला देशीय असा नवीन संघर्ष उभा राहिला ; तो अजूनही शमलेला नाही . पूर्व पाकिस्तान नावाच्या शत्रुचं नामकरण बांगला देशी झालं एवढाच काय तो फरक पडला आणि भारत-पाकिस्तान-बांगला देश या देशातील समस्यांत भरच पडली ; सीमावाद , घुसखोरी , दहशतवाद्यांना आश्रय आणि उत्तेजन या समस्या आणखी उग्र झाल्या कारण पाकिस्तानचे तुकडे झाल्याने आणि ते तुकडे करण्यात पुढाकार घेतलेल्या भारताविरुद्ध टोकाचा द्वेष व कडवट भावना आणखी बळकट झाली ; या तीन देशातील धर्मांध पुजार्‍यांनी त्या भावनेचं सुडाग्नीत रुपांतर केलं .  

दुसरा मुद्दा म्हणजे १९७१चं युद्ध आणि मग आलेल्या दुष्काळानं या देशाच्या अर्थ व्यवस्थेचं कंबरडं मोडून टाकलं . निधी युद्धाकडे वळवला गेल्याने आणि सर्वच क्षेत्रात मंदीची लांट आली . हाताला काम नाही , खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशी ती भीषण स्थिति होती . आमच्या पिढीच्या अनेकांना ते दिवस आठवले तर , रांगा लावून मिळवलेल्या मिलोच्या खाल्लेल्या भाकरी आणि नोकरीसाठी केलेली वणवण आठवून आजही अंगावर कांटा आल्याशिवाय राहणार नाही . आताही भारत-पाकचे जवान सीमांवर एकमेकाकडे बंदुका रोखून उभे आहेत . अशी युद्धजन्य किंवा कोणत्याही क्षणी भडका उडेल अशी स्थिती कारगिल युद्धाच्या आधी आणि नंतर संसदेवर हल्ला झाला तेव्हाही निर्माण झालेली होती . तेव्हा दोन्ही वेळा मिळून सीमेवर  नुसतं सैन्य उभं ठेवण्याचा खर्च १८ ते २० हजार कोटी झाला असावा असा अंदाज होता . भारताच्या १२ मिराज विमानांनी परवा बालाकोटच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा खर्च ६ हजार ३०० कोटी रुपये आहे तर दोन्ही देशांची जी विमाने पडली   ( किंवा पाडली गेली ) त्याची किंमत अशीच हजार कोटींच्या घरात आहे , अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत . याशिवाय दारुगोळ्यावर होणारा खर्च तर अफाट आहे . अगदी ०.३२ क्षमतेच्या पिस्तुलाच्या एका गोळी(बुलेट)ची किंमत किमान ५० रुपये असते . युद्धभूमीवर तर कोट्यावधी गोळ्या , बॉम्ब आणि आणि दारुगोळ्यांचा संततधार वर्षाव होत असतो ; म्हणजे एका दिवसाचा युद्धाचा खर्च कसा हजारो कोटी रुपयांचा आहे याचा अंदाज येऊ शकेल . शिवाय त्या दारुगोळ्यांमुळे मरणारे नागरिक , प्राणी , पक्षी , उजाड होणारी जमीन आणि उध्वस्त होणारी शेती , मरणारी झाडं , ओझोनचा स्तर आणि पावसाच्या प्रमाणात होणारी घट याचा विचार या उन्मादात कधीच होत नाही .  अणुबॉम्ब वापरला गेला तर होणारी महाभयंकर हानी आणि वातावरणाचा होणारा वातावरणाचा प्रचंड हास याचा विचार तर अंगाचा थरकाप उडवणारा आहे . जी कांही माहिती प्रकाशित होतीये त्यानुसार दोन्ही देशातील महत्वाची शहरे अणुबॉम्बचे लक्ष असतील . तसं खरंच घडलं तर काय हाहा:कार उडेल याची कल्पना तरी केली जाऊ शकते का ? युद्धाची भाषा करणार्‍यांनी कधी रणभूमी पहिली तरी आहे का ? एखादं शस्त्र कधी हाताळलं आहे का ? आपल्या पोलीस मामाची साधी ३०३ बंदूक घेऊन दोन तास पहारा देऊन दाखवला तर युद्धाचा उन्माद चढलेले शेंदाड नमो भक्त ,  समाज माध्यमांवरचे वाचाळवीर आणि प्रकाश वृत्त वाहिन्यावरचे बाल बुद्धीचे अॅन्कर्स चार दिवस अंग शेकत बसतील अशी स्थिती आहे आणि तरी म्हणतात युद्ध हाच पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग आहे ! ( सेवा कार्यांचा सन्माननीय अपवाद वगळता ) प्रात:शाखेत जाऊन दंड फिरवणं , समाज माध्यमांवर मनाला येईल तशी बेताल कमेंट टाकणं किंवा अॅन्कर्स म्हणून बेताल बडबड करणं आणि प्रत्यक्ष युद्ध लढणं यात फार मोठ्ठं अंतर असतं , हे समजून घेणं या शेंदाडांच्या आकलनाच्या पलीकडचं वास्तव आहे . 

पाकिस्तान सध्या फार मोठ्या आर्थिक खाईत आहे . युद्ध लढण्याची क्षमताच या देशात नाही . प्रकाशित झालेल्या बातम्यांवरुन दिसतं आहे की पाककडे दोन आठवडे पुरेल एवढाही इंधनाचा साठा नाही ; पुरेसा दारुगोळाही नाही . पाक सैन्यही युद्ध करण्याच्या मन:स्थितीत नाही . शिवाय युद्ध सुरु करणं सोपं असतं ते थांबवणं मात्र युद्ध लढणार्‍या देशांच्या हातात कधीच नसतं ; त्याचा एक परिणाम म्हणून अन्य देशांची अनेक आघाड्यांवर बटीक व्हावं लागतं , याची जाणीव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना असावी असं दिसतंय हे सुचिन्ह आहे . हा मजकूर लिहीत असतांना इम्रान खान यांनी विनाअट चर्चेची तयारी दर्शविताना पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या भारताच्या वैमानिकाला सोडण्याची घोषणा करुन आणि ती अंमलात आणून नमतं घेतलेलं आहे . त्यामुळे नाक ठेचलं वगैरे उन्माद न दाखवता , आपली समस्या पाकिस्तान नाही तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे हे लक्षात घेऊन बालाकोटला केले तसे हल्ले करणं आणि दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करणं , मसूद अजहर , दाऊद इब्राहीम सारख्यांना कायमचा धडा शिकवणं , कुलभूषण जाधव यांची सुटका करवून घेणं आणि दहशतवादाला पाठीशी घातल्याबद्दल पाकिस्तनाची जागतिक पातळीवर आता केली आहे त्यापेक्षा सर्व बाजूने जास्तीत जास्त कोंडी करणं , ही आणि केवळ हीच नीती असायला हवी . ही प्रक्रिया दीर्घकालीन असेल तरी तीच कायमस्वरुपी असेल . माथी भडकावून युद्धज्वर निर्माण करुन देशात कायम उन्मादाचं वातावरण पेटतं ठेवणं कोणाच्याच हिताचं नाही .

राहता राहिला , विद्यमान युद्ध सदृश्य वातावरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राजकीय फायदा उठवत असल्याचा मुद्दा . पराक्रम हवाई दलानं केलाय नरेंद्र मोदी किंवा सरकारनं नाही असा विरोधकांचा दावा आहे आणि तो खराही आहे . आपल्या देशात प्रत्येकच मुद्दयाचं राजकारण करण्याची प्रथा निर्माण झालेली आहे . बांगला आणि कारगिलच्या युद्धातही सैन्यच लढलेलं होतं तरी बांगला युद्धातिल यशाचं व बांगला देशच्या निर्मितीचं श्रेय इंदिराजी गांधी आणि कारगिल विजयाचं श्रेय अटलबिहारी वाजपेयी या तत्कालीन पंतप्रधानांनाच मिळालं ; सैन्याला नाही . कोणत्याही सरकारच्या काळात झालेल्या प्रत्येक चांगल्याचं श्रेय त्या सरकारच्या नेतृत्वाला मिळतं आणि अपयशाचाही धनी तोच होतो ही वैश्विक रीतच आहे . चीन विरुद्ध झालेल्या युद्धातल्या पराभवाची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नम्रपणे आणि खळखळ न करता स्वीकारली होती . अपयशाचं श्रेय घेण्याची हिंमत इंदिराजी आणि वाजपेयी यांच्यात जशी होती तशी ती विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नाही . या काळात मोदींनी दाखवलेली विरोधी पक्षांना तुच्छ लेखण्याची वृत्तीही लोकशाहीला शोभेशी नाही . विरोधी पक्षांच्या या काळात झालेल्या बैठकींना ते उपस्थित राहण्यात पंतप्रधानपदाची शान होती . पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची चांगली कामगिरी बजावूनही त्यांची अशातली भाषण ऐकतांना ते गंभीर पंतप्रधान न वाटता नौटंकीबाज नेते वाटू लागले आहेत . निश्चलनीकरणानंतर ही निर्माण झालेली प्रतिमा विद्यमान तणावाच्या परिस्थितीत बदलण्याची संधी मोदी यांनी गमावली आहे . कारण नरेंद्र मोदी हे स्वप्रतिमेच्या आहारी गेलेले नेते आहेत !       

 +919822055799
(लेखक महाराष्ट्रातील जेष्ठ्य संपादक आहेत)

 

Previous articleकौशल्याचा पॅसिफिक : डॉक्टर प्रशांत कसारे
Next articleयुतीनंतरही सेनेसमोर अडथळेच जास्त !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.