लग्न

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

भाग-१

लग्न हा प्रकार मला कधीच पटला नाही. लग्न ही मला नेहमीच मागास संस्था वाटते.

लग्नाशिवाय प्रेम करता येतं,
लग्नाशिवाय एकत्र राहता येतं,
लग्नाशिवाय सेक्स करता येतो,
लग्नाशिवाय मुलांना जन्म देता येतो ….

मग लग्नाशिवाय अशी कुठली गोष्ट जी मिळत नाही ?
तर बुरसटलेल्या समाजाची मान्यता.

एकाचं दोन होणं, म्हणजे ‘अधिक’, म्हणजे लग्न करणं … हे समाज ‘गोड’ मानतं,
दोघांचं विभक्त होणं, म्हणजे ‘वजा’, म्हणजे डिवोर्स … हे समाज ‘वाईट’ मानतं.
मुळात लग्नाला एवढी अव्वाच्या सव्वा किंमत द्यावीच का ? आणि डिवोर्सलाही.
ज्याला एकत्र यावंसं वाटेल तो येईल, ज्याला वेगळं व्हायचं तो होईल…. सिंपल आहे.

त्यात लग्नाला ‘दो दिलों का मिलन’, ‘शादी अतूट बंधन’, ‘स्वर्गात बांधलेली गाठ’ … असं फालतूचं पकवून पकवून अव्वाच्या सव्वा किंमत दिली जाते.
घंटा मिलन आणि गाठ ! मला कोणीतरी ठोकायला हवंय आणि मला कोणीतरी ठोकणारा हवाय. बाबारे, मला समाजमान्य “सेक्स” करायचाय, समाजमान्य पालक व्हायचंय, म्हणून लग्न.

वर कायद्याची घुसखोरी. दोन्ही पार्टनर्सना स्वेच्छेने वेगळं व्हायचं असेल तरी कायद्याच्या किती फॉर्मॅलिटीज. कौन्सिलिंगच करा, ६ महिने बरोबरच राहा … च्यायला. कायद्याचा नको तेवढा हस्तक्षेप. का तर ते लग्न टिकावं. पण मुळात ते लग्न टिकावं यासाठी समाजाला एवढी उत्सुकताच का ?

“बाई गं / बाबारे माझा तुझ्यावर विश्वास नाही. उद्या तू माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर गमजा मारल्या तर, मला सोडून गेलास/गेलीस तर..
अरे मला माझ्या म्हातारपणाची सोय नको का करायला ? मला माझ्या म्हातारपणाची काळजी, म्हणून रे लग्न. काही वर्षांनी आपली भांडणं होतील, आपल्याला एकमेकांचा कंटाळा येईल, तुझ्या चंचल मनाला दुसरं कोणी आवडेल … मग तू लगेच बॅग भरशील आणि चालता होशील. मग मी कोण नवीन शोधत बसू परत ? म्हणून लग्न. म्हणून मला हवाय कोणीतरी जो तुझे लगाम ओढू शकेल, तुला माझ्याबरोबर राहण्यासाठी मजबूर करू शकेल. कोण बरं असेल तो….. अरेच्चा कायदाच कि तो ! ”

———————

‘मोनोगॅमी’ हि संस्था एकंदर समाजाच्या फायद्याची, म्हणून ‘पॉलीगामी’ जाऊन मोनोगॅमीचा स्वीकार करण्यात आला. त्यातला सर्वात महत्वाचा फायदा होता तो, ‘रोगराईला आळा’ आणि ‘भावनिक गुंत्यातून उद्दभवणारे प्रॉब्लेम्स’. साहजिकच लग्न हे एका पार्टनरपुरतं मर्यादित राहिलं. आणि समाजाने देखील ‘लग्न’ ह्या संस्थेतला फायदा पाहून, ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले.

प्रत्येक व्यवस्थेचे बरे-वाईट परिणाम असतातच. तसे लग्नाचे देखील आहेतच. पण बहुतांश लोकांना काय सूट होईल आणि त्याचा समाजावर काय परिणाम होईल ह्यावर त्या संस्था बेतलेल्या असतात. कायदा हा बहुतांश लोकांना/मेजॉरिटी पाहून बनवले जातात. ते प्रत्येकाला सूट होतीलच असं नाही.
म्हणून समाजातली प्रगलभता कशी वाढेल, याकडे समाजाने जास्त लक्ष द्यायला हवं.

जसजसा समाज प्रगल्भ होत जाईल, तसतसं समाजातलं लग्नाचं प्रमाण कमी होऊन ‘लिव्ह इन’ प्रमाण आणि मान्यता वाढत जाईल.

आजकाल बरीच मंडळी कोणाचंही ऐकून, “मी देखील लग्न करणार नाही”, असं म्हणत फिरतात. त्यांचे ते निर्णय पूर्ण विचारांती असतात का याबद्दल मला साशंकता वाटते.

समजा मी उद्या लग्न नाही केलं, मला पार्टनर नाही मिळाला, तर मग माझ्या ‘सेक्स’ चा प्रश्न कुठे संपवायचा ?
मग मी काय करणार, तर पैसे देऊन का होईना बाहेर वेश्यालयात जाणार. मला काहीही करून माझ्या शरीराची भूक मिटवणं गरजेचं आहे. मग पुन्हा बाहेरच्या रोगराईचा प्रश्न आलाच. ही झाली माझी शारीरिक गरज पूर्ण, पण मानसिक गरजांचं काय ? त्या कुठे पूर्ण करणार ? माझा एकटेपणा मी कसा घालवणार ? मी तेवढा मानसिकरीत्या सक्षम आहे का ?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे हवीत.

पण पुन्हा गोम अशी की, वयाच्या २३/२४ वर्षात माझ्याकडे तेवढी विचार करण्याची Maturity / प्रगल्भता येते का ?
आपली लग्न मुळातच ह्या वयात लावली जातात/आपण करतो. लग्नाचा विचार आपण फार विचारांती करतो असं काही नसतं.
‘जन्माला आलं की अमुक एका वयानंतर लग्न करतात, मुलं जन्माला घालतात’ … येवढाच एक संकुचित विचार घेऊन बहुतांश वर्ग जगत असतो.

मग लग्नाचं वय काय असावं ? २८/२९/३० ?
पण पुन्हा इथे गोम अशी की, वयाच्या १८ वर्षापासून सुरु झालेली शारिरीक गरज, सेक्स हे शमवायचं कुठे ?
१० वर्ष खुडत राहायचं ? त्यासाठी समाजाकडे कुठली प्रगल्भ व्यवस्था आहे ? एवढंच काय तर समाज ‘सेक्स एज्युकेशन’ पण देत नाही.
म्हणजे तुमच्या शारीरिक/सेक्शुअल गरजा तुम्ही एकतर मारा, नाहीतर मग लपूनछपून, समाजाच्या भाषेत अनैतिकतेने करा. आणि जमत नसेल तर मग लग्न करून मोकळे व्हा. म्हणजे लग्न हा ‘जर-तर’ चा प्रकार होऊन जातो.

लग्नाला लोकांनी कितीही ‘पवित्र रिश्ता’ वगैरे नावं दिली तरी “सेक्स” हे मला लग्नाचं प्रमुख कारण वाटतं.

– मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

हे सुद्धा पहा , ऐका -https://youtu.be/LmwZCFEudBM

Previous articleलाईफपार्टनर – एकटेपण – पजेसिव्हनेस – मल्टिपार्टनर !
Next articleलग्नाआधी ….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.