राज ठाकरेंच्या छायेत…

-प्रवीण बर्दापूरकर

दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या  उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार असं कांही जसं कोणत्याही आजाराचं निश्चित सूत्र नसतं तसंच राजकारणाचंही असतं हेच राज ठाकरे यांच्या या प्रचाराच्या ‘आऊट सोर्सिंग फंड्या’न दाखवून दिलेलं आहे . देशात सर्वत्र नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असतांना महाराष्ट्रावर मात्र ‘राज छाया’ पसरलेली आहे आणि लढाई राज ठाकरे विरुद्ध सेना-भाजप युती अशी झालेली आहे . परिणामी महाराष्ट्रात सेना-भाजप युती ३२ ते ३५ च्या दरम्यान जागा मिळवेल असे जे अंदाज माध्यम तज्ज्ञ आणि विविध पाहण्यातून समोर आलेले होते , त्याला छेद जातो की काय अशी हवा निर्माण झालेली आहे . उदाहरणच द्यायचं तर ‘निसटत्या का होईना बहुमताने सुशीलकुमार जिंकतील’, ‘अशोक चव्हाण जागा काढतीलच’ , ‘कमी मार्जिननं का असेना नितिन गडकरी जिंकतीलच’ आणि ‘बीड मतदार संघात डॉ. प्रीतम मुंडे हरल्या तर आश्चर्य वाटायला नको’…अशा चर्चांना आता पेव फुटलं आहे . यात तथ्य किती , या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात जाण्यात कांहीच मतलब नाही कारण मतदारांनी कौल दिलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची . मुद्दा आहे महाराष्ट्राची हवा बदलू लागलेली आहे आणि त्याचं श्रेय राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नाही तर ते राज ठाकरे यांना आहे . त्यासाठी त्यांना केवळ १०-१२ जाहीर सभा घेतल्या आहेत ; अशा सभा जर त्यांनी पहिल्या टप्प्याआधीच विदर्भ आणि मराठवाड्यातही घेतल्या असत्या आणि सध्या घेत आलेल्या सभांची संख्या किमान दुपटीने वाढवली असती तर चित्र आणखी वेगळं दिसलं असतं यात शंकाच नाही .

पाठिंबा , गुपचूप पाठिंबा , जाहीर पाठिंबा देऊन दगलबाजी असे प्रकार पत्रकारितेतल्या आजवरच्या चार दशकात अनेक पाहण्यात आले . पण , ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच नाही त्या पक्षाचा नेता प्रचारात उतरतो कुणाला मत द्या हे न सांगता कुणाला मत देऊ नका हे सांगतो आणि त्या मागचं ‘राज’ ( रहस्य ) तो उघड करत नाही , असं पाह्यला मिळालेलं नाहीये ; त्याआधी जर असं कांही घडलं असेल तर त्याची माहिती नाही . याचा अर्थ जर या निवडणुकीत राज्यात खरंच सेना-भाजप युतीचा दारुण पराभव झाला तर राज ठाकरे यांची नोंद एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणारे नेते अशी होईल ; ते राज्याचे निर्विवाद नेते आहेत हे सिद्ध होईल आणि त्याचा आणखी एक अर्थ आहे , आगामी विधानसभा निवडणूक सेना-भाजप युती विरुद्ध मनसे म्हणजे राज ठाकरे अशी होईल . त्या निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरे यांचीच पकड असेल . पण , जर लोकसभा निवडणुकीत युतीला अपेक्षित ( म्हणजे ३०च्या वर ) जागा मिळाल्या तर वाट चुकलेले राजकारणी अशी नवी ओळख राज ठाकरे यांना लाभेल . थोडक्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक राजकीय जुगार खेळत आहेत ; जुगार हा शब्द न रुचणार्‍यांसाठी दुसर्‍या भाषेत सांगायचं तर क्रिकेट सामन्याचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे ; फलंदाजी करणार्‍या संघाला विजयासाठी ६ धावा आणि गोलंदाजी करणार्‍या संघाला केवळ एक बळी हवा आहे , अशी ही चुरशीची स्थिती आहे .

आपला प्रचार आपलं नाव न घेता दुसरा कुणी तरी करतो आहे ; ज्याला आपण आघाडीत सहभागी होण्यास विरोध केला ते राज ठाकरे हे त्यांचं नाव आहे आणि तो त्या प्रचारातून अधिकाधिक लोकप्रिय होतो आहे , याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या उमेदवारांना निश्चितच ओशाळल्यासारखं वाटत असणार . यापेक्षा जास्त महत्वाची बाब म्हणजे आत्ताच्या घटकेला सेना-भाजप युतीला आणि त्यातही नरेंद्र मोदी व भाजपला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तरी केवळ आणि केवळ , राज ठाकरे आणि त्यांचा पक्षच सक्षम आहे , हा जो संदेश जनमनात रुजतो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी धोक्याचा इशारा आहे . राज ठाकरे यांच्या घणाघाती प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त विजयी होतील पण, तरी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाचं अस्तित्व पुसट आणि भवितव्य आणखी क्षीण झालेलं असेल . राज ठाकरे यांच्या विद्यमान क्रेझमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना आघाडी तर सेना आणि भाजपला युती करावीच लागेल अशी स्थिति निर्माण झालेली असेल आणि ती स्थिति राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षासाठी अत्यंत अनुकूल असेल . कारण सेना , भाजप , काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर मनसे हा पाचवा पर्याय ठरतो मात्र , युती आणि आघाडी झाली तर मनसे तिसरा पर्याय असतो हे गेल्या दोन निवडणुकात सिद्ध झालेलं आहे . सध्याची परिस्थिति कायम राहिली तर मनसे पर्याय नंबर तीन नव्हे तर दोन म्हणून समोर येऊ शकतो आणि सत्तेसाठी प्रमुख दावेदारही ठरू शकतो , हे जर लक्षात घेतलं तर राज ठाकरे हे बारामतीकरांच्या इशार्‍यावर नाचत आहेत हा दावा म्हणा की आरोप , क्षणभर मान्य केला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तरी राज ठाकरे यांची पाऊले योग्य दिशेने पडत आहेत , असा याचा अर्थ निघतो .

आणखी एक कळीचा प्रश्न सध्या मिळणारा अफाट प्रतिसाद पाठिंब्यात रुपांतरित करण्यात राज ठाकरे यशस्वी होतील का ? हा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ठामपणे ‘हो’ असं देता येणं शक्य नाही , असा किमान आजवरचा तरी अनुभव आहे . राज ठाकरे हे कसलेले , मुरब्बी नेते आहेत असा साक्षात्कार काही पुरोगामी आणि राजकीय नेते-कार्यकर्त्यांना आत्ता झालेला दिसत असला तरी तो कोणतीही भेसळ नसलेला संधीसाधूपणा आहे कारण , राज ठाकरे यांना आत्ता जो लोकांचा अफाट प्रतिसाद मिळतो आहे तो काही पहिला नाही आणि त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी काही महाराष्ट्रावर प्रथमच पडलेली नाही . त्यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आणि नंतरही त्यांनी घेतलेल्या सभांना महाराष्ट्रभर अस्साच प्रतिसाद मिळाला आहे . त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या मनातल्या महाराष्ट्राची मराठी मनाला भुरळही पडली होती . मात्र , तो प्रतिसाद पाठिंब्यात रुपांतरीत करुन घेण्यात तेव्हा राज ठाकरे यशस्वी ठरलेले नाहीत हे विसरता येणार नाही . कारण मनसे म्हणजे राज ठाकरे नावाचा एकखंबी तंबू आहे , संघटना आहे पण  राज ठाकरे केंद्रीत अशी तिची रचना आहे ; राजकीय पक्ष म्हणून गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य या पक्षात कुणाकडेच नाही , हेच वारंवार दिसून आलेलं आहे . ( राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना रुचणार नाही पण , सांगतोच– राज ठाकरे तसंच नारायण राणे यानी पक्ष सोडल्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी दाखवलं तसं गांभीर्य , चिकाटी आणि सातत्य ! ) . राज ठाकरे म्हणतील ती दिशा आणि राज ठाकरे म्हणतील तो कार्यक्रम अशी या पक्षाची दिशा आणि धोरण आहे ; ही जितकी जमेची बाजू तितकाच कमकुवतपणाही आहे . खळखट्याक , नाकाबंदी , क्वचित राडा किंवा केवळ मराठी बाणा हे कार्यक्रम आकर्षक असले तरी ते पूरक आहेत ; तेच दीर्घकालीन राजकीय धोरण होऊ शकणार नाहीत . पाच वर्षापूर्वी मोदी समर्थन आणि आता इतका टोकाचा विरोध हा यू टर्न का यामागचं ‘राज’ लोकांना समजलं पाहिजे , त्यामुळे राज ठाकरे यांच्या क्रेझची आभा आणखी वाढेल . आज राज ठाकरे भाजप-मोदी सरकारच्या कामाचे जबरदस्त वाभाडे काढत आहेत . मात्र , एक विसरता कामा नये की तसे वाभाडे कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या कामाचे काढता येतातच ; आजवर काँग्रेसेतर पक्षांनी काँग्रेस सरकारांचे असेच पंचनामे केलेले आहेत पण, जनतेने मोजकेच अपवाद वगळता काँग्रेसच्या विरोधात कौल दिलेला आहे ; आता आरोपीच्या पिंजर्‍यात काँग्रेस ऐवजी भाजप आहे , हाच काय तो फरक आहे . राज ठाकरे ते वाभाडे ज्या नेमक्या पद्धतीने काढत आहेत तसे ते काढणारे अभ्यासू वृत्तीचे आणि गारुड करणारी वक्तृत्व शैली असणारे ( छगन भुजबळ वगळता ) नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधे नाहीत आणि यातून या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत . मात्र विरोधी पक्षात राहून सरकारचे वाभाडे काढणे आणि सत्तेत्त राहून प्रशासनावर अंकुश ठेवून लोकहितार्थ काम करणे यात फरक असतो ; त्यामुळे सत्तेतले राज ठाकरे पाहणे हा एक उत्सुकतेचा भाग असेल .

सध्याची भूमिका स्वीकारतांना जी गृहितकं म्हणा की अलिखित करार-मदार की दिलेली वचनं आहेत ती , विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाळली जातीलच याची राजकारणात कोणतीही खात्री नसते हे भान राज ठाकरे यांना असेलच पण , तूर्तास तरी ते काहीही असो , मागच्या सर्व चुका आणि निर्माण झालेले गैरसमज यांना तिलांजली देत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखे भरारी मारते झाले आहेत ; एक राजकीय नेता म्हणून ते झळाळून निघाले आहेत . आता गांभीर्य , चिकाटी अन सातत्य कायम ठेवलं तर येत्या विधानसभा सामन्याचे सामनावीर राज ठाकरे असतील ; अन्यथा २०१९ची निवडणूक राज ठाकरे यांच्या प्रचाराच्या छायेत झाली , याची केवळ आठवण लोकांच्या मनात राहील !

 

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

9822055799
Previous articleअर्ध आकाश मिळवलेल्या राजपूत स्त्रिया
Next articleजगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा -‘कास्ट अवे’!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here