संविधानापलीकडील आंबेडकरांचं काय करायचं ?

-संदीप सारंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आणि महापरिनिर्वाणदिनाला देशभर (अलीकडे तर जगभर) विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. त्यांनी भारताच्या सर्वांगीण उत्थानात दिलेल्या अफाट योगदानाचा गुणगौरव केला जातो. खरेतर, अशा प्रकारचा गुणगौरव त्यांच्या हयातीतच सुरू झाला होता आणि आज तो खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु हा गुणगौरव तपासला तर संविधानाचे शिल्पकार, दलितांचे कैवारी अशा विशिष्ट विशेषणांमध्येच ते कळत-नकळतपणे बंदिस्त झाल्याचे दिसते. वस्तुत: या विशेषणांच्या परिघाबाहेर त्यांचे कर्तृत्त्व विविधांगांनी बहरलेले होते.

माणसाचा जन्म शूद्र-अतिशूद्र जातीत झाला की त्याचा भोगवटा हा ठरलेलाच ! त्यात या समाजाला कर्मविपाकाची गाढ झोप लागलेली ! अशा अवस्थेतील समूहाला जागृत करणे, त्याच्यात लढण्याची चेतना आणि ईर्षा भरणे, त्याला शिकायला, संघर्ष करायला, संघटित व्हायला प्रेरित करणे, हे कार्य करून बाबासाहेब अस्पृश्यांचे देदीप्यमान नेते झाले. त्यामुळे त्यांना दलितांचे कैवारी संबोधणे रास्तच ठरते. राज्यघटनेच्या जडणघडणीमध्ये केंद्रिभूत कामगिरी करून ते संविधानाचे शिल्पकारही ठरले. त्यांनी स्त्रियांच्या, कामगारांच्या, ओबीसींच्या कल्याणासाठी ज्या प्रकारची कामगिरी बजावली ती आजपर्यंतच्या कुठल्याही स्त्री, कामगार, ओबीसी नेत्यांपेक्षा श्रेष्ठ ठरली.

देशाची प्रारंभीची बांधणी/उभारणी होत असताना रिझर्व्ह बँकेची स्थापना, चलननिर्मिती, वीज, धरणे, जलसिंचन इ. क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य पायाभूत ठरले. अशा विविध विषयांमधले त्यांचे योगदान उत्तुंग स्वरुपाचे असून या कार्याची अलीकडच्या काळात गांभीर्याने दखल घेतली जाऊ लागली आहे. ही समाधानाची बाब असली तरी एकूण समाजातील (आणि पुरोगामी विश्वातील) चर्चांचा अदमास घेतल्यानंतर बाबासाहेबांनी केलेले मूलगामी स्वरुपाचे एक कार्य मात्र अनुल्लेखाने मारले जात आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. हे कार्य म्हणजे त्यांनी भारतीय परंपरेची, धर्माची आणि संस्कृतीची केलेली तर्कशुद्ध चिकित्सा होय.

भारतीय परंपरेलाच हिंदू परंपरा म्हणण्याची प्रथा आहे. या परंपरेची केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर त्यातून नेमका काय बोध घ्यायचा हेही त्यांनी दाखवून दिले. हे कार्य नुसते वैचारिक वा व्यासंगिक नसून ते उच्च प्रतीच्या मनोधैर्याचे लक्षण सिद्ध करणारे आहे. कुठल्याही धार्मिक-सांस्कृतिक क्रांतीला जन्म देण्यासाठी नेतृत्त्वापाशी विचार-व्यासंगही लागतो आणि मनाचा कणखर करारीपणाही लागतो ! नुसता विचार मांडल्यास माणूस फारफार तर विचारवंत होतो ! परिवर्तनकार होत नाही. बाबासाहेब परिवर्तनकार ठरले, कारण परिवर्तनासाठी लागणारा दृढनिश्चयी बाणा त्यांनी दाखविला.

अलीकडे आपल्या समाजात बाबासाहेबांच्या या कार्याची चर्चा केली जात नाही. उलट, ती टाळण्याचा प्रयत्न होतो. भारतीय परंपरा ही वैविध्यशाली आणि बहुमुखी आहे. तिच्यात चांगले आहे तसे वाईटही आहे. काही इष्ट आहे तसे अनिष्टही पुष्कळ आहे. असे असताना ही सर्वच्या सर्व संस्कृती आदरणीय कशी ठरेल, असा प्रश्न डॉ. आंबेडकर विचारतात आणि या संस्कृतीत विधायक काय आणि टाकाऊ काय, यावर झगझगीत प्रकाशझोत टाकतात. ते जे विचारमंथन करतात त्यातून या संस्कृतीतले सर्वोत्तम अलगदपणे समोर येते आणि बाबासाहेब नि:संकोचपणे ते स्वीकारतात. उत्तमातले सर्वोत्तम शोधण्याची आणि स्वीकारण्याची ही भूमिका निश्चितच अनुकरणीय म्हटली पाहिजे. ही भूमिका भूतकाळाचे ओझे अनावश्यकपणे डोक्यावर वागवत बसणारी नाही. परंपरेचे भान असणे म्हणजे परंपरा जशीच्या तशी स्वीकारणे नव्हे !

सारासारविवेकाने आणि नीरक्षीरन्यायाने परंपरेचा नेमका ठाव घेणे म्हणजे परंपरेचे भान जपणे ! असे भान जपले की मग त्यातून आपोआपच उज्ज्वल भविष्यकाळासाठी भूतकाळातला परंपरेचा कोणता धागा बळकट ठरू शकेल याचा निर्णय होतो. धर्मपरंपरेच्या दीर्घ चिकित्सेनंतर बाबासाहेब बुद्धिझमचा धागा पकडतात. भारतीय संस्कृतीमधला बुद्धिझम नावाचा अस्सल पुरोगामी अर्क आणि प्रागतिक गाभा स्वीकारण्याची त्यांची ही भूमिका भूतकाळाला योग्य न्याय देणारी, परंपरेचा उचित आदर राखणारी आणि भविष्याची सांस्कृतिक बेगमी करणारी ठरते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या भूमिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची खेळी खेळली जातेय.

सार्वजनिक आणि व्यक्तिगत असे माणसाच्या आयुष्याचे दोन कप्पे असतात. आज सार्वजनिक जीवनात समता, न्याय इत्यादी मूल्यांचा उच्चार व आविष्कार करणारे संविधान आहे. त्यानुसार कायदा आहे. असंख्य योजना/सवलती आहेत. आणि हे सारे मुख्यत: बाबासाहेबांच्या पुढाकारामुळेच झाले आहे. परंतु एवढ्यावरच बाबासाहेब संपत नाहीत ! माणसाच्या व्यक्तिगत जीवनातही हीच तत्त्वमूल्ये रूजली आणि अंगीकारली जावीत ही त्यांची उत्कट मनिषा असून हे घडून येण्यासाठी याच तत्त्वमूल्यांनी परिपुष्ट असलेली संस्कृती निष्ठापूर्वक धारण करण्याची भूमिका ते मांडतात. संविधानाने सामाजिक जीवनातल्या बदलांची ग्वाही दिलीय. परंतु व्यक्तीच्या सांस्कृतिक विश्वातील बदलांची आणि उन्नयनाची हमी कोण घेणार ? या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेब आपल्या भूमिकेतून देतात.

संविधानाच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनातील उन्नत मूलभूत संस्कारांच्या अनिवार्यतेचा विचार करणारे हे आंबेडकर आपण केव्हा समजून घेणार आहोत ? संस्कृतीची चौफेर घुसळण करून त्यातून प्रगल्भ मूल्यसरणीचे जीवनामृत जनतेच्या हाती सोपवू इच्छिणार्‍या आंबेडकरांची आणखी किती दिवस फक्त ‘संविधानाचे शिल्पकार’ एवढ्यावरच बोळवण करणार आहोत ? संविधानात जेवढे आंबेडकर आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक आंबेडकर संविधानाच्या बाहेर आहेत. त्यांचे काय करणार आहोत आपण ?

@9969864685

Previous articleरवीश नावाचा आतला आवाज !
Next article‘स्क्रीन टाईम’ : मुलं आणि पालकांचा वेबदुनियेतील वाटाड्या
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.