ये व्हायरस व्हायरस क्या है… ये व्हायरस व्हायरस !

-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

गेल्या २०-३० वर्षांपासून व्हायरसने धुमाकूळ घातलाय. कधी तो HIV म्हणून पिडतो, तर कधी तो MERS, SARS च्या रूपात धमकावतो, कधी इबोला, कधी स्वाईन फ्लू, तर आज आलाय तो “कोरोनाच्या” नावाने आणि कर्दनकाळ ठरलाय. आणि ही आताशी सुरुवात आहे.

कोरोना तसा नवीन नाही. कोरोनाचे सात प्रकार. पहिले चार तेवढे गंभीर नव्हते – २ अल्फा, २ बीटा, पण पाचवा आला तो MERS आणि सहावा SARS. या दोघांनी जो धुमाकूळ घातला, तोही भयंकरच होता. मग आलं त्याचं पुढचं व्हर्जन – “कोव्हीड १९”. कोव्हीड १९ हा SARS च आहे. पण अतिसुधारित आवृत्ती.

—————-

पण हे व्हायरस मुळात येतातच का ? आणि त्यांचा काहीतरी परपज असावा ? कि नुसतंच यायचं, पेशी प्रदूषित करत त्या जीवाला मारून टाकायचं ? येवढंच काम ? आणि हे असला प्रकार हा आताआताच का ?

ही सगळी उत्तरं शोधण्याआधी ‘व्हायरस’ म्हणजे काय बघूया.

———–

व्हायरस, हा प्रकार फार इंटरेस्टिंग आहे आणि ज्याप्रकारे तो काम करतो, ते अजूनही इंटरेस्टिंग आहे. व्हायरस हा ना धड सजीव आणि ना धड निर्जीव. म्हणजे त्याची कॅटेगरी ही, सजीव आणि निर्जीव, अशा मध्ये कुठेतरी केली जाते. अर्थात ‘सजीव’-निर्जीव’ या शब्दाची आपली जी सध्याची व्याख्या आहे, त्यात तो पूर्णपणे कशातही बसत नाही.

एक ‘मायक्रो-ऑरगॅनिजम’, जो डोळ्यांनाही दिसत नाही.
त्याच्या तुलनेत बॅक्टेरिया पण प्रचंड मोठा, २०० पटीने मोठा. पण बॅक्टेरिया सजीव, कारण तो शरीराच्या बाहेरही राहू शकतो, आतही राहू शकतो आणि कुठल्याही वातावरणात स्वतःला तो ऍडजस्ट करून घेऊ शकतो. गंमत म्हणजे ९९ टक्के बॅक्टेरिया आपल्या फायद्याचे असतात. दही, वगैरे उदाहरण. फक्त १ टक्का बॅक्टेरिया आपली बूच लावायचा प्रयत्न करतो.

पण व्हायरस, हा बांडगुळ. ह्याला जगण्यासाठी पेशी लागते. मग ती पेशी वनस्पती असो, प्राणी, पक्षी असो की आपल्या माणसांची. तो बाहेर तरू शकत नाही. एवढंच काय, तर तो बॅक्टेरियाला देखील इन्फेक्ट करू शकतो. त्याला पेशी असण्याशी मतलब. (अर्थात काही बॅक्टेरिया देखील बांडगुळ आहेत, ज्यांना Cell membrane नाही.)

तर वायरस म्हणजे, एक ‘कण’, जो मध्यभागी ‘RNA किंवा DNA’ घेऊन चाललाय. स्वतःहून जिवंत राहण्यासाठी लागणारं ‘cell membrane’ भाऊकडे नाही. त्यामुळे त्याला इतर पेशींवर आक्रमण करून त्यांची मशिनरी वापरावी लागते.

————————————

ते ठीक, पण याचा जन्मच का आणि कसा झाला ?

तर त्यावर बरेच सायंटिस्ट आपली डोकी फोडत आहेच. तशी त्यांनी ‘कदाचित’,’ जर-तर’ वगैरे हायपोथेसिस मांडले आहेत. पण व्हायरसच्या युनिक Reproduction स्किलमुळे साला ते कधीचे आहेत, कुठून आलेत, कसे आलेत हे सांगणं कठीण जातंय.

आणि का आले ? याचं उत्तर प्रश्नार्थी आहे .
माशी का आली, डास का आले ? आपल्याला त्यांचा त्रास होत असला तरी त्यांचा स्वतःची एक लाईफ आहेच की, आणि आपल्यासारखे ते देखील बांडगूळच. आपण “जेवणासाठी” अवलंबून, ते “जीवनासाठी” अवलंबून. निसर्गाचा खेळ. आता निसर्ग काय आपल्या बापाचा थोडीच आहे. खरंतर आपल्याहून निसर्गाची कोणीच मारली नसेल….

———————————–

तर हा एक व्हायरस, जो एक RNA / DNA चा कण आहे, ज्याला डोळे नाहीत, हात-पाय नाहीत. तो कोणाला टार्गेट करत नाही. तो कोणाला भक्ष्य बनवत नाही. तो स्वतःहून एका जागेतून दुसरीकडे जातही नाही. आपण त्याला ढकलतो. म्हणजे माझ्या शरीरात गेल्यावर, मी शिंकणार-खोकणार, आणि तिथून आपण तो दुसरीकडे फेकणार. एकूण आपलीच सिस्टम त्याला पोसते आणि पसरवते देखील. थोडक्यात काय तर, मायलोर्ड, व्हायरस आज भी नंगू कि तरह पवित्र है. आसू दे आसू दे.

तर आता हा गेला शरीरात. तो घुसला आपल्या पेशीत. आणि आपल्याच पेशींची सगळी मशिनरी वापरून, ऊर्जासाठा वापरून हा त्या पेशीवरच डोईजड होतो. म्हणजे त्या पेशींचं पूर्वीचं काम तर ठप्प होतंच, पण त्या पेशीतली मशिनरी वापरून, तो आपली फौज निर्माण करतो… आणि ती फुग्यासारखी पेशी फाडून हे सगळे बाहेर पडतात आणि इतर पेशी नासवायला घेतात.

ते मॅट्रिक्स मध्ये, Mr Smith नाही का सगळ्यांना Smith करतो…. “Me Me Me and Me…… Me Too”

———————————-

 ऑरे पॉन मॉग ते तुमचं विज्ञान विज्ञान करता, ते औषध का कॉढत नॉही. देव ऑहे हे कॉबुल कॉरा ना
अरे गाबण्या, तुमचा देव तरी काय झक मारतोय बे… तुम्ही तर साला त्याला पण मास्क लावून बसलात….

तर औषधाचा प्रॉब्लेम असा आहे की, हे व्हायरसची उत्क्रांती होत चाललेय. म्हणजे ?
म्हणजे औषधं दिली, की तो अजून ‘टग्या’ बनत चाललाय. एक प्रकारे औषधं त्याला अजून कणखर बनवतायेत. आणि ‘Viral Evolution’ ही येत्या काळात फार फार मोठी समस्या बनणार आहे. HIV ने लोक यासाठी मरत नव्हते की, तो विषारी वगैरे आहे…. पण त्याला थांबवण्यासाठी/नष्ट करण्यासाठी कुठली औषधं त्याच्यावर फरकच पाडत नव्हती. आता ‘कोरोनाची’ही तीच परिस्थिती आहे.

त्यामुळे आपणही दोन चुका करणं टाळायला हवं –

१. छोटे-मोठे ताप-खोकला सर्दीसाठी औषधं घेऊ नये. तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीनेच ती मारली जावीत. नाहीतर तुम्ही उद्या कोरोनासारख्या आजारांवर लढायला कमकुवत ठरता. “पॅरासिटामोल, पेनकिलर” वगैरे घेण्याआधी शंभरवेळा विचार करायला हवा की खरंच गरज आहे का ? तुमच्या शरीराला लढू द्या. अगदी मरायलाच टेकला असाल तर गोष्ट वेगळी आहे.

२. जर डॉक्टरने औषधांचा डॉस दिलाच असेल, तर तो कोर्स पूर्णतरी करा, नाहीतर अजिबात हात लावू नका. ४ दिवसांचा कोर्स असेल आणि तुम्ही दोन दिवसांनी म्हणाल, मला बरं वाटतंय, आता नको गोळ्या-औषधं, तर तुम्ही त्या व्हायरसला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करताय. म्हणजे असं होऊ शकतं की, दोन दिवसांच्या गोळ्या-औषधांनी ते झालेत मलूल, कारण ते पण तर फाईट करत असणार, नाही का ? मग जसं तुम्ही गोळ्या-औषधं थांबवणार, तसं ते अजून जोमाने काम करणार आणि कदाचित, पुढच्या वेळी त्या औषधांचा फरक पडणार नाही. म्हणजेच तुम्हीच तुमच्या शरीराची खोलून मारता आहात हे लक्षात ठेवा.

——————————–

बरं, हे आताच कुठून आले सगळे व्हायरस ?

झालं काय, आपली हाव अति झालेय. आपल्याला जागा पुरेनाशी झालेय. आपण जंगलं जाळत चाललोय. जंगली प्राण्यांच्या कत्तली करत चाललोय. त्यांना खात चाललोय. त्यामुळे ज्या जंगली प्राण्यांचा आपल्याशी कधी संबंध आलेला नाही, त्यांचा आपल्याशी जवळून संबंध यायला लागलाय, त्यामुळे त्यांच्यावर जगणारे व्हायरस आपण ओढून घेत चाललोय. मग तो कधी इबोलाच्या नावावर असतो, कधी एड्स, कधी स्वाईन फ्लूच्या … तर आज आहे “कोरोना” च्या नावाखाली. आपण फक्त नावं बदलतोय… पद्धत एकच.

उद्या अजून काही वेगळं असणार आहे.

एकंदर पाहता निसर्गाने माणसाची ‘बुद्धिशाली’ वगैरे जी काही लायकी काढलेय, त्यावरून शिकण्यासारखं आहे. हे जाहीर आहे की आपण त्यातून कधीच शिकणार नाही. आपली हाव आपला विनाश करणार हे ठाम आहे. ग्लोबल वॉर्मिंग होतंच, त्यात आता हे युद्ध.

बरं, जरी उद्या त्याच्यावर Vaccine शोधलं, तरी Wild प्राण्यांची तस्करी थांबणार नाही, अंधश्रद्धेखाली त्यांना मारलं जाणार, खाल्लं जाणार…
अजून ५/६ वर्षांनी अजून काहीतरी विचित्र भीषण रूप घेऊन निसर्ग आपल्यासमोर उभा राहणार आहे.

आणि अशावेळी ना तुमची करोडोंची इस्टेट मदतीला येणार, ना तुमचा बॅंकबॅलंस. अशावेळी फक्त तुम्हाला आधार देणार आहे, ते म्हणजे तुमचं आरोग्य.

मग आपण आपला विचार कसा करायचा ?

– रोज कमीतकमी आपल्या शरीरात ५ रंगांचा आहार जायला हवा. यात पालेभाज्या-फळभाज्या आणि फळं, दही… वगैरे आहारात असावंच असावं.
– रोज कमीतकमी अर्धा तास, दम लागेल असा-घामाघूम होईल असा व्यायाम करणं अत्यावश्यक आहे. (आठवड्यातून ४ दिवस कमीतकमी)
– आमदाराच्या / नगरसेवकाचे किंवा आपल्या आवडत्या मंत्र्यांच्या चड्डीत किती शष्प आहे, अशा रिकामचोट राजकारणी विषयांचा इंटरेस्ट असण्यापेक्षा, आरोग्यावर नवीन काय शिकायला मिळतंय… नवीन काय अंगिकारता येईल, याचा सातत्याने पाठपुरावा करणं अत्यावश्यक आहे.
– शरीराबरोबर मन कसं निरोगी ठेवता येईल… हे पाहायला हवं.

शेवटी, ‘सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट’, हाच एक निसर्गाचा नियम उरणार आहे. फिट तरणार, दुबळा मरणार.
आपल्याला कुठल्या कॅटेगरीत बसायचंय हे ठरवून तशी ठोस पावलं टाकावी लागतील.

बाकी, कुठल्यातरी महान विद्वानाने म्हटलंच आहे –
“आयुष्य सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन”

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात)

Previous articleतिन्ही ‘लोक’ आनंदे कसे भरतील?
Next articleकोरोना व्हायरसनंतरचे जग
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.