लोकशाहीच्या संरक्षणासाठी…

विचार-टिमथी स्नायडर, अनुवाद -मुग्धा कर्णिक

येल विद्यापीठातील इतिहासाचे, होलोकॉस्ट इतिहासाचे प्राध्यापक टिमथी स्नायडर यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी काय करायला हवे या विचाराचे वीस मुद्दे मांडले आहेत. त्यांचा अनुवाद येथे देत आहे. हे मुद्दे वाचत असताना आपल्याकडल्या उदाहरणांचा येथे उल्लेख नसला तरीही तुम्हाला ती उदाहरणे नक्की आठवतील याची खात्री आहे.

१- गरज नसताना अगोदरच माना तुकवू नका. बऱ्याचशा अधिकारशहांना जी सत्ताशक्ती मिळते ती लोक स्वतःहून देऊ करत असतात. असल्या कठीण काळात तर अनेक व्यक्ती शासनाला आपण कसं वागलेलं रुचेल याचा विचार करून आधीच तसे वर्तन करू लागतात. तसं करू नका. त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणा आधीच देऊ केलात तर अधिकारशहांना लोकांना आज्ञांकित करण्यातील शक्यता ध्यानी येतात. आणि त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरील जुलमी पकड घट्ट होत जाते.

२- संस्थांचे रक्षण करा.न्यायालये, माध्यमे, किंवा वृत्तपत्रे यांचा मागोवा घेत रहा. कुठल्याही संस्थेला आपली मानत असाल तर तिच्यासाठी काही कृती करावी लागेल. संस्था कधीच स्वतःच स्वतःला संरक्षित करू शकत नसतात. त्यांना सुरुवातीपासून विचारसामर्थ्याचे पाठबळ नसेल तर त्या झरझर गडगडत जातात.

३- राष्ट्रनेते आणि पुढारी जर नकारात्मक उदाहरणे घालून देत असतील तर आपण आपले काम अधिकच न्यायबुध्दीने करणे महत्त्वाचे ठरते. कायद्याचे राज्य मोडीत काढणे वकिलांशिवाय शक्य होत नाही, आणि दिखाऊ खटले चालवणे न्यायाधीशांशिवाय शक्य होत नाही.

४- राजकारण्यांची भाषणे ऐकताना काही शब्दांकडे सावधपणे लक्ष असू द्या. दहशतवाद, अतिरेकी या शब्दांचा वापर वाढू लागला की सावध व्हा. अपवादात्मक परिस्थिती किंवा आणिबाणीची परिस्थिती या कल्पना मोठ्या धोकेबाज असतात. देशभक्तीच्या फसव्या शब्दयोजनांबद्दल मनात संतापच असायला हवा.

५- कल्पनेपलिकडची अवांच्छित परिस्थिती उद्भवली तर शांत रहा.
दहशतवादी हल्ला झाला असेल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अनेकदा सगळे अधिकारशहा अशा घटनांची फार वाट पाहात असतात. त्यातून त्यांच्या शक्तीचे एकत्रीकरण होत रहायला मदतच होणार असते. राइशटॅगच्या आगीची आठवण ठेवा. असल्या प्रकारची आपत्ती सत्तेचा तोल ढळवायला, विरोधकांना नामोहरम करायला उपकारक ठरते. हिटलरी पाठ्यपुस्तकातला फार महत्त्वाचा धडा आहे तो. त्याला बळी पडू नका.

६- भाषेचा सुज्ञ वापर करा. सगळेजण एकसाथ जे वाक्प्रचार वापरत आहेत ते वापरणं टाळा. स्वतःची वैचारिक बोली स्वतः घडवा. दुसरे लोक जे बोलत आहेत तेच तुम्ही मांडणार असलात तरीही. झोपण्यापूर्वी इंटरनेट वापरू नका. आपली गॅजेट्स दुसरीकडे चार्जिंगला लावा. आणि वाचा. काय वाचणार? वाक्लाव हॅवेलचे द पॉवर ऑफ द पॉवरलेस, जॉर्ज ऑर्वेलचं १९८४, स्झेस्लॉ मिलोझचे द कॅप्टिव माइन्ड, आल्पर्ट काम्यूचे द रिबेल, हॅना आरेन्डचे द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम, किंवा पीटर पोमेरान्त्सेवचे नथिंग इज ट्रू अँड एव्रीथिंग इज पॉसिबल.

७- वेगळे उठून दिसा. कुणीतरी असायलाच हवं वेगळं. उक्तीने आणि कृतीने सर्वांसारखंच असणं सोपं असतं. काहीतरी वेगळं करणं थोडं विचित्र, अस्वस्थ करणारं वाटेल. पण थोडं अस्वस्थ झाल्याविना मुक्ती मिळणार नसते. ज्या क्षणी तुम्ही उदाहरण घालून देता, जैसे थेचे गारूड भंग पावते. आणि मग इतर अनेक तुमच्या सोबत चालू लागतात.

८- सत्यावर विश्वास ठेवा. वास्तव नाकारणे म्हणजे स्वातंत्र्यच नाकारणे. काहीच सत्य नसेल तर मग सत्तेवर कुणी टीकाच करू शकणार नाही, कारण तसं करायला काही पायाच उरत नाही. काहीच सत्य नसेल तर मग सगळाचा देखावा. आंधळं करून सोडणाऱ्या झगझगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतं हे कधीही विसरायचं नाही.

९- शोध घेत रहा. घटनांचे अर्थ स्वतः लावायचा प्रयत्न करा. दीर्घ लेख वाचण्यासाठी वेळ काढा. शोधपत्रकारिता करणाऱ्या प्रिंट मिडियाला आर्थिक पाठबळ द्या. तुमच्या डोळ्यासमोरच्या चकचकत्या पडद्यावरच्या अनेक गोष्टी तुमचे नुकसान करण्यासाठीच तिथे चमकत असतात हे समजून घ्या. अपप्रचारांचा शोध घेणाऱ्या साइट्सबद्दल वाचा.

१०- थोडं सक्रीय राजकारण करा. सत्ताधाऱ्यांना तुम्ही खुर्चीत बसूनबसून थुलथुले व्हावे, तुमच्या भावना पडद्यावरच्या चकचकाटात विरळ विरंजित व्हाव्यात असेच वाटत असते. बाहेर पडा त्यातून. जरा अनोळखी लोकांत, अनोळखी जागी फिरा. नवे मित्र जोडा आणि त्यांच्यासोबत चार पावले चाला.

११- डोळ्याशी डोळा भिडवा, बोला. हे केवळ विनम्रता दाखवण्यासाठी नव्हे. आपल्या परिसराशी जोडून घेण्यासाठी करावे लागेल. अनावश्यक सामाजिक भिंती पाडण्यासाठी, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, हे समजण्यासाठी हे करावे लागेल. आपल्याला इतर सर्वांना तुच्छ लेखण्याच्या काळात जगण्याची वेळ आली तर आपल्या रोजच्या जगण्यात डोकावणाऱ्या मनोभूमिकांशी ओळख हवीच.

१२- जगात जे घडतं आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल
स्वस्तिके, झेंडे किंवा अशाच द्वेषचिन्हांकडे डोळे उघडून पहा. नजर फिरवून काहीच साध्य होणार नाही. या चिन्हांपासून स्वतःला दूर ठेवा आणि इतरांना तेच उदाहरण घालून द्या.

१३- एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा. ज्याज्या पक्षांनी आजवर एकछत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असे होऊ नये म्हणून सर्व निवडणुकांत सहभागी होऊन मतदान करा.

१४- चांगल्या कामांना आर्थिक मदत करा चांगले काम करणारी एखादी संस्था शोधून तिला नियमित मदत करा. यामुळे आपण नागरी समाजाचा एक भाग आहोत आणि स्वतंत्र निवड करू शकतो हे भान जागे राहील.

१५- खाजगी अवकाश सांभाळा. हलकटपणे वागणारे सत्ताधारी तुमच्याबद्दलची माहिती वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपला काँप्युटर वेळोवेळी मालवेअरमुक्त करा. इमेल्स म्हणजे खुल्या आकाशावर लिहिण्यासारखेच आहे. इंटरनेटवरील पर्यायी मार्ग वापरून संपर्क करा. किंवा सरळ नेट कमीच वापरा. व्यक्तिगत निरोप व्यक्तिशः प्रत्यक्षच द्यायची सुरुवात करा. कायद्याशी संबंधित काहीही प्रकरणे असतील तर ती लवकरात लवकर निपटून टाका. अधिकारशहांचे राज्य अखेर ब्लॅकमेलवर चालते. कुठल्या हुकाला तुम्हाला टांगायचं त्याचा शोध घेत असते. फार जास्त हूक्स ठेवू नका.

१६- इतर देशांकडून शिका. विदेशांत आपले मित्र असू द्या. नवे विदेशी मित्र अवश्य जोडा. इथल्या अडचणींतून एक सार्वत्रिक दिशा दिसते आहे. कुठल्याच देशाला एकेकट्याने उत्तरे मिळणार नाहीत. तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबियांकडे पासपोर्ट्स असतीलच असं पहा.

१७- अर्धलष्करीदलांकडे लक्ष असू द्या. व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं बोंबलून सांगणारे लोक जेव्हा गणवेष धारण करून, मशाली पेटवून कवायती करू लागतात, एखाद्या नेत्याचं चित्र फडकवत फिरतात तेव्हा अखेर जवळ आली असं समजा. नेत्याचे निमलष्करी अनुयायी आणि अधिकृत पोलीस किंवा लष्कर मिसळू लागतात तेव्हा खेळ संपला असंच समजायचं आहे.

१८- शस्त्र धारण करण्यापूर्वी विचार करा. सार्वजनिक सेवेचा भाग म्हणून तुमच्याकडे शस्त्र असेल तर देव तुमचं भलं करो आणि तुमचं रक्षण करो. पण भूतकाळात पोलीस आणि शिपाई यांनी केलेली दुष्कृत्ये आठवा. नकार देण्याची मानसिक तयारी ठेवा. याचा अर्थ समजत नसेल तर एखादे होलोकॉस्ट म्यूझियम अवश्य पहा आणि कर्तव्यातील नैतिकता पालनाच्या प्रशिक्षणाबद्दल थोडेसे जाणून घ्या.

१९- धैर्यवान रहाण्याचा यत्न करा. आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ.

२०- देशभक्त असा. नवा राष्ट्रप्रमुख देशभक्त नाही. आपला देश काय आहे याचे भान येणाऱ्या पिढ्यांना असावे म्हणून चांगले उदाहरण आपणच घालून द्यायला हवे. त्यांना त्याची फार गरज भासेल.
—————–

अनुवाद -मुग्धा कर्णिक

Previous articleडिप्रेशन आणि बायका !
Next articleमायबोलीचा वारकरी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.