जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १०
साभार – साप्ताहिक साधना
– सुरेश द्वादशीवार
नेहरू युरोपात असताना ब्रुसेल्स येथे भरलेल्या साम्राज्यवादविरोधी नामवंतांच्या परिषदेला गेले. तीत लिग ऑफ अॅन्टिइम्पेरियालिझम ही संघटना स्थापन झाली. अॅल्बर्ट आईन्स्टाईन, मादाम सन् यत् सेन व रोमारोलाँसारख्या थोरामोठ्यांचा त्यात समावेश होता. नेहरूही त्या संघटनेचे सभासद झाले. मात्र ही संघटना फारशी चालली नाही. तिने घेतलेल्या ज्यू विरोधी भूमिकेमुळे आईन्स्टाईन तिच्यातून प्रथम बाहेर पडले. पुढे गांधींनी लॉर्ड हॅलिफॅक्स व लॉर्ड इर्विन यांच्याशी केलेल्या करारामुळे त्या संघटनेने नेहरूंनाही बाहेर पडायला लावले. प्रत्यक्षात त्या संघटनेवर कम्युनिस्टांचा ताबा होता. साम्राज्यवादाविरुद्धचे एक व्यासपीठ म्हणूनच नेहरूंनी त्यात सहभाग घेतला. याच काळात युरोपात वास्तव्य करणार्या काही क्रांतीकारी कार्यकर्त्यांचीही नेहरूंनी भेट घेतली. पण ते त्यांच्यामुळे फारसे प्रभावित झाले नाही. त्यातले बरेचजण कमालीची सामान्य बुद्धी असलेले होते. श्यामजीकृष्ण वर्मा हे वयोवृद्ध क्रांतिकारक कमालीचे संशयी बनले होते आणि आपल्याकडे येणारा प्रत्येकचजण सरकारी हेर असल्यासारखे वागत होते. त्यांचे मानसिक संतुलनही वयोमानानुसार बिघडले होते. एकेकाळचा त्यांचा दरारा ओसरला होता आणि त्यांचे आयुष्य दयनीय म्हणावे असे झाले होते.
राजा महेंद्रप्रताप हा क्रांतिकारी इसम त्यांना भेटायला आला तोच मुळी विचित्र पोषाखात. त्याच्या अंगावरच्या कपड्यांना नुसतेच खिसे होते आणि त्यात कागदांची भेंडोळी होती. ही सारी सामुग्री मी माझ्याजवळ सदैव ठेवतो असे म्हणणारे हे प्रताप सारे जग हिंडले होते. तुर्कस्थानात काहीकाळ राहिलेले मौलाना ओबेदुल्लाही नेहरूंना याचवेळी भेटले. त्यांनी संयुक्त भारताची एक योजना तयार केली होती. पण नेहरूंना ती कागदावरच चांगली वाटली. मादाम कामांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी त्या ठार बहिर्या झाल्या होत्या आणि प्रत्येकावर प्रश्नांची सरबत्ती करीत होत्या. नेहरूंनाही त्यांनी सोडले नाही. इतरांची उत्तरे ऐकायला मात्र त्या तयार नव्हत्या. नेहरूंनी त्यांचे वर्णन ‘फ्रेंच राज्यक्रांतीच्या पुस्तकातून अवतरलेली स्त्री’ असे केले आहे. बरकतशहा या क्रांतीकारी इसमालाही ते भेटले. दीर्घकाळ भूमिगत राहिलेल्या या इसमाने पुढे अमेरिकेतील सानफ्रॅन्सिस्को येथे आत्महत्या केली. येथेच नेहरूंना सरोजिनी नायडूंचे बंधू वीरेंद्रनाथ चट्टोपाध्यायही भेटले व त्यांचा चांगला स्नेह जुळला. चम्पकारमण पिल्ले या नाझी कार्यकर्त्याशीही त्यांची भेट झाली. अतिरेकी राष्ट्रवादाने पछाडलेल्या या पिल्लईचा १९३० च्या दशतकातच बर्लिनमध्ये मृत्यू झाला.
वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय दारिद्य्रात जीवन कंठत होते. त्यांचे कपडे मळलेले आणि फाटकेही होते. मात्र ते हसरे होते. बोलण्यात कडवटपणा नव्हता. स्वातंत्र्यासाठी आपण पत्करलेल्या गरिबीचा त्यांना अभिमान होता. दुसर्या महायुद्धाच्या काळात त्यांचा मॉस्कोत मृत्यू झाला, एकाकी आणि मित्रहीन अशा अवस्थेत. याच काळात त्यांची दोन अमेरिकेन स्नेह्यांशी मैत्री जुळली. रॉजर बाल्डविन हा मानवी अधिकाराच्या क्षेत्रात काम करणारा तर दुसरा जन्माने भारतीय लेखक असलेला. लहान मुलांसाठी आकर्षक पुस्तके लिहिणार्या या लेखकानेही पुढे अमेरिकेतच आत्महत्या केली.
मोतीलालजी इंग्लंडला परत येतपर्यंतचा काळ नेहरूंनी प्रवास व स्थळांना दिलेल्या भेटीत घालविला. ते नॉर्वेत असताना पायाखालचा कच्चा बर्फ कोसळल्याने ते खोल दरीत पडले व काही काळ इस्पितळात राहिले. त्याआधीही एका धबधब्याखाली स्नान करीत असताना ते असेच अपघातग्रस्त झाले होते. मात्र या काळात त्यांच्या लक्षात आलेली व दीर्घकाळ परिणाम करणारी बाब इंग्लंडची न्यायालये व सरकार तेथील कामगारांना न्याय देत नसल्याची व आपल्याच श्रमिकांशी दुष्टाव्याने वागणार्या उद्योगपतींना साथ देत दिसल्याची होती. ही बाब नेहरूंना जगभरच्या कामगारांची दुस्थिती व त्यांचे होणारे शोषण समजावून देणारी ठरली.
१९२४ मध्ये रशियात होणार्या क्रांतीच्या वर्धापन दिनाचे निमंत्रण त्यांना व मोतीलालजींनाही आले. मोतीलालजी रशियात जायला फारसे उत्सुक नव्हते. पण नेहरूंनी त्यांना आग्रह करून सोबत नेले. लहानगी कृष्णाही त्यांच्यासोबत होते. रशियात सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण होते. मोतीलालजींना मात्र तो सारा प्रकार काँग्रेसच्या अधिवेशनासारखाच वाटला. मॉस्कोतील क्रेमलिनच्या राजवाड्याशेजारी एक अतिशय देखणे व संपन्न चॅपेल आहे. त्यात स्त्रियांची गर्दी होती. मात्र चॅपेलच्या प्रवेशद्वारावरच मार्क्सचे वचन कोरले होते. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’.
मॉस्कोत त्यांचा मुक्काम चार दिवसांचा होता. या काळात त्यांनी क्रांतीच्या वर्धापनदिनाचा सोहळा अनुभवला. तेथील नृत्ये पाहिली. माणसांच्या अंगावर साधी वस्त्रे असलेली व त्यावर कोट वा गरम कपडा नसल्याची बाबही त्यांना चकित करून गेली. या मुक्कामात दोन्ही नेहरूंनी कालिनीन या रशियाच्या तत्कालीन अध्यक्षांची भेट घेतली. तीन खोल्यांच्या साध्या घरातले त्यांचे वास्तव्यही त्यांना चकीत करून गेले. त्या घरात शोभेच्या व चैनीच्या वस्तू नव्हत्या. परराष्ट्र मंत्री चिचेरीन यांचे घर त्याहून लहान आणि साधे होते. मात्र त्यांनी नेहरूंना दिलेली भेटीची पहाटे चार वाजताची वेळ मोतीलालजींचा संताप वाढविणारी होती. मग ती बदलून पहाटेच्या एक वाजताची करण्यात आली.
नंतर त्यांनी लेनिनच्या समाधीलाही भेट दिली. मॉस्कोच्या भव्य लाल चौकात क्रेमलिनच्या राजवाड्याभोवती असलेल्या किल्लेवजा भिंतीजवळ ही समाधी आहे. त्यातले लेनिनचे रूप नेहरूंना फारसे आकर्षक वाटले नाही. समाधीत रशियन मातीचा वास होता. मात्र लेनिनचा देह आणि चर्या यावर एक कमालीचा आदर वाटायला लावणारा ताठा होता. त्याच्या ओठांवर किंचितसे हसू होते. आयुष्यभर केलेल्या कष्टांचा आणि त्यात मिळविलेल्या यशाचा त्यावर अभिमान होता. त्याचा देह गणवेषात होता आणि त्याच्या एका हाताची मूठ वळलेली होती… मरणातही त्याचे हुकूमशहा असणे जाणवत होते ही त्याविषयीची नेहरूंची नोंद.
(प्रस्तुत लेखकाने २०१२ मध्ये लेनिनच्या समाधीला भेट दिली. यावेळी त्याच्या अंगात काळ्या रंगाचा सूट, पांढरा शुभ्र शर्ट आणि गळ्यात काळ्याच रंगाचा टॉय होता. त्याचे गोरेपण त्यावरच्या पावडरीमुळे आणखी उठावदार दिसत होते. मात्र पुतळ्यात व छायाचित्रात दिसणारी लेनिनची उंची त्यात दिसली नाही. त्याचा देह लहानखुरा व काहीसा ठेंगणा म्हणावा असा दिसला. मात्र त्याच्या चर्येवरचा हुकूमशहाचा करडेपणा तसाच होता. तो एकाचवेळी आकर्षक व आदरणीयही होता. समाधीगृहातले वातावरण शांत व गंभीर होते. पहार्याला असलेले सैनिक एकेकाला अदबीने समोर सरकायला सांगत होते. लेनिनचे शव पाहणार्यावर एक खोलवर परिणाम करणारे हे वातावरण मात्र नक्कीच होते.)
रशियन हुकूमशाहीत मोतीलालजींचा जीव रमला नाही आणि त्या देशाने लोकशाही कधीच अनुभवलीच नाही हे नेहरूंच्याही मनात येत राहिले. मार्क्सवादी क्रांतीने राजेशाही संपविली, सरंजामदार निकालात काढले आणि श्रमिकांना व कुळांना मोकळे केले एवढेच. मात्र स्टॅलिनच्या काळात त्याही दोन वर्गांना वेठीला धरून त्याने लष्करी व आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाची जी कमालीची क्रूर म्हणावी अशी कठोर अंमलबजावणी झाली ती नेहरूंनाही नजरेआड करता येणारी नव्हती. त्यामुळे मार्क्सची तत्त्वे मान्य पण कम्युनिस्टांची राजवट अमान्य अशी काहीशी त्यांच्या मनाची अवस्था होती. तशातच त्यांना भारतात परतण्याचे वेध लागले होते.
(ऑर्थर पामर या अमेरिकन राजदूताने विसाव्या शतकात जगात झालेल्या हुकुमशहांनी मारलेल्या व मरायला लावलेल्या माणसांची एकूण संख्या १६ कोटी ९० लक्ष एवढी सांगितली आहे. त्यात हिटलरने दोन कोटी, स्टॅलीनने पाच कोटी तर माओने मारलेल्या सात कोटी माणसांचा समावेश आहे. या आकड्यात युद्धात मेलेल्यांची संख्या समाविष्ट नाही. या तीन हुकूमशहांखेरीज जगातल्या बाकीच्या लहानसहान हुकूमशहांनी उरलेल्यांचे जीव घेतले आहेत. ही आकडेवारी तेव्हाही अंगावर शहारे आणणारी होती व आजही आहे.)
भारतातले राजकारण दीड वर्षात बदलले नव्हते. शस्त्राचार्यांनी ठिकठिकाणी पाडलेल्या खुनांची संख्या वाढली होती. १९२६ मध्ये मुस्लिम धर्मांधांनी स्वामी श्रद्धानंदांची हत्या केली होती. त्यांच्या मृत्यूने नेहरू कळवळले. श्रद्धानंदाची देशभक्ती, धाडस व सर्वांना सोबत घेण्याची वृत्ती त्यांना परिचित होती. इंग्रज पोलिसांनी त्यांच्या छातीवर बंदुकांच्या बायोनेट्स रोखल्या तेव्हा त्या थोर देशभक्ताने आपली विशाल छाती त्यांच्यासमोर उघडी करून त्यांनाच आव्हान दिले होते. नेहरूंच्या मनात त्या सार्या आठवणी तरळल्या आणि भारतात शक्यतो लवकर परतण्याची त्यांची तळमळ वाढली.
नेमक्या याचवेळी इंग्लंडमधील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या स्टॅनले-बाल्डवीन सरकारने भारतासाठी संवैधानिक सुधारणा सुचवायला जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची स्थापना केली. या कमिशनमधील सगळेच सभासद ब्रिटीश असल्याने त्याला आरंभापासूनच भारताच्या रोषाला सामोरे जावे लागले. हे कमिशन पाठविण्यामागे इंग्लंडचे राजकारणही कारणीभूत होते. हे कमिशन काँग्रेस व अन्य पक्षात एकवाक्यता घडवून आणेल व त्याचवेळी हिंदू आणि मुसलमान यांच्यातील दुभंगही दूर करील असे सांगितले गेले. प्रत्यक्षात मात्र इंग्लंडमध्ये पुढील वर्षी निवडणुका व्हायच्या होत्या आणि त्यात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष पराभूत होणार अशी चिन्हे दिसत होती. आपल्या पश्चात येणारे लिबरल पक्षाचे सरकार भारताला जास्तीची स्वायत्तता देईल ही भीती कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला व त्याचे भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांना वाटत होती. त्यामुळे कमिशन नेमण्याचा अधिकार आपणच वापरावा व भारताला शक्यतो मर्यादित स्वायत्तता द्यावी हा सायमन कमिशनच्या नियुक्तीमागचा खरा हेतू होता. भारतीय नेत्यांनाही तो चांगलाच कळणारा होता. त्यामुळे या कमिशनमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्याचा मुद्दा पुढे रेटत भारतात सायमनविरोधी आंदोलनाची तयारी सुरू झाली. प्रत्यक्षात ते आंदोलनही देशव्यापी व प्रचंड म्हणावे असे झाले. ८ नोव्हेंबर १९२७ ला या कमिशनच्या नेमणुकीची बातमी नेहरूंना ते मॉस्कोत असतानाच समजली आणि ते भारतात परतण्याच्या तयारीला लागले. परतताना ते लंडन मार्गे आले. जॉन सायमन हे नामांकीत वकील होते आणि मोतीलालजींचा त्यांच्याशी व्यावसायिक संबंधही होता. प्रिव्ही कौन्सिलसमोर सुरू असलेल्या एका खटल्यात ते दोघे एकाच अशिलाची बाजू लढवीतही होते. त्यामुळे लंडनला येऊन व सायमन यांच्याशी बोलणी करून मोतीलालजींनी ते काम हातावेगळे केले. त्यांच्या एका भेटीच्यावेळी नेहरूही त्यांच्यासोबत होते.
१९२७ चे काँग्रेसचे अधिवेशन याच सुमारास मद्रासमध्ये व्हायचे होते. त्याला हजर राहण्यासाठी नेहरू कुटुंब मग कोलंबो मार्गे मद्रासला पोहोचले. या सार्या काळात कमला नेहरू आणि कृष्णा कुटुंबासोबत होत्या. मोतीलालजी मात्र मद्रासला न येता युरोपातच काही काळ थांबले.
(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)
9822471646