विचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते !

मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७

 

सुधाकर जाधव
—————————————

विचाराचे वय असते आणि त्याचा मृत्यू अपरिहार्य असतो ही मान्यताच समाजात नसल्याने मेलेल्या विचारधाराना कवटाळून बसलेले लोक जगातील कानाकोपऱ्यात दिसतात. धर्म आणि त्यांनी निर्माण केलेल्या समाजरचना आजही आदर्श मानणारा मोठा समूह आहे. तसेच आधुनिक विचाराची परिणामकारकता संपल्याचे दिसून आल्यावरही त्याच विचाराला कवटाळून राहणारी जमातही सर्व ठिकाणी आढळून येते.

…………………………………………………………………………………………………………………..
जगाचा इतिहास हा बदलाचा इतिहास आहे. अधिक उन्नत अवस्थेकडे वाटचाल हे स्थायी तत्व राहिले आहे. उन्नत अवस्था म्हणजे तरी काय तर जग आपल्या जगण्यासाठी अधिकाधिक अनुकूल व्हावे ही. जग असे आपल्या जगण्यासाठी अनुकूल करून घेण्याचा माणसाचा प्रवास अखंड सुरु आहे. सृष्टीत निर्माण झालेल्या पहिल्या माणसापासून सुरु झालेला अनुकूलतेचा प्रवास आज जगाच्या पाठीवरील प्रत्येक माणूस आपापल्या परीने करीत असल्याचे आपण बघतो. आदिम काळातील जग आणि आजचे जग यात कल्पनातीत अंतर आहे. आज माणूस प्रगतीच्या शिखरावर आहे असे आपण मानत असलो तरी कालचे जग त्या त्या काळातील मापदंडानुसार प्रगतीच्या शिखरावरच होते. मागचा कालखंड भौतिकदृष्ट्या आपल्याला जितका मागासलेला वाटतो तीच भावना उद्याच्या कालखंडातील माणसाची आपल्या बद्दल असणार आहे. व्यवस्था सतत बदलत आल्या आहेत. बदलाची गती देखील वाढतीच राहिली आहे. या सगळ्या बदलाचे श्रेय नि:संशयपणे माणसाचे आहे , मनुष्य जातीचे आहे. बदल माणसांमुळे घडले हे जितके ठामपणे सांगता येते तसे विचाराच्या आणि विचारधारांच्या प्रभावाने बदल झालेत असे सांगता येत नाही. बदलास माणसाचे निरीक्षण , माणसाची प्रतिभा जितकी कारणीभूत ठरली आहे तितकी विचार आणि विचारधारा कारणीभूत ठरल्याचे आढळत नाही. प्रतिभावान माणसांच्या शोधाने जगात जेवढे बदल घडून आलेत तेवढे बदल प्रतिभावान विचारवंताच्या विचाराने किंवा त्या विचाराच्या विचारधारेतून झालेले नाहीत. इतिहासाकडे पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की विचारधारांच्या आधारे जग बदलण्याचा प्रयत्न पूर्वीही झाला. त्यातून काहीकाळ काही बदलही घडलेत. असा बदल घडवून आणणारा विचार पुढचे बदल घडविण्यासाठी मात्र अडथळा ठरलेला आहे.
धर्म या प्राचीन विचारधाराच आहेत. त्या त्या धर्माच्या विचाराने त्या त्या काळी बरीच उलथापालथ झाली. व्यवस्था बदलल्यात. पण झालेला बदल पुरेसा कधीच नसतो. बदललेल्या व्यवस्थेला बदलाची गरज असतेच. एवढी लवचिकता धर्म विचारातही नव्हती आणि आधुनिक विचारधारेत सुद्धा नाही. धर्म विचारांनी माणसावर निर्माण केलेला प्रभाव आणि या प्रभावातून निर्माण झालेल्या व्यवस्था जरा जास्त काळ टिकल्या. प्रवाहित समाज स्थिर होण्याचा परिणाम तसाच असतो जसा पाण्याच्या प्रवाहाचे डबके झाले की होतो. धर्म विचाराने माणसे बदलली, व्यवस्था बदलली. धर्म विचाराची धर्म संस्था झाली तेव्हा धर्म विचार आणि धर्म विचारांनी बदललेली माणसे पुढच्या बदलाला अडथळा म्हणून उभी राहिली. आधुनिक विचारधारांचा जन्म बदलातील हा अडथळा दूर करण्यासाठी झाला. एकेकाळी लोक धर्माने जशी झपाटली गेलीत तशीच आधुनिक काळात नव्या विचारांनी झपाटली. हे झपाटलेपण बदल घडण्याच्या काळापुरते मर्यादित असते. बदल घडून गेला आणि स्थिरत्व आले की झपाटलेपण संपते. झपाटलेपण संपण्याचे लक्षण म्हणजे त्या विचाराची उपयुक्तता संपल्याचे निदर्शक असते. नेमके हेच आजवर लक्षात घेतले गेले नाही. विचाराचे वय असते आणि त्याचा मृत्यू अपरिहार्य असतो ही मान्यताच समाजात नसल्याने मेलेल्या विचारधाराना कवटाळून बसलेले लोक जगातील कानाकोपऱ्यात दिसतात. धर्म आणि त्यांनी निर्माण केलेल्या समाजरचना आजही आदर्श मानणारा मोठा समूह आहे. तसेच आधुनिक विचाराची परिणामकारकता संपल्याचे दिसून आल्यावरही त्याच विचाराला कवटाळून राहणारी जमातही सर्व ठिकाणी आढळून येते. यात उजवे-डावे आहेत म्हणजे काय तर जुन्या विचाराची चौकट अधिक चांगली मानून त्या चौकटीत समाजाला बसविण्याची इच्छा बाळगणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे उजवे तर नव्या विचाराची चौकट चांगली मानून त्या चौकटीत समाजाला बसविण्याचा प्रयत्न करणारे डावे. ज्याला उजव्या-डाव्यांचा वैचारिक संघर्ष असे मोठे नाव आपण देतो तो हा संघर्ष आहे. समाजाला विशिष्ट चौकटीत बसविण्याचा संघर्ष . बदलाची विचारधारा मानणारे किंवा बदलाला विरोध करणारे एक गोष्ट लक्षातच घेत नाही की इतिहासकाळापासून समाज जास्त काळ एका चौकटीत कधीच राहिला नाही. अशी चौकट मोडत गेल्यानेच समाजाची प्रगती झाली आहे. उजव्या डाव्यांचा संघर्ष आजचा नाही तर फार पूर्वीपासून चालत आला आहे. या संघर्षात आजचे डावे उद्याचे उजवे बनतात ! म्हणजे आज बदलासाठी प्रयत्न करणारे उद्या त्यापुढच्या बदलाचे विरोधक बनतात. पण त्यांनी विरोध केल्याने बदल थांबत नाहीत. आपल्याला हवे तसे बदल होत नाहीत . समाज भलतीकडेच चालला आहे ही भावना प्रत्येक काळात आपल्याला दिसून येईल. आपल्याला पाहिजे असलेले बदल न होता समाज भलतीकडेच चालला असे वाटणे हे तो मानत असलेल्या विचारधारेची उपयुक्तता संपल्याचे लक्षण असते. समाजाला मागे नेवू पाहणाऱ्या उजव्यांची उपयुक्तता जशी संपलेली असते तशीच समाजाला पुढे नेवू इच्छिणाऱ्या डाव्यांच्या विचाराची उपयुक्तता देखील संपते हे ध्यानात न घेतल्याने उजवे-डावे सगळेच निराशेने ग्रासले जातात. आज झपाटलेपण दिसण्याऐवजी नैराश्याने झपाटलेले कार्यकर्ते दिसतात याचे कारण त्यांची विचारधारा समाजाने आजमावून झाली आहे. समाजाला त्याच्या पुढे जाण्याची आकांक्षा आहे. समाजाची ती आकांक्षा पूर्ण व्हावी असे कार्यकर्त्यांकडे काही नसल्याने समाज त्यांच्याकडे पाठ फिरवतो. विचाराला विशेषत: विचारधारेला एक्सपायरी डेट असते हे जोपर्यंत लक्षात घेतले जात नाही तो पर्यंत कार्यकर्त्यांचे नैराश्य दूर करणारे नवे औषध म्हणजे नवा विचार पुढे येणार नाही.
एखाद्या विचाराचा मोठ्या जनसंख्येवर प्रभाव पडतो तेव्हा व्यवस्थेत बदल होतात हे आपल्याला धर्माने दाखवून दिले आहे. पण जगाच्या पाठीवर धर्म स्थापन होण्याच्या आधीही जग बदलतच होते. ते बदलणे व्यवस्थेवर खोलवर आणि स्थायी परिणाम करणारे होते . उदाहरणार्थ मानवाला विस्तवाचा लागलेला शोध. किंवा वनस्पतीच्या निरीक्षणातून एका दाण्याचे शंभर दाणे होवू शकतात हा लागलेला शोध. या दोन शोधांचा जरी विचार केला तरी त्यामुळे जग किती बदलले याची कल्पना येईल. शोधाच्या अशा असंख्य मालिकेतून आजचे जग घडले आहे. असे बदल करणारे शोध मानवीय प्रतिभेतून लागलेत हे खरे , पण शोधांचे श्रेय कोणत्या विचारधारेला देता येत नाही. इतिहास तर उलट सांगतो. मानवीय जीवनात व्यापक बदल घडवून आणणाऱ्या वैज्ञानिक शोधांचा विरोध धर्मासारख्या संघटीत विचारधारानी केला. मानवीय जीवनात बदल घडवून आणणाऱ्या शोधांचा विरोध आज धर्माकडून कमी आणि आर्थिक , सामाजिक , राजकीय विचारधारांकडून अधिक होत असल्याचे पाहतो. कॉम्प्यूटर , संकरीत वाण , बी.टी. बियाणे अशी अनेक उदाहरणे आपल्याला पुरावा म्हणून देता येईल. साम्यवादी विचार हा समाजबदलाचा विचार मानला जातो. मग जग अधिक सुखमय करणाऱ्या संगणकाचा परिवर्तनवादी विचार करणाऱ्यांकडून का विरोध झाला असेल हे बघितले पाहिजे. परिवर्तनवादी विचाराची चौकट बनते तेव्हा त्या चौकटीला धक्का देणारे त्यांना काहीही चालत नाही हेच कारण दिसून येईल. म्हणजेच परिवर्तनवादी विचार एका टप्प्यावर अपरिवर्तनवादी बनतो आणि त्यावेळी त्याची उपयुक्तता संपलेली असते. या सगळ्या गोष्टीचा विचार करता एक निष्कर्ष काढता येईल. विज्ञान आणि वैज्ञानिक शोधानी मानवीय जीवनात आणि जगात घडून आलेले बदल जितके स्थायी असतात तितके विचार आणि विचारधारांनी केलेले बदल स्थायी नसतात. विज्ञानासारखा निरंतर विकास विचारधारांचा होत नाही हे त्याचे कारण असावे. बैलगाडी ते यान हा विज्ञानाचा विकास थक्क करणारा आहे आणि यातील प्रत्येक साधन जसजसे विकसित झाले त्याचा मानवी जीवनावर अनुकूल परिणाम होत गेला. एका साधनाकडून दुसऱ्या साधनाकडे जाताना विज्ञानाला काहीच अडचण जात नाही. असे विचारधारांच्या बाबतीत होत नाही. एका विचारधारेतून दुसऱ्या विकासधारेकडे प्रवास सुखद आणि सुखकर नसतो. याचे कारण विचारामुळे होणाऱ्या बदलाची मर्यादा आम्ही लक्षात घेत नाही. इतर घटकांमुळे व्यवस्थेत होणाऱ्या बदलांना स्वीकारणे, नाकारणे किंवा त्या बदलांना दिशा देणे हे विचारधारेचे काम आहे. शोधांमुळे आणि साधनांमुळे जसे बदल घडतात तशा प्रकारचे प्रत्यक्ष बदल विचारांमुळे घडत नसतात. बैलगाडीतून मोटारीपर्यंतचा प्रवास करण्यास मानवी जीवनाची तयारी करणे , हा प्रवास सुखकर होईल यासाठी धडपडण्याची प्रेरणा देणे हे विचाराचे आणि विचारधारेचे काम. बैलगाडीतून मोटारीपर्यंत जाण्याचा प्रवास ज्या विचारधारेने सुखकर आणि शक्य होते तो विचार मोटारीपासून विमानापर्यंतचा प्रवास करण्यास प्रेरक ठरेल याची मात्र खात्री देता येत नाही. याचा अर्थ विचाराची उपयुक्तता ही विशिष्ट टप्पा पार पाडण्यासाठीच असते. नवा टप्पा पार पाडताना नवा विचार आवश्यक ठरतो. मानवाच्या किंवा जगाच्या विकासक्रमात विकासाने निर्माण केलेले प्रश्न सोडविणे हे विचारधारेचे काम असते. असे प्रश्न सोडविणे म्हणजे बदल – परिवर्तन समजत असतो. ही समजूतच चुकीची आहे. होणारे बदल मानवी जीवनास उपयुक्त कसे ठरतील याचे दिशादर्शन व मार्गदर्शन तेवढे विचारधारांकडून होत असते. ५००-१००० वर्षापूर्वी व्यवस्थेत होणारे बदल धिम्या गतीने व्हायचे. त्यामुळे त्याकाळच्या विचारधाराना समाजावर दीर्घकाळ विचाराचा ठसा उमटविणे शक्य झाले. समाजमनावर दीर्घकाळ धर्माचा प्रभाव टिकून होता तो बदलाच्या धिम्या गतीने. बदलाची गती वाढली तसतसा त्यांचा प्रभाव कमी होवून दुसऱ्या विचारधारा समोर आल्या. आता बदलाचा वेग एवढा आहे की मागच्या शे-दोनशे वर्षात निर्माण झालेल्या विचारधारा कालबाह्य झाल्या आहेत. आजचे कार्यकर्ते अशा कालबाह्य विचाराचे पाईक आहेत. कालबाह्य विचारांनी नव्या बदलाचा अर्थ कळत नसल्याने कार्यकर्ते निराश आणि संभ्रमित आहेत.
ही निराशा समाजाला प्रागतिक पथावर गतिमान ठेवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांपुरती मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही. मागचे सगळे चांगले आहे अशी समजूत बाळगून समाजाला तिकडे नेवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यातही नैराश्य आहे. भारतात अशा विचारसरणीच्या हाती राजकीय सत्तेची लॉटरी लागल्याने त्यांच्यात खुशीची लहर दिसत असली तरी मूळ ध्येयपूर्तीबाबत अंधारच असल्याची त्यांना जाणीव आहे. कृत्रिम प्रयत्नाने समाज मागे-पुढे जात नसतो. दंडशक्तीच्या आणि कायदेकरून काही काळ समाजाला मागे किंवा पुढे नेता येईल , पण सदैव तसे करणे शक्य नसते. दंडशक्तीच्या बळावर रशियाने समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला तो जसा फसला तसाच प्रयत्न दंडशक्तीच्या जोरावर समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न मुस्लीम जगतात मोठ्या प्रमाणावर आणि भारत-अमेरिकेसारख्या राष्ट्रात अल्पप्रमाणात चालू आहेत. पण अशा प्रयत्नांना होणारा विरोध लक्षात घेतला तर समाजाला मागे नेणे पुढे नेण्यापेक्षाही अवघड आहे. मागे नेणाऱ्या शक्तींचा जोर वाढतो आहे असे आज दिसते याचे प्रमुख कारण अन्य घटकांमुळे समाजव्यवस्थेत होणाऱ्या बदलाच्या गतीचा अर्थ लावून तो बदल रुजविण्यास सहाय्यभूत , अनुकूल ठरेल अशी परिवर्तनवादी विचारधारा नव्याने निर्माण झालेली नाही. अपरिवर्तनवादी विचार नव्याने निर्माण होण्याची गरज नसते. तो सातत्याने अस्तित्वात राहात आला आहे. पोकळी निर्माण झाली आहे ती नव्या परिस्थितीत नवी परिवर्तनवादी मानसिकता तयार करण्यासाठी प्रेरक ठरू शकेल अशा परिवर्तनवादी विचाराची. आजच्या विचारधाराच कालबाह्य ठरल्या असे नाही तर नव्या परिस्थितीत परिवर्तनाच्या चळवळीची औजारे देखील जुनी झाली आहेत. चैतन्य नसलेला सत्याग्रह , बंद , उपोषण अशा मार्गाना आता प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. चंगळवादी संस्कृतीचा हा परिणाम आहे असे समजणे चुकीचे आहे. अस्तित्वातील तत्वज्ञाने कालबाह्य झालीत तशीच या मार्गाची परिणामकारकता कमी झाली इतकेच. नव्या परिवर्तनवादी तत्वज्ञानासाठी आणि नव्या मार्गासाठी आधी जुन्या बेड्या तोडणे गरजेचे आहे. या बेड्या तोडून पोकळीत उडी घेण्याचे साहस सगळ्याच परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यात नसल्याने जुने जोखड मानेवर घेवून पाय घासत चालत आहेत. परिवर्तनाच्या विचाराच्याही बेड्या तयार होत असल्याने योग्य वेळी बेड्या तोडून पुढे जाण्याचे साहस आणि दृष्टी असेल तोच दृष्टा कार्यकर्ता. अशा दृष्ट्या कार्यकर्त्याची आज वानवा आहे. एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या विचार व कार्यकर्त्याच्या बळावर परिवर्तन शक्य नाही हे उमजले तरच नवा विचार , नव्या दमाचे कार्यकर्ते पुढे येतील.
चळवळीचा महामेरू आणि महागुरू आमच्या देशातला. महात्मा गांधी. तत्वज्ञान हे महात्मा गांधीचे क्षेत्र कधीच नव्हते. प्रतिकूल परीस्थितीत चळवळ उभी करणे , चालविणे आणि वेगवेगळे मार्ग वापरून चळवळीचे सातत्य टिकविणे या क्षेत्रातील तो महापंडीत. दीर्घकाळ चळवळ चालविणे , चळवळीतील सातत्य टिकविण्याचा एक मोठा फायदा हा असतो की चळवळीच्या प्रभावाने जुने कार्यकर्ते जुने न होता सतत बदलत राहतात आणि प्रत्येक टप्प्यावर नवे कार्यकर्ते तयार होत राहतात , येत राहतात. चरखा , अपरिग्रह अशा नको त्या गोष्टी आम्ही गांधींकडून घेण्याचा प्रयत्न केला. अस्तित्वात नसलेल्या  गांधी तत्वज्ञानाची निर्मिती करून त्याच्या मागे जाण्यात वेळ आणि शक्ती खर्च करणारांनी त्यांच्या चळवळीचे शस्त्र आणि शास्त्र याकडे दुर्लक्ष करून त्यावर जंग चढू दिला. तत्वज्ञानाची चौकट निर्माण करून तसा समाज घडविण्यात आजवर कोणी यशस्वी झाले नाहीत. तत्वज्ञानाऐवजी दिशेचे भान आणि त्या दिशेने समाजाला नेता येईल अशा चळवळी दीर्घकाळ चालविण्याची धमक दाखविलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिवर्तन घडवून आणले. गांधी त्यातील एक. पण पुन्हा गांधीनी वापरलेली हत्यारे आता चालवीत राहिलो तर त्यात ती परिणामकारकता असणार नाही याचे भान राखले तर परिस्थितीनुसार उपयोगी पडणारी परिवर्तनाची औजारे शोधत राहण्याची प्रेरणा मिळेल. परिवर्तनाच्या मंत्राइतकेच , किंबहुना मंत्रापेक्षा जास्त तंत्राचे महत्व आहे. कारण मंत्र बदलत नाही. तंत्र बदलत राहते. मंत्र घोकत बसले तर परिवर्तनाचा मंत्रजाप करणारे आणि देवदेवतांचा मंत्रजाप करणारे यात फरक राहात नाही. दोघेही सारखेच पोथीनिष्ठ बनतात. परिवर्तनाच्या मंत्राची पोथी होवू द्यायची नसेल तर परिस्थिती बदलासोबत मंत्र आणि तंत्र दोन्ही बदलता आले पाहिजे. गांधी किंवा कुठल्याही नेत्यांच्या , प्रेषितांच्या पाऊलावर पाउल टाकून पुढे जाण्याने हे होणार नाही. त्यांच्यापुढे चार पाउले कार्यकर्त्याला टाकता आली तरच समाजाला चार पाउले पुढे नेता येईल. पण आज कुठल्याही विचारधारेचे कार्यकर्ते असू देत त्यांचा प्रयत्न त्या विचारधारेच्या प्रेषिताच्या पाऊलावर पाउल टाकण्याचा राहतो. ते हे विसरतात की प्रेषितामुळे परिवर्तन घडायचे ते घडून गेले. गरज त्याच्या पुढे जाण्याची आहे. कोणत्याच विचारधारेच्या कार्यकर्त्यांची तशी पुढे जाण्याची तयारी नसल्याने कार्यकर्ते आणि चळवळ आज कुंठीतावस्थेत आहेत.
सभोवतालची परिस्थिती बदलणे ही आज दूरची गोष्ट झाली. गरज कार्यकर्त्यांची परिस्थिती आणि मानसिकता बदलण्याची आहे. माझे दोन अनुभव सांगतो. मी वयाच्या २० व्या वर्षी परिवर्नाच्या चळवळीत उतरलो. २५ व्या वर्षी छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या संस्थापक सदस्यापैकी एक होतो. या संघटनेत काम करण्याची वयोमर्यादा ३० होती. वयाच्या तिशी जवळ येणाऱ्या कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाली. तिशी पार केली की संघर्ष वाहिनी सोडावी लागणार . मग परिवर्तनाचे कार्य पुढे चालवायचे कसे असा प्रश्न त्यांच्या मनात आला. सुरुवातीच्या काळात संघर्ष वाहिनीचे प्रमुख लोकनायक जयप्रकाश नारायण होते. त्यांच्या समोर हा प्रश्न मांडण्यात आला. वयाच्या तिशीपर्यंत परिवर्तनाचे कार्य केल्यानंतरही पुढे स्वबळावर परिवर्तनाचे कार्य करता येत नसेल तर त्यांनी खड्डे खोदण्याचे काम केले पाहिजे असे सरळ उत्तर जयप्रकाश नारायण यांनी दिले. अर्थ स्पष्ट आहे. चळवळीची चाकोरी बनण्याआधीच पुढे पाउल टाकता आले पाहिजे. दुसरा असाच अनुभव शेतकरी संघटनेतही आला. शेतकरी संघटनेच्या चळवळीने दशक ओलांडल्या नंतर एक कुंठीतावस्था निर्माण झाली होती. शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांच्या दुरावस्थेचे तेच प्रमुख कारण आहे हे संघटनेच्या चळवळीने सर्वमान्य झाले होते. संघटनेची उपयुक्तता सिद्ध होवून संपली होती. प्रत्यक्षात भाव मिळण्यासाठी नव्या स्वरुपाची चळवळ , नव्या स्वरूपाच्या संघटनेची व तत्वज्ञानाची गरज होती. संघटनेचे प्रमुख असलेल्या शरद जोशींनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून शेतकरी संघटनेच्या विसर्जनाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. त्या प्रस्तावाला कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध केला . त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला . अशा विरोधामागे संघटनेकडून परिवर्तन घडेल अशा विश्वासापेक्षाही इतकी वर्ष आपण हे काम केले, यातून समाजात एक स्थान निर्माण झाले , ओळख निर्माण झाली ती सोडून पुढे काय करायचे हा त्यांना स्वत:बद्दल वाटणारा अविश्वास अधिक होता. आपण करीत असलेल्या चळवळींना कुंठितावस्था आली की ती चळवळ सोडून पुढे जाता आले पाहिजे. कार्यकर्त्यांची त्याची तयारी असत नाही. त्यामुळे विचाराचे आणि संघटनेचे , चळवळीचे मढे वाहून नेणे तेवढे उरते. परिवर्तनवादी चळवळीच्या आणि कार्यकर्त्यांच्या आजच्या कुंठीतावस्थेचे हे खरे कारण आहे. भौतिक समृद्धी , भौतिक सुखसोयी किंवा चंगळवाद याच्याशी त्याचा काही संबंध नाही. चंगळवादाला वाईट समजणे हेच परिवर्तन विरोधी आहे. ज्ञानेश्वराच्या पसायदानात चंगळवादाचे सशक्त प्रकटीकरण पाहायला मिळते. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हा वेगळ्या शब्दात व्यक्त झालेला चंगळवादच आहे. पसायदान उदात्त आणि चंगळवाद वाईट हा समजुतीचा घोटाळा आहे. अशा गैरसमजुतीवर उभ्या राहणाऱ्या चळवळी यशस्वी होणार नाहीत आणि होवूही नयेत. जगाचा परिवर्तनाचा प्रवास अधिकाधिक सुखसोयी , संपन्नता आणि समृद्धीसाठीच आहे. समृद्धी , संपन्नता वाईट समजणाऱ्या चळवळी समाजाला मागे घेवून जातात. अधिकाधिक समृद्धी आणि अधिकाधिक संपन्नतेची , वैविध्याची आस बाळगणाऱ्या चळवळीच समाजाला पुढे नेत असतात. अशा बदलासाठी विचारात आणि स्वत:त बदल करण्यासाठी तत्पर असावे लागते. या तत्परतेचा अभाव ही आजच्या विचारधारा आणि कार्यकर्त्या समोरील समस्या आणि आव्हान आहे.
——————————————————————————
(लेखक छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे)
९४२२१६८१५८

Previous articleनवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची ‘गम्मत’
Next articleकविता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.