लावणीतला शृंगार हरपला…

मुकुंद कुळे

यमुनाबाई वाईकर आणि शृंगारिक लावणी, म्हणजे सोन्यातलं जडावकाम. बाईंचा आवाज असा बावनकशी होता की त्यांच्या आवाजात शृंगारिक लावण्या ऐकायच्या म्हणजे सुखाची परमावधी. सोबत त्यांच्या एकेक अदा म्हणजे तर थेटच ‘मार डाला’ थाटाच्या. पण बाईंच्या बैठकीतील शृंगारिक लावण्या ऐकून त्यांची आगळिक करण्याची हिंमत मात्र कुणाला झाली नाही, एवढी बाईंचं गाणं आणि त्यावरच्या अदा खानदानी होत्या. गाणं कुठलंही असो आणि कितीही अश्लील भाव असलेलं असो… यमुनाबाई आपल्या अदेचं आणि भावकामाचं एवढं अस्सल मायाजाल विणत जायच्या की रसिकाचं लक्ष आशयापेक्षा बाईंच्या कलात्मक अभिव्यक्तीकडेच लागून राहायचं…
बाईंचा पेचदार-टोकदार आवाज आणि त्याला साजेसं चेहर्‍यावरील भावकाम नि आंगिक अदा… रसिक कधी घायाळ झाल्याशिवाय राहिलाच नाही. पण हे घायाळपण कलेचं होतं, वैषयिक नाही.
‘अहो भाऊजी मी कोरा माल, मुखी विडा लाल
नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी
जशी फुलली चाफ्याची, कळी ग… बाई ग…’
किंवा
‘उंच माडीवरती चला, भोग द्या मला
मी ग रायाच्या बसते की डाव्या बाजूला…
वयाच्या साेळाव्या वर्षापासून नव्वदीपर्यंत यमुनाबाई अशा शृंगारिक लावण्या सादर करत होत्या, पण ना लावणीतला शृंगार कमी झाला ना बाईंचं वय वाढलं. त्यांची लावणी कायम तेज:पुंजच राहिली. म्हणून तर वयाच्या एेन ऐंशीत जेव्हा बाईनी दिल्लीच्या कमानी अॉडिटोरियमध्ये बैठकीच्या लावणीवर अदा केल्या, तेव्हा त्या पाहून थक्क झालेल्या बिरजू महाराजांनी त्यांना घट्ट मिठी मारली होती आणि ते म्हणाले होते- ‘जी कर रहा है की आप गाये और आपके गानेपर मै अदा करू…’ तशीही संधी लवकरच चालून आली.
बिरजू महाराजांच्या पुण्यातील शिष्या प्रभा मराठे यांनी बिरजू महाराजांच्या साठीला बिरजूमहाराज आणि यमुनाबाईंची जुगलबंदी घडवून आणली. त्या कार्यक्रमात यमुनाबाईंनी म्हटलेल्या
‘मुखसे ना बोलो कान्हा
बाजुबंद खोलो…’ या गाण्यावर बिरजूमहाराजांनी मनसोक्त अदा केल्या होत्या.
यमुनाबाई म्हणजे बैठकीच्या लावणीचं खणखणीत नाणं होतं. लहानपणी आईबरोबरच त्यांनी अनेक लावणीगायिकांकडून शिक्षण घेतलं. पण त्यातही त्या अभिमानाने नाव सांगायच्या त्या गोदावरीबाई पुणेकरांचं. गायनाचं आणि भावकामाचं अस्सल कसब त्यांनी गोदावरीबाईंकडूनच उचललं होतं.
आवाज चांगला असल्यामुळे सुरुवातीच्या काळात यमुनाबाई गायच्या आणि त्यांच्या बहिणी नाचायच्या. मात्र त्या काही काळ बडे गुलाम अली खाँच्या एका शिष्याकडे शास्त्रीय ढंगाचं गाणंही शिकल्या होत्या. त्यामुळे तराणावगैरेही त्या हुकमतीने गायच्या. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे त्यांच्या आवाजाला गाण्याची पक्की बैठक मिळाली आणि त्यानंतरच ठाय लयीतल्या बैठकीच्या लावण्या ही त्यांची खासियत झाली… आणि ही ओळख त्यांनी अखेरपर्यंत जपली…
अगदी पाचेक वर्षांपूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हाही त्यांनी बसल्या बसल्या कितीतरी लावण्या गुणगुणून दाखवल्या होत्या…
… वाईतील त्यांच्या सम्राज्ञी नावाच्या घरातील अंगण्यातील झोपाळ्यावर बसून त्या मंद सुरात गात होत्या… तेव्हा दृष्टीला समोरचे वाईचे घाट आणि त्या घाटांतून शांतपणे वाहणारी कृष्णानदी दिसत होती… मनात आलं, किती पावसाळे या दोघींनी एकमेकींच्या संगतीने अनुभवले-पाहिले असतील… आता तर यमुनाबाई गेल्या. कृष्णा एकटीच राहिली… पण तसं तरी कसं म्हणू? मला कृष्णेच्या खळाळत्या पाण्यातच यमुनाबाईंच्या लावणीचे सूर ऐकू येतायत.

९७६९९८२४२४

Previous articleसुरमई
Next articleधर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.