चिराग़-ए-दैर आणि बनारसची प्रकाशकथा:- सिनेमाच्या नजरेतून!

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)

-जितेंद्र घाटगे

बनारस शहर, तिथले ८६ घाट आणि नदी यांचे पापुद्रे खरड्वडून मूळ शोधता येत नाही. वाराणसीचं वय म्हणाल तर ५००० वर्ष, म्हणाल तर ५०० वर्षांचा एकच श्वास. आरंभापासून शेवट्पर्यंत पोखरत राहिलं तर एखाद्याला मिळेल १५० वर्षाचा वटवृक्ष, तर दुसऱ्याला मिळेल पणजीच्या लुगड्यात गुंडाळलेलं एक दिवसाचं कोवळ्या लुसलुशीत पालवीसारखं बाळ. या बाळाच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केल्यास दिसेल की त्या पालवीस असलेली संपन्नता वटवृक्षाच्या गळून पडणाऱ्या पिवळ्या पानात देखील असते. मला या शोधात काय मिळालं? बनारस, गंगा नदी, तिथले घाट, निमुळत्या गल्ल्या, स्क्रीन मेमरीज, फेक मेमरीज आणि सिनेमा यांचा अभूतपूर्व गुंता.

आज मला हे सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की बनारस, गंगा नदी, तिथले घाट, स्क्रीन मेमरीज, फेक मेमरीज आणि वाराणसीचे संदर्भ असलेला सिनेमा यांनी आयुष्याला टेकू दिला नसता तर मी कधीच कोलमडून पडलो असतो. आणि आज या गप्पा मारतोय त्या चक्क माझ्या गावच्या गोदाकाठी. कुठले धागेदोरे कुठे येऊन पोचतात हे बघितलं तर अचंबित व्हायला होतं. कुठल्याही गोष्टीचा मागोवा घेताना सिनेमाच्या लेन्समधून बघण्याचा नाद कदाचित माझ्यासोबतच संपेल. तोवर बघूया सिनेमाच्या नजरेतून दिसत राहणाऱ्या गोष्टी…

एखाद्या देशाच्या विशिष्ट कालखंडाबद्दल जाणून घ्यायचे असल्यास त्या काळातील साहित्य-सिनेमाद्वारे समांतर शोध घेणे प्रस्तुत ठरायला हवं. मात्र भारतासारख्या खंडप्राय देशात एकाच वेळी अनेक देश नांदत असतात. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक इकोसिस्टीम प्रचंड गुंतगुंतीची आहे. त्यामुळे ‘सिनेमा समाजाचा आरसा आहे’ या घासून गुळगुळीत झालेल्या वाक्याला हिंदी सिनेमा कायम छेद देत आलाय. आपली सामाजिक गुंतागुंत आणि सिनेमा एकमेकांना नेहमीच रेसिप्रोकेट करत आलेय. त्यामुळे सिनेमाला सोशल डॉक्युमेंट मानावे की नाही याबाबत विभिन्न मतप्रवाह आहेत. भारत हा विविधतेचा जिवंत उधाण असलेला देश आहे, जिथे असंख्य संस्कृती, भाषा, उपसंस्कृती आणि राज्ये आपापली ओळख घेऊन उभी आहेत. प्रत्येक प्रदेशाची आपली खास परंपरा, स्वतःची भाषा आणि वेगळे अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे, हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपण एक स्वतंत्र State of affairs मानू शकतो, ज्याच्या स्वतःच्या परंपरा, सांस्कृतिक चौकट, आणि भाषा आहेत. मला या गोष्टीचे कायम आश्चर्य वाटते की या चंदेरी स्वप्नसृष्टीला, बनारसच्या गोष्टीतून, पात्रातून, गंगेवरच्या घाटातून ज्यांनी सिनेमात मूर्तरूप दिले ते कलाकार, निर्मिती केल्यानंतर पूर्ववत अवस्थेत कधी पोचू शकले असतील की नाही?

काशी या शब्दाचा अर्थ ‘विश्वाचा प्रकाश’ असा होतो. कला, धर्म आणि तत्वज्ञान याविषयात जगाला अनेक महापुरुष देणारं काशी ‘विश्वाचा प्रकाश’च आहे यावर वेगळं शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही. बनारसच्या भव्यतेची तुलना फक्त महाभारतासोबत होऊ शकते. बनारस, गंगा आणि सिनेमा यांचं नातं उलगडून दाखवणं हा या महाकाव्याचा एक पापुद्रा काढण्यासारखं आहे. अनेक वर्षानंतर क्वचित एखादी कलाकृती समोर येऊन उभी राहते जी पाहताना आपण अनकॉन्शियस पातळीवर कितीही कोरडं राहून मीमांसा केली तरी निर्लेप असं मागे काहीतरी उरतं. तिच्या विचारातील स्पष्टता, अभिव्यक्तीतील धैर्य आणि मांडलेले सिद्धांत पचवताना आपल्याला आधी ‘Learn to unlearn’ जमवावं लागतं. अशी कलाकृती पाहण्याआधीचे आपण आणि पाहून झाल्यानंतरचे आपण यात मूलभूत पातळीवर बदल झालेला असतो.

आजवर जगलेल्या बऱ्या-वाईट आयुष्याचा गाळीव अर्क काढून एका सिनेमात बसवायचा म्हटलं तर अवघड काम. अनेक सिनेमात ‘स्लाईस ऑफ लाइफ’ की असलंच काहीतरी म्हणतात ते दिसतं. मात्र तुकड्या तुकड्यात. हे तुकडे सापडण्याची जागा प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. कुठल्या सिनेमाचा भाग आपल्या आयुष्यात पझलच्या तुकड्यासारखा परफेक्ट फिट होतो, हे ज्याचं त्याला नेमकं माहीत असतं. सिनेमा आणि आपलं खरं आयुष्य स्थल-काल-क्रम बदलत असतील, पण कुणालाही समजावून न सांगता येणारा abstract धागा दोन्हीकडे समान असतो. ही समानता इतकी असते की आपल्या आयुष्यावर वेगळा बायोग्राफिकल सिनेमा काढण्याची गरज पडू नये. बनारस सोबत नातं असलेल्या ‘घातक’, ‘मसान’, ‘मुक्ती’ भवन’, ‘मोहल्ला अस्सी’, ‘वॉटर’, ‘रांझना’, ‘धरम’, ‘अंग्रेजी में कहते है’, ‘लागा चुनरी मे दाग’ या सिनेमात प्रत्येकाला आपले आत्मचरित्रात्मक संदर्भ सापडतील ते उगाच नाही. तुम्ही भले प्रत्यक्ष काशीला गेलेला असो वा नसो!

मानसशास्त्रात false memories आणि screen memories या विलक्षण संकल्पना आहेत. आपली बनारस गंगा नदीबद्दलची धारणा सांस्कृतिक चित्रणांद्वारे, विशेषतः सिनेमाद्वारे आकारास येते, जी वास्तविक अनुभवाला प्रतीकात्मक आणि भावनिक पातळीवर रूपांतरित करते. false/फेक मेमरीज या अशा आठवणी असतात ज्या कधीच घडल्या नाहीत किंवा वास्तविक घटनांना कमालीचं distorted करून मेंदूत जमा झालेल्या असतात. चित्रपटातील दृश्यांमुळे कधीच न घडलेली घटना घडल्याचे आठवत राहणे ही सामान्य नैसर्गिक घटना आहे. सिग्मंड फ्रॉइडने मांडलेली ‘Screen Memories’ ही सुद्धा अशीच एक अचाट संकल्पना आहे, ज्यात प्रत्यक्ष घडलेल्या भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या किंवा आघातकारक अनुभवांना मेंदू मृदू अथवा सोयीस्कर वेगळ्या स्वरूपात साठवतो. या दोन्ही संकल्पनांच्या बाबतीत ठराविक शहरं, जागा दाखवणारे चित्रपट महत्वाची भूमिका निभावतात. बनारस आणि गंगाघाटाची पार्श्वभूमी असलेले सिनेमे याचं ठळक उदाहरण. जिथे चित्रपटातील प्रतिमा आपल्या नदीच्या आठवणी आणि अनुभवावर प्रभाव टाकतात, आणि प्रत्यक्ष अनुभव व सिनेमाद्वारे मिळालेला अनुभव यांच्यात एक मिश्रण घडवतात, ज्यात फरक करण्यात आपला मेंदू बरेचदा घोळ करतो. अर्थात आपल्या आत ठसठसत राहणाऱ्या वेदनागर्भात शिरून त्यातल्या प्रत्येक शिरेचा सोनोग्राफ समोर ठेवणे, अमूर्त वेदनेला चेहरा देण्याचं हे काम सिनेमा नेमकं करतो. त्यामुळे पहिल्यांदा बनारस गेल्यावर मला सर्वत्र सिनेमातली पात्रं अन इतके वर्ष सिनेमामुळे जी प्रतिमासृष्टी माझ्या मनाने तयार केली होती ती दिसत होती. तिला ओलांडून पुढे जायचं म्हटलं तर एवढ्या वर्षात स्क्रीन मेमरीजने जतन करून ठेवलेल्या घटना दूर सारून वेदनेच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासारखे होते. अर्थात एकदा ते शक्य झाले तर बाहेर तावून सुलाखून निघणारे व्हर्जन नितळ निकोप असेल हे निश्चित! कारण काशीच्या सौंदर्याला मांगल्याची किनार आहे.

“ये मज़दूर का हाथ है कात्या, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है! ये ताकत ख़ून-पसीने से कमाई हुई रोटी की है. मुझे किसी के टुकड़ों पर पलने की जरूरत नहीं.”
– काशी, घातक (१९९६ )

पुराणे व महाकाव्यात असलेली गंगेच्या अवतरणाची कथा आणि शिवपुराणात व स्कंदपुराणात आलेली काशीच्या निर्मितीची कथा मला कळण्याआधी बनारसचं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं ते ‘घातक’ सिनेमातील काशीच्या रूपाने! “घातक” (१९९६) ची कथा मुंबईत घडत असली तरी बनारस कथानकात महत्त्वाची भूमिका बजावते. आजही बनारस नाव डोळ्यासमोर आले तर अस्सी घाटावर अंघोळ करून बाहेर पूजेला बसणाऱ्या सनी देओलसोबत सिनेमातील मंत्रोच्चार अनुभवता येतो. एखादा सिनेमा रिलीज होऊन किती वर्षे झाले या नियमाने त्याचं वय मोजलं जाऊ शकत नाही. तो आपल्याला ज्या टप्प्यावर नेऊन सोडून देतो आणि पुन्हा कधीही बघितला तरी आपण स्वतःला जिथे बघतो – ते – सिनेमामुळे आपल्याला लाभलेलं वय असतं. शाळेत असताना ‘घातक’ बघितला होता. त्याने मला लहान वयात सुद्धा ऐन तारुण्यात असलेलं सळसळतं रक्त कसं असू शकतं, याची झलक दाखवली. आजही तो बघितला तर अंगात काशी संचारतो. उतारवयात सुद्धा घातक बघितला तर हाताच्या मुठी वळल्या जातील. आपल्यावर असा प्रभाव पाडणारा सिनेमा त्या ‘तक्षक’ किड्यासारखा असतो. सगळी कवाडं बंद करून सुद्धा छोट्याश्या फळामार्गे तो राजा परीक्षितचा जीव घेतोच. सिनेमाही तसाच. तुम्ही कितीही त्याला शिव्या द्या… आपल्यापासून लांब ठेवा… त्यातला किडा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला चावून डसल्याशिवाय राहत नाही. एखादा सिन/डायलॉग आपल्याला आयुष्यभर पुरतो. मी बनारसला पहिल्यांदा गेल्यावर उतरलो ते अस्सी घाटात ते यासाठीच. सिनेमाच्या नजरेने आयुष्य बघण्याची मर्यादा मला ‘लाभली’ आहे. काशी ही व्यक्ती फक्त सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर बनारसच्या नैतिक शक्तीचे ती प्रतीक आहे, जी न्यायासाठी उभी आहे आणि कमकुवत लोकांचे संरक्षण करते.
……………………………………..

“गंगा में पाप भी धोते है, और पिछवाड़ा भी,
करप्शन तो हमारा नॅशनल कॅरेक्टर हो चुका है”

– ‘काशी का अस्सी’ (काशिनाथ सिंग)

सनी देओलची मुख्य भूमिका ‘मोहल्ला अस्सी’मध्ये बनारस या शहराला कथानकाच्या केंद्रस्थानी स्थान दिले गेले आहे. हे शहर केवळ भौतिक पार्श्वभूमी म्हणूनच नव्हे तर चित्रपटातील विषयांचे प्रतीक म्हणून मध्यवर्ती भूमिका निभावते. हा चित्रपट काशीनाथ सिंग यांच्या “काशी का अस्सी” या व्यंगात्मक कादंबरीवर आधारित आहे. बनारसचे व्यवसायीकरण, सांस्कृतिक अधःपतन, आणि सामाजिक-राजकीय बदलांवर हा सिनेमा तीक्ष्ण भाष्य करतो. भारताच्या उदारीकरणाचा बनारसवर पडलेला प्रभाव याहून अचूकपणे कुणीही दाखवलेला नाही. इथे बनारस केवळ सिनेमाची पार्श्वभूमी नसून, भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या बदलत्या रूपाचे प्रतीक आहे. त्यात १९९० ते १९९८ या काळात धार्मिक स्थळांचे व्यवसायीकरण दाखवताना दांभिक प्रवृत्तीवर कोरडे ओढले आहे. रूढीवादी धार्मिक पुजाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या सनी देओलने यात साकारलेली भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या ऍक्शन इमेजला फाटा देणारी होती. ‘भोस*के’ हा तकीया कलाम असलेली बनारस शहरातील पात्रं, आणि एकूण सिनेमातील भाषा अन दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील हा आक्षेप ठेवून २०१५ मध्ये सिनेमाच्या प्रदर्शनाला CBFCने स्थगिती आणली होती.

मला क्षणार्धात ‘घातक’ मधला सनी देओल आठवला. व्यवस्थेला शिंगावर घेणारा काशी! काळ पुढे सरकतोय तसा हिंदी सिनेमाही बदलतोय… अन त्वेषाने बंड करून पेटून उठण्याचं आवाहन करणाऱ्या कलाकृतींचे स्वरूप सुद्धा. ‘काशी का अस्सी’मध्ये वाराणसी शहरात होणाऱ्या बदलाचे मानवी दस्तऐवजीकरण आहे. १९९० ते १९९८ दरम्यान जागतिकीकरण आणि रामजन्मभूमी आंदोलन यांचा वाराणसीवर झालेल्या बदलाचे मायक्रोस्कोपिक चित्रण ‘काशी का अस्सी’मध्ये आढळते. यात शहराची सांप्रदायिक ओळख आणि घसरलेली नीतिमत्ता यांचा परस्परसंबंध तिरकसपणे उलगडून दाखवला आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक घुसळण होण्याच्या कालखंडात एकाच शहरात परस्परविरोधी प्रवाह एकमेकांना भिडत असतात. ‘काशी का अस्सी’मध्ये दाखवलेली पात्रं अनेकांसाठी कल्चरल शॉक असूनही त्याकडे डोळेझाक करता येत नाही. त्याच्या मुळापर्यंत जायचं असल्यास तो जिथे फरफटत घेऊन जाईल तिथवर जाण्याची तयारी हवी. आजचे काशी शहर विकसित होताना परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील द्वंद्वाचे चित्रण दाखवताना हे पुस्तक समकालीन भारतीय समाजाचा आरसा म्हणून काम करते. जे वाचकांना संस्कृती आणि समुदायाच्या बदलत्या गतिशीलतेबद्दल आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करते. काशीचं मूलतत्त्व आध्यात्मिकता होते, जिथे लोक आत्मशोधासाठी येत असतं, पण आता ते हरवत चालले आहे, अन त्याला बाजारू स्वरूप येत आहे.

“ओ गंगा तुम, गंगा बहती हो क्यूँ?
नैतिकता नष्ट हुई, मानवता भ्रष्ट हुई
निर्लज्ज भाव से बहती हो क्यूँ?
इतिहास की पुकार, करे हुंकार
ओ गंगा की धार, निर्बल जन को
सबल-संग्रामी, समग्रोगामी
बनाती नहीं हो क्यूँ?”

-भूपेन हजारिका यांचे प्रसिद्ध गीत

………………………………..

दीपा मेहता दिग्दर्शित “वॉटर” (२००५ ) मध्ये बनारसचे प्रतीकात्मक आणि कथात्मक महत्त्व अतिशय खोल आहे. १९३८ मध्ये भारतातील विधवांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात बनारस हे धार्मिक रीतिरिवाजाने बंदिस्त विधवांच्या जीवनाचे केंद्र आहे. त्या आश्रमात विधवा स्त्रियांना जबरदस्ती राहायला भाग पाडले जाते. शहराचे आध्यात्मिक महत्त्व, पवित्र गंगा नदी, मुक्ती आणि दडपशाही यांची थीम या पात्रांच्या, विशेषतः विधवांच्या, संघर्षाशी जोडलेली आहे.

प्रेमचंद यांच्या ‘कफन’ कथेत घीसूच्या भणंग आयुष्यातील सगळ्यात भारी आठवण ही की त्याने कुठल्यातरी कार्यक्रमात पोटभर जेवलं होतं. २५-३० पुऱ्या खाल्ल्याची आठवण! पोटभर मनसोक्त जेवण ही आठवण होऊ शकते? बनारस घाटावर फिरताना तुलसी घाटाच्या कोपऱ्यात भणंग अवस्थेत एक म्हातारी पडलेली दिसली. अन ‘वॉटर’ सिनेमात १९३८ सालचं बनारस भोवताली दिसायला लागलं. सिनेमात एक लहानगी मुलगी विधवा आश्रमात जबरदस्ती ढकलली जाते. त्या लहान मुलीला एक जख्ख म्हातारी तिथे भेटते अन ती म्हातारी तिच्या लग्नाची गोष्ट सांगते. – ‘मी जेव्हा ७ वर्षांची होते, तेव्हा माझं लग्न झालं अन विधवा देखील. लग्न कसं झालं, नवरा कसा होता यातली कुठलीच गोष्ट मला आता आठवत नाही. मात्र एवढं लक्षात आहे की त्या दिवशी जेवणात खूप सारी मिठाई तयार केली होती. मी ती भरपेट खाल्ली. बस. तेवढी मिठाई फक्त माझ्या अजूनही लक्षात आहे, त्यानंतर कधीच तसं गोडधोड खायला मिळालं नाही.’ आजपासून हजारो लाखों वर्षानंतर त्या म्हातारीचे जीवाष्म पुढच्या पिढींना हाती लागले तर?
तुलसी घाट सोडला तरी तो प्रश्न काही माझा पिच्छा सोडत नाही.

“नारायण : सभी पुरानी परंपराएं खत्म हो रही हैं।
कल्याणी: लेकिन जो अच्छा है, वह नष्ट नहीं होना चाहिए।
नारायण: और कौन तय करेगा कि क्या अच्छा है और क्या नहीं?
कल्याणी” : आप!”

(’वॉटर’ सिनेमातील एक संवाद)

…………………………

जग सोडून जाताना फक्त एकच सिनेमा सोबत घेऊन जायची मुभा असेल तर तो कोणता असेल? माझ्या स्वताच्या अत्यंत आवडत्या आणि जवळच्या फिल्मची लिस्ट टोकाची संमिश्र आहे. मात्र मरताना एकच सिनेमा वर घेऊन जायचा पर्याय असेल तर ‘नीरज घेवन’ दिग्दर्शित ‘मसान’ सिनेमाव्यतिरिक्त माझ्यासाठी तरी काहीच असणार नाही. प्रत्येकाचं एक अल्टर्ड व्हर्जन असतं, ज्यात तो काहीही असू शकतो. एरवी बटबटीत हिंदी सिनेमाने पडद्यावरच्या लार्जर दॅन लाईफ हिरोच्या रुपात स्वतःला बघायला शिकवलं. खऱ्या आयुष्यात आपण तसले हिरो नाही, हे ज्याचं त्याला पक्कं माहीत असतं. अगदी साईड ऍक्टर सुद्धा नाही. सिनेमात, कादंबरीत जशी अनेक सटरफटर पात्रे असतात, आपण त्यातलेच एक. सामान्य व्यक्तीच्या ठायी तसला मोठेपणा नसतो. नायकत्व सिद्ध करण्याची एक संधी देखील आयुष्यभर वाट बघून मिळत नाही. ‘मसान’ अशाच सामान्य वाटणाऱ्या पात्रांची असामान्य गोष्ट सांगतो.

‘मसान’मध्ये बनारस केवळ शहर नसून जीवन, मृत्यू आणि सामाजिक बंधनांचे प्रतिकांचे मध्यवर्ती केंद्र आहे. या चित्रपटात देवी आणि दीपक यांच्या जीवनाच्या गुंता उलगडतो, जिथे बनारसचे घाट आणि गंगेच्या काठावर जीवन-मृत्यूचे चक्र प्रतिबिंबित होते. देवीला बनारसने लादलेल्या नीती-अनीतीच्या चौकटीत बंदिस्त केलं आहे. ‘जितनी छोटी जगह, उतनी छोटी सोच’ हे तिचं बनारसबद्दलचे मत आहे. देवी ज्या अडचणीतून जातेय त्यासाठी ती स्वतःच्या वडिलांना जबाबदार ठरवते. ‘मी गिल्टमध्ये असेल तर तुम्ही सुद्धा गिल्ट मध्ये राहावं.’ दुर्दैवाने अनेकांच्या बाबतीत हा फकीर स्क्रीन मेमरीचा भाग नसेल. दीपकसाठी बनारस जातीय संघर्षांचं प्रतिनिधित्व करते. सिनेमात बनारस हे असे एक पात्र आहे जे इतर पात्रांच्या नीतिमत्तेवर, निर्णयावर थेट प्रभाव पाडते. ‘मसान’मध्ये दीपकच्या कुटुंबाला डोम राजाच्या वर्गातून आलेलं दाखवलं आहे, जे हरिश्चंद्र घाटावर अंत्यसंस्काराचं काम करतात. त्यांच्या मान्यतेनुसार घरातल्या चुलीवरची आग सुद्धा तेव्हाच जळेल जेव्हा जळत्या चितेवरून लाकडाचा तुकडा आणला जाईल. कुणाच्यातरी मरणावरच हे घर जगू शकतं. हरिश्चंद्र आणि मणिकर्णिका घाटावर चिंतेची आग कधीच विझत नाही. तरीही सगळ्या हातांना काम लागेल असं काही नाही. ‘स्क्रीन मेमरीज’ने माझ्या लहानपानाच्या अशाच एका घटनेचं वेगळं व्हर्जन तयार करून ठेवलं आहे. यावेळेस बनारसला गेलो तेव्हा अनेक डोम हाताला काम नाही म्हणून बसून होते. श्रीकांत वर्मा यांची ‘मणिकर्णिका का डोम’ कविता तेव्हा आठवते – ‘इसके सिवा डोम कह भी क्या सकता है!’

“डोम मणिकर्णिका से अक्सर कहता है,

दु:खी मत होओ मणिकर्णिका
दु:ख तुम्हें शोभा नहीं देता
ऐसे भी शमशान हैं
जहाँ एक भी शव नहीं आता
आता भी है,
तो गंगा में
नहलाया नहीं जाता
डोम इसके सिवा कह भी क्या सकता है…..

एका सीनमध्ये दीपक घाटावरच्या चिता जळताना पाहत शालूसोबत फोनवर बोलतोय. तिकडून ती याला कविता ऐकवतोय. ‘मसान’ गंगेने दिलेल्या आवाहनात बुडून जाण्याची आणि तरीही जिवंत बाहेर निघण्याची कथा आहे.

बनारस शहर प्रत्यक्षात जगणं याहून वेगळं कुठे असणार! गंगा मोक्ष आणि मुक्तीचं प्रतीक बनते, संगम एक नवीन सुरुवात करण्याचं स्थान ठरतं, जिथे देवी आणि दीपक आपला भूतकाळ मागे सोडून नवीन जीवनाचा स्वीकार करतात. शहराच्या अध्यात्मिक आणि भावनिक परिवर्तनाची प्रतीकं अधोरेखित होत राहतात. बदलत राहतात. नदी मात्र तीच.

बनारसमध्ये गेल्यावर ‘काशी लाभ मुक्ति भवन’ अर्थात ‘मोक्ष भवन’ याचं गूढ आकर्षण मलाही होतं. पण वर म्हणालो तसं सिनेमाने दिलेल्या ‘false memories’ मुळे प्रत्यक्ष जाण्याआधी सुद्धा तिथे नको त्या आठवणी तयार करून बसलोय. हे बरं की वाईट माहीत नाही. एखाद्या कलाकृतीचं मूल्यांकन करताना ‘भावणं’ किंवा ‘वाटलं’ यापलीकडे जाऊन चिकित्सा करता यायला हवी. अर्थात चिकित्सा आली म्हणजे चिरफाड आली, गुणावगुण तपासणं आलं. पण या कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर सुद्धा – ज्या गोष्टींसाठी ते सिनेमे भावले, आपलेसे वाटले – अगदी त्याच कारणासाठी आयुष्यभराकरीता घरी घेऊन जाव्या आणि मरेपर्यंत उराशी सांभाळाव्या अशा निकोप आणि प्युअर कलाकृती दुर्मिळ असतात. विरोधाभास असा की ‘मरेपर्यंत उराशी सांभाळावं’ असं ज्या सिनेमाबद्दल मी बोलतोय तो सिनेमा मात्र प्रत्यक्षात ‘learn to let things go’ हे सांगू पाहतोय. मी सांगतोय ते २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुक्ती भवन’ ह्या शुभाशीष भूतीयानी दिग्दर्शित सिनेमाबद्दल. सिनेमात जीवन, मृत्यू, आणि आध्यात्मिक मुक्तीच्या शोधासाठी बनारस शहराची अत्यावश्यक भूमिका आहे. इतकं की हा सिनेमा बनारस बाहेर कुठे घडूच शकत नाही. भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक बनारस, अनेकांना विश्वास आहे की या शहरात मरण आणि गंगेच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केल्यास जीवन-मृत्यूच्या चक्रातून मोक्ष प्राप्त होतो.

७७ वर्षीय दयानंद कुमार जेवण्याच्या टेबलावर मुलगा, सून, नात यांच्यासोबत एक विचित्र घोषणा करून टाकतात. – ‘मुझे लगता है मेरा वक़्त आ गया है, और मुझे लगता है की मैं मरने के लिए तयार हूँ!’ चिडचिड करण्याच्या वयात असला हट्टीपणा मुलासाठी नवीन नसतो. पण या वेळी वडिलांना स्वतःच्या मृत्यूबद्दल लागलेली चाहूल आणि त्यांनी मनाची केलेली तयारी याबाबत पक्का निर्णय झाला आहे. – ‘मी उद्या गोदान करतोय, आणि परवा बनारस. मरण्यापूर्वी मला मोक्षप्राप्तीसाठी असलेल्या एका ठिकाणी जायचं आहे.’ मुलगा राजीवच्या वाट्याला आधीच भरपूर काही वाढून ठेवलंय. डिमांडिंग जॉब, टारगेट्समुळे येणारं वर्कलोड, मुलीच्या लग्नाची तयारी. घरच्या जबाबदाऱ्या आणि बापाचा हट्टीपणा यात ओढाताण झालेला राजीव वडिलांसोबत वाराणसीला जायचा निर्णय नाखुषीने घेतो. निर्णय कसला… त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतोच. ‘वयासोबत येणारा आडमुठेपणा असेल फक्त, होणार तर काही नाही, थोडे दिवस जाऊन परत वापस येऊ’ हे तो बायकोजवळ बोलूनही दाखवतो. वाराणसीत ‘मुक्ती भवन’ नावाचं एक चॅरिटीवर चालणारं ठिकाण आहे. आपलं मरण आता जवळ आलंय आणि ते स्वीकारण्यासाठी तयार असू तरच तिथे आपल्याला प्रवेश मिळतो. स्वतःला मृत्यूच्या आधीन करण्यासाठी आपल्याला दोन आठवडे मिळतात. १५ दिवसानंतर तुमचं मरण नाही आलं तर आवरून परत निघावं लागतं. अर्थात त्याची सुद्धा एक गंमत आहे, पण त्याबद्दल पुढे. काहीशा नाखुशीने बाप – मुलगा त्या छोट्याशा खोलीत एकत्र बांधले जातात. बहुदा पहिल्यांदाच!
बाप नावाच्या प्राण्याचा एक ऑरा असतो. बंदिस्त शिंपला. त्यात शिरकाव करणे हयात असेपर्यंत अनेकांना जमत नाही. कधीच न उलगडण्याने त्यातील माया हरवत जाते.

रवींद्रनाथ टागोरांनी सत्यजित रें लहान असताना डायरीत लिहिलेला संदेश असा होता. –

‘मी जगभर प्रवास केला.
नद्या आणि पर्वत पाहण्यासाठी दूरवर भटकलो.
आणि सारे काही पहिले,
पण माझ्या घरासमोरच्या, एक गवताच्या पात्यावरील
दवबिंदू पाहण्याचे मात्र मी विसरलो.
एक दवबिंदू… ज्याच्या इवल्याश्या परिघात
भोवतालचे सारे जग प्रतिबिंबित झाले होते.’

आपलंही असं होत असावं का? शुभाशीष भूतीयानी असाच एक दिपवून टाकणारा दवबिंदू दाखवतात. बाप नावाच्या बंदिस्त शिंपल्याला हळुवारपणे उघडून त्यातली गंमत दाखवतात. असं काही जे आजवर एकाच छताखाली राहून देखील आपण कधीच बघितलेलं नसतं. एकमेकांविषयीच्या जुन्या वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या खदखद मागे सोडून आयुष्य आणि मृत्यू समजून घेत नव्याने बंध निर्माण होणे आणि ते अलगदपणे जाऊ देणे हा काहींसाठी ‘मोक्ष’ असू शकतो आणि तो मिळण्यासाठी तुम्हाला वाराणसीत जाण्याची गरज नसते हे गवसण्याचा प्रवास म्हणजे ‘मुक्ती भवन’. हिंदू धर्माच्या प्रचलित समजूतीनुसार त्या-त्या जन्मात केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारत जन्म आणि मृत्यूच्या साखळीतून मुक्त होणे म्हणजे मोक्षप्राप्ती. या अखंड साखळीतून सुटका हेच अंतिम ध्येय असावं का? आपल्यातले बरेच जण जिवंत असताना स्वतःला रहाटगाड्याच्या स्वाधीन करतात. त्याऐवजी आपल्या टर्म्सवर आयुष्य जगत मृत्यूची चाहूल लागताच खुल्या मनाने त्याला सामोरे जाणं हे महत्वाचं असू शकत नाही का? ‘मुक्ती भवन’ या मूलभूत प्रश्नांना हात घालतो.

‘मुक्ती भवन’ ची सगळ्यात मोठी ताकत हीच की तो मरणाकडे सहानुभूतीने न बघता अस्तित्वात असतानाच मोकळं होण्याची गरज अधोरेखित करतो. आयुष्याला आपण महाकाव्य, महावस्त्र वैगरे पालुपद लावत बसतो, प्रत्यक्षात मात्र ती अनेक चिंध्या जोडून तयार केलेली गोधडी असू शकते. ‘मुक्ती भवन’ त्या तुकड्या-तुकड्यातलं सौंदर्य दाखवू पाहतो. त्यामुळे सिनेमाचा विषय गंभीर वाटत असला तरी त्याला नर्मविनोदाची झालर आहे. एरवी कधी न दिसणाऱ्या गोष्टी त्या छोट्याश्या खोलीत एकत्र असताना जाणवू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य नेमकं वेचून तो समोर ठेवतो. आपण जगतो कसं, जगताना तडजोड कशी करतो, स्वतःला डब्ब्यात लपवतो कसं, जवळच्या लोकांवर प्रेम कसं व्यक्त करतो, स्वतःला-इतरांना माफ कसं करतो – याचा आजीच्या हाताने गोधडी शिवावी तसला कोलाज आहे. नात्यांचे सांधे बदलल्यावर नव्याने तयार झालेले डायनॅमिक्स स्वीकारताना होणाऱ्या टोचणीची शिलाई त्याला आहे. वडिलांसोबत रूममध्ये राहताना त्यांचे कपडे धुण्यापासून तर स्वयंपाक करेपर्यंत सगळी कामं राजीवला करावी लागतात तेव्हा तो बंदिस्त शिंपला अलगदपणे उघडत असतो.

एका प्रसंगात दयानंद मुलाला विचारतात की, ‘तू लहान असताना कविता करायचा, ते का सोडून दिलय आता?’ तेव्हा राजीव उत्तर देतो की, ‘शाळेत तुम्हीच शिक्षक असल्याने त्या टोकाच्या शिस्तीचा सगळ्यात जास्त त्रास मलाच व्हायचा. शिक्षा भोगायला मीच नेहमी पुढे!’ प्रत्यक्षात राजीवला कडक शिस्तीची जाणीव असून सुद्धा तो त्याच्याच बापाचं अपडेटेड व्हर्जन झाला आहे. मुलीने स्कुटर शिकणे आणि जॉब करणे याबाबत तो निरुत्साही आहे. मुलीचं जिथे लग्न ठरलं आहे, ती व्यक्ती मुलीला पसंत नसून सुद्धा केवळ बापाच्या इच्छेखातर ती लग्न करतेय. बापाबद्दल जी काही खदखद त्याच्या मनात आहे, प्रत्यक्षात मात्र तो स्वतःच्या मुलीशी त्याहून वेगळं वागत नाहीये. तितकाच जिद्दी. ‘मी कधीच चांगला बाप होऊ शकलो नाही’ ही खंत बोलून दाखवणे हा दयानंदचा मोक्ष आहे. तर आपल्या मुलीबद्दल माझ्यापेक्षा वडिलांना जास्त माहिती आहे, हे स्वीकारून परिस्थिती बदलण्याची तयारी ठेवणं हा राजीवचा मोक्ष.

‘तुंबलेल्या भावनांना मोकळं होऊ देणं’ याची निकड वाराणसीचं खरंखुरं काशी लाभ मुक्ती भवन चालवणारे भैरवनाथ शुक्ला नेमकं सांगतात. गेल्या ४५ वर्षांपासून ते सांभाळणाऱ्या शुक्ला यांनी आजवर १६००० पेक्षा जास्त मृत्यू त्या १२ खोल्यांच्या भवनात बघितले आहे. एका मुलाखतीत त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याआधी आयुष्याची १२ महत्वाची तत्वे सांगितली आहे. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. – Resolve all conflicts before you go. माणसं आयुष्यभर विनाकारण ओझं घेऊन वावरतात. शेवटच्या क्षण जवळ येईपर्यंत. हे सोबत न बाळगता गाठी मोकळ्या सोडून हलकं होणं किती गरजेचं आहे, हे शुक्लाजी इतक्या वर्षात प्रत्यक्ष बघत आले आहे. धुसफूसत असलेले conflicts बोलून दाखवले आणि समाधानाने जीव सोडला अशी असंख्य मरणं त्यांनी बघितली आहे. सिनेमात एका प्रसंगात दयानंद यांची तब्येत बिघडल्यावर सगळ्या घरच्यांना बोलावलं जातं. आपण आता हे जग सोडून जात आहोत ही जाणीव झाल्यानंतर दयानंद आपल्या मुलाची माफी मागून म्हणतात, ‘मी कधीच चांगला बाप होऊ शकलो नाही यासाठी मला माफ कर’. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ते बरे झालेले असतात. जसं काही फक्त हे ओझं उतरवल्याने त्यांना बरं वाटणार असतं.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दिल्ली 6’ सिनेमात असाच एक सुदंर प्रसंग आहे. सिनेमात अभिषेक बच्चनची आजी(वहिदा रहमान) आपल्या मरणोत्तर विधीसाठी आधीच खरेदी करते. उत्तरक्रियेसाठी लागणारा कलश सोने-चांदीचा असावा, तांब्याचा की मातीचा यासाठी तिचे काहीएक विचार आहे. आपल्या अंत्यविधीसाठीच्या सामानाची तयारी ती इतक्या उत्सुकतेने करते की तो मटका विकत घेण्यासाठी सुद्धा दुकानदाराशी घासाघीस करू पाहते. आधी विचित्र वाटत असलेली गोष्ट नातवाला नंतर पटते – माणसाचा जन्म कुठे, कसा व्हावा यावर त्याचं नियंत्रण नसतं. पण त्याचा शेवट कसा करावा हे काही अंशी त्याच्या हातात असतं. हे फक्त इच्छामरण या एका संज्ञेभोवती फिरणारं नाही. कुठलीही वेदना नसताना देखील एखाद्याला जीवनाच्या पुढच्या प्रवासाला स्वखुशीने सामोरे जायचं असेल तर त्याचा आदर करायला हवा. जेवण झाल्यावर दयानंद आणि राजीव फेरफटका मारत घाटाजवळ बसतात. तेव्हा राजीव बापाला विचारतो, ‘तुम्ही का हा निर्णय घेत आहात, आम्ही तुमची सेवा करायला कमी पडलो का?’ त्यावर बाप म्हणतो, ‘तसं अजिबात नाही. बस माझं मन भरलं आहे आता, थकवा जाणवतोय.’ राजीव प्रतिप्रश्न करतो, ‘निदान पुढच्या जन्मी तर परत आपल्याच कुटुंबात, घरात जन्म घेणार कि नाही?’ त्यावर दयानंद हसून उत्तर देतात, ‘मी कशाला पुढच्या जन्मी माणूस होईल, मस्त वाघ होईल की. किंवा कांगारू. माझ्या पोटाला दोन खिसे असतील ज्यात मी वाट्टेल त्या वस्तू ठेवेल. त्यासाठी मला ऑस्ट्रेलियात का जन्म घ्यावा लागेना!’ जाणाऱ्या माणसाची इच्छा लक्षात न घेता आपण त्याला थांबवू पाहतो तेव्हा ते नेमकं त्याच्या भल्यासाठी असतं की आपल्या सोबतीसाठी, समाधानासाठी… याबाबत विचार करायला लावणारा मिश्किल प्रसंग. आपल्या घरात अशा विषयावर संवाद शेवटचा कधी झालेला आठवून बघा. मी वडिलांसोबत एकाच रूममध्ये शेवटचा कधी झोपलो होतो, ते सुद्धा आठवत नाहीये. त्या आवरणातून बाहेर येण्यासाठी मुक्तीभवनच्या त्या कोंदट रूममध्ये एकत्र येण्याची वाट बघावी की प्रेशरकुकरचं झाकण उडण्याआधीच सगळे कॉन्फ्लिक्ट बोलून निराकरण करून घ्यावे हा निर्णय घेण्यासाठी ‘मुक्ती भवन’ सिनेमा एक ट्रिगर ठरतो. विशेष म्हणजे सिनेमा आणि बनारस याच्या संदर्भात आलेली ही आठवण फक्त ‘स्क्रीन मेमरी’ नाही.

मुक्ती भवनात १५ दिवस होऊन सुद्धा मृत्यू येत नाहीये हे कळल्यावर देखील दयानंद स्वतःच्या निर्णयावर ठाम आहे. अजून काही दिवस फक्त. तशा केसमध्ये भवनचालक अजून दोन आठवडे राहण्याची मुभा कशी देतात, हे बघणं मजेशीर आहे. रजिस्टरमध्ये दयानंदचं नाव बदलून दुसऱ्या नावाने बुकिंग केली जाते. सर्व बंधनातून मुक्त होऊन १८ वर्ष झाली तरी मृत्यू लाभत नाही, अशा समवयीन विमलाजींसोबत दयानंदचं अनोखं नातं तयार झालं आहे. सहवेदनेचं नातं. विमलाजी गेल्यानंतर आता आपण पुन्हा मुलामध्ये गुंतायला नको याची जाणीव होऊन ते राजीवला परत शहरात जायला सांगतात. ‘इतने सालो बाद तुम मुझे फिर अपने से लगने लगे हो, अब तुम्हे जाना चाहिए।’ मुक्ती स्वीकारण्याचा हाच क्षण असतो.

दयानंद कुमारने शांतपणे मृत्यू स्वीकारल्यानंतर त्यांच्या डायरीत नातीला काही टिपणं आढळतात. स्वतःच्या आणि मुलाच्या काही पूर्ण-अपूर्ण स्वप्नांबद्दल. पण त्यात अजिबात खेद नाहीये की त्याचा विषाद नाही. उलट सगळ्याकडे तटस्थ आणि मिश्किलपणे बघण्याची दृष्टी आहे. त्यात ते स्वतःबद्दल हसत हसत लिहितात – ‘दयानंद कुमार प्रसिद्ध कवी और कहानीकार थे, उनकी रचनाएँ आज भी कभीकभार पुराने किताबों के दुकान में धूल चाटती हुई दिख जाती है। धूल चटाउं या दिमक?’ – अशी नजर प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष नाही का? चिंचोळ्या गल्लीतून अंत्यसंस्कारासाठी नेताना खांदा देणाऱ्या राजीवला रडू येत असतं. नात त्याचा हातात हात घेते आणि दोघे टाळ्या वाजवून नाचू लागतात. मृत्यूचा सुद्धा सोहळा होऊ शकतो याचं सटल चित्रण. माणूस दिमाखात जगला की स्टेजवरून निघताना त्याच्या एग्जिटला सुद्धा टाळ्या पडतात, तसंच काहीसं. बनारस हे शाश्वत काळाचे शहर आहे. जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत स्वरूपाचे प्रतीक आहे. “मुक्ती भवन” मध्ये शहराच्या चिरकाल टिकणाऱ्या शाश्वततेचं नेमकं प्रतिबिंब दाखवले आहे.

बनारस एक जिवंत वारसास्थळ आहे. इतर हेरिटेज स्थळांसारखं इथे केवळ वास्तूला महत्व नाही. किंबहुना ते महत्वाचं नाहीच. अविरत वाहणारी काशीची प्राणसरिता गंगा नदी, लोकं, तिथली ऊर्जा आणि सात किलोमीटर लांबीचा माणसाळलेला घाट हे तिथलं हेरिटेज आहे. हे घाट म्हणजे दगडधोंड्यानी बांधलेलं स्थापत्य नसून मुक्तीच्या मार्गावरील टप्पे आहेत. इथे कुठल्याही दिवशी दिसणारं दृश्य हे भारताची प्रतिकृती असते.जगातले एकमेव शहर जिथे कथक, गायकी आणि तबल्याचे घराणे आहेत. याहून जिवंत हेरिटेज दुसरं काय असू शकेल!

प्रत्येक शहरात काही छोटे मोठे चौक असतात. काशीचा चौक अभूतपूर्व आहे. स्कंदपुराणात काशीखंडमध्ये ‘आनंदकानना’ चौकाचा उल्लेख आहे. जो आजही बघावयास मिळतो. या चौकातून एक रस्ता काशी विश्वनाथ मंदिराकडे जातो, म्हणजे धर्माकडे… दुसरा रस्ता जातो मणिकर्णिका घाटावर, म्हणजे मुक्तीकडे… तिसरा रस्ता जातो ठठेरी बाजारात खरेदीसाठी… तर चौथा रस्ता दालमंडीच्या गल्लीत जातो, जिथे पूर्वी देहविक्री करणाऱ्या महिलांची वस्ती होती.. धर्म, मोक्ष, अर्थ, काम यांचे रस्ते एकाच ठिकाणी मिळणारा कदाचित हा जगातील एकमेव चौरस्ता असावा. एका आयुष्यात हे अद्भुत शहर अनुभवणं तर केवळ अशक्य. शक्य आहे तोवर आपल्याला बनारसच्या घाटावर नेऊन ठेवणारे सिनेमे ‘स्क्रीन मेमरीज’सह अनुभवत राहू. सिग्मंड फ्रॉइड म्हणतो कि स्क्रीन मेमरीज अशा आठवणींना distort अथवा बदलून टाकतात ज्या प्रत्यक्ष आयुष्यात आघात करणाऱ्या असतात.

जेव्हा तुम्ही बनारसला भेट द्याल, तेव्हा या चित्रपटांमधील जिवंत सिनेमॅटिक प्रतिमा तुमच्या वास्तविक अनुभवाशी एकरूप होतील. शहर तुम्हाला ओळखीचं वाटेल, परंतु त्यात काहीतरी वेगळेपण असेल. ‘मुक्ती भवन’, ‘मसान’, ‘वॉटर’, ‘रांझणा’ आणि ‘मोहल्ला अस्सी’ मधील दृश्यं तुमच्या अनुभवात मिसळून तुमच्यासाठी ‘स्क्रीन मेमरीज’द्वारे अभूतपूर्व अनुभव तयार करतील. शहरातील गोंधळ किंवा साधेपणा कदाचित चित्रपटांमधील गोंडस प्रतिमेसारखा सुंदर किंवा तसाच नसेल, परंतु या चित्रपटांनी निर्माण केलेल्या आठवणी तुमच्या बनारसच्या अनुभवाला अधिक गहन आणि भावनिक बनवतील.

“संगम दो बार आना चाहिए, एक बार अकेले और एक बार किसी के साथ।”

.। ……….

मिर्झा गालिबचे ‘चिराग़-ए-दैर’

मिर्झा गालिब यांची बनारसची भेट प्रसिद्ध आहे. बनारसमध्ये त्यांनी जे काही पाहिलं, त्या आठवणी, बनारस आणि तेथील गंगा पाहिल्यानंतर त्यांच्या मनात उमटलेले तरंग त्यांनी ‘चिराग़-ए-दैर’ या पर्शियन भाषेत लिहिलेल्या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत .. बनारसमध्ये गालिब यांनी तीन आठवडे घालवले. शहराची ओळख झाल्यानंतर त्यांनी आपले मित्र मौलवी मोहम्मद अली खान यांना एक लांबलचक पत्र लिहिले. या पत्रात बनारसबाबत त्यांच्या मानसिक स्थितीचे अत्यंत मार्मिक चित्रण होते. ते लिहितात- “जेव्हा मी बनारसमध्ये प्रवेश केला तेव्हा पूर्वेकडून एक जीवन देणारा, स्वर्गासारखा वारा वाहू लागला, ज्याने माझ्या शरीराला शांत केले आणि माझ्या हृदयात नवीन चैतन्य फुंकले. त्या वाऱ्याच्या करिष्माई प्रभावाने माझे शरीर विजय ध्वजासारखे उन्नत झाले. थंड हवेच्या लहरींनी माझ्या शरीरातील अशक्तपणा दूर केला. या पुस्तकात बनारस , तेथील गंगा , संस्कृती, लोकजीवनावरील गालिब यांच्या कविता आहेत.

(लेखक नामवंत स्तंभलेखक व चित्रकार आहेत)

 

Previous articleमाझा नवा मित्र-ChatGpt
Next article‘मीडिया वॉच’ चे दिवस
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here