वादग्रस्त पण कमिटेड!

अविनाश दुधे
महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झालाkishor tiwari की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी त्याची ‘कुंडली’ तपासण्याची प्रथा सुरू झाली आहे. निखळ कर्तृत्वाच्या जोरावर एखाद्याला सन्मानित केले जाऊ शकते, एखाद्याचं ज्ञान, त्याचा अनुभव लक्षात घेऊन त्याची नेमणूक होऊ शकते, यावर सध्या कोणाचाच विश्‍वास नाही. त्यामुळे नवीन कुठल्याही नियुक्त्या व पुरस्कार जाहीर झालेत किंवा संबंधिताची जात, पात, संघटना, विचारधारा, गोत्र सारं काही तपासलं जाते. सध्या जुनी गोत्र मागे पडली आहेत. आता संघवाला, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, सेवासंघवाला, बामसेफवाला असे वेगवेगळे नवनवीन गोत्र तयार झाले आहेत. या गोत्रवाल्यांचे कुठल्या घटनेकडे, कुठल्या व्यक्तीकडे कसे पाहायचे याचे खास तयार केलेले स्वत:चे असे चष्मे आहेत. सर्वसामान्य जनतेनेही त्यांच्या या चष्म्यानेच प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांनी तो आग्रह धरणे स्वाभाविकही आहे. त्यांनी आपापले कळप तयार केले आहेत. ते कळप त्यांना अधिक मजबूत, आक्रमक करायचेत. त्यामुळे तटस्थ, विवेकबुद्धीने, निरक्षीर विवेकाने वागणारी माणसं या कुठल्याही गोत्राला नको असतात. कृत्रिम गोष्टींचा अभिमान व अभिनिवेश बाळगून असणार्‍या या गोत्रांच्या ठेकेदारांजवळ सत्ता व अधिकार आलेत की ते स्वाभाविकच आपल्या कळपातील माणसांची ठिकठिकाणी वर्णी लावतात. आता हे एवढं स्वाभाविक झालं आहे की त्याचं कोणाला कसलंही नवल वाटत नाही. हे असंच असतं असं वाटावं, एवढी या प्रकाराची सवय झाली आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात हेच झालं आणि आता भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात तर अगदी ठरवून ठिकठिकाणी आपली माणसं पेरली जात आहेत.

वसंतराव नाईक स्वावलंबन शेती मिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या किशोर तिवारींच्या नियुक्तीकडे याच दृष्टिकोनातून पाहायला हवे. किशोर तिवारींच्या नेमणुकीनंतर या तिवारींचं कर्तृत्व काय?, त्यांना शेती, आत्महत्या वगैरे विषयातील काय कळते? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे. आपल्याकडे काही विषयात अतिशय मजेशीर आग्रह आहे. शेती, आत्महत्या वगैरे विषयात ठराविक लोकांनीच, काही राजकीय पक्षाच्या लोकांनीच बोलावं… इतरांनी तोंड उघडलं की, यांना शेतीतलं काय कळतं, कापूस, भूईमूग जमिनीखाली पिकतो की वर, हेही यांना माहीत नाही, असं उपहासानं सांगितलं जातं. वरच्या जातीच्या, सुस्थापित मंडळींना कितीही तळमळ असली, कळवळा असला तरी शेतीबद्दल आणि तेथे राबणार्‍या माणसांबद्दल बोलण्याचाच अधिकारच नाही, असंच आपण ठरवून टाकलं आहे. असो!… तर हे किशोर तिवारी तसे संघगोत्राचे. त्यांच्या घराण्यातील तीन पिढय़ा संघ-जनसंघाशी संबंधित आहे. स्वत: किशोर तिवारींनी ते कधी लपवून ठेवलं नाही. भूतकाळात भारतीय जनता पक्ष व प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या नेत्यांना भरपूर फटाके लावूनही किशोर तिवारींना हा मिशनचा लाल दिवा मिळाला तो घराण्याच्या पूर्वपिठिकेमुळेच. अर्थात किशोर तिवारी संघाचे आहेत म्हणून त्यांचं या विषयातील काम अजिबात छोटं ठरत नाही. साधारण २०-२२ वर्षांपूर्वी हे नाव अचानक प्रकाशात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात तिवारी कुटुंब बर्‍यापैकी परिचित होतं. मात्र बाहेर ते फारसे कोणाला माहीत नव्हते. ९३-९४ च्या दरम्यान कधीतरी उच्चशिक्षित किशोर तिवारी यांनी मल्टिनॅशनल कंपनीतील पाच आकडी भक्कम पगाराची नोकरी सोडून विदर्भ जनआंदोलन समिती स्थापन केली. केळापूर, झरी जामणी, घाटंजी आदी आदिवासीबहुल तालुक्यातील तेंदूपत्ता गोळा करणार्‍या मजुरांना वाढीव मजुरी मिळावी, तेंदूपत्ता उत्पादक व्यापार्‍यांकडून त्यांचं होत असलेलं शोषण थांबावं यासाठी तिवारी लढायला लागले. या विषयात यवतमाळातील वर्तमानपत्रांच्या कार्यालयात येणार्‍या त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रसिद्धिपत्रकामुळे त्यांच्याकडे पहिल्यांदा माध्यमांचं लक्ष जायला सुरुवात झाली.

काही दिवसातच किशोर तिवारींनी शेतकरी आत्महत्येच्या विषयात हात घातला. तेव्हा शेतकरी आत्महत्यांना नुकतीच सुरुवात झाली होती. काही दिवसातच एकापाठोपाठ एक शेतकरी आत्महत्या करायला लागलेत. माध्यमांसाठी हा प्रकार नवीन होता. तिवारी मात्र अतिशय चिकाटीने प्रत्येक आत्महत्येचं डॉक्युमेंटेशन करायला लागले. रोज घडणार्‍या आत्महत्यांचे आकडे व नाव, गाव फोटोसह सर्व तपशील ते वर्तमानपत्रांना पुरवायला लागले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या जोरावर वर्तमानपत्रे हा विषय लावून धरायला लागलेत. सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमांपुरता हा विषय र्मयादित होता. काही दिवसातच इतर जिल्ह्यातही आत्महत्या वाढायला लागल्यात. हा विषय चिंतेचा व्हायला लागला. किशोर तिवारी मग यवतमाळपुरते र्मयादित राहिले नाही. त्यांनी हा विषय राज्यपातळीवर नेला. राज्यातील प्रत्येक वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांच्या फॅक्सवर रोज सायंकाळी विदर्भातील आत्महत्येचा करुण कहाण्या उमटायला लागल्यात. तिवारी तेथेच थांबले नाही. आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांची कार्यालयं, राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, सचिव, केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्राचे सचिव, पंतप्रधान कार्यालय अशा सर्व ठिकाणी त्यांचे फॅक्स जाऊन धडकायला लागले. त्या काळात तर आम्ही पत्रकार रोज किती फॅक्स रोल लागतात, हे त्यांना गमतीने विचारायचो. तिवारींचं माहीत नाही पण तिवारींच्या फॅक्सच्या मार्‍यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी चांगलेच हैराण झाले. तिवारींच्या सततच्या फॅक्समुळे अनेक कार्यालयात रोज फॅक्सचे रोल संपायचे. यातला विनोद जाऊ द्या, पण तिवारी ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचा फॉलोअप घेतात त्याला तोड नाही. त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे. अतिशय अस्खलित इंग्रजी ते बोलतात. विषयाचा अभ्यास आहे. जाण आहे. त्यामुळे अनेक शासकीय अधिकार्‍यांची त्यांच्यासमोर तारांबळ उडते.

शेतकरी आत्महत्येच्या विषय अतिशय अभ्यासपूर्ण व गांभीर्याने जगासमोर नेण्यात अनेकांचा मोठा वाटा आहे. चंद्रकांत वानखडे, विजय जावंधिया, गजानन अमदाबादकर, विजय विल्हेकर, रवी तुपकर अशी अनेक माणसं ठिकठिकाणी या विषयात पोटतिडकीने काम करत आहे. मात्र शासन आणि माध्यमांना हलविण्यात तिवारींचं योगदान मोठं आहे. इंग्रजीचा योग्य वापर आणि तंत्रज्ञानाची उत्तम समज या जोरावर हा विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम किशोर तिवारींनी केलं. देशातील सर्व आघाडीच्या वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी यवतमाळ, अमरावती, वध्र्याच्या खेड्यापाड्यात आलेत ते किशोर तिवारींमुळे. परदेशातीलही शेकडो पत्रकार विदर्भात येऊन गेलेत ते तिवारींच्या पाठपुराव्यामुळेच. माध्यमांना या विषयातील कुठलेही डिटेल्स हवे असतील तर एकमेव नाव समोर येते ते किशोर तिवारींचं. राज्य व केंद्र स्तरावरील सचिव दर्जाचे अनेक अधिकारी, अनेक आयोग, कमिट्यांना विदर्भात वारंवार यावं लागले त्यामागेही तिवारींचा फॉलोअप कारणीभूत आहे. २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विदर्भाच्या दौर्‍यावर आले होते त्यामागे पी. साईनाथ, चंद्रकांत वानखडे, जयदीप हर्डीकर यांच्याप्रमाणेच किशोर तिवारी यांच्या प्रयत्नाचाही मोठा वाटा आहे. १९९४ पासून विदर्भात झालेल्या जवळपास प्रत्येक शेतकरी आत्महत्येची इत्थंभूत माहिती त्यांच्याजवळ आहे. आपल्याकडे कोणत्याही विषयाची तात्त्विक मांडणी खूप होते. कारणांवरही तळमळीने बोलले जाते, पण यासोबत डॉक्युमेंटेशन व पाठपुरावाही खूप महत्त्वाचा असतो. ते काम किशोर तिवारींच्या खाती जमा झालं आहे. याबद्दल त्यांना १०० टक्के गुण देतानाच त्यांच्याबद्दलचे काही आक्षेपही नोंदवले पाहिजेत. तिवारी हे शेतकरी आत्महत्या या विषयाची आक्रस्ताळी व अतिरंजीत मांडणी करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे आत्महत्यांचे आकडे मांडून तिवारींनी सवंग प्रसिद्धी मिळविली, असेही आरोप त्यांच्यावर होतात. तेंदूपत्ता मजुरांच्या आंदोलनाच्या विषयातही ते अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. शिवाजीराव मोघे, वामन कासावार, माणिकराव ठाकरे व यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे इतरही प्रमुख नेते त्यांच्याबद्दल फारसं चांगलं बोलत नाही. तिवारींनी त्यांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला होता, त्यामुळे त्यांचा वैताग आपण समजू शकतो. अर्थात तिवारी वादग्रस्त आहेच, हे नाकबूल करता येत नाही. ते हुशार आहेत, पण काहीसे विक्षिप्त वाटावेत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:वर कायम खूश राहणारी जी माणसं असतात त्यामध्ये त्यांचा समावेश आहे. अनेक जिनिअस माणसांचा हा प्रॉब्लेम आहे. तिवारी बोलतातही खूप. आतापर्यंत विरोधात असल्याने हे चालून गेलं. आता शासनाचा एक भाग झाल्यानंतर ते कृती काय करतात, हे पाहणं रंजक ठरेल. तिवारींपेक्षा अधिक समतोल व गांभीर्याने शेतकर्‍यांचा विषय लावून धरणार्‍या माणसाची नेमणूक व्हायला हवी होती, असा एक सूर आहे. मात्र प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक सरकारला, समूहाला आपल्या गोत्रातील माणसं हवी असतात. त्यानुसार तिवारी यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांची विषय मांडणीची अतिरंजीत पद्धत सोडली तर त्यांच्या कमिटमेंटबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. त्यांना विषयाची उत्तम जाण आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, याची नेमकी कारणं त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता आता शासकीय यंत्रणेतील एक महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाल्यानंतर तिवारींनी उपाययोजनांना हात घातला पाहिजे. शेतकर्‍यांना वाजवी दरात बी-बियाणे, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शंभर टक्के कर्जपुरवठा, बियाणे, खते, कीटकनाशक खरेदीत कृषी केंद्रांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट, पेरणीनंतर सातत्याने होणारा खंडित वीजपुरवठा, सिंचनाच्या अपुर्‍या सोयी या विषयात लक्ष घालून सुधारणा घडवून आणण्याचा प्रय▪तिवारींनी केला पाहिजे. त्यात जर ते पन्नास टक्के जरी यशस्वी ठरले तर स्वावलंबन मिशन आणि किशोर तिवारीचं अध्यक्षपदही सार्थकी लागलं असं म्हणता येईल.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Previous articleअसलेपण – नसलेपण
Next articleभाजपाने केलाय मित्रपक्षांचा खुळखुळा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.