रवीश नावाचा आतला आवाज !

 

-विजय चोरमारे

आजच्या काळातली मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता जिथं थांबते, तिथून पुढं रवीश कुमारची पत्रकारिता सुरू होते.

आपण ज्या दुनियेत आलो आहे त्या दुनियेत येणारं बुजरेपण एकीकडं आणि आपण जिथून आलोय त्या मातीशी या दुनियेचं कुठल्याही प्रकारचं नातं नसल्याची आतून पोखरणारी जाणीव दुसऱ्या बाजूला असते. त्यातूनच येणारा न्यूनगंड आणि आत्मविश्वास गमावण्याच्या टोकावरचं नैराश्य आतून उगवायला लागलेलं असतं. मोडून पडायला एखादी काडीही पुरेशी असते, त्याचप्रमाणे स्वतःच्या क्षमतेची जाणीव होण्यासाठीही एखादा क्षण, एखादी घटना पुरेशी असते. अशा प्रसंगी स्वतःची क्षमता सिद्ध करून परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन एखादा रवीश कुमार उभा राहत असतो. तेव्हा खेड्यापाड्यांतून येणा-या हजारो तरुणांचा आत्मविश्वास द्वगुणित होत असतो. असा हा रवीश कुमार स्वतःची वाट चोखाळत पुढे जात राहतो. अर्थात कितीही बुद्धिमान, निडर पत्रकार असला तरी एकट्याच्या हिंमतीवर असं कुणी काही करू शकत नाही. त्याला प्रणय रॉय, राधिका रॉय यांच्यासारखे मालक, ऑनिंद्यो चक्रवर्ती यांच्यासारखे संपादक, सहकारी आणि एनडीटीव्हीसारखी संस्था मागे उभी असावी लागते. रवीश कुमार घडण्यासाठी वातावरणही तसं असावं लागतं. नाहीतर पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्द्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न पुण्यप्रसून वाजपेयींनी केला आणि संपूर्ण एबीपी न्यूजचीच आर्थिक मुस्कटदाबी झाली. प्रसारणात व्यत्यय आणला गेला, प्राइम टाइमच्या कार्यक्रमाची चित्रं हलू, थरथरू लागली. पुण्यप्रसूनना नारळ दिल्यानंतर पडद्यावरचं चित्र स्थिर झालं. या घटनेला काही महिन्यांचाच काळ लोटलाय. एनडीटीव्हीची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले नाहीत असं नाही. झाले आणि अजूनही सुरू आहेत. परंतु प्रणय रॉय खंबीरपणे उभे राहिले. ते उभे राहिले म्हटल्यावर लाजेकाजे का होईना त्यांच्यामागं इतर काही आजी-माजी पत्रकार, पत्रकार-संपादकांच्या संघटना, वृत्तसमूहांच्या काही मालकांना उभं राहून एकीचं चित्र उभं करावं लागलं.

असं सगळं असलं तरी रवीश कुमार बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे.

बिहारमधल्या छोट्याशा खेड्यातून आलेला रवीश आपल्यासोबत तिथल्या मातीचा गंध घेऊन राजधानीत आला. तो येताना फक्त आपलं गावच नव्हे, तर खेड्यात पसरलेला सत्तर टक्के ग्रामीण भारत आणि त्या भारताचं आकलन घेऊन आला. आणि हेच त्याचं इतरांपेक्षा अधिक मोठं भांडवल होतं. त्याच्याजोडीला त्याच्याकडं होती कमालीची संवेदनशीलता आणि उच्च कोटीचं कारुण्य. जिथं माणसाचं दुःख आहे, तिथं बातमी आहे ही धारणा जोडीला होती. आणि आपल्या बातमीमुळं त्या माणसाचं गुंजभर दुःख हलकं झालं तरी पत्रकारितेचं सार्थक झालं अशी भूमिका होती. खेड्यातल्या माणसाकडं असणारं निर्मळ मन हे त्याच्याकडचं अधिकचं भांडवल होतं. त्याच निर्मळपणाच्या बळावर तो राजधानीतल्या प्रपातामध्ये एखाद्या झ-यासारखा स्वतःचा प्रवाह घेऊन झुळझुळत राहिला. बातमी म्हणजे मंत्री, संत्री, बडे नेते, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या फायद्यासाठी-तोट्यासाठी घडवलेल्या फंदफितुरीच्या, दगाबाजीच्या कपोकल्पित कहाण्या अशी समजूत असताना आणि हे म्हणजेच मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता अशी समजूत असण्याच्या काळात तो त्यांच्या भाषेत बोलायचं तर काठाकाठानं चालत राहिला. परंतु लोकांचं मुख्य धारेकडं असलेलं लक्ष त्यानं आपण चाललो असलेल्या काठाकडं कधी खेचून घेतलं हे त्या मुख्य धारेतल्या बुजुर्गांना कळलंसुद्धा नाही.

रवीश कुमार एनडीटीव्हीमध्ये आला, ते साल १९९६ होतं. म्हणजे नव्या आर्थिक धोरणाचं बस्तान बसलं होतं आणि जागतिकीकरणानं कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलं होतं. माध्यमांचं बाजारीकरण सुरू झालं होतं. बहितांश मुद्रित माध्यमांनी पेड न्यूज हा रीतसर व्यवहार म्हणून स्वीकारला होता, त्यात कुणालाच काही गैर वाटत नव्हतं. सर्व क्षेत्रांत प्रायोजकांचं प्रस्थ वाढू लागलं होतं आणि माध्यमांसाठीही त्यांची गरज भासू लागली होती. प्रायोजकांचा खूश ठेवण्याचा अर्ध्याहून अधिक भार संपादकांच्या खांद्यावर येऊन पडला होता. अशा काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमात सुरूवात केलेल्या रवीश कुमारला एनडीटीव्हीने रिपोर्टर म्हणून संधी दिली. कालांतराने त्याची ओळख निर्माण झाली, ती रवीश की रिपोर्ट या कार्यक्रमातून. एनडीटीव्ही इंडियाच्या नियमित प्रेक्षकांना रवीश कुमारची ओळख होऊ लागली होती. बातम्या देणारी इतरही चांगली मंडळी असली तरी रवीश की रिपोर्टमधून येणारे विषय खूप वेगळे आणि लक्षवेधी असायचे. आपल्याकडं महादेव कोकाटेंची फाडफाड इंग्लिश शिकण्याची पुस्तकं एकेकाळी खूप लोकप्रिय होती. तशा धर्तीवरच्या इंग्रजी शिकवणा-या पुस्तकांच्या बाजारपेठेवरची रवीश की रिपोर्टमधली स्टोरी अजूनही आठवते. ऑफबीट म्हणता येतील असे विषय असायचे. टीव्हीच्या पडद्यावर किंबहुना वृत्तपत्रांतूनही न दिसणारी सामान्य, कष्टकरी माणसं रवीशच्या या रिपोर्टमधून भेटत होती.

रवीश की रिपोर्टचे विषय वेगळे असायचे हा झाला एक भाग. पण त्याचवेळी रवीश त्यासंदर्भात जे बोलायचा, तो अनेकांना आपला आतला आवाज वाटायचा. बिहारी वळणाचं त्याचं हिंदी ऐकायला खूप गोड वाटायचं, जे अजूनही वाटतं. या हिंदीबरोबर कॉर्पोरेट कृत्रिमपणा आणि अभिनयाचा अतिरेक नसतो. गोष्टीवेल्हाळपणा हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून नमूद करावं लागेल, रवीशचे संपादक म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या अनिंद्यो चक्रवर्ती यांनीही आपल्या लेखात त्या गुणवैशिष्ट्याचा उल्लेख केलाय. एक मात्र खरं की एनडीटीव्ही इंडियाचे जे नियमित दर्शक होते, त्यांनाच रवीश की रिपोर्टची जादू कळली होती. त्याहीपुढं जाऊन रवीशची ओळख व्हायला लागली, ती प्राइम टाइम शो नंतर. भारतातील सर्व भाषांमधील वृत्तवाहिन्यांमध्ये रात्री नऊसारख्या मौलिक वेळेला प्रेक्षकशरण न होता केला जाणारा हा एकमेव कार्यक्रम असावा. सुधीर चौधरी, रजत शर्मा, श्वेता सिंग, अंजना ओम कश्यप वगैरे मंडळींचे मोदी महिमागान सुरू असताना सामान्यांच्या प्रश्नांवरचा कार्यक्रम शांतपणे सादर करणारा रवीश कुमार निश्चितच वेगळा भासतो. साध्या साध्या माणसांचे प्रश्न घेऊन देशाच्या सत्ताधा-यांना प्रश्न विचारतो, तेव्हा या बाजारात आपली बाजू घेणारा कुणीतरी आहे, हा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण होतो. साध्या माणसांचे प्रश्न अनेकदा मुख्य राजकीय प्रवाहाबाहेरचे असले, तरी सत्तेतल्या लोकांना मिरच्या झोंबवणारे असायचे. सत्तेत नरेंद्र मोदी आणि बाकीची मंडळी राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचै औद्धत्य करताना जोकर वाटतात. भले त्यांचा टीआरपी दांडगा असेल. शंभर अडाण्यांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं अडाणी म्हणणं शहाण्या माणसाला रुचत नाही. बाकीच्यांना ते भान नव्हतं. ते बिनधास्त सत्तेची भाटगिरी करीत राहतात. कायदेशीर किंवा संविधानाशी संबंधित विषयांवर बाकीच्या वाहिन्यांवर वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून आरडाओरडा करणारे कार्यक्रम सुरू असतात, तेव्हा रवीशच्या कार्यक्रमामध्ये नाल्सारचे कुलगुरू फैजान मुस्तफा शांतपणे त्या विषयाचे कायदेशीर पैलू उलगडून दाखवत असतात. माध्यमांच्या उद्दिष्टांपैकी टू इन्फर्म आणि टू एज्यूकेट या दोन उद्दिष्टांची पूर्ती रवीश कोणताही आव न आणता तज्ज्ञांमार्फत करतो.

न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर एकट्या रवीश कुमारनं त्यासंदर्भात शोधपत्रकारिता करणा-या निरंजन टकलेंना घेऊन कार्यक्रम करण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं. किंवा राफेलचा विषय प्राइम टाइमला घेऊन चर्चा केली होती. राजकीय सत्तेला थेट भिडणं म्हणतात ते याला. मोदी-शहांच्या दहशतीखाली बाकी सगळ्यांनी त्यांचा गोदी मीडिया बनणं स्वीकारलं होतं, तेव्हा रवीश कुमार हाच अर्ध्याहून अधिक भारतातल्या लोकांना एकमेव सच्चा पत्रकार भासत होता. कारण पत्रकार म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारा अशीच लोकांची धारणा होती. २०१४ पर्यंत रवीश ते करीत होता, तेव्हा त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणा-यांना रवीश मोदी सरकारच्या दुख-या नसांवर बोट ठेवू लागला तेव्हा देशद्रोही वाटू लागला. मोदी सरकारला प्रश्न विचारण्याची किंमत रवीशला चुकवावी लागत होतीच, परंतु त्यापेक्षी कितीतरी पटींनी अधिक ती प्रणय रॉय-राधिका रॉय यांना चुकवावी लागत होती आणि त्याबद्दल त्यांची तक्रार असल्याचं आजवर कधी ऐकू आलेलं नाही. ते ऐकू आलं असतं तर रवीश कुमारला मॅगेसेस पुरस्कारापर्यंत पोहोचता आलं नसतं.

पाव शतकाची कारकीर्द असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकाराच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात, त्याच्या भूमिकेसंदर्भात, त्यानं सादर केलेल्या कार्यक्रमासंदर्भात, त्यांच्या वेगळेपणासंदर्भात तपशीलानं बोलायचं म्हटलं तरी आणखी खूप काही लिहिता आणि बोलता येईल. रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्याला शिव्या देणा-यांचा जोर ओसरलेला नसल्याचं डिजिटल मीडियामध्ये दिसून येतं. उलट विखार अधिक तीव्र बनला आहे. अर्थात अमित शहा यांच्यासारखा दबंग गृहमंत्री असताना हा जोर ओसरण्याचं काही कारणही नाही. परंतु एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चहुबाजूंनी अंधारून आल्यासारखं वातावरण होतं आणि कुठूनच प्रकाशाची तिरीप येण्यासाठी फट दिसत नव्हती. अशा कठिण काळात रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली. कुणी कल्पनाही केली नव्हती अशा कोप-यातून कल्पनेपलीकडचे तेजस्वी किरण आले. रवीश कुमारला जाहीर झालेला मॅगेसेसे पुरस्कार या देशातील धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी लोकांना आपलाच गौरव वाटू लागला. एखाद्या व्यक्तिचा गौरव एका देशातल्या मोठ्या समूहाला आपला गौरव वाटावा, आणि गौरव होणारी व्यक्ती पत्रकारितेतली असावी, ही पत्रकारितेसाठीही अभिमान वाटावी अशी घटना आहे. परंतु दुर्दैवानं आजच्या भारतातल्या बहुतांश पत्रकारितेला तसं वाटलं नाही, हे दुर्दैव पत्रकारितेचंच!

रवीश कुमारचा आज वाढदिवस, त्याला मनःपूर्वक शुभेच्छा !!

(रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ऑगस्ट २०१९मध्ये लिहिलेली ही पोस्ट. आज पुन्हा रवीशच्या वाढदिवसानिमित्त.)

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

9594999456

Previous articleसमुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम
Next articleसंविधानापलीकडील आंबेडकरांचं काय करायचं ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.