‘लैला’-भविष्यातील भारताचे भयावह चित्र

वैभव छाया

‘डिस्टोपिया’ म्हणजे स्वप्नवत किंवा आदर्श अशा ‘युटोपिया’च्या विरुद्ध असा भयावह समाज. हुकुमशाही, फॅसिझम असलेल्या अशा डिस्टोपियन स्वरूपाच्या कलाकृती अगदी भविष्याचे भाकीत करून चिंतेत पाडत नसल्या तरी वर्तमानात, आपल्या सभोवती समाजात अशा वृत्ती असतातच… जॉर्ज ऑरवेलची “१९८४’ किंवा रे ब्रैडबरीची “फैरनहाइट ४५१’ या कादंबऱ्यांच्या रांगेत मोडणारी पत्रकार प्रयाग अकबर यांची “लैला’ ही अशीच एक डिस्टोपियन कांदबरी… याच कांदबरीवर आधारित नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली “लैला’ ही दीपा मेहता यांची वेब सिरीज आपण अशा डिस्टोपियाच्या दिशेने वाटचाल करत आहोत का, अशी शंका उपस्थित करते.
———
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि नियतीशी आपला करार सुरू झाला. हा करार शंभर वर्षांनंतर आजच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून कसा असेल याचे यथार्थ वर्णन करणारी नेटफ्लिक्सची ‘लैला’ ही वेबसिरीज आहे.
लैलाचे कथानक काय आहे हे सांगण्यासाठी म्हणून हा लेख नाही. ‘लैला’ मध्ये काय घडतं, कसं घडतं यासाठी तुम्हाला ती सिरीज पहावी लागेल. हा लेख या सिरिजचे जे सोशियो पॉलिटकल इंम्पॅक्ट आहेत त्यावर आहे. प्रगाय अकबर यांनी २०१७ साली ‘लैला’ या शीर्षकाखाली लिहीलेल्या कादंबरीवरच ही सिरीज आधारीत आहे. दिग्दर्शन केलंय दीपा मेहता यांनी. ‘लैला’ चे ट्रेलर लाँच झाल्यादिवासापासून ही सिरीज सोशल मीडियावर चर्चेत होती. ब्राह्मणी, संघी राजकारणाचे पाठीराखे असणारे युजर्स… ज्यांना आजच्या पॉप्युलर कल्चरमध्ये चाळीस पैसेवाले ट्रोलर भक्त म्हटले जाते त्या सर्वांनी नाके मुरडलीयेत. सिरीजला वेड्यात काढले आहे. तर दुसऱ्या बाजूस तर्काने, विवेकाने वागणाऱ्या प्रागतिक बुद्धिवादी युजर्सनी या सिरीजला ब्राह्मणवादावर तिखट प्रहार म्हटले आहे. तर जात्यंतक चळवळीत अग्रेसर असणाऱ्या बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी या सिरीजला ब्राह्मण्यवादी राजकारणापर्यंत जाणारी परंतु अभिजन वर्गापर्यंत लिमिटेड असलेली ताकदवर सिरीज म्हटलेय. या मुद्द्यावरही येऊयातच. परंतू त्याआधी कळीचा प्रश्न असा, आर्यावर्त मध्ये जे दाखवले आहे ते खरेच तसे होईल का? तर या प्रश्नाचे उत्तर शोधणे खूप गरजेचे आहे.

फार प्रस्तावनेत न जाता थेट मुद्द्यावर येऊयात. लैलाची कथा डॉ. जोशी या कॅरेक्टरभोवती फिरते. सहा भागात प्रकाशित झालेल्या या सिरिजमधील पहिल्या पाच भागात डॉ. जोशी थेट दिसत नसला तरी त्यांच्या अवतीभोवती फिरणारे आणि त्याच्या नावाने प्रभावित असलेले जग सातत्याने आपल्याला घाबरवत राहते. सिरीजच्या सुरूवातीपासूनच आर्याव्रत नावाच्या देशात राहणाऱ्या सर्व समुदायांनी निवडलेला नेता म्हणून डॉ. जोशीचा जयजयकार सतत घुमत राहतो. ज्याचा मुख्य उद्देश विभिन्न जात-धर्म समुदायांच्या विभाजनातून शांतता कायम करण्याचा असतो. हे समुदाय त्यांच्या त्यांच्या संख्यबळानुसार विविध घेट्टो मध्ये विभाजीत केले आहेत. त्यांचे विभाजन करताना आधुनिक शहरांतील आताची सेक्टर पद्धती आहे. हे सर्व सेक्टर उंचच उंच भिंतींनी एकमेकांशी विभक्त आहेत. प्रत्येक सेक्टरचे स्वतःचे असे स्वतंत्र नियम आहेत. हे नियमवजा कायदे पाळणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहेत. न पाळणाऱ्यांना मृत्यूदंड अथवा श्रमकेंद्र असं गोंडस नाव दिलेल्या छळछावणीत रवानगी आहे. पूर्ण सहा भागांची सिरीज काळ्याकुट्ट, कुंद, दमट, धुरकट वातावरणात आपल्या डोळ्यांना दिसते. त्यामुळे कथेतला हिंसक आणि निराशाजनक भाव आपसूकच पूर्ण सिरीजच्या कथानकाचा भाव आपल्या मनावर बिंबवून जातो.

लैला ची कथा २०४७ सालची आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या शंभर वर्षांनंतरची. हा बदलेला भारत आहे. ज्याचे नाव सुद्धा बदलेले आहे. संवैधानिक व्यवस्था नसलेल्या, एकछत्री कारभार असलेल्या या देशाचा नायक आहे डॉ. जोशी आणि देशाचे नाव आहे आर्यावर्त. तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगत, त्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाचा प्रत्येक प्रकारचा डेटा सरकारी यंत्रणेकडे आहे. आर्यावर्त मध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक गोष्टीत सर्विलंसला सामोरे जावे लागतंय. ते करत असलेली प्रत्येक गोष्ट सरकारी निगराणीत आहे. ही निगराणी अधिक काटेकोर व्हावी यासाठी गेस्टेपोसारखी सिक्रेट पोलिस सर्विस देखील आहे. पाणी सहज उपलब्ध नाही. पाण्याचे स्मगलिंग चालू आहे. पाणी ही लक्झरी कमॉडिटी बनलेलीये. कुणीही मोकळ्या वातावरणात फिरू शकत नाही. तोंडाला एअर फिल्टर मास्क लावल्याशिवाय श्वास घेणे अशक्य आहे. आर्यावर्त मधल्या शाळांत आर्य पद्धतीने वंशश्रेष्ठत्वाचे शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेद्वारे लहान मुलांचे मेंदू लहान वयातच प्रोपोगेंडाने बांधून त्यांचे नीट प्रोग्रॅमिंग केले जातेय. या शिक्षणव्यवस्थेत शिकण्याचा अधिकार फक्त शुद्ध रक्तबीजाच्याच मुलांना आहे. जी मुले शुद्ध रक्तबीजाचे नाहीत त्यांची रवानगी प्रोजेक्ट बळीमध्ये करून कायदेशीररित्या त्यांचे खून करण्याचा कायदा आहे. तो अतिशय निर्दयीपणे राबवण्यात आलेला या सिरीजमध्ये सातत्याने आपल्याला पहायला मिळतो. या कथेची नायिका आहे शालिनी रिजवान चौधरी ऊर्फ शालीनी पाठक. तिला या सर्व परिस्थितीतील यातनांशी दोन हात करावे लागतात.

या कथेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत एका मंत्राचे वारंवार उच्चारण आपल्या कानी पडते, तो मंत्र म्हणजे, ‘हमारा जन्म ही हमारा कर्म है. ‘हा मंत्र शुद्धीकरण केंद्रातील प्रत्येक कैदी महिलेला वारंवार ऐकावा लागतो, म्हणावा लागतो, त्याचा जाप करावा लागतो. हे अगदी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेतील जातीनियुक्तीच्या नियमांप्रमाणेच आहे. जिथे ज्याचा जन्म तिथेच त्याचाचं मरण, तो ना वर जाऊ शकत ना तेथून खाली येऊ शकत. यावरून आर्यावर्तमधली व्यवस्था ही बिनशिड्याची छळछावणी असलेली इमारत आहे याची जाणीव सतत मेंदूला होत राहते. प्रत्येक घेट्टोच्या भिंतीच्या पलीकडे डंपिंगचे मोठमोठाले ढीग आहेत. त्यातून सातत्याने बाहेर पडणारे मिथेनचे लोट पेट घेतायेत. आगीचे लोळ पसरतायेत. आगीचे लोळ पसरवणाऱ्या डंपिंगच्या मधोमध झोपडपट्ट्या आहेत. घरवजा झोपड्यांचे रंग निळे आहेत. काही ठिकाणी हिरवे आहेत. हे मेटाफर आहे वस्त्यांत राहणाऱ्या लोकांच्या जात-धर्म चरित्र वास्तवाचे. स्लम एरियातले लोक रोज एकमेकांशी भांडतायेत, मारामाऱ्या करतायेत. घोटभर स्वच्छ पाण्यासाठी. काळ्या ढगांची सावली पडू लागली की भांडण सोडून जिथे आडोसा मिळेल तिथे लपतायेत कारण पडणारा पाऊस आता काळ्या रंगाचं पाणी घेऊन बरसतोय. ह्या पाण्यानं सुख नव्हे तर अंग जाळणारं दुःख बरसतंय. या घेट्टोंना विभक्त करणाऱ्या भिंती विद्रोह्यांच्या घोषणांनी भरून गेल्यात. पण काळा पाऊस त्या घोषणांना, यल्गारांना धुवून मिटवण्यात किमान तेव्हाही अशक्तच वाटतो आहे. इथे प्रत्येक माणसाच्या शरिराचे बायोमेट्रीक केले गेले आहे. त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण अगदी जातीव्यवस्थेप्रमाणेच आहे. आर्यावर्त मध्ये कुणाला प्रवेश, कोण निषिद्ध हे त्यांच्या हातावर गोंदवले गेलेल्या टॅटूवरून ठरते. हा टॅटू ज्यू समुहाने उभ्या केलेल्या सिक्रेट सोसायट्यांच्या सिंबॉलिजमशी साधर्म्य साधणारा आहे. हा सिंबॉल ठरवतो प्रत्येक माणसाचे आर्यावर्तमधले स्टेटस. हे स्टेटस त्यांनी ठरवलंय त्या व्यक्तीच्या रक्तावरून. कोण शुद्ध रक्ताचे, कोण अशुद्ध रक्ताचे यावरून कोण छळछावणीत जाणार कोण आर्यावर्तमध्ये राहणार याची ठरवणूक होते. डॉ. जोशीने बनवलेले हे सर्व नियम जो तोडेल त्याला बळजबरीने सिक्रेट पोलिस शुद्धीकरण केंद्रात पाठवतात. शुद्धीकरण केंद्रात पाठवल्यानंतरही जर कुणी तयार झाले नाही तर त्यास विषारी गॅस चेंबरमध्ये डांबून मारून टाकण्याची शिक्षा आहे.

ही आधुनिक पद्धतीची आधुनिक मनूद्वारे तयार केली गेलेली आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अधिक जुलूमी पद्धतीने राबवली जाणारी मनूव्यवस्था आहे. यात शुद्ध बीजांव्यतिरिक्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दूष म्हटले जाते. अगदी शुद्धीकरण केंद्रात कैदी म्हणून असलेल्या बाया देखील स्वतःचं शोषण होत असूनही त्यांनी एकमेकांना दूष म्हटलेले पटत नाही. दूष ही त्यांच्यासाठी प्रचंड मोठी शिवी आहे. आर्यावर्तमध्ये महिलांच्या शुद्धीकरणावर सर्वात जास्त जोर दिलेला आहे. हा जोर आज एकविसाव्या शतकात आहे तसाच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महिलांवरील वर्चस्वाशिवाय ब्राह्मणवादाची मूळे तग धरू शकत नाही हे त्या व्यवस्थेचा पहिला नियम आहे जो मनूकाळापासून आजतागायत चालू आहे. कारण ब्राह्मणवादात, मनूवादात जातींचे शुद्धीकरण, महिलांचे शुद्धीकरण खुप महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच आर्यावर्तमध्ये परधर्मात लग्न करणाऱ्या, निम्न जातीत लग्न करणाऱ्या, बापाच्या संपत्तीत हक्क मागणाऱ्या स्त्रिया दूष आहेत. गुन्हेगार आहे. अशा महिलांना पकडून थेट वनिता कल्याण केंद्र नावाने चालणाऱ्या महिला शुद्धीकरण केंद्रात डांबले जाते. त्यांच्यावर चार्ज लागतो तो देशद्रोहाचा. या पापातून मुक्त होण्यासाठी त्या महिलांना आपल्यासारख्याच दोन देशद्रोही महिलांचा खून करावा लागतो. त्याशिवाय त्या कैदी महिला देशद्रोही असल्याच्या पापातून मुक्त होत नाहीत.

आज आपण २०१९ मध्ये जगतोय. आपल्या हातांच्या रेषांपासून डोळ्यांच्या बुब्बुळांपर्यंतचा डेटा सरकारकडे आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या शरिराची माहीती देण्यासाठी हळूहळू तयार झालो आहोत. त्याच पद्धतीने येत्या पाच ते दहा वर्षांत आपण आपल्या रक्ताची माहितीवजा मालकी सुद्धा सरकारकडे जमा करायला तयार होऊच यात वाद नाही. चौकाचौकात, गल्लीबोळात आपण सीसीटीव्हीच्या निगराणीत आहोत. आपण कुठे जातो, काय करतो, काय खातो, कोणता धर्म पाळतो, कोणत्या विचारधारेचे वाहक आहोत, कोणते ब्रँड वापरतो, कोणती टॅक्सी सर्वीस वापरतो इथपासून ते आपण वापरत असलेले कंडोम, पीत असलेली दारू, मोबाईल, मोबाईलवरचं संभाषण, आपलं सेक्शुअल ओरिएंटेशन हा सर्वच्या सर्व डेटा सोशल मीडियांच्या महाकाय सर्वरवर आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजेंसद्वारे त्या सर्व डेटाची नीट विभागणी करून या सोशल मीडिया जय “आर्यावर्त’! साईट्स जगभरातील राजकिय पक्षांना अजस्त्र रकमांना विकत आहेत. केंब्रिज अनालिटीका, फेसबुक, ट्विटर ने हे काम २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत भारतात तर २०१६ च्या निवडणूकांत अमेरिकेत केलेले आहे. याच डेटाने जनमत आणि जनमन विभक्त करून राजकीय निर्णय प्रभावित करण्याचा सर्वात मोठा पायंडा ब्रेक्झिटच्या निमित्ताने पाडून जगाला डेटाची ताकद दाखवून दिली. ही ताकद वापरूनच जगभरात हुकूमशाही व्यवस्था लोकशाही निवडीच्या माध्यमाने सत्ता काबीज करून आहेत. बहुसंख्यांकाद्वारे अल्पसंख्यांकांचे निर्दालन करणाऱ्या या व्यवस्था सातत्याने सत्तेच्या पटलावर विजयी होत आहेत. नोटाबंदी, मॉबलिंचिंग, फसलेली अर्थव्यवस्था, गौरक्षकांचा उच्छाद, फसलेली बँकिंग सिस्टीम, घसरलेला जीडीपी, शेतकरी आत्महत्येचा वाढलेला दर, बेरोजगारीचा वाढलेला दर, वाढत्या आत्महत्या, सातत्याने होत असलेल्या दंगली, दंगलीनंतरचे ध्रुवीकरण, विचारवंतांच्या हत्या, अल्पसंख्यांकांचे निर्दालन, विद्यार्थ्यांच्या संस्थात्मक हत्या, सैनिकांच्या नावावरचे राजकारण, मागासवर्गीयांचे अमानुष शोषणासारखे ज्वलंत मुद्दे प्रत्येकाच्या मनात पेटत असताना देखील २०१९ च्या निवडणूकांत मोदी सरकारने आधीपेक्षाही अधिक मोठे बहुमत प्राप्त केले. हे महाकाय बहुमत वर उल्लेख केलेल्या एआय टेक्नोलॉजीच्या बळावर मिळालेले आहे. हे आता कुणीही नाकारू शकत नाही. या यशाचे पहिले सुत्र भारतात नांदणाऱ्या विभिन्न जातीसमुहांचे विघटनीकरण करून त्यांचे निर्दालन करून, एकमेकांपासून विभाजित करून स्वतःच्या सोयीची सत्ता व स्वहिताची शांतता प्रस्थापित करण्यात आहे. हीच या सत्तेची पहिली पायरी आहे. तर लैला मध्ये दाखवलेली अवस्था ही ब्राह्मण्यवादांच्या राजाकारणाची अत्युच्च पायरी.

उदाहरणादाखल … आपण मुंबई शहर निवडूया. लैला मध्ये दाखवलंय तसंच शहर आहे. मोठमोठे रस्ते, आताचे हाऊसिंग काँम्प्लेक्स आहेत अगदी तसेच काँम्प्लेक्सेस, त्यांची सिक्युरिटी सिस्टीम. या इमारतींना प्रोटेक्ट करणाऱ्या मोठमोठ्या तटबंदी. जशा आजच्या आहेत. फक्त त्या छोट्या आहेत. आणि या तटबंदीच्या आजूबाजूला आहेत आजच्या वस्त्या. जशा गारोडीया काँम्प्लेक्सच्या बाजूला आहे रमाबाई कॉलनी, मानखुर्दची वस्ती. ज्यात मागास जातींचे आणि मुस्लिम धर्माचे लोक राहतात. या वस्त्या वेढल्यात अजस्त्र अशा डंपिंग ग्राऊंड्सनी. ज्यातून तसाच धूर निघतो जसा आर्यवर्तच्या स्लममधून निघतोय. आजच्याच काळात या वस्त्यांत राहणारे लोक टीबी, दमाने आजारी आहेत. फुफ्फुसांचे कँसर झालेत. बायकांचे डोळे, गर्भपिशव्या खराब झाल्यात. पिण्याच्या पाण्याचे पाईप गटारीतून येतायेत. दिवसआड काळसर गढूळ पाणी येतं. पाण्यात किडे येतात. अगदी तसेच जसे आर्यावर्त च्या स्लममध्ये येतायेत. हीच स्थिती फक्त रमाबाई कॉलनीपुरती नाही. मुंबईत जिथवर हायवेचं जाळं आहे आणि हायवेच्या लगत मागास आणि मुस्लिमांच्या वस्त्या आहेत तिथली हीच परिस्थिती आहे २०१९ मध्ये. २०४७ ची आर्यावर्तमधली परिस्थिती त्यामुळे अतिशयोक्ती वाटत नाही. ज्यांना अतिशयोक्ती वाटतेय त्यांच्या मेंदूतील गदळ गु घाण गोबर लवकर बाहेर येवो हीच प्रार्थना करावीशी वाटते.

लैला मध्ये दाखवल्यामप्रमाणे जर कुणाला वाटत असेल की आमच्या शिक्षणाच्या, पैशांच्या बळावर आमचे असे हाल होणार नाहीत तर त्यांनी कथेची नायिका जी स्वतः श्रीमंत आहे, उच्च जातीची आहे तिचे झालेले हाल पहावे. तिचा नवरा रिजवान (राहूल खन्ना) हा मुस्लिम आहे. त्याला मारून टाकले जाते. परंतु शालीनीला मारून न टाकता तीला शुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. यावरून २०४७ साल येईपर्यंत उरलेले मागास जातीचे पुरूष व बाया एकतर मारून संपवले आहेत किंवा जे उरले आहेत ते डंपिंगने आच्छादलेल्या दूष वस्तीत ढकलून दिले आहेत. ज्यांचे हाल जिनोसाईडच खाणार आहे भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवात. कदाचित त्यामुळे सिरिजमधले शोषक आणि शोषित अजूनपर्यंत ब्राह्मणच दाखवले गेले असावेत. कदाचित याच्या सेकंड सिजनमध्ये काही वेगळे दाखवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ब्राह्मणांपासून सुरू झालेली आणि ब्राह्मणांवरच संपू पाहणारी ही सिरीज आहे असे म्हणणे थोडे घाईचे होईल. परंतू त्यामुळे जे पॉलिटीकल स्टेटमेंट लैला ड्रॉ करू पाहतेय ते नाकारता येणार नाही. कारण जातीय मानसिकतेतून आलेला गिल्ट काँन्शियसनेस हा सर्वात आधी येथील उच्चवर्णीयांना करून देणे गरजेचे आहे. म्हणून सर्व पात्रं ही उच्चवर्गीय आहेत. नायक ही त्याच वर्गाचा, खलनायकही त्याच वर्गाचा. जोशी खलनायक आहे. त्याच्या जागेवर बसण्याची मनिषा बाळगणारा राव साहेब हा सुद्धा ब्राह्मणच आहे. अमेरिकेहून परतून स्कायडोम नावाचे प्रोजेक्ट बनवणारा डॉ. दीक्षित हा सुद्धा ब्राह्मणच आहे. परंतू आपल्या प्रोजेक्टचा गैरवापर होणार आहे हे लक्षात येताच प्रोजेक्टची ब्लू प्रिंट विद्रोह्यांना पुरवतो. ह्या विद्रोह्यांचं नेतृत्व केलंय ते भानूने (सिद्धार्थ). भानू त्याच्या सर्व हालचाली स्लममधून चालवतो. पण यात एक कॅरेक्टर अजून आहे ते आहे यादव नावाचे .डॉ. जोशीचे अत्यंत निकट आणि प्रामाणिक कॅरेक्टर. जो एकाच वेळी डॉ. जोशीशी प्रामाणिक असून उच्चवर्गीय नायकाचे रिवर्स शोषण करणारा आहे. सध्याच्या राजकिय स्थितीत ब्राह्मणवादाचे फुटसोल्जर बनून जातीव्यवस्था अतिकडक राबवणारा, रस्त्यावर उतरून दंगलीत भाग घेणाऱ्या समुहाचे प्रतिनिधीत्व करणारे हे कॅरेक्टर आहे.

आर्यावर्त सारखी एखादी व्यवस्था किंवा संस्था जरी उभी राहीली तर ती आजच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या समकक्षच असेल. ज्याचे सर्वात पहिले बळी असतील ते या देशातले मागासवर्गीय, महिला. लैलामध्ये दाखवल्याप्रमाणे ते २०४७ साली किती लोक जीवंत असतील याची शाश्वती देता येणार नाही. सध्याच्या घडीला ज्याप्रकारे एकामागोमाग संस्था उद्धवस्त केल्या जात आहेत त्या रोखाने लैलात दाखवलेले ताजमहालचे विध्वंस आणि जय आर्यावर्तचा उद्घोष फार दूर नाही हे आपल्याला कळून चूकते. पुराव्यादाखल लव जिहाद  आणि घरवापसीचे प्रकरण आपण अनुभवलेच आहे. या व्यवस्थेच्या उभारणीसाठी बीजशुद्धी, वंशशुद्धी प्रचंड महत्त्वाची आहे त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांची शुद्धी करणारे केंद्र अत्यंत जुलूमी पद्धतीने राबत आहे.

जागेच्या अभावामुळे फार काही लिहीता येणार नाही. परंतु यथावकाश जरूर लिहीन. उन्मादाच्या कालखंडात आपणही उन्मादी बनलो आहोत. पैशाच्या जोरावर सर्व काही झाकले जात आहे. पण सुसाईड बाँम्बरची एक नवीन पिढी जन्माला आली आहे नव्हे तर ती घडवून जन्माला आणली जात आहे. म्हणून लैला हे प्रचंड ताकदवर पॉलिटीकल स्टेटमेंट आहे त्या स्थितीवर. पोस्ट ट्रूथ कालखंडातील स्टेटमेंट. फायर आणि वॉटर बनवून स्त्रियांच्या लैंगिकतेवर, पुरूषी वर्चस्ववादावर नेमके स्टेटमेंट करू पाहिलेल्या दीपा मेहतांना जो त्रास भारतीयांनी दिलाय त्याची उरफाटी चमाट आहे लैला सिरीज. कविता लिहीली, लेख लिहीला, चिकित्सा केली की गोळ्या घालणाऱ्या गायगुंडांच्या सनातनी झूंडींची औकात ही सरड्याची आहे. जे वारंवार स्वhiतासाठी रंग बदलतात पण धाव मात्र कुंपणापर्यंतचीच. त्यामुळे परदेशातून चालणारं नेटफ्लिक्स अजूनतरी यांच्या सेंसॉरशीपमध्ये नाही. म्हणून सिरीजमधला भानू रागावून आर्यावर्त के माँ की चूत म्हणून राग व्यक्त करतो. तरी कुणाला त्यावर कात्री चालवता येत नाही. दाद द्यावीशी वाटते तीन बायकांच्या हिमतीची एक म्हणजे दिग्दर्शक दीपा मेहता दुसरी पटकथाकार ऊर्मी जुवेकर आणि तिसरी शालिनी पाठकची भूमिका साकारणारी हुमा कुरेशी. पोस्ट ट्रूथ कालखंड ज्यात एंड ऑफ आयडीयोलॉजी होऊन फक्त पॉलिटीकल आयडेंटीटीचा खेळ उरलाय अशा नजीकच्या भविष्याची चूणूक लैला दाखवते. यथावकाश ही सिरीज भारतात बॅन होईल. टोरंटवरून, टेलिग्रामवरून बॅन होईल. त्याआधी पाहून घ्या. स्वअस्मिता उगाळत कोणता गु अंगाला फासून घेतलाय हे भारतीयांना किमान कळेल तरी.

[email protected]

Previous articleपुरुषसूक्ताचे पठण बंद करा!
Next articleआंद्रे आगासीच्या बाबाची कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.