राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर वामनराव जोशी

थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिक वीर वामनराव जोशी यांचा आज जन्मदिवस . त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा
– सोमेश्वर पुसतकर
राष्ट्रोन्नतीसाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणारे वीर वामनराव जोशी, वीर वामनराव दादा म्हणून वर्‍हाडात उल्लेखिले जात. देशभक्ती ही दादांची जीवननिष्ठा होती. स्वातंत्र्यप्रेमाची तेजस्वी ज्वाला सदैव दादांच्या हृदयात धगधगत होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हाच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा रोख होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘सबकुछ कुर्बान’ याच भावनेने दादा झुंजले. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करणारे दादा खरे वीर होते.
स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या वीर वामनराव दादांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी अमरावती येथील एका सामान्य कुटुंबात झाला. वडील गोपाळराव आणि आई अन्नपूर्णा यांच्या शिस्तीत दादा अमरावतीच्या बुधवार्‍यात लहानाचे मोठे झाले. आईचा सेवाभाव, निस्पृहता आणि सत्यप्रियता या संस्कारात त्यांचे बालपण गेले. वामनराव दादांचा बालपणापासूनच देशसेवेकडे ओढा होता. त्यांचे  सुरूवातीचे जीवन जहाल क्रांतीकारकाचे होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीसाठी युवकांची एक मोठी संघटना उभी केली होती. युवकांना त्यांनी शस्त्र प्रशिक्षण  दिले होते. युवकांसाठी आखाडे काढणे, लष्करी पुस्तकांचे ग्रंथालय तयार करणे,बॉम्ब बनविण्याच्या प्रयोगशाळाही चालविणे इत्यादी कार्य दादांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे सुप्रसिध्द बंगाली क्रांतीकारक बारीद्रंकुमार घोष दादांना फार मान देत. बारींद्रकुमार घोष यांचेशी वामनराव दादांचे निकटचे संबंध होते.
 वीर वामनराव दादांच्या नेतृत्त्वाखाली विदर्भात १९०२ ते १९१४ या काळात सशस्त्र क्रांतीचा उठाव झाला. दादांनी अमरावती, अकोट व वरूड या तीन प्रमुख  गावांवर लक्ष केंद्रित केले . या गावांच्या परिसरात अनेक ठिकाणी गुप्तपणे शस्त्रसामुग्री ठेवण्यात आलेली होती. वामनराव हे काही वेगळेच व्यक्तिमत्व होते . दादांसोबत राहिलेले हरिराव देशपांडे यांनी ‘दादांच्या आठवणी’  या लेखात (१९५६ चा ‘लोकमत’ दिवाळी अंक) लिहिल्यानुसार ‘आकोट येथे वामनराव दादांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे तीनशे सशस्त्र तरूणांचे संघटन उभारून त्यांना शिस्तीचे व शस्त्रांचे शिक्षण देण्यात आलेले होते. एकट्या दुकट्या  इंग्रज  अधिकार्‍याचा एखाद्या ठिकाणी खून करणे म्हणजे सशस्त्र क्रांती अशी वेडगळ  समजूत दादांची नव्हती . दादांची कल्पना अशी होती की, केव्हा ना केव्हा इंग्रजी सत्तेच्या विरूध्द भारतीय जनतेला उघड बंडाची उठावणी करावी लागेल. तशी वेळ जेव्हा येईल तेव्हा या उठावणीत भाग घेणयासाठी संघटीत, शिस्तबध्द, स्वसंरक्षणक्षम, धैर्यशालीअसे तरूण तयार असले पाहिजेत म्हणून ठिकठिकाणी मोठ्या संख्येने  तरूणांच्या संघटना त्यावेळी दादांनी उभारल्या होत्या. त्यात आकोटच्या तीनशे युवकांची संघटना ही एक होती. या तरूणांना शस्त्रांचे शिक्षण देण्यासाठी सुमारे तीनशे तलवारी, काही बंदुकी व पिस्तुली यांचा संग्रह करण्यात आला होता. क्रांतीकारक तरूणांच्या संघटना उभारण्याचा दादांचा हा उद्योग तलवारी व बंदुकांचा संग्रह करणे एवढ्यापुरता मर्यादित नव्हता.  . बॉम्ब तयार करण्याचे तंत्रही त्यांनी शिकून घेतले होते. त्यासाठी त्यांनी आष्टी येथे प्रयोगशाळाही उभारली होती. दादांच्या नेतृत्त्वाखाली चौदा तरूण आष्टीस या प्रयोगशाळेचे काम करीत असत. लष्करी डावपेचांची माहिती करून घेण्यासाठी दादांनी युध्दविषयक जवळपास एक हजार पुस्तकांचा संग्रह  जमविला होता. या पुस्तकांचे काळीजीपूर्वक अध्ययन करण्यात येत असे. त्यात वर्णिलेल्या डावपेचांवर चर्चाही करण्यात येत असे. हे डावपेच व या हालचाली याची माहिती केवळ लढाईच्या वेळीच कामी पडते असे नाही. सार्वजनिक कामे करतानाही त्याचा फार उपयोग होतो, असे दादांचे मत होते . याच डावपेचाचा उपयोग निवडणुकीच्या लढती लढतांनाही दादा अनेक करीत असत.’
   याच काळात सरकारने देशभरात क्रांतीकारकांचा जबरदस्त पिच्छा पुरवल्यामुळे सशस्त्र आंदोलनाचा जोर एकदम कमी झाला. गुप्त पोलीस वामनराव दादांच्या व त्यांच्या सहकार्‍यांच्या मागे लागले. ही गोष्ट लक्षात घेऊन दादांनी मोठ्या कौशल्याने सशस्त्र आंदोलन शांत केले आणि सर्व शस्त्रास्त्रे, बॉम्ब तयार करणारी प्रयोगशाळा आणि लष्करी डावपेचविषयक पुस्तके जमिनीत पुरून टाकण्यास  सहकाऱ्यांना सांगितले.  याचेवळी दादांनी ब्रिटीशांच्या दडपशाहीला बळी पडू शकणार्‍या उसळत्या रक्ताच्या युवकांना बलोपासनेकडे वळविले. अनंत व अंबादासपंत वैद्य या बंधूकरवी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली. स्वातंत्र्य आंदोलनकाळात स्वयंसेवकांचा झरा जिवंत ठेवणार्‍या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे दादा हे मूळ प्रेरणास्थान आहे. सुरूवातीच्या काळात जहाल क्रांतीकारक असलेले दादा पुढे महात्मा गांधीचे अनुयायी झाले. २६ डिसेंबर १९२०ला नागपूरला कॉंग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात वीर वामनराव दादांनी असहकार ठरावाच्या समर्थनार्थ प्रभावी भाषण केले. या अधिवेशनात असहकारितेचा ठराव मंजूर झाला.  देशात सर्वत्र धरपकडीस सुरूवात झाली. ब्रिटिशांनी विदर्भात प्रथम कुणाला पकडले असेल तर ते वामनराव जोशी यांना. वामनराव दादांना अटक झाल्याची बातमी ‘संदेशकार’ अच्युत बळवंत कोल्हटकरांनी दादांना ‘सिंह’ असे संबोधून ‘सिंह जाळ्यात अडकला’ या मथळ्याखाली छापली.
          दादांच्या अटकेची बातमी त्यांच्या घरी नानासाहेब बामणगावकर यांनी त्यांच्या आईला कळविली. दादांची आई अंथरूणाला खिळली होती. परंतु दादांच्या अटकेची बातमी समजताच दादांची आई म्हणाली  ‘माझे रघुनाथ व गणपती ही दोन मुले हयात नाही, नाही तर आज माझ्या एका मुलाऐवजी तीन मुलांना मला देशासाठी तुरूंगात पाठविता आले असते’. दादांची आई खरोखरच राष्ट्रभक्त होती. वामनराव दादांना अटक झाल्यानंतर अटकेच्या निषेधार्थ निषेध सभा,  वलगाव येथे आयोजित करण्यात आली. अमरावतीत सभाबंदी असल्याने ही सभा वलगावात झाली .या सभेत नागपूरचे राष्ट्रकवी आनंदराव टेकाडे उत्स्फूर्तपणे गरजले,
हा शूर विदर्भवीर। खरा रणधीर ॥
घे पारतंत्र्य शृंखला तोडण्या । राष्ट्रभक्त खंजिरा ॥
सभेला उपस्थित सर्वांनी वामनराव दादांना स्वयंस्फूर्तीने ‘वीर’ ही पदवी बहाल केली. १९२० ते १९४२ या काळात दादा स्वातंत्र्य आंदोलनात सकिय होते. याकाळात वर्‍हाडातील स्वातंत्र्य चळवळीचे दादा सूत्रधार बनले. दादांचे अमोघ वक्तृत्त्व, कर्तुत्व व स्वार्थत्याग यामुळे वर्‍हाडातील तरूण पिढी भारावून गेली होती. वीर वामनराव दादा विदर्भाचे भीष्मपितामह बनले. 1या कालावधीत दादांनी अनेकवेळा कारावास भोगला. दादांनी स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेऊन देशाच्या संसाराची काळजी वाहिली. दादांच्या संसाराला दादासाहेब खापर्डे यांनी व जनतेने हातभार लावला. सर्व जनतेला त्यांच्याबद्दल आदर व अभिमान वाटत असे.
वामनराव दादांचा खरा पिंड निष्ठावान देशभक्ताचा होता. स्वातंत्र्यप्राप्ती हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासपूर्तीच्या मार्गात दादांना अनेक आघात  सहन करावे लागले. दोन निष्ठूर दैवी आघातही झाले. दादांचा पहिला मुलगा नारायण दादांनी सुरू केलेल्या ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ या साप्ताहिकाच्या प्रकाशनात सहकार्य करीत होता. तो अत्यंत हुशार होता. परंतु डिसेंबर १९२४  मध्ये त्याला प्लेग झाला. त्याला सणसणून ताप भरला होता. त्याचे डोके मांडीवर घेऊन दादा ‘स्वतंत्र हिंदुस्थान’चा अग्रलेख लिहीत होते. याच दरम्यान नारायणने शेवटचा श्‍वास घेतला. ‘स्वतंत्र हिंदुस्थान’चा अग्रलेख  लिहूनच दादांनी नारायणचे मस्तक खाली ठेवले. दादांच्या राष्ट्रभक्तीला तोड नाही. नारायणच्या मृत्यूला दोन वर्ष लोटत नाहीत तोच दादांचा दुसरा मुलगा हरी याचेही आजाराने निधन झाले.
      राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वामनराव दादा हे उत्तम वक्ते, लेखक आणि नाटककार होते. त्यांची लेखणी त्यांच्या वक्तृत्त्वाप्रमाणेच जहाल व ओजस्वी होती. राष्ट्रजागृतीसाठी त्यांनी नाटके लिहीली. त् ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘रणदुंदुभी’ आणि ‘धर्मसिंहासन’ ही वामनराव दादांची तीनच नाटके रंगभूमीवर आली. पण या तीनच नाटकांनी दादांना श्रेष्ठ नाटककारांच्या पंक्तीत नेऊन बसविले. दादांनी केवळ द्रव्यार्जनासाठी नाटके लिहीली नाहीत तर राष्ट्रीय चळवळीला प्रेरक अशीच नाटके त्यांनी लिहीली. दादांची नाटके महाराष्ट्रभर गाजली. दीनानाथ मंगेशकरांनी दादांची पदे गायिली. अनेक नाटक कंपन्याची आर्थिक बाजू दादांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाने सावरली. या नाटकाने केशवराव भोसल्यांच्या ‘ललितकलादर्श’ला स्थिरस्थावर केले. त्यातील केशवरावांची मृणालीनी खूप गाजली. वामनरावांची स्त्री पात्रेही बाणेदार व तेजस्वी असत, ‘रणदुंदुभी’ मध्ये दीनानाथांच्या वाट्याला आलेल्या नायिकेचे नावच मुळी तेजस्विनी होते. ‘रणदुंदुभी’ तील पदांना चाली द्यायचे काम रामकृष्ण बुवा वझे यांनी केले. वझेबुवांच्या चाली जोरकस होत्या. दादांच्या नाटकांना रसिकांची मोठी गर्दी असे. दादांची लेखणी प्रतिभासिध्द होती. नाट्यदेवता दादांवर प्रसन्न होती. परंतु स्वातंत्र्य चळवळीत आयुष्य झोकून दिल्याने लिखाण करण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नसे. १९२१ साली भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे दादा अध्यक्ष होते.
दादांचे हस्तलेखन सुंदर व सुवाच्च होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘गीतारहस्या’ची हस्तलिखीत प्रत तयार करण्यासाठी बोलाविले. ‘गीतारहस्या’च्या प्रस्तावनेत त्यांचा उल्लेख आहे. ‘गीतारहस्य’ ची  हस्तलिखीत प्रत तयार करताना गीतेचे तत्त्वज्ञान दादांनी आत्मसात केले. त्यांनी जीवनभर कर्मयोगाचा सिध्दांत आचरणात आणला.
१९४३ते १९५३ या काळात वामनराव दादांनी अमरावतीच्या नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. १९४४ मध्ये दादा तुरूंगात असताना देखील जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले. शहराच्या विकासात दादांनी महत्त्वाचे योगदान दिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर दादांच्या देशसेवेबद्दल नेहरू सरकारने दादांना पाच हजार रूपयांची मदत पाठविली. परंतु करारी व मानी दादांनी ‘मी देशसेवा अद्याप लिलावात काढलेली नाही’ असे बाणेदार उत्तर देऊन मदत साभार परत पाठविली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४९ साली पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद व कोंग्रेसच्या  जेष्ठ नेत्यांनी वामनराव दादांना बिहारचे राज्यपाल म्हणून जाण्याची विनंती केली. पण दादांनी ती अमान्य केली. त्यांना कुठल्याही पदाचा किंवा संपत्तीचा मोह नव्हता. दादा विधानसभेचेही  सदस्य होते. पण तेथील कामकाजात त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. त्यांनी मध्यप्रदेश विधानसभेत १९५५ साली पहिले व शेवटचे एकच भाषण केले, ते म्हणजे गोवा ते गोंदियापर्यंत मराठी माणसांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केलेले भाषण. संयुक्त महाराष्ट्रासाठी दादांनी केलेले हे ओजस्वी भाषण त्यांचे विधानसभेतील एकमेव भाषण होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दादा समाजातील दूर्जनांविरूध्द सतत संघर्ष करीत राहीले. दादांचा हा संघर्ष म्हणजे आसुरी संपत्ती व भोगनिष्ठा याविरूध्द त्यागनिष्ठा यांच्यातील संघर्ष होता. मायभूच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍या वीर वामनराव दादांनी ३ जून १९५६ रोजी इहलोकाची यात्रा संपविली. आयुष्यभर त्यागाचाच मोह बाळगणार्‍या दादांच्या निधनानंतर त्यांच्याजवळ  फक्त दोन लुंगी व कुर्ता एवढीच संपत्ती होती.
(लेखक अमरावतीच्या आझाद हिंद मंडळाचे कार्यकर्ते आहेत)
9823072030
Previous articleमनोहर पर्रिकर… प्रेमात पडावे असे मित्र!
Next articleतू, ती आणि दोघांच्या सिंगलता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.