-केतन पुरी
आशिया-आफ्रिका कॉन्फरन्सच्या वेळेस पंडितजी आणि बर्माचे पंतप्रधान उ नू सोबत होते.उ नू यांना नेहरूंच्या क्रोधाची पूर्ण कल्पना होती.त्यांनी परिषद चालू होण्याआधी नेहरूंना बजावले
“पंडितजी,तुम्ही भडकायचं नाही.”
नेहरू त्यावर उत्तरले,
“मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करीन,परंतू जर मी संतापू लागलो,तर उ नू, तुम्ही मला टेबलाखालून सरळ एक लाथ मारा.”
एक विकसीत राष्ट्र म्हणून जडण घडण होत असणाऱ्या देशाचे पंतप्रधान आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा असा मार्ग सुचवतात! आजच्या घडीला हे खरंही वाटायचं नाही.
के.एफ.रुस्तमजी हे नेहरूंचे मुख्य सुरक्षाअधिकारी.त्यांनी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलंय,
‘नेहरू लहरी होते,रागीट होते,अवखळ होते,प्रेमळ होते तर रुसकेसुद्धा होते.’
पुढे ते लिहीतात,
‘सुरक्षा यंत्रणा झुगारून देत अफाट-विराट जनसमुदायात घुसने नेहरूंना आवडे मात्र त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येत असे.’
नेहरूंना लोकांप्रती किती प्रेम होते,यावर एक फार सुंदर किस्सा आहे.
१९५४ साली त्रावणकोर-कोचीन येथे नेहरुजींच्या सुरक्षा सल्लागारांनी लक्षात आणून दिले,की लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला अडथळा म्हणून काटेरी तारांचा वापर करण्यात येतो पण त्यामुळे लहान मुले तसेच मोठी माणसे त्यात अडकून जखमी होतात.तसेच,पंतप्रधान आणि सामान्य जनता एकमेकांपासून वेगळे आहेत असेही भासवल्या जाते.ही गोष्ट लक्षात आल्यावर नेहरूंनी सर्व राज्यांना खरमरीत शब्दात एक परिपत्रक पाठवून सभास्थानी या तारा न बसवण्याविषयी सांगितले.मध्यप्रदेश येथील सभा दोन दिवसांवर आलेली.मुख्यमंत्री डॉ.काटजू यांनाही हे पत्रक मिळाले पण ठरवलेल्या व्यवस्थेत बदल करणे शक्य नसल्याने त्यांनी परिपत्रकाकडे दुर्लक्ष केले.नेहरुजी जेव्हा सभास्थानी पोहोचले तेव्हा तिथल्या काटेरी तारा पाहून प्रचंड संतापले.त्यांनी हातपाय आपटले,आरडाओरडा केला.नेहमी ते खूप चिडलेले असत तेव्हा गर्दीत शिरत.याहीवेळेस ते गर्दीत सरळ शिरले आणि तारा तोडल्या,खांब उखडून टाकले.लोकांसमोर आपल्या सुरक्षेला कवडीइतकीही किंमत देत नाही हेच त्यांनी दाखवून दिले.गाडीत बसल्यावर डॉ.काटजूंची कानउघडणी झाली ती वेगळीच.पुढच्या सभेतही हेच चित्र.तारा एवढ्या घट्टपणे बसवल्या होत्या की नेहरुजींना त्या निघेना,त्यांनी अक्षरशः खांब उखडण्याची तयारी चालवली.यावेळेस मात्र सुरक्षा अधिकारी पुढे आले.त्यांनी सर्व कुंपणे तोडून टाकली.यात कुणाचे कपडे फाटले,कुणाला खरचटले.पण नेहरूजींचा संताप काही केल्या कमी होत नव्हता आणि लोकांकडून टाळ्या वाजवणे काही थांबत नव्हते.
सामान्य जनतेमध्ये सरळ घुसून त्यांच्या हृदयाला भिडण्याची जी कला नेहरूंनी अवगत केली,ती आजच्या घडीला खरच अचंबित करणारी आहे.असाही पंतप्रधान असतो!
नेहरूंसाठी जनता एखाद्या प्रेयसीसारखी होती.गर्दीला हाताळण्याची नेहरूंची तऱ्हा एकमेवाद्वितीय होती.त्यांना गर्दीची थट्टामस्करी करायला आवडे.गर्दी शांत असेल तर ते मुद्दामून गर्दीतून चालत जात,मग जो अपूर्व गोंधळ माजत असे त्यास तोड नाही.मध्येच गर्दीत उतरून एखाद्या लहान मुलाच्या गळ्यात हार घालत,लोकांना अक्षरशः नेहरुजींचे वागणे पाहून आनंदाचे भरते येई.ते देखणे होते,भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी देशासाठी केवढा त्याग केला होता म्हणून लोकांच्या हृदयात त्यांना वेगळेच स्थान होते.
अमृतसरच्या पवित्र मंदिरात नेहरुजी गेले तेव्हा त्यांना केवळ पाहण्यासाठी लाखभर जमाव आलेला.पंडितजींना एक पाऊलही पुढे टाकणे शक्य नव्हते.1957 च्या युथ काँग्रेसच्या मेळाव्याला 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावली होती,एवढी गर्दी झाली होती की नेहरुजींना स्टेडियममध्ये प्रवेश करणेच शक्य नव्हते.कलकत्ता ते शेवराफुली या रेल्वेप्रवासादरम्यान नेहरुजींना केवळ पाहण्यासाठी म्हणून अक्षरशः रेल्वे अडवल्या गेल्या.18 डिसेंबर 1957 रोजी लोकसभेत ‘पंतप्रधानांनी अशा ठिकाणी जाणं बंद केलं पाहीजे’ या विषयावर चर्चा झाली,किती आश्चर्याची गोष्ट आहे ही.
स्वातंत्र्योत्तर काळात एवढं प्रेम मिळालेला नेता विरळच.थेट गर्दीत घुसून लोकांच्या हृदयाला हात घालण्याची जी कला नेहरुजींना अवगत होती,तीच पुढे अनेक नेत्यांनी अवलंबली.पण नेहरुजींसारखे साऱ्या भारतभरातून प्रचंड प्रमाणात जनतेचे प्रेम मात्र सर्वच नेत्यांच्या वाट्याला आले नाही.
नेहरुजी अवखळ बालकासारखे होते.त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की ती पूर्ण होईपर्यंत त्यांना चैन पडत नसे.नेत्यापेक्षा जनतेचे राज्य या भारतावर आहे असे मानणाऱ्या नेहरुजींकडे पाहीले की ‘जनपुरुषाच्या’ कार्यव्याप्तीची कल्पना सहजपणे समजून जाते.
लोकांचं नेहरुजींवर एवढं प्रेम आहे की आजही त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आमच्या देशातल्या निवडणुका पूर्ण होत नाहीत.हीच त्यांच्या विकसनशील कार्याला मिळालेली पोचपावती.
–