रावणाला का जाळायचं?

-डॉ. मुकुंद कुळे

परवा विजयादशमीच्या मुहूर्तावर संपूर्ण देशभर रावणप्रतिमेचं जल्लोषात दहन करण्यात आलं. जणू त्याला जाळणारे आणि मनात जाळण्याची आशा बाळगून असणारे सारेच प्रतिराम! दुष्टाला मारायला निघालेले सुष्टच… पण आपल्यातला सुष्ट कोण आणि दुष्ट कोण, हे कोण ठरवणार? आपल्याला ते ठरवण्याचा खरंच अधिकार आहे? कारण न्यायनिवाडा करायला बसलं की आपण कायमच स्वतःला सुष्ट म्हणवणार आणि समोरच्याला दुष्ट. पण स्वतःला सुष्ट ठरवताना किंवा रावणाला दुष्ट ठरवून जाळताना, आपण त्याबरोबर आपल्यातला दुष्टावा जाळतो का तर नाही, तो तसाच असतो. तोच दुष्टावा मग धार्मिक किंवा जातीय दंगलीतून उफाळून येतो, तोच दुष्टावा एखाद्याला माणूस म्हणून जगणं नाकारताना दिसून येतो, तोच दुष्टावा आज समाजकारणापासून राजकारणापर्यंत सर्वत्र शिगोशिग भरलेला आहे आणि तोच दुष्टावा श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होण्यातही आहे. मग विजयादशमीला आपण कोणाला जाळतो? तर कुणालाच नाही. ती फक्त आपल्याला हवं तसं जगण्या-वागण्यासाठी आपणच पाहिलेली आपली सोय असते. म्हणूनच मग आपल्या सोयीनेच आपण कधीतरी राम असतो आणि आपल्या सोयीने कधी रावण देखील…

… आणि रामायणातले राम-रावण तरी वेगवेगळे कुठे होते, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तसे ते दोघे कधी भले होते तर, कधी बुरे. पण भलेपणा नेहमीच जेत्याच्या वाट्याला येतो तसा तो रामायणात रामाच्या वाट्याला आला आणि राम रामायणाचा नायक ठरला तर रावण खलनायक! अर्थात ‘रामायण’ रचणारे वाल्मीकीच रामाच्या प्रेमात होते, शेवटी त्यांच्याच तर हातात होतं सारं. कुणाला कसं रंगवायचं ते त्यांनीच ठरवलं आणि त्यांनी रामाला झुकतं माप दिलं. म्हणून तर अकराव्या शतकातील प्रसिद्ध काश्मिरी कवी बिल्हणाने म्हटलंय-

 ‘लंकापतेः संकुचितं यशो यत्

यत्कीर्तिपात्रं रघुराज पुत्र:

सर्व तदेवादिकवेः प्रभावात्

न निन्दनीयः कवयः क्षितीन्द्रैः’

 म्हणजे आज लंकाधिपती रावणाचा यश जे एवढं कमी झालेला आहे आणि रामचंद्र जो इतका कीर्ति शिखरावर चढलेला आहे, त्याला कारण केवळ आदि कवी वाल्मीकींचं सामर्थ्य कारणीभूत होय. तेव्हा राजेलोकांनी कवीची निंदा करू नये… एखाद्याचं चरित्र घडवण्यात-बिघडवण्यात लेखकाचा मोठा वाटा असू शकतो! अर्थात रावणाने वाल्मीकींची निंदा केली होती किंवा काय ते ठाऊक नाही, पण वाल्मीकीनी आपलं झुकतं माप मात्र श्रीरामाच्या पारड्यात टाकलं एवढं खरं! अन् तरी ठरवूनही वाल्मीकीना रावणाला पूर्ण काळ्या रंगात रंगवता आलं नाही, तसंच रामाच्या वागण्यातही काही ठिकाणी वाल्मीकींच्या लेखणीतूनच सैलपणा राहून गेलेला दिसतो. म्हणूनच जेव्हा रामप्रेमी सीता अपहरणामुळेच रामाला रावणाचा वध करावा लागलं असं म्हणतात, तेव्हा रावणप्रेमी मात्र त्याचं खापर रामाच्याच माथ्यावर फोडतात. विशेषतः दिवंगत मराठी संशोधक वि. भि. कोलते आणि प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आचार्य चतुरसेन शास्त्री यांच्यासारखे विद्वान राम-रावण युद्धासाठी रामालाच जबाबदार धरताना दिसतात. आचार्य चतुरसेन शास्त्री यांच्या ‘वयं रक्षामः’ या हिंदी साहित्यकृतीचा नायकच रावण आहे. तर वि. भि. कोलते आपल्या ‘महात्मा रावण’ या पुस्तकात म्हणतात- ‘राम-लक्ष्मणाने शूर्पणखेची केलेली क्रूर चेष्टा हे अतिशय वाईट कर्म होतं. कारण शूर्पणखेने सभ्यपणाने रामाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. पण त्यावेळी तिला सभ्यपणे नकार देण्याऐवजी सत्यवचनी राम म्हणाला की- माझा धाकटा भाऊ लक्ष्मणाकडे जा, त्याचं लग्न झालेलं नाही. त्याने शरीरसुखही भोगलेलं नाही; तोच तुला सुखी ठेवेल! वास्तविक राम-लक्ष्मण दोघांचं लग्न एकाच मांडवात झालेलं असताना रामाने खोटं का बोलावं? यानंतरही दोघांनी शूर्पणखेची येथेच्छ चेष्टा केली आणि नंतर लक्ष्मणाने तिचे नाक-कान कापले. यामुळेच ती चिडली आणि तिने लंकेला जाऊन आपल्या भावाकडे म्हणजे रावणाकडे राम-लक्ष्मणांची तक्रार केली. तसंच सीतेचं अपहरण कर असं त्याला सांगितलं.’

कोलते यांच्या म्हणण्यानुसार राम-रावणातल्या संघर्षाचे बीज येथे आहे. पण शूर्पणखेने सांगितलं म्हणून रावणाने लगेच दंडकारण्यात जाऊन सीतेचं अपहरण करणंही तेवढंच अयोग्य होतं. म्हणूनच राम-लक्ष्मणाने शूर्पणखेची केलेली चेष्टा जेवढी चुकीची होती, तेवढंच रावणाने सीतेचं केलेलं अपहरणही निषेधार्ह होतं. म्हणजे एरवी परस्त्रीबद्दल सहृदयी असलेला राम शूर्पणखेच्या बाबतीत अनीतिने वागलेला दिसतो, तर सीता आपल्या ताब्यात असताना तिचा शीलभंग न करणारा नीतिमान रावण सीतेच्या अपहरणाने मात्र दोषी ठरला. म्हणजेच राम काय किंवा रावण काय वेळप्रसंगी दोघेही कधी नीतिने तर कधी आणि अनीतिने वागले आहेत.

याचप्रमाणे राम-रावण युद्धाला सीतेचं अपहरण कारणीभूत ठरलं खरं, पण मुळात रामाच्या दंडकारण्यात येण्याबद्दलही अनेक संशोधक शंका उपस्थित करतात. कैकयीमुळे रामाला वनवास घडला असं सांगितलं जातं. परंतु ते थोतांड असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. भारतीय इतिहास-संस्कृतीचे अभ्यासक असलेले अमरावतीचे प्राध्यापक अशोक राणा म्हणतात- ‘राम-लक्ष्मणाचा तथाकथित वनवास हे मोठं षड्यंत्र होतं. राम हा आर्य होता आणि त्याला रावणाच्या अधिपत्याखालील द्राविडी प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणायचा होता. आधी विश्वामित्राने राक्षस यज्ञात त्रास देतात म्हणून राम-लक्ष्मणाला बरोबर नेऊन त्राटिकेसारख्या राक्षसांचा नाश करून त्या-त्या प्रदेशावर कब्जा मिळवला. तेव्हाची यज्ञ संस्कृती ही एक प्रकारे अधिकारदर्शक होती. क्षत्रियांचा पाठिंबा असलेले ब्राह्मण जिथे-जिथे यज्ञ करायचे तो प्रदेश त्यांचा होऊन जायचा. म्हणूनच राक्षस खरं तर यज्ञाला विरोध करायचे. पण आम्ही धर्माचं रक्षण करतो असं सांगून राम-लक्ष्मणाने त्यांना मारलं आणि तो प्रदेश आपल्या ताब्यात आल्यावर, त्यांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला.’

राम खरोखरच वसाहतवादी होता की नाही याबाबत ठोस संशोधन अजून झालेलं नाही. त्याने पित्याने कैकयीला दिलेल्या वचनाचा मान राखला असंच रामायण आणि नंतरच्या काळात लिहिले गेलेले अभिजन परंपरा सांगणारे ग्रंथ सांगतात. त्यामुळेच रामाच्या एकवचनी नि एकपत्नीव्रताचं उदाहरण आजच्या कलियुगातही दिलं जातं. परंतु बहुजनांची लोकपरंपरा मात्र नेहमी अभिजनांच्या परंपरेपेक्षा वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणून रामाने सीतेवर घेतलेल्या संशयाचा जाब विचारताना तर ती उच्चरवाने म्हणते-

‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा’

एवढंच कशाला रामाचे पितृवचनी-मातृवचनी अशा कितीही गुणांची वाखाणणी केली, तरी वाली आणि सुग्रीवाच्या घरगुती भांडणात पडून रामाने वालीची जी हत्या केली तिचं समर्थन नाहीच कोणी करणार. किंवा तपस्या करतो म्हणून त्याने शंबुकाची जी हत्या केली, तिचं समर्थन तरी कोण आणि कसं करेल?

मात्र याचाच अर्थ काय, तर राम काय किंवा रावण काय दोघेही मानवी गुण-दोषांनी युक्तच होते. सदा सर्वकाळ कोणीच गुणी वा अवगुणी असत नाही. कुठल्या तरी मोहाच्या क्षणी किंवा आपत्कालीन परिस्थितीत एखादा चुकीचा वागून जातो, पण त्यामुळे तो कायमचा खलनायक होत नाही आणि जर क्वचित कधी चुकीचं वागूनही राम नायकच राहत असेल तर मग एका मोहाच्या क्षणी सीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाला तरी खलनायक का म्हणायचं खरंतर? राम आणि रावण या रामायणातल्या अशा दोन व्यक्ती आहेत, ज्या एकमेकांशिवाय पुऱ्याच होऊ शकत नाही. म्हणूनच विजयमादशमीला देशभर रावणाला जाळलं जात असलं तरी दक्षिणेतल्या काही प्रांतांबरोबरच, दंडकारण्यातल्या काही आदिवासी जमातींमध्ये रावणाबद्दल आजूनही प्रेम शाबूत आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील कोरकू आदिवासी समाज तर रावणाला आजही पूजनीय मानतो. तसंच रावणपुत्र मेघनाद हा त्यांचा देव असून, त्याच्या नावाने दरवर्षी जत्राही भरते. म्हणजेच एकीकडे रामाला मानणारा समाज आहे, तिथेच दुसरीकडे रावणाला मानणारा समाजही आहे.

शेवटी राम व रावण या दोन प्रवृत्ती आहेत. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही कधी सुष्ट तर कधी दुष्ट. मग एकट्या रावणालाच का जाळायचं वर्षानुवर्षं? आणि जेव्हा दुष्टतेच प्रतीक म्हणून एखाद्याची प्रतिमा आपण जाळतो, तेव्हा कळत नकळत त्याच्यातली सुष्टता, म्हणजेच रावणाबरोबर रामालाही जाळतो की! मग ही सुष्टता जपायची की जाळायची?

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकेशवराव धोंडगे – ‘मन्याड’चा थकलेला वाघ !
Next article‘बच्चन’ व्हायचंय का तुम्हाला?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.