‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या

 

अविनाश दुधे

परवा बलात्काराच्या आरोपाखाली आसारामबापूला जन्मठेप झाली . त्याला झालेल्या शिक्षेमुळे देशातील लाखो लोक आनंदित झालेत त्यापैकी मी एक आहे. आसारामचा आणि माझा थेट संबंध येण्याचं काही कारण नाही . मात्र २२ वर्षाच्या पत्रकारितेतेत वेगवेगळ्या निमित्ताने चारदा मी आसारामबाबत लिखाण केलं . आणि प्रत्येक वेळी भयानक अनुभवांना मला सामोरं जावं लागलं. या शिक्षेच्या निमित्ताने ते सारे अनुभव डोळ्यासमोर तरळून गेलेत .

 सन २००३. तेव्हा मी यवतमाळात ‘लोकमत’ चा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो . डिसेंबर महिन्यात तिथे बापूंचे प्रवचन (सत्संग) आयोजित करण्यात आले होते . जवळपास महिनाभरापासून त्याची जोरदार जाहिरात सुरु होती . शहरातील सर्वं प्रभावशाली मंडळींची एक समिती त्या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी दिवसरात्र एक करत होते . या अशा बापू , बुवा , महाराजांचे खरे स्वरूप माहीत असल्याने मी काहीसा त्रयस्थपणे त्या सगळ्या आयोजनाकडे पाहत होतो . मात्र प्रवचनाचा दिवस उजाडला आणि लाखोंचे जत्थे शहरात येवून धडकायला लागले . केवळ एखादा लाख लोकसंख्या असलेल्या त्या छोट्या शहरात बाहेरील प्रांत व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दीडेक लाख जमा झाले होते . स्वतः आसाराम ज्या दिवशी विशेष विमानाने शहरात आले त्या दिवशी तर गर्दीने उच्चांक गाठला होता .

   माझा ऑन फिल्ड रिपोर्टर वेळोवेळी मला अपडेट देत होता . जिथे गर्दी तिथे बातमी या न्यायाने प्रवचनाची बातमी द्यायची मात्र आपण त्या तमाशापासून दूरच राहायचं असा निर्णय मी घेतला होता . मात्र ज्यादिवशी आसाराम आले त्या दिवशी तिथे जावून आलेले  ‘लोकमत समाचार’ चे जिल्हा प्रतिनिधी प्रा . किशोर गिरडकर यांनी तेथील गर्दी आणि इतर गोष्टींचं मोठं उत्कंठावर्धक वर्णन माझ्याजवळ केलं . ते ऐकून मला राहवेना . मी माझा सोबती उपसंपादक ज्ञानेश्वर मुंदे याला घेवून त्वरेने प्रवचनस्थळी पोहचलो . पुढील तीन ते चार तास मी तिथे होतो . तिथे मी जे काही पाहिलं, अनुभवलं त्याने मी दिग्मूढ होवून गेलो . देव – धर्माच्या नावाखाली तिथे जो काही प्रकार सुरु होता ते पाहून मी प्रचंड अस्वस्थ झालो . किमान दोनेकशे भक्तांशी मी बोललो . भाबडे भक्त मोठ्या कौतुकाने बापूंना आम्ही कसा हार घातला , कशी मंत्रदीक्षा घेतली हे कौतुकाने सांगत होते . त्यासाठी एवढे एवढे पैसे मोजले हे सुद्धा ते अभिमानाने सांगत होता ( तेथील तेव्हाच्या सामूहिक वेडाचाराचे वर्णन मी सोबत जोडलेल्या वार्तापत्रात केले आहे . त्यामुळे येथे त्याची पुनरावृत्ती करत नाही ) त्यांच्यापैकी काही लोकांना  मला बापूबद्दल प्रचंड आदर असल्याचे दाखवून तुम्हाला बापूचा आशीर्वाद कसा लाभला हे तुमच्या पावत्यांसह छापतो असे आमिष दाखवून मंत्रदीक्षा आणि इतर धार्मिक विधींसाठी मोजलेल्या पैशांच्या पावत्या मी मिळविल्या .

  नंतर बापूंचे प्रवचन सुरु झाले . एका शब्दात सांगायचे झाल्यास ते प्रवचन म्हणजे ‘बकवास’ होते. समोरच्या लाखो लोकांना मूर्ख समजून बापू बुलेटप्रूफ काचेमागून वाटेल ते बडबड करत होता . मध्येच हरिओम हरिओम चा गजर भक्तांना करायला लावत होता . मुश्किलीने दहा –बारा मिनिट बापू बोलला आणि खास विमानाने निघून गेला . इकडे बापूंचे खास सेवेकरी भक्तांना लुबाडण्याचे काम करतच होते . दरम्यान मी माझा मोर्चा आयोजकांकडे वळविला . त्यापैकी अनेक जण ओळखीचे होते . बापूंच्या आगमनामुळे ते सुद्धा पावन झालो आहोत अशा भावनेत होते . त्यांनीही मोठ्या कौतुकाने बापूंना दहा लाख बिदागी दिली आणि बाकी कशी कशी व्यवस्था केली याचं रसभरीत वर्णन माझ्याजवळ केलं .

  ते सगळ ऐकून, डोक्यात साठवून चक्रावलेल्या मूडमध्ये मी ऑफिसमध्ये आलो . मनात संताप दाटून आला होता . हे सगळ खरमरीत शब्दात लिहून काढावं असे वाटत होते . पण मुख्य आयोजक हा लोकमतचे मालक दर्डा परिवाराच्या फार जवळचा माणूस होता . त्यामुळे आपण लिहू ते छापून येईल का ही शंका होती . मात्र तिरमिरीत मी ते सारं लिहून काढलं. दुसरा दिवस नेमका माझा जिल्हा वार्तापत्राचा होता . त्यामुळे यवतमाळ जिल्हा वार्तापत्र म्हणून ते नागपूर कार्यालयाला रवाना केलं . त्या वार्तापत्राला ‘आसारामबापूंची दुकानदारी’ असा थेट मथळा मी दिला होता . इथे तेव्हाच्या लोकमत बद्दल थोडं सांगितलं पाहिजे . आज लोकमतला जे व्यावसायिक व बाजारू स्वरूप आलं आहे तेव्हा ते एवढं नव्हतं. जिल्हा प्रतिनिधी आणि वार्ताहरांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. त्यात यवतमाळ हे दर्डांचं शहर असल्याने तिथून येणाऱ्या मजकुरात नागपूरची संपादक  मंडळी फार डोकं घालत नव्हते .

  त्यादिवशी माझ लक जोरात होतं. बरीच वरिष्ठ मंडळी रजेवर होती . डेस्कवर उपसंपादक गणेश देशमुख होते. . गणेश माझ्यासारखेच बिनधास्त व थेट रिपोर्टिंग करणारे असल्याने आमचं चांगलं जमायचं . त्यांनी ते वाचून मला फोन केला .’अविनाशजी , वार्तापत्र जबरदस्त आहे . खळबळ नक्की उडेल . पण छापून टाकू . पाहून घेवू . मात्र मथळा फारच थेट आहे . तुमची हरकत नसेल तर तुमच्याच लेखातील ‘सारा धर्माचाच बाजार’ हा मथळा घेवू’, असे ते  म्हणाले. मी होकार दिला. उर्वरित काम आटोपून घरी आलो .

   पण रात्रभर डोक्यात हुरहूर होती . वार्तापत्र छापून येईल की रात्री कोणी वरिष्ठ काढून टाकेल , हे वारंवार डोक्यात येत होतं. छापून आलं तर त्या वार्तापत्राचे काय काय परिणाम होतील यावर मी विचार करत होतो . आसाराम आणि त्यांचे भक्त हे किती ताकतवर आहेत हे मी जाणून होतो . त्यामुळे उद्या नेमकं काय होईल याबाबत मी वेगवेगळे अंदाज मी बांधत होतो . भीती मात्र डोक्यात अजिबात नव्हती . तेव्हा तरुण होतो . अंगात मस्ती होती . माणूस कितीही मोठा असो त्याला शिंगावर घेण्याची तयारी होती . (दोन वर्ष अगोदरच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे साप्ताहिक ‘चित्रलेखा’ त इंदूरच्या भैय्यू महाराजांवर मी इंदूरमध्ये जावून केलेला  ऑन स्पॉट रिपोर्ट संपूर्ण राज्यात गाजला होता . भैय्यू महाराजांच्या भक्तांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या . एके दिवशी रात्री घरी परतताना माझ्या मोटारसायकलला मागून टाटा सुमोने उडविण्याचा प्रयत्न झाला होता . माझा आणि चित्रलेखाचा निषेध करणारी हजारो पत्र मुंबईत संपादक ज्ञानेश महारावांना पाठविण्यात आली होती . शेवटी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेवून त्यांनी मला काही दिवस मुंबईत बोलावून घेतलं होतं. तो एपिसोड सविस्तरपणे पुन्हा कधीतरी लिहेल ) भक्तमंडळी काय काय तमाशे करतात हे मला चांगलं माहीत होतं.

   रात्री काहीशी अर्धवटच झोप आली . सकाळी पेपर आल्याबरोबर झडप घातली . वार्तापत्र जसंच्या तसं छापून आलं होतं. मी खुश झालो . आता वाट होती प्रतिक्रियांची . ११.३० च्या दरम्यान कार्यालयात गेलो . तिथे गेल्या गेल्या ‘काही तरुण तुमची चौकशी करून गेले . अविनाश दुधे कोण आहेत?’ हे विचारून गेलेत. आपल्या ऑफिसच्या भिंतीवर आसारामबापूचे पोस्टर चिपकवून गेलेत,  हे शिपाई मालोकरने मला सांगितले . ‘खूप भडकून होते ते पुन्हा येणार आहेत’, असेही तो म्हणाला . मी सावध झालो . क्राईम रिपोर्टर संदीप खडेकरला आपल्या ऑफिसकडे पोलिसांना लक्ष द्यायला सांग. काही इमर्जन्सी आली तर ते त्वरेने आले पाहिजे अशी व्यवस्था करायला सांगितले . हे प्रकरण दर्डांपर्यंत पोहोचणार याची मला १०० टक्के खात्री आहे . त्यामुळे यवतमाळ कार्यालयाचा प्रशासकीय कारभार सांभाळणारे विजय दर्डा यांचे भाऊ किशोर दर्डा यांच्या कानावर मी संपूर्ण प्रकार टाकला . तोपर्यंत आसारामच्या कार्यक्रमाचे स्थानिक आयोजक व शहरातील अनेक प्रतिष्ठीत मंडळींचे फोन त्यांना येवून गेले होते . ते त्वरेने ऑफिसला आलेत . या किशोर दर्डांचं एक वैशिट्य होतं. अगोदरच्या जिल्हा प्रतिनिधींच्या कामात ते भरपूर हस्तक्षेप करत असले तरी काय कोण जाणे  माझ्या कामात ते कधी ढवळाढवळ करत नसत . माझ्या रोखठोक लिखाणाचं त्यांना कौतुकही होतं. त्यांनी मला माझ्याजवळ कुठले पुरावे आहेत हे जाणून घेतलं आणि बघू आता काय होते , तू काळजी करू नको म्हणून मला दिलासा दिला.

  दरम्यानच्या काळात आग पसरायला सुरुवात झाली होती . आसारामभक्तांनी माझा मोबाईल नंबर मिळवून मला धमकाविणे सुरू केलं होतं. दर दोन – चार मिनिटांनी फोन वाजत होता . मी शांतपणे त्यांच्याशी बोलत होतो . तुम्हाला लेखातील कुठल्या भागाबाबत आक्षेप आहे ? मी जे लिहिलं आहे त्यात चुकीचं काय आहे सांगा विचारत होतो. संपादकीय विभागात सारे रिपोर्टर आणि डीटीपी ऑपरेटर माझ्या सभोवताली बसून हे ऐकत होते . बाहेरच्या रूममध्ये किशोर दर्डांचाही फोन खणखणत होता . ते त्यांच्या पद्धतीने समजूत घालत होते . दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागातून फोन सुरु झाले . पाहून घेण्याच्या , परिणाम वाईट होतील अशा धमक्या सतत मिळत होत्या .

   नाही म्हटलं तरी टेन्शन वाढत होत . दुपारचं जेवण ऑफिसलाच आटोपलं. फोन सुरूच होते . दुपारी चारच्या दरम्यान तेव्हाचे लोकमत नागपूरचे संपादक किशोर कुलकर्णी यांचा फोन आला . त्यांनी सुरुवातीलाच मला झापले . तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही काय लिहिलं? काहीतरी बेजबादारपणा करता, असे बरंच काही ते बोलले . मी त्यांना आपल्याजवळ आसारामच्या दुकानदारीचे पुरावे आहेत सांगत होतो . पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . लोकमत च्या नागपूर कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा येणार आहे. त्याला आम्ही कसं फेस करायचं , काय सांगायचं ? असे म्हणत त्यांनी फोन रागावूनच बंद केला .

  जवळपास तासाभराने पुन्हा त्यांचा फोन आला . आपण उद्या लोकमतच्या पहिल्या पानावर जाहीर माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी मला सांगितले. मी कळवळून त्यांना सांगत होतो . सर ,माफी मागण्याची गरज नाही . आपल्याजवळ पुरावे आहेत . पण ते ऐकायला तयार नव्हते . हा वरिष्ठ मंडळीचा निर्णय आहे असे त्यांनी मला सांगितले . हे ऐकून मी धुमसतच बाहेर किशोर दर्डांजवळ आलो . माफी मागण्याचा निर्णय मला अजिबात आवडला नाही असे सांगितले . ते म्हणाले , ‘नागपूर कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा गेला . ते सारे खूप चिडून होते . त्यामुळे निर्णय घ्यावा लागला असेल.’

  आमची चर्चा सुरु असतानाच लोकमतचे संचालक देवेंद्र दर्डां यांचा फोन आला . ते मुळात शांत स्वभावाचे . त्यांनी संपूर्ण प्रकरण माझ्याकडून समजून घेतले . मी त्यांनाही म्हटले , ‘सर , मुझे नही लगता हमे माफी मागनी चाहिये.’ त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही . ऐकून घेतलं . मी भयंकर अस्वस्थ होतो . मी किशोर  दर्डांना म्हटलं, ‘हा प्रकार विचित्र आहे . उद्या एखाद्या गुंडांविरुद्ध किंवा दाऊद इब्राहिमच्या कारवायांबद्दल बातमी छापली आणि त्यांनी ५०० गुंड  कार्यालयावर पाठवले तर आपण माफी मागणार काय?’ किशोर  दर्डांनी माझी अस्वस्थता हेरली . त्यांनी थेट लोकमतचं सुप्रीम कोर्ट विजय दर्डांना फोन लावला . एव्हाना संपूर्ण प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहचल होतंच. माझी कॉमेंटही त्यांनी जशीच्या तशी विजयबाबूंच्या कानावर अविनाश ऐसा कहता है, म्हणून  टाकली. त्यांनीही माझ्याकडून संपूर्ण प्रकरण समजून घेतलं . पुरावे आहेत याची खात्री केली . मात्र काय करणार हे काही सांगितलं नाही.    

   दरम्यान नागपूर कार्यालयातील सहकारयांकडून एका समाजाच्या व्यापाऱ्यांनी नागपूर कार्यालयात घातलेल्या गोंधळाची माहिती दिली . त्यामुळे उद्या माफी छापून येणार असेही त्यांनी सांगितले . किशोर  दर्डां मला म्हणाले, ‘तू तुझं काम केलं . वाचकांपर्यंत जे पोहोचायचं ते पोहचलं . आता फार विचार करू नको’. दरम्यान संदीपने पोलिसांकडून मिळालेला सल्ला माझ्या कानावर घातला . २-३ दिवस घरी न थांबता बाहेर कुठे कोणाला माहीत नसलेल्या ठिकाणी मुक्काम करा असा निरोप पोलिसानी मला पाठवला होता . मी खिन्न अवस्थेतच कार्यालयाबाहेर निघालो . सोबत सहकारी होते . त्या रात्री एका मित्राकडे मुक्काम केला . फोन बंद करून थकलेल्या अवस्थेत झोपलो .

  सकाळी निराश मनानेच लोकमत उचलला . तर आश्यर्याचा सुखद धक्का मिळाला . लोकमतने माफी छापली नव्हती  . रात्री तिकडे कार्यालयात नागपुरात काय घडलं माहीत नाही. पण माफी आली नाही हे माझ्यासाठी खूप आनंददायी होतं. अभिमानाने छाती फुगलेल्या अवस्थेत मी कार्यालयात आलो . इकडे दुसऱ्या दिवशीही भक्तांचे फोन सुरूच होते . मात्र नंतर मी कंटाळलो . अपरिचित नंबरहून येणारे  फोन उचलणे बंद केले . चार – पाच दिवसानंतर हा प्रकार थंडावला . दरम्यान विदर्भातील परिवर्तनवादी संघटनानी या प्रकरणात उडी घेवून आसारामच्या निषेधाचे पत्र काढणे सुरु केले . आसाराम भक्त त्यामुळे नरमले . काही दिवसात त्यावर पडदा पडला . मात्र आसारामची महाराष्ट्रात पहिल्यांदा पोलखोल करण्याचं समाधान मला मिळालं होतं. पुढे मी अनेक बुवा – महाराजांचा भंडाफोड केला . मात्र हे प्रकरण कायम स्मरणात राहील .

( दैनिक ‘पुण्य नगरी’ चा विदर्भ आवृत्तीचा कार्यकारी संपादक झाल्यानंतरही मी दोन – तीन वेळा आसारामबद्दल लिहिले . तेव्हाही असेच अनुभव आले . किंबहुना ते अनुभव आणखी दाहक होते . २०१२-१३ मध्ये आसाराम भक्तांनी मला भरपूर त्रास दिला . पाच वर्षापूवी आसारामबापूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर मी लिहिलेल्या लेखानंतर  बापूच्या देशविदेशातील भक्तांनी जवळपास दहा दिवस प्रचंड शिवीगाळ , जीवे मारण्याच्या धमक्या देवून मला जगणे मुश्कील केले होते . बापूवरील आरोप खोटे आहेत . न्यायालयाने त्यांना कुठे दोषी ठरविले असा त्यांचा युक्तिवाद होता . धमकी देणाऱ्यांमध्ये महिला भक्तांची संख्या खूप मोठी होती . त्यात एका आमदाराची बहीणही होती . अगदी अमेरिका ,ऑस्ट्रेलिया , कॉनडातून भक्तांनी धमक्या दिल्या होत्या . न्यायालयात खेचण्याची धमकी दिली होती .  मी महिलांना काही वाईट बोलावं यासाठी ते चिथावत होते . तेव्हा वकिलांमार्फत अनेक नोटीसही त्यांनी पाठवल्या  . पुण्यनगरी व्यवस्थापनाला जाहिराती बंद करण्याच्या धमक्या दिल्या . आता न्यायालयाने बापूला बलात्काराच्या  आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर बापूंच्या त्या भाबड्या आणि हिंसक भक्तांची आठवण येते . त्याबद्दल सविस्तर कधीतरी लिहेल . त्यादरम्यान लिहिलेले दोन लेख याच mediawatch.info पोर्टलवर  ‘अखेर आसाराम बलात्कारीच !’ आणि ‘आसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात?’ या मथळयाखाली उपलब्ध आहेत ते अवश्य वाचावेत. आसारामच्या दुकानदारीबाबत १८ डिसेंबर २००३ मध्ये ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झालेलं वार्तापत्र commets मध्ये फोटो स्वरुपात आहे .)

 (लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)  

Previous articleआसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात?
Next articleअकबर बादशहाची चित्रवेल्हाळ पुस्तके
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

3 COMMENTS

  1. वास्तवाची खूपच थेट आणि निर्भीड मांडणी. तुमच्या या वार्तांकनाला खरच हिंमत लागते आणि ती तुम्ही दाखवल्याने भविष्यात अशा बाबा लोकांना कशा प्रकारची प्रसिद्धी द्यायची याचाही एक मानक (दंडक) तयार झाला आहे.

    या लिखाणासाठी मनापासून धन्यवाद सर.

  2. I was serving at that time as Lokmat taluka reporter, and was very impressed, when I read the news item on Asaram, you have created a space in my heart, which I told you when you was the dist correspondent of Lokmat.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here