रेड लाईट डायरीज: शोध मालतीचा

– समीर गायकवाड

महाराष्ट्रात डान्सबार जोरात होते तेव्हाची गोष्ट. आमच्या सोलापूरात रतन मुखर्जीची टीम दोन ठिकाणी होती एक मुळेगाव तांडा इथं आणि एक न्यू विनय बारला. दोन्हीकडे नाचगाणे करणाऱ्या मुलींचा मोठा भरणा होता. हा रतन कोलकत्याचा होता आणि त्याच्याकडच्या सर्व मुली बीरभूम, चोबीस परगणा, मुर्शिदाबाद, मालदा जिल्ह्यातल्या होत्या. वादक सुद्धा तिकडचेच होते. एकदोन कलाकार स्थानिक होते. त्यात एक विजापूरची मालती नावाची कानडी मुलगीही होती. रतन ह्या सर्व मुलींची काळजीही घ्यायचा आणि त्यांना बरोबर छक्केपंजे शिकवून पैसे कसे कमवायचे याचे आडाखेही शिकवायचा. रतनची बायको गंगा सुरेल आवाजाची होती. ती रोज फ्लोअरवर असायची पण खास फर्माईश असली तरच गायची. तिथं आलेला कस्टमर दारूच्या ग्लासात बुडाला की त्याचा खिसा आपोआप हलका होई. लोक तऱ्हे तऱ्हेची गाणी सांगत, नाचायला लावत, पैसे उधळत. अंगचटीला येत. रात्री आठ ते अकरा नुसता धुमाकूळ चाले. मी जितके म्हणून डान्स बार पाहिले त्यावर पुन्हा सविस्तर लिहिता येईल इतक्या कथा त्यात आढळल्या. इतकं रसरशीत आयुष्य क्वचित कुणाच्या वाटेला येत असेल. असो…

सोलापूर हे आंध्र कर्नाटकच्या सीमेवर असल्याने फर्माईशीनुसार कधी कधी कानडी, तेलुगु गाणीही गावी लागत. अशा वेळी मालती उपयोगी येई. गव्हाळ वर्णाची, अपऱ्या नाकाची, मध्यम बांध्याची, काजळ घातलेल्या धनुष्याकृती डोळ्याची, नाजूक जिवणीची, हसऱ्या चेहऱ्याची, गोड गळ्याची, गालावरल्या खोलगट खळीचं अप्रूप नसणारी मालती म्हणजे चैतन्याचा झरा होता. अत्यंत आकर्षक मेकअप करून आणि उंची साड्या घालून ती रोज हजर असे. या मालतीकडे एक तरुण देखणं पोरगं नेहमी येऊ लागलं. कर्नाटकमधील इंडी जवळील एका गावातून तो एकटाच जीप घेऊन यायचा. ‘यजमान’ ह्या कानडी चित्रपटातील दोन गाणी ऐकून झाली की थेट साधनेचे ‘नयनो में बदरा छाये’ हे गाणं तो ऐकायचा. मालती गाताना त्याच्या डोळ्यात पाणी असायचे. मालतीवर तो अफाट पैसे उधळायचा. रतनने त्याला मालतीशी ‘कनेक्शन’ करून हवे का असेही विचारून पाहिले पण त्याला ते नको होतं. एकदोन वर्ष हा सिलसिला चालला. पुढे डान्स बार बंद झाले. रतन कोलक्त्याला निघून गेला. त्याची टीम विखुरली. वेगवेगळे लोक विविध ठिकाणी गेले. तर त्या सगळ्या लोकांत मालती देखील निघून गेली. म्हैसूरजवळ तिचा अपघात झाला. त्यात काही दिवस जखमी अवस्थेत होती आणि नंतर उपचाराअभावी ती मृत्यूमुखी पडली. या लोकांची अनेक नावे असतात त्यामुळे खरी माहिती मिळण्यात खूप अडचणी येतात. बार बंद झाल्यामुळे यातील काही लोक यातून कटले… अजूनही काहींचा ग्रुप सोलापुरात आहे. आता फक्त ऑर्केस्ट्रा बार चालतो. त्यातील काही लोक अधूनमधून आजही मला भेटतात आणि नवीजुनी माहिती देत राहतात. यावर मागे एकदा सविस्तर लिहिलं असल्याने पुन्हा मालतीकडे वळू.

काल रात्री पुणे रोडवरील अंबिका कला केंद्रावर मित्रांसोबत गेलो होतो. बराच वेळ बसून तिथं काहीच हाती लागत नव्हतं. मग फोनचं निमित्त करून काही वेळासाठी बाहेर आलो आणि समोर जे पाहिलं ते मोठं धक्कादायक होतं. समोर तोच तरुण पोरगा होता पण ओळखू न येण्या पलीकडच्या अवस्थेत होता. अगदी खंगून झिजून गेला होता तो. मालतीसाठी डान्सबार मध्ये येणारा, नोटा उडवणारा. शांत बसून दारू पिणारा, गाणं ऐकताना रडणारा, मालतीशी रूम शेअर करायला नकार देणारा. तोच तो ! जीर्ण झालेल्या शर्ट विजारीच्या वेशात होता. गालफाडे आत गेलेली, दाढीचे खुंट वाढलेले. डोक्यावरचे केस विस्कटलेले. अंगावर धुळीची पुटं चढलेली. तोंडाला देशी दारूचा वास. पायात चप्पलसुद्धा नव्हती त्याच्या. मी त्याला ओळखण्याआधी त्याने मला ओळखले. त्याने ‘समीरss ‘ असा आर्त आवाज दिला. मी विस्मयग्रस्त झालेलो.

त्याची मराठी मोडकी आणि माझी कानडी त्याहून मोडकीतोडकी. त्याने मिठी मारणेच बाकी ठेवले होते. त्याच्याशी बोलताना विषय मालतीचाच निघाला. त्याने अनेक वेळा विचारूनही त्याला मालतीची खरी माहिती मिळाली नव्हती. त्याची कथा अगदीच क्लेशदायक होती. ऐन तारुण्यात असताना त्याने एका मुलीला फसवले होते, त्या मुलीने पुढे जाऊन आत्महत्या केली होती. दरम्यान दुसऱ्या एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. तिच्यावर त्याचा खूप जीव जडला होता. तिच्यापासून एक मुलगा झाला. त्याचा संसार सुखाचा चालला होता. पण नियतीला ते मंजूर नसावं. एका रेल्वे अपघातात त्याची पत्नी आणि सहा महिन्याचे मूल मरण पावले. या घटनेचा त्याला मोठा धक्का बसला. दुःख कशात विसरावं याचं नेमकं ज्ञान नसलं आणि सोबतचे मित्र योग्य विचारसरणीचे नसले की अशा वळणावर जे अघटीत होते तेच त्याचे झाले होते. तो दारू पिऊ लागला. आणि एकदा दारूच्या नशेत ‘न्यू विनय’ला आल्यावर त्याने मालतीला पाहिले. त्याचा स्वतःवर विश्वास बसला नाही. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यात आणि मालतीच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य होते !

त्या दिवसांपासून त्याची तहानभूक हरपली. त्या तरुण पोराच्या भावनांना कुणी समजून घेतले नाही. त्याच्या वर्तनाला अय्याशी संबोधून त्याला घराबाहेर काढले गेले. मात्र त्याचा इस्टेटीमधला हिस्सा त्याला दिला गेला. वाट्याला आलेली जमीन विकून त्या पैशातून काहीतरी नव्याने करावे असे त्याच्या डोक्यात होता पण त्या दरम्यानच डान्सबार बंद पडले आणि त्याची परवड सुरु झाली. त्याने मालतीचा जमेल तितका शोध घेतला. यात लोकांनी त्याला खरी माहिती न देता त्याच्या पैशावर हात साफ केला. तो पूर्ण रस्त्यावर आला. मालतीबद्दल जे कोणी काही सांगेल त्यावर विश्वास ठेवत तो तिला धुंडाळत राहिला. असंच फिरत फिरत पायाला भिंगरी बांधून तो अंबिका कला केंद्रापाशी आला होता. मिळेल ते काम करायचे आणि हाताला येईल ते खायचे अन तिचा शोध घ्यायचा इतकेच त्याचे आयुष्य उरले होते. बाकी काहीच त्याच्या विश्वात शिल्लक नव्हते. रात्र नाही की दिवस नाही साल नाही की महिना नाही !

अंगाचं पाचट झालेला पोरगा आता माझ्या पुढ्यात होता आणि माझ्या काळजाचा पालापाचोळा होऊन गेला. मालतीचे काय झाले हे त्याला सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्याच्या खोल गेलेल्या, शुष्कतेच्या खाचा झालेल्या, काळ्या वर्तुळात बुडालेल्या म्लान डोळयांना नजर देण्याचे माझे अखेरपर्यंत धाडस झाले नाही. मंतरल्यागत मी सरळ खिशात हात घातला आणि होते नव्हते ते सर्व पैसे त्याला दिले. त्याला त्याच्या गावाकडं परत जायची विनंती केली तसे त्याच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. त्याला तिथेच थांबवून मी आत गेलो.

मित्रांच्या खिशातले होते नव्हते तितके पैसे त्याला द्यावेत म्हणून घाईघाईने बैठक बसलेल्या खोलीत शिरलो. इशाऱ्याने सगळ्याकडून पैसे घेतले. पैसे गोळा करताना बैठकीत ज्यांची बारी लावली होती त्या मालकीणबाई माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होत्या. त्यांना काही वेगळाच संशय आला असावा. ते सर्व पैसे घेऊन मी धावतच बाहेर आलो. बाहेर येऊन पाहतो तर तो तिथे नव्हता. त्याचा अस्थीपंजर झालेला मळकट देह शोधत मी थेट हाय वे पर्यंत पळत आलो पण तो कुठेच दिसला नाही. कला केंद्राबाहेरील रोडवरच्या पान टपरीवाल्याला विचारलं तर त्याला एका एसटीबसमध्ये बसून जाताना पाहिल्याचे त्याने सांगितले…

ते ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. किती तरी वेळ निशब्द होऊन थिजून गेल्यासारखा उभा राहिलो. तो त्याच्या गावी तर नक्कीच गेला नसावा मग कुठे गेला असेल, तो पुन्हा मला भेटेल का असे टोकदार प्रश्न काळजात अधांतरी टाकून तो अंधारलेल्या दिशांच्या शोधात निघून गेला होता. जो शोध कधी पुरा होणार नाही त्याचा पाठलाग करण्याची मरणवेडी प्रतीक्षा त्याच्या वाट्याला का यावी याचा विचार करत मख्खपणे सिगारेट ओढत उभं राहिलो. त्याच्या आठवणीत उस्मरत राहिलो. डोळे पाझरत राहिले. ओठाला चटका बसला तेंव्हा भानावर आलो. नियती पण कमालीची क्रूर असते, ती कुणासोबत कोणता डाव खेळेल, नशिबाची कशी थट्टा मांडेल याचा काही नेम नसतो…

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

83809 73977

Previous articleमित्रो और भक्तो,सबको सलाम!
Next articleयुगांतर व्याख्यानमाला- विषय: नीती– सुरेश द्वादशीवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.