वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा..!

नीलांबरी जोशी

अमेरिकेनं अफगाणिस्तानामधून आपल्या फौजा अखेरीस २० वर्षानंतर मागे घेतल्या. ही अमेरिकी साम्राज्यवादाची आपल्या अंताकडे वाटचाल म्हणावी का?

२००१ पासून सुरु असलेल्या या युध्दात सुमारे दीड लाख अफगाणिस्तानी नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार या युद्धापायी अमेरिकेला दरवर्षी ४५० कोटी डॉलर्सचा खर्च सोसावा लागत होता.

एकूण, आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या वर्चस्वाखाली लढणाऱ्या फौजांना तालिबान हे डोईजड प्रकरण झालेलं होतं. तालिबानच्या हल्ल्यांपासून अफगाणिस्तानमधलं सरकार वाचवण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्र गेली काही वर्ष प्रयत्न करत होती. २०१४ साली मित्रराष्ट्रांनी आपली युध्द मोहीम आवरती घेतली. पण अमेरिकेनं युध्द चालू ठेवलं होतं.

अब्जावधी डॉलर्स खर्च करुनही या युध्दात अफगाणिस्तानात मानवी हक्क आणि शांतता प्रस्थापित करणं हा हेतू साध्य झालेला नाही. तिथे परत एकदा तालिबानची जुलमी राजवट आहेच…!

***********

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानहल्ला झाला. यामध्ये जवळपास २९७७ अमेरिकन नागरिक मारले गेले. या हल्ल्यांमागे “अल कायदा” या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन असल्याचं लवकरच लक्षात आलं. ओसामा बिन लादेन तेव्हा अफगाणिस्तानात आश्रयाला होता. त्याला अमेरिकेच्या ताब्यात द्यायला अफगाणिस्तानमधल्या तालिबानी राजवटीनं नकार दिला.

त्यानंतर सुमारे एका महिन्यातच अमेरिकेनं अफगाणिस्तानात हवाई हल्ले सुरु केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सैनिक अफगाणिस्तानात जाऊन पोचले आणि युध्द सुरु झालं. पण अमेरिकेसारख्या बलाढ्य देशावर हल्ला करणारा ओसामा बिन लादेन कोण होता? यासाठी थोडा पूर्वेतिहास पहावा लागेल.

******

या युध्दाआधी अफगाणिस्तानात अंतर्गत युध्दं २० वर्षं चालूच होती. १९७९ साली अफगाणिस्तानमध्ये उठाव झाला तेव्हा सोव्हिएत सैन्यानं तिथे घुसून कम्युनिस्ट राजवटीला आपला पाठिंबा दिला. कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात तिथे एक गट उभा ठाकला. तो गट मुजाहिदीन. अमेरिका, पाकिस्तान, चीन, सौदी अरेबिया अशा काही देशांचा मुजाहिदीनला पाठिंबा होता.

या प्रकरणात १९८९ साली सोव्हिएत युनियननं माघार घेतली. अफगाणिस्तान तेव्हा जवळपास बेचिराख झालं होतं. अंतर्गत सुंदोपसुंदीच्या काळात तालिबानचा जन्म झाला. ‘विद्यार्थी’ असा पश्तू भाषेत तालिबान या शब्दाचा अर्थ आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमाभागात तालिबानी जास्त होते. १९९४ साली अफगाणिस्तानातले नागरिक मुजाहिदीनच्या राज्यकारभाराला कंटाळले होते. “भ्रष्टाचार कमी करुन अफगाणिस्तानाला सुरक्षित करु” या दाव्यावर तालिबानी लोकांनी आपले हातपाय पसरले.

तालिबाननं धार्मिक मूलतत्ववाद रुजवण्याचा प्रयत्न केला. शाळांमध्ये कट्टर इस्लाम शिकवणं हा त्यांच्या प्रचाराचा भाग होता. इस्लामिक कायदा शरिया याचा आपल्या मर्जीप्रमाणे तालिबाननं अर्थ लावत स्त्रियांना बुरख्याची सक्ती केली. स्त्रियांना शिक्षण घ्यायला बंदी होती. पुरुषांना दाढी वाढवणं सक्तीचं केलं. अफगाणिस्तानात टीव्ही आणि चित्रपट यांच्यावर बंदी आली. तालिबानचे नियम मोडणाऱ्यांना जाहीर मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या जात. व्यभिचाराचा आरोप असलेल्या एका स्त्रीला सर्वांसमक्ष दगडानं ठेचून मारलं जाई. या घटनेवरचा “द स्टोनिंग आॉफ सोराया” हा चित्रपट हृदयद्रावक आहे.

******

याच तालिबाननं अल-कायदा या दहशतवादी संघटनेला म्हणजेच ओसामा बिन लादेन याला आश्रय दिला होता. अल-कायदानं ९/११ घडवून आणल्यामुळे अमेरिका आणि इतर काही देशांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला. “दहशतवादी कारवायांसाठीचा तळ म्हणून अफगाणिस्तानाचा होणारा वापर थांबवणं आणि तालिबान राजवटीच्या लष्करी गटांवर हल्ला करणं” या हल्ल्यांचं उद्दिष्टं असल्याचं अमेरिकेचं म्हणणं होतं. तालिबानी संघटनेचे तळ आणि ओसामा बिन लादेनचे प्रशिक्षणाचे कॅंप्स यांच्यावर अमेरिकेनं हल्ला केला. त्यानंतर तालिबानला अफगाणिस्तानातली सत्ता सोडावी लागली.

अमेरिकेच्या सहाय्यानं अफगाणिस्तानात २००४ साली नवीन सरकार स्थापन झालं. २०११ साली अमेरिकेनं ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये घुसून ठार केलं.

पण तालिबानी लोकांच्या अफगाणिस्तानातल्या दहशतवादी कारवाया चालूच राहिल्या. ड्रग्ज, खाणी यातून तालिबानला भरपूर कमाई सुरु होती. अफूच्या व्यापारासारख्या गोष्टींमधून तालिबानला दरवर्षी १५० कोटी डॉलर्स मिळतात. त्या पैशांच्या जोरावर तालिबाननं आपलं सामर्थ्य परत प्रस्थापित करण्याचा पूर्ण प्रयत्न चालवला होता. तो आता यशस्वी झाला आहे.

*******

यावर ख्रिस हेजेस हा पुलित्झर पारितोषिक विजेता पत्रकार म्हणतो,

“अफगाणिस्तान, इराक, सिरिया, येमेन आणि पाकिस्तान या देशांमध्ये ९/११ घटनेनंतर म्हणजे २००१ नंतरच्या युध्दांमध्ये ८,०१,००० माणसं मारली गेली. अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान, येमेन, सोमालिया आणि फिलीपाईन्स या देशांमधून ३.७ करोड माणसं निर्वासित झाली असं “ब्राऊन विद्यापीठातल्या वॉटसन इन्स्टिट्यूट”चा अहवाल सांगतो.

गेल्या चार हजार वर्षांमध्ये सुमारे ७० साम्राज्यं, ज्यांच्यामध्ये ग्रीक, रोमन, चायनीज, आॉट्टोमान, हॅप्सबर्ग, जर्मनी, जपान, ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि सोव्हिएत युनियन अशा साम्राज्यांचा समावेश होतो, ती लष्कराच्या अतिरेकी मूर्खपणानं लयाला गेली. रोमन साम्राज्य ऐन भरात असताना फक्त दोन शतकं टिकलं. आपण (अमेरिकन साम्राज्य) साधारण तितक्याच कालावधीत लयाला जाऊ. असाच काहीसा युक्तिवाद केल्यामुळे कार्ल लायबेनेश्ट या पहिल्या महायुध्दाच्या सुरुवातीला जर्मन लष्करानं अंतर्गत शत्रू – द एनिमी फ्रॉम विदिन असं संबोधलं होतं. नंतर कार्लला तुरुंगवास आणि फाशीची शिक्षा दिली गेली..”

”उगवती साम्राज्यं न्यायानं वागतात, आपल्या देशाचं नियंत्रण प्राप्त करण्यासाठी परराष्ट्रांच्या हल्ल्यांविरोधात लष्कर वापरतानाही तर्काचा वापर करतात.. याऊलट, मावळती साम्राज्यं आपल्या सत्तेचं पाशवी प्रदर्शन करतात, आक्रमकपणे लष्कर वापरुन आपली गमावलेली प्रतिष्ठा आणि सत्ता परत मिळवायचा प्रयत्न करतात.. ! “इन द शॅडोज आॉफ द अमेरिकन सेंच्युरी” या पुस्तकात इतिहासकार आल्फ्रेड मॅकॉय यानं हे लिहिलं आहे. तो पुढे म्हणतो, “साम्राज्यवादी दृष्टिकोनातून विचार केला तरीही अशा लष्करी कारवाया अर्थव्यवस्था खिळखिळी करतात आणि पराभूततेकडच्या आधीच चालू असलेल्या वाटचालीचा वेग वाढवतात..!”

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleमुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो..!
Next articleसमाजशिक्षक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.